Reflections for the Homily on Feast of Baptism of our Lord (10/01/2016) By: Allwyn Gonsalves.
प्रभू येशूचा स्नानसंस्कार
दिनांक: १०/०१/२०१६.
पहिले वाचन: यशया ४०: १-५, ९-११
दुसरे वाचन: संत पौलाचें तीताला पत्र २:११-१४, ३:४-७
शुभवर्तमान: लूक ३:१५-१६, २१-२२
“तू माझा परमप्रिय पुत्र आहेस,
तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे”
प्रस्तावना :
ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा
करीत आहे. आज पुन्हा एकदा आपण घेतलेल्या स्नानसंस्काराच्या वचनांची पुनरुजुळणी
करण्यास पाचारीत केले जात आहे.
आजच्या पहिल्या
वाचनात यशया संदेष्टा लोकांना तारणप्राप्तीसाठी पश्चाताप आणि देवपुत्राच्या
आगमनाची तयारी करावयास सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल तीताला पाठवलेल्या
पत्रात, सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा तारणारा येशू ख्रिस्त
ह्याच्याद्वारे लाभली आहे असे सांगतो. तसेच आजच्या लूकलिखीत शुभवर्तमानात योहानाने
येशूविषयी केलेली घोषणा, ‘माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे’ असे ऐकावयास मिळते.
स्नानसंस्कार हा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्वाचा संस्कार
आहे. त्याद्वारे आपली ख्रिस्ती श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते. हीच ख्रिस्ती
श्रद्धा अधिक दृढ होण्यासाठी लागणारी कृपा-शक्ती आपणास मिळावी म्हणून आजच्या
मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
योहानाने
लोकांना पश्चाताप करायला सांगितले आणि बाप्तीस्मा करण्याची प्रथा सुरु केली. बाप्तिस्मा हे नाव “बैप्टांयझेन” या ग्रीक शब्दावरून आले आहे त्याचा
अर्थ डुबणे, डुबविणे अथवा बुडवून काढणे असा होतो:
जणु ते ख्रिस्ताच्या मृत्युत पुरले जात आणि नवीन निर्मिती म्हणून त्याच्या पुनरुत्थानात सहभागी होत. संत पौल कलैस्सेकारांस
सांगतो की तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला आणि
ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्याद्वारे
त्याच्या बरोबर उठविले गेला” (कलैस्सेकारांस
२:१२). येशू ख्रिस्त म्हणतो, “पाण्यापासून
व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही” (योहान ३:५). ह्याच ख्रिस्त वचनानुसार
बाप्तीस्मा संस्काराला "पवित्र आत्म्याठायी
नवजीवन" असे सुद्धा म्हटले जाते. योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता “येशू गालीलाहुन यार्देनवर त्याच्याकडे
आला” (मत्तय ३:१३). येशूने संत योहान बाप्तीस्ता ह्याच्या
हस्ते बाप्तिस्मा स्वीकारून मगच आपल्या प्रेषितीय कार्यास सुरवात केली. आपल्या पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या प्रेषितांनाही
ह्याच प्रेषितकार्याची दीक्षा दिली, “तुम्ही जाऊन सर्व राष्टातील लोकांस
शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या
नावाने बाप्तिस्मा दया, जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते
सर्व त्यांस पाळावयास शिकवा”(मत्तय
२८:१९-२०).
जेव्हा
संत योहानाने लोकांस पश्चाताप करण्याचे आवाहन केले तेव्हा येरुशलेम, सर्व यहूदिया व यार्देनच्या आसपासचा
अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला व त्यांनी आपआपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत
योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला (मत्तय ३:५). योहान
येशूविषयी म्हणतो, “मी
पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्च्यातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागून जो येत आहे तो
माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहाणा उचलून चालण्याची
देखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा
बाप्तिस्मा करणार आहे” (मत्तय
३:११).
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये पेत्र लोकांस सांगतो, “पश्चाताप
करा आणि तुमच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू
ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या,म्हणजे तुम्हाला पवित्र आत्माचे दान
मिळेल” (प्रेषितांची
कृत्ये २:३८). येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आणि योहानापेक्षा श्रेष्ठ असूनसुद्धा
येशूने योहानाकडून बाप्तिस्मा का घ्यावा? ह्याचे उत्तर आपणास मत्तय अध्याय ३ ओवी १५ वरून आपणास स्पष्ठ होते की
प्रभू येशूने केवळ पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा स्वेच्छेने स्वीकारला तो फक्त
धर्माचरण परिपूर्ण व्हावे म्हणूनच. जेव्हा येशूने बाप्तिस्मा स्विकारला तेव्हा जो
पवित्र आत्मा जगाच्या प्रारंभी जलाशयावर तळपत होता, तो
आत्मा ख्रिस्तावर पाठवून देवाने नवनिर्मितीच्या कार्याला शुभारंभ करून घोषित केले की, “हा
माझा पुत्र मला परम प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे” (मत्तय ३:१७).
नव्याकरारात
आपण अनेक ठिकाणी पाहतो की अनेक लोकांनी बाप्तिस्मा स्वइच्छेने व विश्वासाने
स्वीकारलेला आहे. उदा. “फिलिप्प
देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा
विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रीया ह्याचा बाप्तिस्मा झाला स्व:ता शिमोनानेही
विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलीप्पाच्या सहवासात राहील” (प्रेषितांची कृत्ये ८:१२-१३), तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा
स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन
हजार माणसाची भर पडली" (प्रेषितांची कृत्ये१६:१५).
बोधकथा:
एका
खेड्यात धर्मगुरूना चर्च बांधायचे होते. चर्च बांधण्यासाठी येणारा अवास्तव्य खर्च
पाहून धर्मगुरूनी लोकांना उदारहस्ते मदत करण्याचे आवाहन केले. लोकांनी उदारहस्ते
मदत करून सुध्दा अवास्तव्य खर्चामुळे चर्चचे काम अपूर्ण राहिले. त्याच गावातील एका
बाईची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती, तिच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थित ना
घर ना दार, अशा बिकट परिस्थितीत ही बाई
धर्मगुरूना १०० रूपयांची
देणगी चर्च बांधण्यासाठी देण्यास तयार होते. परंतु धर्मगुरूंना ह्या बाईच्या आर्थिक परिस्थितीची
जाणीव असल्यामुळे,
धर्मगुरू ती देणगी घेण्यास नकार देतात व त्या बाईस म्हणतात, ''हे कसे शक्य आहे की, मी तुमच्याकडून चर्च बांधणीसाठी
देणगी स्विकारावी, खरे तर मीच तुम्हाला मदत करायला पाहिजे.'' ह्यावर त्या बाईने धर्मगुरूंना सांगितले, ''मी तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु बाप्तिस्माद्वारे मी एक
ख्रिस्ती व्यक्ती व देवाची मुलगी
आहे. तुम्ही माझ्या
परिस्थितीची चिंता करू नका. देवाने ह्या क्षणापर्यंत माझी चांगली देखभाल केलेली आहे व
ह्यापुढेही तो करील ह्याची मला खात्री आहे. बाप्तिस्माद्वारे त्याने माझा
त्याच्या राज्यात परिपुर्ण स्विकार केलेला आहे, तर मग त्याच्या राज्याची घोषणा
करण्यासाठी ह्या आपल्या चर्चसाठी मी माझ्यापरीने मदत का करू नये?''(बाप्तिस्माद्वारे आपण देवाची प्रिय
मुले होतो).
मनन चिंतन:
लूकचे शुभवर्तमान
येशूचा स्नान-संस्कार कसा झाला व बाप्तीस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या येण्याची
कशी तयारी केली हे सांगत आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पापांच्या क्षमेसाठी
पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या अशी घोषणा केली, कारण इस्रायलचे संदेष्टेही हाच
सुपरिचित संदेश देत असत. हाच संदेश योहानाने लोकांना दिला, परंतु तो वेगळ्या
पद्धतीने प्रभूच्या येण्याचा मार्ग तयार करत होता. त्याच्या ह्या घोषणेने तेथील
लोकांचे त्वरित हृद्यपरिवर्तन झाले व त्यांनी लगेचच योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारला. योहान इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने प्रभू येशू
येण्याचा संदेश जगजाहीर केला. योहान घोषणा करताना म्हणत असे ‘माझ्यापेक्षा समर्थ
असा कोणी एक माझ्यामागून येत आहे, त्याच्या पायतनाचा बंध लवून सोडण्याची
देखील पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केलेला आहे. तो तर तुमचा
बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे’. येथे आपणांस योहानाचा नम्रपणा जाणवतो
कारण त्याला माहित होते की, माझ्या मागून जो येत आहे, तो दुसरा कोणी नसून जगाचा
तारणारा प्रभू येशु ख्रिस्त आहे. ह्याची जाणीव त्याला पूर्णपणे असल्यामुळे, त्याने
प्रभूचा मार्ग अतिशय योग्य प्रकारे तयार केला. पण त्याच्यानंतर जो येणार होता तो
आत्म्याने अंत:करणे शुद्ध व नवीन करणार होता. त्यामुळे येथे आपणास येशूचे कार्य हे
योहानापेक्षा वेगळे व सामर्थ्यशाली होते ह्याची प्रचीती येते.
प्रभू येशू गालीलातील नाझरेथहून आला, तेव्हा त्याने
योहानाच्या हातून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला; येशू जरी देवाचा पुत्र होता तरी
त्याने श्रेष्ठपणा दाखवला नाही, तर नम्रपणे तो योहानाकडून बाप्तिस्मा स्विकारतो.
त्यामुळे येशू ‘मानव’ होता हे आपणास दिसून येते. तसेच तो ‘देवपुत्र’ असल्यामुळे
लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले व आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरताना
येशूला दिसला व आकाशवाणी झाली की “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” देवाचा कृपाशीर्वाद
त्याच्यावर येतो. व इथूनच प्रभूयेशुच्या प्रेषितीय कार्याची सुरुवात होते. येथे
मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.
आज पवित्र देऊळमाता ख्रिस्ताच्या बाप्तीस्माचा सण साजरा
करीत आहे. ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या बाप्तीस्म्याची
आठवण करून देतो. आपल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा पाण्याने व पवित्र आत्म्याने झालेला
आहे. देवाने आपल्या सर्वांना त्याची लेकरे म्हणून निवडले आहे आणि ह्याची साक्ष
देण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला जगात पाठवले आहे. आपल्याविषयी देव संतुष्ट
आहे. आपले आईवडील तसेच धर्म-आईबाप आपल्यासाठी देवाला वचने देतात. आपण ती वचने
आपल्या दररोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्याप्रमाणे वागून
आपण जगाला ख्रिस्ताच्या प्रेमाची व दयेची साक्ष देणे गरजेचे आहे.
मदर तेरेसा म्हणत असत, ‘माझ कार्य अथांग सागरातील एका
थेंबाप्रमाणे आहे’. मदरचे प्रचंड कार्य पाहता त्यांनी प्रौढी मिरवली असती, पण
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे तिच्यात जगावेगळी नम्रता होती. मदरप्रमाणे
आपल्याला ही नम्रता धारण करता येणे हे प्रभूच्या कार्यासाठी अगत्याचे आहे.
ख्रिस्त मला त्याच्या कार्यासाठी खूप प्रकारे बोलावत आहे.
त्यासाठी चर्च हे उत्तम प्रकारचे कार्य करण्याचे साधन आहे. चर्च-सलग्न खुप काही
संघटना आहेत. एखाद्या संघटनेत सहभागी होऊन देवाचे कार्य करूया. म्हणजे खरे
ख्रिस्ती असल्याचा अभिमान वाटेल. तसेच बाप्तिस्म्यातला आपला पवित्र आत्मा आपल्याला
त्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल. देवाचे कार्य करण्यासाठी खूप तरुणांनी पुढे यावे व
देवाची सुवार्ता सर्वत्र पसरावी म्हणून आपण आजच्या स्नानसंस्काराच्या सणादिवशी खास
प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐकुन घे.
१. आपल्या ख्रिस्तसभेच्या धार्मिक
अधिकारा-यांना देवराज्याची सुवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव दूर होऊन सर्वत्र
शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना
योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या कामधंदयावर परमेश्वराचा आशीर्वाद
असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. स्नानसंस्काराद्वारे आपल्यावर
असलेल्या ख्रिस्ती जबाबदारीची आपणांस जाणीव व्हावी व स्नानसंस्काराच्या वचनांशी आपण सदैव एकनिष्ठ राहावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या
धर्मग्रामातील ज्या व्यक्ती
आजारी, निराशीत आणि दु:खी कष्टी आहेत अश्या सर्वांना दैवीदयेचा स्पर्श होऊन, त्यांचे जीवन प्रभूप्रेमाने
प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
Dear Allwyn very deep reflection.... Very nice may God has chosen u to write such reflection....it will touch many peoples' life. All the best for ur future ministry
ReplyDelete