सामान्य काळातील बारावा रविवार
पहिले वाचन: जखऱ्या १२: १०-११, १३:१
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ३: २६-२९
शुभवर्तमान: लूक ९: १८-२४.
दिनांक: १९/०६/२०१६.
दिनांक: १९/०६/२०१६.
“जो माझ्यामागे येऊ पाहतो त्याने आत्मत्याग करावा व स्वतःचा
वधस्तंभ वाहून मला अनुसरावे.”
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील
बारावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने आपल्या ख्रिस्ती
जीवनातील मुल्ये आणि तत्वे ह्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करतात.
पहिल्या वाचनात संदेष्टा जखऱ्या इस्रायलच्या
लोकांना देवाचे त्यांच्यावर असलेले प्रेम ह्याविषयी सांगतो. तसेच तो इस्रायल लोकांनी
देवाविरुद्ध केलेल्या कृत्यांमुळे देवाला झालेला संताप व्यक्त करतो. दुसऱ्या
वाचनात संत पौल गलतीकरांस पाठविलेल्या बोधपत्रात येशुख्रिस्तावरील श्रद्धेतून ख्रिस्तामध्ये
आपण एक होण्याचा अनुभव आपणास मिळतो असे म्हणतो. तर शुभवर्तमानात येशु आपल्या
शिष्यांना ‘तुम्ही मला कोण म्हणून म्हणता’ असा प्रश्न विचारतो. पेत्राने दिलेल्या
प्रतिसादामुळे येशु ख्रिस्त त्याला होणाऱ्या दुःखसहनाविषयी भाकीत करतो.
प्रत्येक व्यक्तीला जीवनात जगावेसे
वाटते. कोणालाही दुःख, संकटे हवीशी वाटत नाही. मात्र, दुःख आणि संकटामुळे आपण
अधिकच येशूच्या जवळ जात असतो. ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, ख्रिस्ती जीवन
जगण्यासाठी लागणाऱ्या मुल्यांची आणि तत्वांची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून आपण
ह्या ख्रिस्तयागात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: जखऱ्या १२: १०-११,
१३:१
जखऱ्या हा बारा (Minar) प्रवक्त्यामधील एक प्रवक्ता
आहे. तो येरुशलेममध्ये राहत असे आणि देवाविषयी उपदेश करत असे. त्याने लोकांना
येरुशलेमचे मंदिर पुन्हा उभारण्यासाठी प्रोत्साहन केले. त्याने भाकीत केले होते
कि, जगातील संपूर्ण राष्ट्रे पवित्र भूमीवर येऊन इस्राएलच्या देवाला अनुसरतील.
संदेष्ठा नाथान ह्याने दाविदाला दिलेले वचन तो विसरला नाही कारण ते वचन दैविक
होते. त्याचा वंशज जो दाविदाच्या गादिवर बसून राज्य करील तो त्याच्या राज्याची
स्थापना करील. नवीन प्रस्थापित केलेल्या राज्यातील लोक नवीन आत्म्याचा स्वीकार
करतील. जो आत्मा लोक स्विकारतील तोच आत्मा लोकांना देवाचे उपकार करण्यास आणि
त्यांनी केलल्या पापांबद्दल पश्चाताप करण्यास समर्थ करील. ते देवाकडून त्यांनी
केलेल्या पापांची क्षमा मागतील. उत्तरेकडील पॅलेस्तीन शहरामध्ये एक परंपरा होती कि,
एका ठरलेल्या दिवशी मोठा आकांत किंवा आक्रोश लोक करत असत. (राजे २: २३:२९) मध्ये
उल्लेख केल्याप्रमाणे योशियाच्या मृत्यूमुळे जो इस्राएलमधील महान राजा होऊन गेला
त्याच्या मृत्यूमुळे लोकांनी शोक केला. तसाच शोक (आकांत) येशुख्रिस्ताच्या मृत्यूनंतर
येरुशलेममध्ये होणार ह्याची प्रचिती आपणास होते.
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ३:
२६-२९
‘ख्रिस्ताचा स्विकार केल्यानंतर ज्यू किंवा ग्रीक, गुलाम किंवा
स्वतंत्र, पुरुष आणि स्री असा भेदभाव उरत नाही’. या विधानावर भाष्य करताना कॉल्टा,
रिका येथील येल्झा तामेझ या बायबलच्या अभ्यासिका म्हणतात, ‘केवळ वांशिक आणि धार्मिक
क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक घटकांना या मुलभूत विधानाने स्पर्श केला
आहे. ज्या समाजाने पितृसत्ताक समाजपद्धती आणि गुलामगिरी गृहीत धरली होती, तिथे
गुलाम-मालक भेदभाव नष्ट झाला. स्री-पुरुष समान आहेत, हि भाषा ऐकायला मिळणे म्हणजे
अन्याय आणि पक्षपात यांचे बळी ठरलेल्यांसाठी आदर्श समाजाचे स्वप्न आणि ध्येय साकार
झाल्यासारखे वाटते. ह्या भूमिकेमुळे अनेक महिला ख्रिस्ताच्या अनुयायी झाल्या आणि
त्यांनी प्रारंभीच्या चर्चमध्ये महत्वाची पदे सांभाळली’. नव्या उमेद्वारांना
बाप्तिस्मा देताना त्यांनी वरील विधानाचे स्पष्टीकरण करून सांगितले जात असे.
ख्रिस्ती होण्यापूर्वी ‘सारे मानव समान आहेत’, या अटीचा स्वीकार करणे आवश्यक होते.
शुभवर्तमान: लूक ९: १८-२४
तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?
येशु कोण होता याविषयी लोकांत अनेक कल्पना होत्या. प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणी
एक जीवंत झाला आहे असे त्यांना का वाटत होते? येशुच्या सहवासात राहिलेल्या
प्रेषितांना तो देवाचा ‘ख्रिस्त’(अभिषिक्त) आहे याची खात्री पटली होती. इस्रायली
लोक ज्या मसिहाची वाट पाहत होते व ज्याच्या येण्याविषयीचे भाकीत जुन्या करारात
केले होते, तोच मसिहा किंवा ख्रिस्त येशु होता. ख्रिस्ताने दुःख सोसावे व जीवे
मारले जावे व त्याचे पुनरुत्थान व्हावे याचे अगत्य होते. असे येशु ख्रिस्ताने
सांगूनही तसे घडेपर्यंत त्यांनी विश्वास ठेवला नाही.
ख्रिस्ताने त्या दिवसांत
आपल्याविषयी बरेचसे शिकविले व त्याच्यामागे जाणे किंवा त्याचा शिष्य होणे याचा
अर्थ अधिक स्पष्ट करून सांगितला. ज्याला ख्रिस्ताचे शिष्य व्हायचे आहे, त्याने
स्वतःच्या इच्छा, मार्ग व हक्क यांचा त्याग करावा व ख्रिस्त ज्या मार्गाने गेला
त्या मार्गाने जावे. ख्रिस्ताला स्वता:चे समर्पण करणे, त्याच्याशी एकनिष्ट राहून
त्याचे प्रभुत्व मानणे व कित्येकदा ख्रिस्ताकरिता निंदा व छळ सोसणे, यास स्वतःचा
वधस्तंभ घेणे असे म्हटले आहे. अशाप्रकारे ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे स्वतःच्या
आयुष्याची सर्वोतम गुंतवणूक करणे होय. नाहीतर, आपले जीवन फक्त स्वतःकरीता खर्च करणे
व निरुपयोगी ठरेल.
बोधकथा:
ग्रॅन्डां एका मोठ्या डोंगरावर चढत होती. तिने अर्धा डोंगर चढला होता. एका खडकाच्या बाजूला उभी असता तिने थोडा वेळ तिथे विश्रांती घेतली. अचानक तिचा तोल सांभाळण्याचा दोरखंड तुटून झटकन तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिच्या डोळ्यात असलेला लेन्स (Lens) खाली पडला. तिने देवाचे आभार मानले आणि ती म्हणाली, “मी ह्या दगडाच्या कडेला उभी आहे. शंभर किलोमीटर खाली आणि शंभर किलोमीटर उंच अश्या ठिकाणी आहे. पण मला काहीही झाले नाही. परंतु त थोडा वेळ तिला काही दिसेनासे झाले.” नंतर तिच्या लक्षात आले की तिच्या एका डोळ्यातील लेन्स खाली पडला आहे. तिने तो लेन्स शोधण्यास सुरवात केली. तिला वाटले कि तिची लेन्स ह्या दगडावरच कोठेतरी पडली असेल. परंतु लेन्स तिला तिथे सापडली नाही.
ती घाबरली होती. त्यासमयी तिने तिचे भयभीत मन शांत व्हावे तसेच तिचे हरवलेले लेन्स परत मिळावे म्हणून प्रार्थना केली.
अशा अवघड अवस्थेतही डोंगर चढणे सोडले नाही. जेव्हा ती पूर्ण डोंगर चढून वर माथ्याशी गेली, तेंव्हा तिच्या साथीदारने तिला लेन्स शोधायला मदत केली; पण ती त्यांना सापडली नाही. आता जरी ती शांत झाली होती आणि डोंगरसुद्धा चढली होती तरी ती निराश होती. कारण ती स्पष्टपणे डोंगरावरून आजूबाजूचा परिसर बघू शकत नव्हती. त्याच वेळेस तिला बायबलमधील वाक्य आठवले: “देवाची दृष्टी सर्व जगावर असते.”
तिच्या विचारात मग्न होऊन ती म्हणाली, “देवा, तू हे सर्व डोंगर पाहू शकतोस. तुला प्रत्येक दगड आणि झाडांची पाने यांची खात्री आहे. तुलाच माझ्या डोळ्याची लेन्स कुठे आहेत ह्याची जाणीव असणार म्हणून तूच कृपा करून मला मदत कर.”
नंतर, जेव्हा ते परत खाली डोंगराच्या पायथ्याशी आले तेव्हा त्यांची भेट दुसऱ्या गिर्यारोहकांबरोबर झाली. त्यांच्यामधील एकाला तिची ती लेन्स सापडली होती आणि म्हणून त्याने तिला ती लगेच देऊ केली.
हि ग्रॅन्डांसाठी फार मोठी आश्चर्याची बाब होती. गिर्यारोहकाने डोंगराच्या पायथ्याशी ती लेन्स एक मुंगी हळुवारपणे घेऊन जात असता त्याच्या ती दृष्टीस पडली होती.
हि गोष्ट इथेच संपली नाही. ग्रॅन्डांचे वडील एक व्यंगचित्रकार (cartoonist) होते. जेव्हा तिने वडिलांना घडलेली घटना सांगितली तसेच तिने केलेल्या प्रार्थनेविषयीही सांगितले, तेव्हा त्यांनी मुंगी ‘डोळ्याची लेन्स’ ओढून नेत आहे असे व्यंगचित्र काढले आणि त्या चित्राच्या खाली असे लिहिले, ‘देवा, मला माहीत नाही कि मी हि लेन्स का घेऊन जात आहे. मी हि लेन्स खाऊ शकत नाही आणि हि वजनाने जडसुद्धा आहे. पण जर तुझी इच्छा असेल कि मी हि लेन्स घेऊन जावी, तर तुझ्यासाठी मी हेसुद्धा करील’.
मनन चिंतन:
जेव्हा आपण जीवन जगण्यासाठी
सुरवात करतो, तेव्हा आपल्याला जीवनाविषयी काहीच ठाऊक नसते. आपले आई-वडील, घरातील
आणि शेजारच्या व्यक्ती आपल्याला कसलाही त्रास होणार नाही, याची बारकाईने काळजी
घेतात. आपल्या सर्व गरजा त्यांच्याकडून भागवल्या जातात. आपल्याला अडचणी, अवघडपणा
ह्या गोष्टींची जाण नसते. आपल्या लेकरांस कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून
आपल्याकडे त्यांची नजर असते. लहानातून मोठे होत असताना आपली मानसिक वृत्ती
अधिकाधिक वाढत असते. ज्या गोष्टी आपणास आनंद देतात त्या गोष्टी आपणास हव्याश्या
वाटतात परंतु ज्या गोष्टींमुळे आपल्याला दु:ख सहन करावे लागते; त्या गोष्टी आपण
टाळण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे जेवत असताना जेवणात मिठाचा खडा सापडला तर आपण
जेवण न फेकता फक्त तो मिठाचा खडा बाजूला काढून जेवायला सुरवात करतो, अगदी
त्याचप्रमाणे जीवनात जर दु:खाचे प्रसंग आले तर आपण जीवन सोडून न देता, जीवनात उदास
न होता पुन्हा जीवन जगायला सुरवात केली पाहिजे.
जगाच्या आरंभापासून देवाने आपल्या
पुत्राद्वारे प्रत्येक मानवाला उंचावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपण
देवाच्या सार्वकालिक आनंदात सहभागी होऊ शकतो. देवाला अगोदरच कल्पना होती कि,
मानवाच्या पाप आणि दृष्टपणामुळे देवाला दु:ख भोगावे लागणार आहे. मात्र लोकांच्या
पापी वृत्तीवर लक्ष न देता त्यांचा स्वीकार करण्यास आणि त्यांच्या पापांची क्षमा
करण्यास तो तयार होता. आपणासाठी ह्या गोष्टी करणे कठीण आहे. परंतु ह्या सर्व
गोष्टी जुन्या करारामध्ये येशूच्या क्रूसावरील मरणाअगोदर संदेष्ट्यांद्वारे सांगितल्या
होत्या ह्याचा आढावा आपण पहिल्या वाचनामध्ये घेतला आहे. हीच भविष्यवाणी
येशुख्रिस्तामार्फत पूर्णत्वास आणण्यात आली. आपण सर्व पापी आहोत. फक्त शास्री आणि
परुशी ह्यांनी येशुख्रिस्ताला मारले नाही तर आपण जरी ख्रिस्ताचे अनुयायी असलो
ख्रिस्ती जीवना जगात असलो तरी आपण आज ख्रिस्ताला आणि त्याने शिकवलेल्या विचारांना आणि
मूल्यांना जीवे मारत असतो. आपण ख्रिस्ताचा तिरस्कार करतो जेव्हा आपण त्याची शिकवण
पाळत नाही. आपण ख्रिस्ताला उच्च मानतो जेव्हा आपण त्याचा मानवावर असलेला अधिकार
नाकारतो. येशुख्रिस्त आज आपल्याला त्याने शिकवलेल्या मूल्यांवर चालण्यास आमंत्रण
देत आहे. आणि प्रत्येक ख्रिस्ती लोकांनी येशूची शिकवण अगीकारने अगत्याचे आहे.
जगाच्या सुर्वातिअगोदर देवाची
योजना होती की, आपण सर्वांनी त्याचे पुत्र व्हावे त्यामुळे आपण त्याच्या
सार्वकालिक जीवनात सहभागी होऊ शकू. प्रत्येक पिता आपल्या मेहनतीने आपल्या मुलांना
चांगले शिक्षण लाभावे म्हणून प्रयत्न करत असतो. ह्या सर्व गोष्टी करत असताना त्यांना
मर्यादा असते. देव आपला स्वर्गीय पिता त्याच्या मर्यादेपलीकडे जात असतो; देवाने
आपली दुर्बलता समजून घेऊन आपल्यासाठी महान द्येच्या साकारामेंताद्वारे प्रायश्चित
मिळवून दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो. देवाची दया
सर्वांसाठी, जगातील सर्व लोकांसाठी आहे. जे स्वत:ला पापी समजतात त्यांना देवाच्या
दयेचा अविष्कार त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत होऊ शकतो. देव त्याच्या दूतांमार्फत
आणि इतर लोकांमार्फत तसेच जीवनातातील प्रसंगाद्वारे आपल्यावर असलेल्या त्याच्या
प्रेमाची आठवण करून देत असतो. तो आपल्याला आमंत्रण देत असतो त्यामुळे आपण
त्याच्याकडे जाऊ शकतो. त्याच्या प्रेमात कसलाही भेदभाव नाही. तो कोणाची तुलना करत नाही.
त्याच्यासाठी सर्व मानवजात समान आहे. मानव स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्यासाठी
स्वत:ची इतरांबरोबर तुलना करतो.
ख्रिस्ताचा प्रामाणिक अनुयायी, सार्वकालिक
जीवनावर विश्वास ठेवतो; तो ख्रिस्ती तत्वे पाळण्यासाठी जीवनात कोणतही क्रूस
उचलण्यास मागे फिरत नाही. येशु ख्रिस्ताने त्याच्या जीवनातील मुल्यांद्वारे
स्वत:च्या जीवनाचा त्याग केला. त्याच्या ह्या महान कृतीमुळे आपल्याला प्रेरणा मिळते.
आपल्याकडून सुद्धा त्याच्या अशाच अपेक्षा आहेत. ख्रिस्ताला अनुसरून आपल्या पटीने
जे काही चांगले आपण करु शकू, त्यात आपण आपला क्रूस वाहत असतो. येशु ख्रिस्ताच्या
मृत्यूनंतर आज पर्यंत आपल्यासमोर अनेक महान स्री पुरुषांची उदाहरणे आहेत ज्यांनी
ख्रिस्ताची शिकवण अंगिकारली आणि ख्रिस्ती मुल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांनी दु:ख
सहन केले. कित्येकांनी तर आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. जेंव्हा देव आपल्या
जिवंत जड क्रूस पाठवतो त्याच वेळेस तो आपले खांदेदेखील बळकट करत असतो.
ख्रिस्ती जीवन आपल्याला आपल्या
दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या संकटांना आनंदाने आणि उत्साहाने स्विकार करण्यास
उत्तेजन देते. ज्या व्यक्ती आपल्याला त्रास देतात त्यांना क्षमा करून त्याबद्दल
सूड न घेण्याच्या वृत्तीला, कृसाचा भार उचलणे असे म्हणता येईल. आजारात होणाऱ्या
वेदना सहनशिलतेने सहन करणे आणि देवाच्या व आजूबाजूच्या लोकांबद्दल कुरकुर न करणे
हे सुद्धा ख्रिस्ती हौतात्म्याचे प्रतिक आहे.
आजच्या ख्रिस्तयागात सहभागी होत
असताना येशु ख्रिस्ताने आपल्याला विश्वासाची जी देणगी दिली आहे ती अधिकाधिक दृढ व
वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आमचा क्रूस
वाहण्यास आम्हाला सामर्थ्य दे.
१. ख्रिस्तसभेचे कार्य सांभाळणारे आपले पोप, बिशप्स, कार्डीनल्स, धर्मगुरू आणि
धर्मभगिनी ह्यांना प्रभू ख्रिताने चांगले आरोग्य द्यावे, त्यांच्या कार्यावर
प्रभूचा वरदहस्त असावा, त्यांना त्यांच्या संकटात प्रभूने प्रेरणा द्यावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२. ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे तिथे प्रभूने लोकांचा
ख्रिस्तावरील विश्वास बळकट करून त्यांना सर्व छळ सहन करण्यास मानसिक व शारिरीक
शक्ती द्यावी, दु:ख आणि अडचणीविषयी त्यांचात होकारार्थी वृत्ती निर्माण व्हावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक आजारी आहेत, ज्यांच्या कुटुंबात अशांतता आहे आणि ज्यांचे जीवन
निराशेच्या आधीन झालेले आहे, त्यांचे प्रभूने सांत्वन करावे, त्यांना जीवनात नवीन
दिशा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे चांगले
फळ त्यांना लाभावे आणि ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे तिथे पाऊस पडून त्यांच्या
मुलभूत गरजा भागवल्या जाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या
संधीचा चांगला उपयोग करावा आणि ज्या मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्यांच्यासाठी
मदतीचे हात पुढे यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment