Wednesday, 29 June 2016



Reflection for the Homily of Fourteenth Sunday in Ordinary Time C (03-07-2016)  By Lavet Fernandes.




सामान्य काळातील चौदावा रविवार

(संत थॉमस: भारताचा प्रेषित)

दिनांक: ०३/०७/२०१६.
यशया: ६६:१०-१४.
गलतीकरांस पत्र: ६:१४-१८.
लूक: १०:१-१२, १७-२०.



तुम्हांला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.



प्रस्तावना:

     आज आपण सामान्यकाळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज आपण संत थॉमस, भारताचा प्रेषित ह्यांचादेखील सण साजरा करीत आहोत.
यशयाने जी भविष्यवाणी केली होती ती कधीच पूर्ण होणार नाही असे इस्रायल लोकांना वाटले; परंतु हीच भविष्यवाणी ख्रिस्ताद्वारे पूर्ण झाली आहे. हे आपल्याला यशया संदेष्टा पहिल्या वाचनामध्ये सांगत आहे. गलतीकरांस पत्र यामध्ये संत पौल त्याला मिळालेल्या आशिर्वादाबद्दल तसेच त्याच्या ख्रिस्ती धर्मामध्ये झालेल्या धर्मांतर व पाचारणाविषयी बोलत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये संत लूक बारा शिष्यांचे व त्यांच्या मिशन कार्याचे वर्णन करतो.
संत थॉमस ह्यांनी दोन हजार वर्षांपूर्वी भारतात येऊन मिशन कार्य व लोकांचा विश्वास दृढ करण्याचे कार्य केले. शांतीचा संदेश त्यांनी भारताच्या बऱ्याच भागांत पोहोचवला; जेणेकरून आपण सर्वजण शांतीने जीवन जगू आणि हेच कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी देऊळमाता आज आपणा सर्वांना बोलावत आहे.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया ६६:१०-१४

यशया संदेष्टा पहिल्या वाचनामध्ये हद्दपार करून आलेल्या लोकांना प्रोत्साहन करीत आहे की, त्यांनी नवीन शहर उभारले पाहिजे. लोकांनी आपली आशा देवावर ठेऊन सर्व संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे तिकडे नवीन येरुशलेम येईल आणि सर्व जगभर शांतीचे वातावरण असेल यावर विश्वास ठेवला.
     यशयाने केलेली भविष्यवाणी पूर्ण होणार नाही असे इस्रायल लोकांना वाटले परंतु हिच भविष्यवाणी ख्रिस्ताद्वारे पूर्ण झाली आहे. पण ही भविष्यवाणी पूर्णत: देवाच्या स्वर्गीय राज्यामध्ये खरोखर पूर्ण होणार असे संदेष्ट्यांनी त्यांना सांगितले होते.
जे चर्च ख्रिस्ताने स्थापन केले होते, ते आता पृथ्वीवर नवीन येरुशलेम झाले आहे. हेच चर्च आता मुख्य व सर्वांचे घर झाले असून, त्यामध्ये सर्व प्रकारचे लोक येतात. आता सर्व ख्रिस्ती लोक खात्रीने ह्या नवीन येरुशलेमचा आनंद व उल्हास करू शकतात. ती स्वर्गीय येरुशलेम सर्वांची वाट पाहत आहे. जेथे आपण सर्वजण जीवनाचे धडे शिकू शकतो व तिथे आपल्या सर्व  इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील आणि त्या जीवनाला कधीच अंत नसणार.

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ६:१४-१८

     गलतीकरांस पत्र यामध्ये संत पौल त्याला मिळालेल्या आशीर्वादाबाद्दल व त्याचे ख्रिस्तीधर्मामध्ये झालेलं धर्मांतर याविषयी बोलत आहे. त्याला आता कोणतीच वस्तुस्थिती महत्वाची वाटत नाही. परंतु फक्त वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण तो त्याच्या डोळ्यासमोर व स्मृतीत ठेवत आहे. संत पौल पुढे सांगत आहे की, कालवरीचा प्रसंग आणि येशू ख्रिस्ताचे मरण ह्या त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना होत्या. त्याद्वारे ख्रिस्ताने पित्याची अखंड आज्ञा पालन केली आणि आता तो देवाचा पुत्र झाला आहे.
     येशू ख्रिस्ताच्या कालवरीवरील भूमिकेने ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी सार्वकालिक योजना आखल्या आहे. संत पौल आता सर्व ख्रिस्ती आणि ज्यू लोकांसाठी प्रार्थना करतो की, आता ते सर्व देवाचे नवीन इस्रायल झाले आहेत. आता त्यांना देवाची शांती व दया दाखविण्यात आली आहे, जेणेकरून ते सर्व ह्या दृष्टीकोनातून नवीन जीवन जगतील.

शुभवर्तमान: लूक १०:१

     संत लूक शुभवर्तमानामध्ये बारा शिष्यांचे वर्णन करत आहे. ख्रिस्त त्यांना मिशन कार्यासाठी पाठवतो. जेणेकरून त्यांनी देवाची सुवार्ता पसरावी. त्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना गावांमध्ये व शहरामध्ये पाठवतो. येशूचेजवळ बारा शिष्य असून तो अजून बहात्तर शिष्यांची निवड करतो व त्यांना मिशन कार्यासाठी पाठवतो. येशूची शिकवण त्यांनी घेतली होती. येशू ख्रिस्त त्यांनाही सुवार्ता घोषित करण्यासाठी पाठवतो. जेणेकरून ते येशूच्या येण्याची तयारी करतील आणि त्याचा मार्ग मोकळा करतील.
     बारा जणांचा नंबर हा फक्त शिष्यांसाठी मर्यादित होता. कारण बारा शिष्य हे इस्रायल वंशाचे बारा नेते म्हणून संबोधले गेले होते. तर ते बहात्तरजण वडिलधारी माणसांचे प्रतिनिधित्व करत होते; जुन्या करारातदेखील मोशेने अशाच सत्तर जणांची निवड करून त्यांना इतर लोकांचे प्रतिनिधी बनवले होते, जेणेकरून ते त्याला लोकांची व्यवस्था पाहण्यासाठी मदत करतील. संत लूक आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की पिक फार आहे; परंतु कामगार पुष्कळ कमी आहेत. त्यामुळे आपल्याला प्रार्थना करण्याची फार गरज आहे. जेणेकरून आपल्याला कामगार भेटतील व देवाचे राज्य पुढे नेता येईल.
‘घरात शांती असो’- ज्यू लोकांच्या घरी नमस्कार करण्याची पद्धत नेहमीच्या प्रमाणे निरर्थक व रिक्त होती. येशू ख्रिस्ताने शिष्यांना सूचना दिल्या होत्या की शिष्यांनी ज्यू लोकांच्या घरी जाऊन त्यांना देवाची शांती वा आशीर्वाद प्रदान करावा. हि येशू ख्रिस्ताची इच्छा होती. परंतु जर ते रहिवासी योग्य नसतील तर तो आशीर्वाद पुन्हा तुमच्याकडे परत येईल व त्यांचा काही परिणाम होणार नाही. जर तुम्हांला कोणत्या कुटुंबाने स्वीकारलं, तर त्यांच्या घरी राहा आणि तुमचे कार्य पूर्ण करा. जेणेकरून तुमचे हे कार्य अनावश्यक व शांतताभंग करून कुटुंबे उध्वस्त करणार नाहीत. जर तुम्हांला एखाद्या गावात किंवा शहरात स्वीकारलं आणि जर जेवण व निवारा दिला तर तुम्ही काही वेळ तिथे थांबा; तसेच येशू ख्रिस्ताने शिष्यांना शक्ती दिली होती, जेणेकरून ते रोग्यांना बरे करतील व लोकांना सांगतील की देवाचे राज्य जवळ आले आहे. रक्षणकर्ता व त्राता येऊन गेला, हे सर्व सार शिष्यांना जाहीर करायचं होतं.

बोधकथा

     संत ग्रेगरी जेव्हा छोटे होते, तेव्हा त्यांचे वडील फार आजारी होते व मरणाच्या खाटेला खिळून पडले होते. संत ग्रेगरी त्यांचे वडील लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून दररोज प्रार्थना करायचे. एकदा संत ग्रेगरी गाढ झोपेत असताना एक देवदूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व त्यांना म्हणाला की, ‘तू येशूचे नाव एका कागदावर लिहून आजारी माणसाच्या उशीखाली ठेव’. सकाळी ग्रेगरी उठल्यावर ते आपल्या आईला हा देवदूताचा संदेश सांगतात व हे दृश्य सांगून झाल्यावर त्यांची आई त्यांना हे वचन पाळावयास सांगते. आईने सांगितल्याप्रमाणे ते तसे करतात. संत ग्रेगरी आपल्या वडिलांच्या डोक्याखाली येशूचे नाव असलेले एक कागद ठेवतात; तर काय चमत्कार घडून येतो? त्या कुटुंबात संत ग्रेगरी यांच्या वडिलांची प्रकृती बरी होण्याच्या मार्गावर होती. त्यांना पहिल्यापेक्षा अधिक पटीने बरे वाटू लागले.

मनन चिंतन:

येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शक्ती आणि सामर्थ्य आहे; जर ख्रिस्ताचे नाव आपल्या हृदयात व ओठावर असेल आणि जर त्याचे नाव विश्वासाने घेतले तर आपण आपल्या जीवनात चमत्कार पाहतो, हे आपल्याला येशूच्या शिष्यांनी केलेल्या कामगीरीवरून समजून येते.
     आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की, सत्तर शिष्य जेव्हा त्यांच्या मिशन कार्यावरून परत आले, तेव्हा ते फार आनंदी आणि उत्साहित होते. ते येशू ख्रिस्ताला सांगत होते की, ‘गुरुजी तुमच्या नावामध्ये फार शक्ती आहे. तुमच्या नावाने आम्ही भूतंदेखील बाहेर काढली’ (लूक १०:१७). शिष्यांनी येशूच्या नावामध्ये शक्ती आहे हे त्यांच्या कार्यातून अनुभवले होते. येशू ख्रिस्ताचं नाव हे फक्त सुंदर नसून त्यामध्ये फार मोठी शक्ती आहे.
     हेलन केलर ह्या प्रसिद्ध व नावाजलेल्या व्यक्तीची एक प्रेरणात्मक गोष्ट सांगितली जाते. ती बघू शकत नव्हती. एकदा देवाने तिला फार गहन असा प्रश्न विचारला, ‘तुझी अशी कोणती इच्छा आहे की, जी मी आता पूर्ण करू शकतो’?. बाजूला लोकांचा फार मोठा घोळका होता. त्यांना वाटले की, ती देवाकडे तिची दृष्टी मागेल, परंतु लोकांकरीता आश्चर्यास्पद अशी घटना घडली. तिने देवाकडे स्वत:साठी दृष्टी न मागता, देवाकडे जगात शांतता व शांती असावी अशी मागणी केली.
     प्रत्येकाच्या मनात व हृदयात एक भावना असते व त्या भावनेला एक तहान लागलेली असते, ती तहान म्हणजे शांतीची. प्रत्येकाला वाटते की, प्रत्येकाच्या जीवनात, घरात, गावात व देशात शांतता नांदावी. येशू ख्रिस्ताने शिष्यांना सुवार्ता पसरविण्यासाठी वेगवेगळ्या गावात व शहरांत पाठविले जेणेकरून ते लोकांना शांतीची सुवार्ता सांगतील व ‘तुम्हांबरोबर देवाची शांती असो’ हि सलामी देतील. येशू ख्रिस्ताने फक्त बारा शिष्यांनाच न पाठवता बहात्तर इतर शिष्यांनादेखील शांतीचा संदेश देण्यासाठी पाठवले व त्यांच्याद्वारे ख्रिस्ताने संपूर्ण देऊळमातेची निवड केली जेणेकरून आपण सर्वजण शांतीसंदेशाचे वाहक बनावेत.
     आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन जगू शकतो. परंतु शांतीच्या मार्गावर चालणे म्हणजे लोकांना जवळ आणणे होय. जर कोणी आपल्यावर चिडला, आपली टिंगल टवाळी केली, अब्रू घालवली तर आपण शांतीचे जीवन जगून एक आदर्श त्यांच्यापुढे मांडायला हवा. शांतीचा मार्ग पकडणे म्हणजेच लोकांना समजुन घेणे ज्याप्रकारे लोक आहेत त्याप्रकारे त्यांना समजण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्या मर्यादांवर व कामजोरीवर मात करणे. आपण शांती फक्त आपल्या मित्रांबरोबरच नव्हे तर आपल्या शत्रूवरही दाखवावी. ख्रिस्त ह्या जगात आला जेणेकरून आपल्याला जीवनात मुक्ती किंवा सुटका मिळेल. येशू ख्रिस्ताने आपली भीती व वेदना दूर केल्या आणि आपणास शांतीदूत बनण्यास पात्र केले.
आपली शांती काही ठिकाणी स्वीकारली किंवा मान्य केली जात नाही. परंतु ती आपल्याकडे एखाद्या ‘एकोसारखी’ (प्रतीध्वनी) परत येईल. आपली शांती स्वीकारली नाही म्हणून खचून न जाता, शांती पसरविण्याचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. आजचे जग स्पर्धात्मक जग आहे. त्यामुळे इथे कोणीही इतरांच्या बाबतीत विचार करण्यास धजत नाही. ते एका दृष्टीकोनातून फाटून गेले आहे. जेथे राग द्वेष व मत्सर आहे. तेथे आपल्याला आव्हानात्मक मिशन कार्य करायचे आहे व लोकांच्या जीवनात एक आदर्श बनायचे आहे. जेथे फाटाफूट आहे तेथे आपल्याला पूल बांधण्याचे कार्य करून सर्व जखमा भरून काढायच्या आहेत. हेच कार्य संत थॅामस येशूचा शिष्य ह्याने भारतात येऊन केले. त्याचा सण आपण आज साजरा करीत आहोत. संत थॅामस ह्याने भारतात येऊन लोकांची मने जिंकली व येशूविषयी शांतीची सुवार्ता भारतात पुष्कळ अशा ठिकाणी पसरवली आणि येशू ख्रिस्ताचा एक खरा व सच्चा शिष्य म्हणून त्याचे मिशन कार्य पूर्णत्वास नेले.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरु व धर्मभगिनी ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे, त्यांना देवाचा कृपाशीर्वाद मिळावा व देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगात सर्व ठिकाणी अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी अशांतता निर्माण झाली आहे. जीवन जगणे फार धोक्याचे झाले आहे. त्यासाठी जगात शांतीचे वातावरण निर्माण व्हावे व सर्वांनी ऐक्याने राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. यावर्षी चांगला पाऊस पडावा व शेतकऱ्यांना चांगले पिक घेता यावे किंबहुना त्यांच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.







Friday, 24 June 2016



Reflection for the Homily of Thirteenth Sunday in Ordinary Time  (26-06-2016)  By Wilson Gonsalves.





 सामान्यकाळातील तेरावा रविवार

दिनांक: २६//२०१६.  
पहिले वाचन: राजे १९: १६,१९-२१
दुसरे वाचन: गलीतीकरांस :,१३-१८ 
शुभवर्तमान: लूक :५१-६२   



‘नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देव राज्यास उपयोगी नाही’



प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. ख्रिस्ती जीवन हे शिष्यत्वाचे जीवन आहे म्हणूनच आजच्या उपासनेतील तीनही वाचने आपणाला देवाच्या सुवार्तेचा प्रसार करण्यास पाचारीत आहेत.
आजच्या पहिल्या वाचनात देवाने एलीयाद्वारे एलिशाला केलेल्या पाचारणाविषयी ऐकतो. गलतीकरास पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात तुम्हांला स्वतंत्रतेकरीता पाचारण करण्यात आले आहे असे म्हणतो. तर शुभवर्तमानात प्रभू येशू त्याचा पाठलाग करू पाहणार्यांना  स्पष्ट सांगतो की, ‘जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही’.
स्वत:ला केंद्र्स्थानी ठेवून जगाकडे पाहणारी व्यक्ती फक्त स्वत:च्या विकासासाठी काम करू शकते. देवराज्याची स्थापना करण्यासाठी असा उपयुक्तवादी दृष्टीकोण निरुपयोगी आहे. आज येशू ख्रिस्त आपणाला देखील त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यास बोलावीत आहे, येशूच्या ह्या मिशन कार्यामध्ये हातभार लावण्यास आपणाला त्याची कृपा शक्ती मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीमध्ये प्रार्थना करून त्याच्या कृपेची याचना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: राजे १९: १६,१९-२१.

राजे  ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये देव द्या करतो तेव्हा त्याचा अनादर करू नकोस. नम्र हो त्याची श्रेष्ठता ओळख. देव एलीयाशी किती प्रीतीने वागला. त्याला चांगले अन्न पूर्ण विश्रांतीची गरज होती तेंव्हा देवाने प्रथम त्याला त्याचा पुरवठा केला.
मी अपयशी झालो आता एकटाच उरलो आहे. इस्राएलि लोकांनी पश्चाताप करून देवाकडे वळावे या जळणाऱ्या आवेशाने एलिया भरलेला होता यासाठीच देवाने पाउस पाठवू नये अशी त्याने प्रार्थना केली होती. मी न्याय करणार आहे. मी आपले कार्य चालू ठेवणार आहे. निराशेवर एक उत्तम उपाय आहे, प्रभूने दिलेल्या कामास परत सुरवात करणे. प्रभूच्या आज्ञा पाळण्यास सुरवात करणे. निराशेत स्वता:ची कीव करणाऱ्या एलीयाला देवाने आज्ञा दिल्या. देवाने एलीयाला देव स्वता: करीत असलेल्या कार्याची कल्पना दिली. देवाने जसे एलीयाला घर दिले होते, तसेच सात हजारांना यहोवा देवाशी एकनिष्ठ राहण्यास बळ पुरवले होते. आपण एकटेच प्रभूची सेवा करीत आहोत हि कल्पना चुकीची असते! देवाने जे सांगितले ते एकून एलीयाला काय वाटले असेल? एलीयाने लगेच आज्ञापालन करण्यास सुरवात केली आणि देवाने त्याला अलिशासारखा देवाशी एकनिष्ठ असलेला देवाने घडविलेला सोबती दिला.   
                
दुसरे वाचन: गलतीकरांस :,१३-१८ 

आजच्या दुसऱ्या वाचनात आपण असे ऐकतो की आत्म्याच्या प्रेरणेने सामथ्याने चालत राहा. नीतिमान राहण्यासाठी यहुदी बनणे याचा अर्थ समजून घ्या. परराष्ट्रीय लोकांतून ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता, त्यांना तेथे आलेले खोटे शिक्षक यहुदी बनण्यास सांगत होते.
खरे ख्रिस्ती जीवन ख्रिस्तावरील विश्वासाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. देवाची प्रीती कृपा याचा सततचा पुरवठा त्यांस होत असतो. ते खोटे शिक्षण देणारे मरणदंडास पात्र होते. सध्याच्या काळात खोटे शिक्षण देणारे आहेत. ते ख्रिस्तावरील विश्वासापासून  दूर करून अनुभवावर अवलंबून राहण्यास सांगतात.
प्रीतीने वागण्याचे रहस्य घ्या. आत्म्याच्या प्रेरणेने चला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही, हे प्रीतीने वागण्याचे एकमेव रहस्य आहे असे संत पौल सांगत आहे. स्वशक्तीने आपणाला देहस्वभावावर विजय मिळत नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये पवित्र आत्मा वसती करतो. आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहू तर प्रीतीने वागू. आमच्या मनात आनंद शांती राहील. इतरांबारोरोबर  आपण सहनशीलतेने, ममतेने चांगुलपणाने वागू. आपण विश्वासू, सौम्य स्वता:वर नियंत्रण असणारे असावे. हेच प्रीतीने भरलेले जीवन आहे. हेच संत पौलाच्यामते खरे ख्रिस्ती जीवन आहे.

शुभवर्तमान: लूक :५१-६२   

आजच्या पवित्र शुभवर्तमामध्ये प्रभूची सेवा करणारे कसे असावेत ह्याबद्दल शिकवणूक दिली आहे. ख्रिस्ताप्रमाणे दृढनिश्चयाने पुढे जाणारे असा संदेश आपल्याला ह्या प्रस्तूत उताऱ्यातून मिळतो. या मार्गावर वधस्तंभावरच्या मरणाचा अनुभव आहे हे त्याला माहित होते. दृढनिश्चयाने त्याने तिकडे आपले तोंड वळविले. विरोध करणाऱ्याकडे त्याने दुर्लक्ष केले. तो लोकांच्या तारणासाठी आला होता; सूड उगविण्याचा विचार करणाऱ्या आपल्या शिष्यांना त्याने धमकाविले. प्रभूच्या सेवेत आपली मने त्याची इच्छा पूर्ण करणाऱ्यामध्ये गुंतलेली असावीत असा उपदेश आपल्याला ह्यातून प्राप्त होतो. 

बोधकथा:

आनंदवन नावाच्या एका जंगलात एका साधूचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये वीस पंचवीस शिकाऊ शिष्य होते. सर्वजण एकत्र साधूच्या मोठ्या पर्णकुटीत राहत होते आणि एक मैलभर अंतरावर त्या साधूची शेती होते. साधूचे शिष्य आळीपाळीने त्या शेतीची मशागत करत असे. पावसाळा चालू होता आणि त्या शेतामध्ये साधूच्या शिष्यांनी भाताची लागवड केली होती. भाताच्या पिकाला भरपूर पाणी लागते, म्हणून दर तिसऱ्या दिवशी साधू आपल्या एकेक शिष्याला संध्याकाळच्या वेळेला त्या शेतीवर पाठवयाचे आणि शेतात पाणी आहे किंवा कुठे बांध फुटून पाणी वाहून जात असेल, तर ते अडवायला पाठवत असे.
एक दिवस संध्याकाळी साधू महाराजांनी एका शिष्याला तेथे पाठवले. तो तेथे पोहचल्यावर बघतो तर भातशेतीच्या एका शेताचा बांध फुटलेला आणि शेतातल सर्व पाणी वाया जात असताना त्यास आढळले. तो शिष्य तेथे गेला आणि त्याने आजूबाजूचा चिखल, माती, दगड गोळा करून तो बांध निट केला, परतू दहा मिनिटांच्या अवधीत तो परत फुटला. त्या शिष्याने परत एकदा सर्व शक्ती पणाला लावून  तो बांध परत निट केला, परंतू पंधरा मिनिटांच्या अवकशात तोहि फुटला. सूर्य अस्ताला गेला होता. शिष्य थोडा नाराज झाला पण हिंमत हरला नाही आता त्याने तिसऱ्या वेळेला बांध नीट केला, तो बांध फुटू नये म्हणून हातपाय पसरून त्यावर तो आडवा झोपला. त्यामुळे बांधाला मजबुती आली. पण एव्हाना रात्र आणि काळोख झाला. पण तो शिष्य सकाळ होईपर्यंत त्याच अवस्थेत राहिला.
          येथे घरी आश्रमामध्ये साधू आणि इतर शिष्यांनी काळजी लागली कि शेती पाहायला पाठवलेला शिष्य घरात परत आला नाही. मग सकाळी पाचच्या सुमारास साधू दोन शिष्य शेतीकडे गेले. तेथे जवळ पोहचताच त्या शिष्याच नाव घेऊन साधू मोठ्याने हाक मारू लागले, त्यांच्या हाकेला मिळताच त्यांच्या जीवात जीव आला. मग खूप जवळ जाताच तो शिष्य एका शेताच्या बाधावर आडवा होऊन झोपलेला त्यांना दिसला. त्यांनी त्याला हात देऊन उभा केला आणि विचारलं, ‘अरे, आम्ही संपूर्ण रात्र जागे राहून चींताग्रस्त झालो होतो आणि तू येथे ह्या शेतीच्या बाधावर का झोपलास’?
          ‘क्षमा असावी महाराज’, तो म्हणाला; शेती बघायला पाठवताना आपण मला म्हणालात कि कुठे शेताचा बांध फुटून पाणी वाहून वाया जात असेल तर बांध पुन्हा बांधून पाणी अडवून ठेव. त्या शेताचा बांध फुटला होता पाणी वाहत राहून वाया जात होतं. दोन वेळा मी तो बांध तयार केला पण पाण्याच्या शक्तीने फुटला. मग तिसऱ्या वेळेला बांध पुन्हा बाधून तो फुटून पाणी वाया जाऊ नये म्हणून मी त्यावर आडवा झोपून त्याला बळकटी दिली. वरिष्ठांच आज्ञपालन करताना स्वता:च्या जीवाचीही पर्वा करणारा तो आदर्श शिष्य! ‘शिष्य असावा तर असा’! साधू महाराजांनी त्याला शाबासकी दिली
   
मनन चिंतन      
                                           
१. आज जगात अनेक प्रकारचे गुरु आहेत. राजकीय गुरु, धर्मिक गुरु . परंतू अनेकदा गुरुचे अनुयायाचे मतभेद होऊन शिष्यगण नव-नवीन गुरूच्या शोधात असतात. कित्येकदा अशा शोधातच अखंड जीवन व्यथीत होते. बहुतेकदा असे असते की शिष्यगण स्वता:चा फायदा किती ह्याचे तोलमोल करतात. जेथे अधिक फायदा तेथे आपला गुरु आपले सर्वस्व. ख्रिस्त हि परंपरा मोडू इच्छितो. स्वता:च्या फायद्यावरून गुरु अथवा देव ठरवू नये. त्यावरून ठरवलेले गुरु कालांतराने अपेक्षाभंग करतात.
प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी व्हायचे असेल तर सर्व बाह्य गोष्टीचा तर त्याग हवाच, परतू स्वता:च्या इच्छा, आकांक्षेचा देखील त्याग घडायला हवा. अशा त्यागी वृतीचा इतरांच्या कल्याणासाठी मोठ्यामनाने, मोकळ्या वृतीने पुढे सरसावू शकतो. निस्वर्थीपणातून उदयास आलेला परोपकार खरे स्वर्गसुख देवू शकतो.                                                                         

          अशा व्यक्तीचा धर्म नसतो, जात नसते, विशिष्ट देश अथवा विचारप्रणाली नसते. ह्या सर्व बाबी व्यक्तीला बंदिस्त करतात. बंदिस्त व्यक्ती कुणाचे शिष्यत्व स्वीकारू शकत नाही.
          प्रभू येशू आम्हां सर्वांना आव्हान करीत आहे. स्वता:चा त्याग करण्यासाठी. जगात स्वार्थ ओतप्रोत भरलेला आहे. अशा स्थितीत स्वार्थ सोडणे खरोखरच आव्हानात्मक क्रांतीकारक ठरू शकेल. अशी क्रांती प्रत्यके क्षेत्रात घडावी ह्यासाठी हि संधी आहे. प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्ताचा सुवार्तिक असतो. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. जीवनातील दैनंदिन कृतीद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता प्रकट करण्यासाठी देवाची कृपा मिळावी, म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
२. पूर्ण मनाने ख्रिस्ताचे शिष्य बनणारे व्हा. यासाठी आपण तीन अडथळे दूर केले पाहिजेत. या विभागातील हे तिघेजण ख्रिस्ताचे शिष्य बनू शकत नव्हते.
    पहिला, स्वता:च्या सुखसोयींना दूर सारून ख्रिस्ताची सेवा करण्यास तयार नव्हता. त्याची इच्छा होती,पण ख्रिस्ताने त्याला बोलाविले नव्हते. त्याला उत्तर देताना त्याला कोणती किंमत द्यावी लागेल ते ख्रिस्ताने आपल्या उदाहरणाद्वारे सांगितले. डोके टेकावयास ठिकाण नसणे हि कीव करण्याची गोष्ट नसून शिष्य होण्याची किंमत आहे.
दुसरा, हा ख्रिस्ताला विनाअट प्रथम स्थान देणार नव्हता. तो ख्रिस्ताला प्रभुजी म्हणतो तेव्हाच स्वता:ची योजना मांडतो. ख्रिस्ताची सेवा करायची असेल तर तो आपल्या दररोजच्या जीवनात प्रभू असला पाहिजे. ज्या गोष्टी तारलेले लोक करू शकतात त्यांना विश्वासणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्राधान्य देऊ नये.
तिसरा, हा पहिल्या दुसऱ्यासारखा आहे. त्याचे मन आपल्याच गोष्टीत गुंतलेले आहे. ख्रिस्त त्याचा प्रभू नाही. मागे पाहत शेत नांगरात येत नाही. आपण खरे शिष्य असू तरच प्रभूची मनोभावे सेवा करू.
ख्रिस्ताने ७२ जणांना सुवार्ता सांगण्यास पाठविले तेव्हा त्याने सेवेची काही मोलाची तत्वे सांगितले. दोघे असे त्याने पाठविले. त्यांनी सतत प्रार्थना करावी. तीव्र विरोध ख्रिस्ताचा द्वेष करणाऱ्याकडे तो आपल्या सेवकांना पाठवितो. स्वता:च्या सुखसोयीच्या मागे लागू नये. उगीचच गप्पा मारण्यात आपला वेळ घालवत बसू नये. जो पाहुणचार मिळेल त्याचा आनंदाने स्विकार करा. कोणत्याही परिस्थितीत सुवार्ता सांगत रहा. ज्यांना आपल्या प्रभूची सेवा करायची आहे त्यांनी स्वता:ची कसून परीक्षा करायला हवी.                                
     
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आम्हाला तुझे निष्ठावंत सेवक बनव.

. आपल्या सेवाकार्याद्वारे  ख्रिस्ताची ओळख जगाला करून देणारे आमचे परमगुरु, महागुरू  धर्मगुरू ह्यांना परमेश्वराने आध्यात्मिक बळ, चांगले आरोग्य दीर्घायुष्य देऊन आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न अडचणी जाणून घ्याव्यात देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगावे. आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे आणि उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. ह्यावर्षी परमेश्वराने चांगली पर्जन्यवृष्टी करून आपल्या देशातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.