Thursday, 9 June 2016



Reflection for the Homily of Eleventh Sunday in Ordinary Time  (12-06-2016)  By Brendon Noon.







सामान्य काळातील अकरावा रविवार

दिनांक: १२-०६-२०१६.
पहिले वाचन: २ शमुवेल १२: ७-१०;१३.
दुसरे वाचन: गलतीकारांस पत्र २:१६; १९-२१.
शुभवर्तमान: लूक ७: ३६; ८:३.




"हिची जी पुष्कळ पापं आहेत त्यांची क्षमा केली आहे"




प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेत, परमेश्वर आपणा सर्वांना, इतरांना क्षमा करून त्यांच्यावर प्रेम करण्यास पाचारण करत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकणार आहोत की, दाविद राजा पापास बळी पडला. ह्या कृत्यामुळे तो क्षमेस अपात्र होता, परंतु आपला परमेश्वर पापांचा धिक्कार करतो व मानवावर प्रेम करतो म्हणून दावीद राजाने पापक्षमा मागितली असता त्याच्या पापांची त्याला क्षमा झाली. शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने पापी स्त्रीला तीच्या पापांची क्षमा केली. दाविद राजा व पापी स्त्री ह्या दोघांनी पश्चाताप केला म्हणून त्यांना त्यांच्या पापांची क्षमा झाली.   
     आपला परमेश्वर दयेचा उगम व करुणेचा अथांग सागर आहे. आपण पश्चातापी अंतकरणाने त्याच्याकडे क्षमा मागितली असता तो आपल्या पापांची आपल्याला क्षमा करतो म्हणून ह्या पवित्र मिसाबलीदानात सहभागी होत असताना थोडावेळ शांत राहून, आपणही खऱ्या अंतकरणाने पश्चाताप करून परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन:  २ शमुवेल १२: ७-१०;१३.

देवनियुक्त इस्रायलचा दुसरा राजा, देवाचा व त्याच्या लोकांचा मध्यस्थी करणारा दाविद राजा ह्याने देवाची हेळसांड करून त्याला दु:खविले होते. त्याने त्याचा सैनिक उरिया ह्याच्या पत्नीचा उपभोग घेऊन पाप केले. त्याच्या स्वत:च्या पापावर पडदा घालावा व त्यातून तो निर्दोष असावा म्हणून त्याने उरीयास रणक्षेत्रावरून बोलावून घेतले व त्यास मद्य प्राशन करवून घरी जावयास आज्ञा केली; परंतु तसे काहीही घडले नाही. नंतर त्यास युद्धात ठार मारावयाच्या हेतूने, त्यास सैन्याच्या समोरच्या तुकडीत ठेवून वध करविला. बेथशेबा ह्या त्याच्या बायकोला त्याने स्वत:ची पत्नी करून घेतले. त्याला देवाचा विसर पडला होता. देवाच्या नजरेत जे पाप होते ते त्याने स्वीकारले. शेजाऱ्याविरुद्ध घडवून आणलेले पाप हे देवास अमान्य आहे हे येथे स्पष्ट होते. दावीद राजाने पाप करून देवाचा अवमान केला होता. परंतु v.१३. मध्ये आपण ऐकतो की, त्याला त्याच्या पापांची जाणीव झाली व त्याने त्याखातर क्षमा मागितली. दावीद राजाची नम्रता आणि देवावर असलेला प्रबळ विश्वास येथे प्रकट होतो. ह्याच लीन व प्रबळ विश्वासामुळे त्याचे तारण झाले व त्याच्यावर कोणताही जीवघेणा प्रसंग ओढवला नाही.

दुसरे वाचन: गलतीकारांस पत्र २:१६; १९-२१.

     प्रस्तुत उताऱ्यात आपल्याला पेत्र आणि पौल ह्यांच्यात ख्रिस्ती परराष्ट्रीयांबद्दल झालेला संवाद आढळतो. ज्यू पंथीयांच्या नियमशास्रानुसार परराष्ट्रीयांच्या घरात जेवणे  यथायोग्य नव्हते. परंतु ह्या चालीरीतींचा ख्रिस्ती नियमशास्रात अंत झाला होता. हे पेत्रास ठाऊक होते, तरीही एक घरात जेवण करत असता त्यास ह्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्यावर पेत्र ते जेवण व घर सोडून निघून गेला. हि चुकीची गोष्ट होती, हे  पौलाला माहित होते, म्हणून संत पौल त्यास पटवून सांगत आहे; ख्रिस्ती धर्मानुसार ज्यू आणि परराष्ट्रीय असा कोणताही भेदभाव केला जात नव्हता. ख्रिस्तामध्ये ते सर्व एक आणि एकमेकास बंधू असे होते.
पुढे पौल म्हणतो की, मोशेने घालून दिलेले नियम आपल्याला स्वर्गात स्थान प्राप्त करून देतात असे नाही, तर जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. प्रत्येक ख्रिस्ती बाप्तीस्म्याद्वारे ख्रिस्ताबरोबर क्रूसाशी खिळला गेला आहे. तो त्याच्यात मरतो व ख्रिस्तात उठविला जाईल. ‘जुन्या नियमशास्राचा अंत हा संत पौलाच्या मते देवासाठी नवीन अध्यात्मिक जीवन जगण्याचा खुला व स्वतंत्र  मार्ग आहे’. त्याद्वारे आपण देवाचे लेकरे बनतो. आपण जगलो तरी ख्रिस्ताचे, मेलो तरी ख्रिस्ताचे; आपण सर्वस्वी देवाचेच आहोत. येशूचा शिष्य बनून संत पौलाच्या बाह्यांगात कोणताही बदल झाला नसला तरी त्यांचे अंतरंग बदलून मात्र तो ख्रिस्तमय झाला हे ह्या प्रस्तून उतऱ्यातून आढळून येते.
      
मनन चिंतन:

     परमेश्वर दयेचा व क्षमेचा अथांग सागर आहे. तो आपल्या सर्वांवर प्रेम करतो. हे आजच्या तीन्ही वाचनांतून स्पष्ट होते..
     दावीद राजाला त्याच्या पापाची जाणीव होत नव्हती की त्याने चूक केली आहे. जेणेकरून तिथे जाऊन तो मेला जाईल व उरीयाच्या पत्नीचा त्याला हव्यास झाला होता आणि त्यासाठी त्याने उरीयाला लढाईत पाठवून त्याचा वध करविला. तो त्याच्या त्या हव्यासापोटी काहीही करायला तयार होता. त्याची हि शुद्ध परत आणण्यासाठी देवाने नाथन ह्या संदेष्ट्याला पाठवून त्याच्या चुकीची जाणीव त्याला श्रीमंत व गरीब ह्यांच्याकडे असलेल्या मेंढराच्या उदाहरणाद्वारे करून दिली; की गरिबाचे मेंढरू श्रीमंताने वधविले (२ शमुवेल १२:१-७) .
आपणही कधीकधी असे समजतो की, मी पाप केलं नाही किंवा चूक केली नाही. दुसरे पोप जॉन पॉल म्हणतात की, ‘आपल्या समाजातून पापाची भावनाच निघून जात आहे, कोणीही मी पाप करत आहे हे स्वीकारण्यास धजत नाही’. आपण कितीवेळा पापात पडतो व उठतो? आपल्याला पाप करायला आवडत नाही तरीही आपण पाप करतो. आपण जेव्हा पाप करतो तेव्हा आपण आपल्या मनस्थितीत नसतो व आपल्याला त्याची जाणीव ही नसते. संत पौल म्हणतात, ‘मला जे करावेसे वाटत नाही तेच मी करतो जे करणे अगत्याचे आहे त्याकडे मी दुर्लक्ष करतो’. आपण गृहीत धरतो की आपण पाप करतच नाही किंवा केलच नाही. उदाहरणार्थ: जेव्हा दारुड्या भरपूर दारू पितो तेव्हा त्याला कळत नाही, की त्यांनी दारू पिलेली आहे परंतु जेव्हा दुसरा कोणी त्याला समजावून सांगतो तेव्हा त्याला चुकीची जाणीव होते. दाविदला सुद्धा त्याच्या चुकीची जाणीव, संदेष्टा नाथानद्वारे झाली. मग आपणा सर्वांचे काय? आपण आपल्या पापांची झडती घेतो का? देवाच्या शब्दाने आपल्यामध्ये काही परिवर्तन घडते का? जेणेकरून आपल्या हृदयावर असलेल्या काळ्या डागाची जाणीव होईल व आपण परमेश्वराकडे गुणकारी स्पर्शासाठी व क्षमादानासाठी धाव घेऊ.
     पापांमुळे बऱ्याचदा आपल्याला दु:ख सहन करावे लागते. जेव्हा आपण परमेश्वरासमोर पापांची कबुली करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला नेहमी क्षमा करतो. कारण परमेश्वर प्रेमळ व दयाळू आहे. तो आपल्यावर खूप प्रेम करतो. त्याला पाप आवडत नाही परंतु मनुष्यावर खुप प्रेम करतो. म्हणूनच आपल्या पापासाठी क्रुसावर दु:ख सहन केले व प्राण दिला व आपणा सर्वांना पापापासून मुक्त केले. आपल्या पापांची किंमत येशू ख्रिस्ताने क्रुसावर प्राण अर्पण करून दिली.
     पोप फ्रान्सिस म्हणतात की, ‘देव आपल्या पापांची क्षमा करण्यास कंटाळत नाही  तर आपल्याला त्याच्याकडे पापांची क्षमा मागण्यास लाज वाटते’. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले आहे की, एक पापी स्री हिच्याविषयी ऐकले आहे. त्या स्रीची पापी वृत्ती सर्व लोकांना माहित होती आणि हि स्री येशूला भेटते. लुकलीखीत शुभवर्तमानामधील हा एक हृदयाला स्पर्श करणारा उतारा आहे. तिने तिच्या अश्रुने येशूचे  पाय धुतले आणि स्वत:च्या केसांनी पुसून काढले. ह्या उताऱ्याद्वारे आपण आपल्या पापांबद्दल माफी मागितली पाहिजे असे येशू ख्रिस्त सांगत आहे. आपल्याला पापांपासून मुक्त करण्यास तो आला. त्याने आपल्याबरोबर प्रेमाचे नाते अधिक बळकट केले. पुष्कळदा आपण आपल्या पापांमुळे देवापासून दूर जातो आणि पापांतच राहणे पसंत करतो.
     माकडाला पकडण्यासाठी शिकारी लोक झाडाला एक छोटेसे छिद्र करतात आणि खाण्याचा पदार्थ ठेवतात. माकड येऊन त्याच्यात जेंव्हा हात घालतो तेंव्हा तो माकड त्यामध्ये फसला जातो. त्या माकडाने जर तो खाण्याचा पदार्थ सोडला तर तो स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो परंतु  माकड ती गोष्ट सोडत नाही. अनेकवेळा आपली परिस्थिती त्या माकडासारखी असते. आपण आपल्या भूतकाळात राहणे पसंत करतो, पापांत राहणे पसंत करतो आणि त्याच्या मोहात पडतो. घडलेल्या गोष्टीवर विचार करून आपण वेळ घालवत असतो. त्या निरुपयोगी गोष्ठी आपण सोडायला तयार नाहीत. आपण येशू ख्रिस्ताने दिलेल्या क्षमेवर विश्वास ठेवायला तयार होत नाही त्यामुळे आपण जीवन जगत नसून खवळलेल्या सागरात दिशाहीन भटकत असतो.
     जर खरच आपल्याला देवाच्या दयेचे व क्षमेचे महत्व समजले तर आपण सदैव देवाच्या सानिध्यात राहू शकतो. आपण पापापेक्षा ख्रिस्ताला आपल्या जीवनात महत्व दिले पाहिजे. कारण तो दयाळू व सर्वशक्तिमान आहे. तोच आपले सर्वस्व आहे. जेव्हा आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्थान देतो तेव्हा आपल्यालाही दावीद व शुभवर्तमानातील पापी स्रीसारखे क्षमादान प्राप्त होईल व नवजीवनाचा अनुभव येईल.
           
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो, आम्हाला तुझ्या दयेचा अनुभव येऊ दे.

1.आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना त्यांच्या रोजच्या जीवनाद्वारे, इतरांना देवाच्या दयेचा व क्षमेचा संदेश देण्यासाठी देवाची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.आपला ख्रिस्ती समूह पापांच्या दरीतून मुक्त होऊन, परस्पर प्रेम व सौख्य भावनेने प्रफुल्लीत होत राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.ज्या लोकांना अजूनही ख्रिस्ताच्या अस्सिम प्रेमाची व क्षमेची ओळख पटलेली नाही अशांना ती ओळख पटावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 
4.आपल्या पॅरिशमधील जे लोक दु:खी व आजारी आहेत त्यांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श लाभावा म्हणून प्रार्थना करूया.
5.आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. 








No comments:

Post a Comment