Reflection for the Homily of Fourteenth Sunday in Ordinary Time C (03-07-2016) By Lavet Fernandes.
सामान्य काळातील चौदावा रविवार
(संत थॉमस: भारताचा प्रेषित)
दिनांक: ०३/०७/२०१६.
यशया: ६६:१०-१४.
गलतीकरांस पत्र: ६:१४-१८.
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील चौदावा
रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज आपण संत थॉमस, भारताचा प्रेषित ह्यांचादेखील सण
साजरा करीत आहोत.
यशयाने जी भविष्यवाणी केली होती ती कधीच पूर्ण होणार नाही
असे इस्रायल लोकांना वाटले; परंतु हीच भविष्यवाणी ख्रिस्ताद्वारे पूर्ण झाली आहे.
हे आपल्याला यशया संदेष्टा पहिल्या वाचनामध्ये सांगत आहे. गलतीकरांस पत्र यामध्ये
संत पौल त्याला मिळालेल्या आशिर्वादाबद्दल तसेच त्याच्या ख्रिस्ती धर्मामध्ये
झालेल्या धर्मांतर व पाचारणाविषयी बोलत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये संत लूक बारा
शिष्यांचे व त्यांच्या मिशन कार्याचे वर्णन करतो.
संत थॉमस ह्यांनी दोन हजार वर्षांपूर्वी भारतात येऊन मिशन
कार्य व लोकांचा विश्वास दृढ करण्याचे कार्य केले. शांतीचा संदेश त्यांनी भारताच्या
बऱ्याच भागांत पोहोचवला; जेणेकरून आपण सर्वजण शांतीने जीवन जगू आणि हेच कार्य पुढे
चालू ठेवण्यासाठी देऊळमाता आज आपणा सर्वांना बोलावत आहे.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६६:१०-१४
यशया संदेष्टा पहिल्या वाचनामध्ये हद्दपार करून आलेल्या
लोकांना प्रोत्साहन करीत आहे की, त्यांनी नवीन शहर उभारले पाहिजे. लोकांनी आपली
आशा देवावर ठेऊन सर्व संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे तिकडे नवीन येरुशलेम येईल
आणि सर्व जगभर शांतीचे वातावरण असेल यावर विश्वास ठेवला.
यशयाने केलेली भविष्यवाणी पूर्ण होणार
नाही असे इस्रायल लोकांना वाटले परंतु हिच भविष्यवाणी ख्रिस्ताद्वारे पूर्ण झाली
आहे. पण ही भविष्यवाणी पूर्णत: देवाच्या स्वर्गीय राज्यामध्ये खरोखर पूर्ण होणार
असे संदेष्ट्यांनी त्यांना सांगितले होते.
जे चर्च ख्रिस्ताने स्थापन केले होते, ते आता पृथ्वीवर नवीन
येरुशलेम झाले आहे. हेच चर्च आता मुख्य व सर्वांचे घर झाले असून, त्यामध्ये सर्व
प्रकारचे लोक येतात. आता सर्व ख्रिस्ती लोक खात्रीने ह्या नवीन येरुशलेमचा आनंद व
उल्हास करू शकतात. ती स्वर्गीय येरुशलेम सर्वांची वाट पाहत आहे. जेथे आपण सर्वजण जीवनाचे
धडे शिकू शकतो व तिथे आपल्या सर्व इच्छा,
आकांक्षा पूर्ण होतील आणि त्या जीवनाला कधीच अंत नसणार.
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ६:१४-१८
गलतीकरांस पत्र यामध्ये संत पौल
त्याला मिळालेल्या आशीर्वादाबाद्दल व त्याचे ख्रिस्तीधर्मामध्ये झालेलं धर्मांतर याविषयी
बोलत आहे. त्याला आता कोणतीच वस्तुस्थिती महत्वाची वाटत नाही. परंतु फक्त वधस्तंभावर
खिळलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण तो त्याच्या डोळ्यासमोर व स्मृतीत ठेवत आहे. संत
पौल पुढे सांगत आहे की, कालवरीचा प्रसंग आणि येशू ख्रिस्ताचे मरण ह्या त्यांच्या
जीवनातील महत्वाच्या घटना होत्या. त्याद्वारे ख्रिस्ताने पित्याची अखंड आज्ञा पालन
केली आणि आता तो देवाचा पुत्र झाला आहे.
येशू ख्रिस्ताच्या कालवरीवरील भूमिकेने
ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी सार्वकालिक योजना आखल्या आहे. संत पौल आता सर्व
ख्रिस्ती आणि ज्यू लोकांसाठी प्रार्थना करतो की, आता ते सर्व देवाचे नवीन इस्रायल झाले
आहेत. आता त्यांना देवाची शांती व दया दाखविण्यात आली आहे, जेणेकरून ते सर्व ह्या
दृष्टीकोनातून नवीन जीवन जगतील.
शुभवर्तमान: लूक १०:१
संत लूक शुभवर्तमानामध्ये बारा
शिष्यांचे वर्णन करत आहे. ख्रिस्त त्यांना मिशन कार्यासाठी पाठवतो. जेणेकरून
त्यांनी देवाची सुवार्ता पसरावी. त्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना गावांमध्ये व
शहरामध्ये पाठवतो. येशूचेजवळ बारा शिष्य असून तो अजून बहात्तर शिष्यांची निवड करतो
व त्यांना मिशन कार्यासाठी पाठवतो. येशूची शिकवण त्यांनी घेतली होती. येशू ख्रिस्त
त्यांनाही सुवार्ता घोषित करण्यासाठी पाठवतो. जेणेकरून ते येशूच्या येण्याची तयारी
करतील आणि त्याचा मार्ग मोकळा करतील.
बारा जणांचा नंबर हा फक्त
शिष्यांसाठी मर्यादित होता. कारण बारा शिष्य हे इस्रायल वंशाचे बारा नेते म्हणून
संबोधले गेले होते. तर ते बहात्तरजण वडिलधारी माणसांचे प्रतिनिधित्व करत होते;
जुन्या करारातदेखील मोशेने अशाच सत्तर जणांची निवड करून त्यांना इतर लोकांचे
प्रतिनिधी बनवले होते, जेणेकरून ते त्याला लोकांची व्यवस्था पाहण्यासाठी मदत
करतील. संत लूक आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की पिक फार आहे; परंतु कामगार
पुष्कळ कमी आहेत. त्यामुळे आपल्याला प्रार्थना करण्याची फार गरज आहे. जेणेकरून आपल्याला
कामगार भेटतील व देवाचे राज्य पुढे नेता येईल.
‘घरात शांती असो’- ज्यू लोकांच्या घरी नमस्कार करण्याची
पद्धत नेहमीच्या प्रमाणे निरर्थक व रिक्त होती. येशू ख्रिस्ताने शिष्यांना सूचना
दिल्या होत्या की शिष्यांनी ज्यू लोकांच्या घरी जाऊन त्यांना देवाची शांती वा
आशीर्वाद प्रदान करावा. हि येशू ख्रिस्ताची इच्छा होती. परंतु जर ते रहिवासी योग्य
नसतील तर तो आशीर्वाद पुन्हा तुमच्याकडे परत येईल व त्यांचा काही परिणाम होणार
नाही. जर तुम्हांला कोणत्या कुटुंबाने स्वीकारलं, तर त्यांच्या घरी राहा आणि तुमचे
कार्य पूर्ण करा. जेणेकरून तुमचे हे कार्य अनावश्यक व शांतताभंग करून कुटुंबे
उध्वस्त करणार नाहीत. जर तुम्हांला एखाद्या गावात किंवा शहरात स्वीकारलं आणि जर
जेवण व निवारा दिला तर तुम्ही काही वेळ तिथे थांबा; तसेच येशू ख्रिस्ताने
शिष्यांना शक्ती दिली होती, जेणेकरून ते रोग्यांना बरे करतील व लोकांना सांगतील की
देवाचे राज्य जवळ आले आहे. रक्षणकर्ता व त्राता येऊन गेला, हे सर्व सार शिष्यांना
जाहीर करायचं होतं.
बोधकथा
संत ग्रेगरी जेव्हा छोटे होते, तेव्हा त्यांचे वडील फार
आजारी होते व मरणाच्या खाटेला खिळून पडले होते. संत ग्रेगरी त्यांचे वडील लवकरात
लवकर बरे व्हावेत म्हणून दररोज प्रार्थना करायचे. एकदा संत ग्रेगरी गाढ झोपेत
असताना एक देवदूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व त्यांना म्हणाला की, ‘तू येशूचे नाव
एका कागदावर लिहून आजारी माणसाच्या उशीखाली ठेव’. सकाळी ग्रेगरी उठल्यावर ते
आपल्या आईला हा देवदूताचा संदेश सांगतात व हे दृश्य सांगून झाल्यावर त्यांची आई
त्यांना हे वचन पाळावयास सांगते. आईने सांगितल्याप्रमाणे ते तसे करतात. संत
ग्रेगरी आपल्या वडिलांच्या डोक्याखाली येशूचे नाव असलेले एक कागद ठेवतात; तर काय
चमत्कार घडून येतो? त्या कुटुंबात संत ग्रेगरी यांच्या वडिलांची प्रकृती बरी
होण्याच्या मार्गावर होती. त्यांना पहिल्यापेक्षा अधिक पटीने बरे वाटू लागले.
मनन चिंतन:
येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शक्ती आणि सामर्थ्य आहे; जर
ख्रिस्ताचे नाव आपल्या हृदयात व ओठावर असेल आणि जर त्याचे नाव विश्वासाने घेतले तर
आपण आपल्या जीवनात चमत्कार पाहतो, हे आपल्याला येशूच्या शिष्यांनी केलेल्या
कामगीरीवरून समजून येते.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की,
सत्तर शिष्य जेव्हा त्यांच्या मिशन कार्यावरून परत आले, तेव्हा ते फार आनंदी आणि
उत्साहित होते. ते येशू ख्रिस्ताला सांगत होते की, ‘गुरुजी तुमच्या नावामध्ये फार
शक्ती आहे. तुमच्या नावाने आम्ही भूतंदेखील बाहेर काढली’ (लूक १०:१७). शिष्यांनी
येशूच्या नावामध्ये शक्ती आहे हे त्यांच्या कार्यातून अनुभवले होते. येशू
ख्रिस्ताचं नाव हे फक्त सुंदर नसून त्यामध्ये फार मोठी शक्ती आहे.
हेलन केलर ह्या प्रसिद्ध व नावाजलेल्या
व्यक्तीची एक प्रेरणात्मक गोष्ट सांगितली जाते. ती बघू शकत नव्हती. एकदा देवाने
तिला फार गहन असा प्रश्न विचारला, ‘तुझी अशी कोणती इच्छा आहे की, जी मी आता पूर्ण
करू शकतो’?. बाजूला लोकांचा फार मोठा घोळका होता. त्यांना वाटले की, ती देवाकडे
तिची दृष्टी मागेल, परंतु लोकांकरीता आश्चर्यास्पद अशी घटना घडली. तिने देवाकडे स्वत:साठी
दृष्टी न मागता, देवाकडे जगात शांतता व शांती असावी अशी मागणी केली.
प्रत्येकाच्या मनात व हृदयात एक
भावना असते व त्या भावनेला एक तहान लागलेली असते, ती तहान म्हणजे शांतीची.
प्रत्येकाला वाटते की, प्रत्येकाच्या जीवनात, घरात, गावात व देशात शांतता नांदावी.
येशू ख्रिस्ताने शिष्यांना सुवार्ता पसरविण्यासाठी वेगवेगळ्या गावात व शहरांत
पाठविले जेणेकरून ते लोकांना शांतीची सुवार्ता सांगतील व ‘तुम्हांबरोबर देवाची शांती
असो’ हि सलामी देतील. येशू ख्रिस्ताने फक्त बारा शिष्यांनाच न पाठवता बहात्तर इतर
शिष्यांनादेखील शांतीचा संदेश देण्यासाठी पाठवले व त्यांच्याद्वारे ख्रिस्ताने
संपूर्ण देऊळमातेची निवड केली जेणेकरून आपण सर्वजण शांतीसंदेशाचे वाहक बनावेत.
आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन
जगू शकतो. परंतु शांतीच्या मार्गावर चालणे म्हणजे लोकांना जवळ आणणे होय. जर कोणी
आपल्यावर चिडला, आपली टिंगल टवाळी केली, अब्रू घालवली तर आपण शांतीचे जीवन जगून एक
आदर्श त्यांच्यापुढे मांडायला हवा. शांतीचा मार्ग पकडणे म्हणजेच लोकांना समजुन
घेणे ज्याप्रकारे लोक आहेत त्याप्रकारे त्यांना समजण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्या
मर्यादांवर व कामजोरीवर मात करणे. आपण शांती फक्त आपल्या मित्रांबरोबरच नव्हे तर
आपल्या शत्रूवरही दाखवावी. ख्रिस्त ह्या जगात आला जेणेकरून आपल्याला जीवनात मुक्ती
किंवा सुटका मिळेल. येशू ख्रिस्ताने आपली भीती व वेदना दूर केल्या आणि आपणास
शांतीदूत बनण्यास पात्र केले.
आपली शांती काही ठिकाणी स्वीकारली किंवा मान्य केली जात
नाही. परंतु ती आपल्याकडे एखाद्या ‘एकोसारखी’ (प्रतीध्वनी) परत येईल. आपली शांती
स्वीकारली नाही म्हणून खचून न जाता, शांती पसरविण्याचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे.
आजचे जग स्पर्धात्मक जग आहे. त्यामुळे इथे कोणीही इतरांच्या बाबतीत विचार करण्यास
धजत नाही. ते एका दृष्टीकोनातून फाटून गेले आहे. जेथे राग द्वेष व मत्सर आहे. तेथे
आपल्याला आव्हानात्मक मिशन कार्य करायचे आहे व लोकांच्या जीवनात एक आदर्श बनायचे
आहे. जेथे फाटाफूट आहे तेथे आपल्याला पूल बांधण्याचे कार्य करून सर्व जखमा भरून
काढायच्या आहेत. हेच कार्य संत थॅामस येशूचा शिष्य ह्याने भारतात येऊन केले. त्याचा
सण आपण आज साजरा करीत आहोत. संत थॅामस ह्याने भारतात येऊन लोकांची मने जिंकली व
येशूविषयी शांतीची सुवार्ता भारतात पुष्कळ अशा ठिकाणी पसरवली आणि येशू ख्रिस्ताचा
एक खरा व सच्चा शिष्य म्हणून त्याचे मिशन कार्य पूर्णत्वास नेले.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरु व धर्मभगिनी ज्यांनी
आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे, त्यांना देवाचा कृपाशीर्वाद मिळावा
व देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पसरावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श
व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगात सर्व ठिकाणी अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढला आहे.
त्यामुळे सर्व ठिकाणी अशांतता निर्माण झाली आहे. जीवन जगणे फार धोक्याचे झाले आहे.
त्यासाठी जगात शांतीचे वातावरण निर्माण व्हावे व सर्वांनी ऐक्याने राहावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४. यावर्षी चांगला पाऊस पडावा व शेतकऱ्यांना चांगले पिक घेता यावे किंबहुना
त्यांच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment