Wednesday, 26 October 2016

Reflection for the Homily of 31st Sunday in Ordinary Time (30-10-2016) By Br. Minin Wadkar.





सामान्य काळातील एकतिसावा रविवार


दिनांक: ३०/१०/२०१६.
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२.
दुसरे वाचन: थेस्सलोनिकाकरांस दुसरे पत्र १:११-२:२. 
शुभवर्तमान: लूक १९:१-१०.


"आज या घराला तारण प्राप्त झाले आहे"




प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील एकतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशुला स्विकारून जीवनात आमुलाग्र बदल घडून आणण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात देव हा साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे व तो त्याची चांगल्याप्रकारे निगा राखतो ह्याची आपणास कल्पना येते. दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलोनिकाकरांस प्रार्थनेचे आश्वासन देऊन सांगतो कि, ‘तुम्ही देवाच्या पाचारणाला प्रामाणिक असा व देवाची महिमा सदैव गात रहा; परमेश्वर तुम्हांवर कृपादृष्टीचा वर्षाव करील.’ तर संत लुकलिखित शुभवर्तमानामध्ये येशू जक्कय नावाच्या जकातदाराला त्याच्या पापांची क्षमा करतो आणि त्याचे व त्याच्या कुटुंबाचे तारण करतो.
येशूच्या आगमनाने जक्कयच्या जीवनात परिवर्तन घडून आले व त्याच्या जीवनाचे सार्थक झाले. आपणसुद्धा जक्कयप्रमाणे येशूला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊया आणि चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहूया. ह्यासाठी लागणारी कृपा व शक्ती ह्या पवित्र मिसाबलीदानात सहभागी होत असताना मागुया. 

सम्यक विवरण
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२

     शलमोनाचा ज्ञानग्रंथ या पुस्तकाचा लेखक सांगतो कि, देव साऱ्या सृष्टीवर प्रेम करतो. तो निर्माता असून तो साऱ्या सृष्टीची काळजी घेतो. देव कोणत्याच गोष्टींचा तिरस्कार करीत नाही कारण तो सर्व सृष्टीची चांगल्या प्रकारे देखरेख करतो. तो सर्वशक्तिमान आहे, त्याची सृष्टीवरील दया व प्रेम अपार आहे. लेखक शेवटी सांगतो कि, ‘देव मनुष्याला त्याच्या पापांची क्षमा करितो व नवे जीवन जगण्यास प्रेरित करतो.’

दुसरे वाचन: थेस्सलोनिकांकरांस दुसरे पत्र १:११-२:२

     संत पौल आपल्या पत्राद्वारे धर्म-परिवर्तन केलेल्या लोकांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. संत पौल त्यांस ख्रिस्ती जीवन व विश्वासामध्ये दृढ होण्यास प्रेरणा देतो, जेणेकरून देवाची महिमा प्रगट होईल. येशूची येण्याची दुसरी वेळ जवळ आलेली आहे आणि लोक आळशी जीवन जगत आहे म्हणून पौल थेस्सलोनिकाकरांस विश्वासात घेवून सांगतो कि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. तुमचे पाचारण देवाला मान्य व्हावे म्हणून तुम्ही देवाची स्तुती व महिमा गात राहा.

शुभवर्तमान: लूक १९:१-१०

     लुकलिखीत शुभवर्तमानामध्ये येशूच्या आगमनाने जक्कयचे झालेले हृदयपरिवर्तन व तारण ह्याविषयी ऐकावयास मिळते. रोमन साम्राज्यामध्ये जकातदार बळजबरीने आणि वाजवीपेक्षा अधिक कर वसूल करीत असे. ह्यामुळे सामान्य व्यक्तीला भरपूर त्रास सहन करावा लागे. लेखक सांगतो कि जक्कय मुख्य जकातदार होता. तो इतर कर वसूलदारांपेक्षा जास्त कर वसूल करीत असे.
जक्कय श्रीमंत होता; संपत्तीमुळे तो देवापासून दुरावला होता. जेव्हा येशू जेरीकोला जात होता, तेव्हा जक्कय येशूला पाहण्यासाठी व्याकूळ झाला होता. जक्कय उंचीने कमी असल्यामुळे तो झाडावर चढला आणि येशूला पाहू लागला. जक्क्यचे वर्णन खालील मुद्यावरून स्पष्ट होते.
१. जक्कयची सामाजिक स्थिती
     जक्कय यहुदी होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. अशी मोठी सामाजिक स्थिती असूनही त्याला समाजामध्ये पापी म्हणून संबोधले जात होते. मुख्य जकातदार व श्रीमंत असूनही इतर यहुदी त्याला तुच्छ मानत होते. त्याला समाजामध्ये आदर नव्हता. त्याच्याकडे पुरेसा पैसा होता परंतु त्याचे पाप व भोग यापासून तारण झाले नव्हते. धन व श्रीमंती असूनही तो पैशाच्या व्यवहारामध्ये नीतिमान नव्हता.
२. जक्कय मार्गाच्या शोधात
     जक्कयची मनःस्थिती अत्यंत निराशेने भरलेली होती. त्याला येशूला पहावयाचे होते. परंतु लोकांच्या गर्दीमुळे त्याला येशूला पाहता आले नाही. जक्कयने येशूला पाहण्याचा ठाम निःश्चय केला. म्हणून तो येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला.
३. जक्कयचे तारण
     येशू जक्कयला म्हणाला, ‘जक्कय त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने येशूचे आगत-स्वागत केले. जक्कयने क्षणाचाही विलंब न करता, येशूला आपल्या घरात आणले आणि स्वत:च्या जीवनाचे तारण करून घेतले. लोकांनी केलेली कुरकुर कानी न घेता, जक्कयने निर्धारपणे स्वत:च्या जीवनाला एक नवी दिशा दिली. जक्कय येशूला म्हणाला, ‘मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.’ हे पाहून येशू जक्क्यला सांगतो की, ‘आज तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे तारण झालेले आहे.’

बोधकथा: “Amazing Grace” (आश्चर्यकारक कृपा)
  
     जॉन न्यूटन हा  गुलामांचा व्यापारी होता. १७४८ मध्ये अफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून घेऊन जात असता उत्तर अटलांटिक महासागरात वादळ निर्माण झाले. जहाजात अचानक पाणी शिरू लागले; त्या जहाजातील लोकांनी पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली; परंतु सर्वकाही निष्फळ ठरत होते. हे सर्वकाही चालले पाहून, न्यूटन त्याचा जीव मुठीत आणून ओरडला, “हे परमेश्वरा द्या करा”. आणि काय चमत्कार महासागरातील वादळ काही वेळानंतर शांत झाले आणि त्याच्या सहकाऱ्यांना जहाजात शिरलेले पाणी काढण्यात यश आले. अशाप्रकारे दोन आठवड्यानंतर त्यांचे जहाज सागरकिनारी लागले.
    ह्या सर्व कृत्याचा आढावा घेत असता, त्याच्या लक्षात आले कि, तो चमत्कारिकरित्या 
बचावला होता आणि ह्याचा कर्ता-करवीता दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द परमेश्वरच आहे. 
हि जाणीव झाल्यावर त्याने बायबल वाचन सुरु केले. त्याच्यात परिवर्तन झाले परंतु त्याने 
त्याक्षणी गुलामांचा व्यापार करणे सोडले नाही, तर आणखी सात वर्षे त्याने तो कारभार चालू
 ठेवला. ह्या वर्षांत त्याने गुलामांना माणुसकीच्या नात्याने वागणूक दिली.  नंतर जॉर्ज 
व्हाईटफिल्ड आणि जॉन वेस्ली ह्यांच्या संपर्कात राहून त्याने ख्रिस्ती धर्माचा सखोल अभ्यास
केला आणि १७६४ साली त्याने अँग्लीकन धर्मगुरू पदाची दिक्षा घेतली. १७७२ मध्ये त्याने 
जगभर प्रसिद्ध आणि नावाजलेलं भक्तीगीत लिहिलं, “Amazing Grace”(आश्चर्यकारक कृपा).
       ज्याप्रमाणे जक्कयचे ह्र्दयपरिवर्तन झाल्यावर त्याने ख्रिस्ताला स्वीकारले अगदी त्याचप्रकारे जॉन न्यूटन ह्याच्या जीवनातही घडले. 

मनन चिंतन

   देव पापी मनुष्याच्या शोधात येतो व त्याचे तो तारण करतो. बायबलमध्ये जुन्याकरारापासून ते नव्याकरारापर्यंत देवाने वेगवेगळे संदेष्ट्ये मानवाच्या शोधात पाठवले. सर्वात शेवटी देवाने स्वत:च्या पुत्राला भूतलावर मनुष्याच्या तारणासाठी व पापमुक्तीसाठी पाठविले. ह्याला कारण एकच ते म्हणजे ‘देवाचे अपार प्रेम’.
संत आगुस्तीन म्हणतात, ‘ज्या देवाने तुझ्या परवानगी शिवाय तुझी निर्मिती केलेली आहे, तो देव, तुझ्या सहकार्याशिवाय तुला वाचवू शकणार नाही.’ याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याला  स्वत:च्या तारणासाठी देवाच्या सानिध्याची नितांत गरज असते. त्याने स्वत:ला विसरून देवाला अंगिकारले पाहिजे. कारण देव प्रेमाळू आहे. तो आपल्याला कधीच सोडणार नाही. म्हणूनच शलमोनाच्या ज्ञानग्रंथात ‘देवाला अखंड सृष्टीची काळजी आहे’ असे सांगितले आहे.
     संत पौल सांगतात की आपण देवाची स्तुती गायला पाहिजे. कारण आपले पाचारण हे देवाचे दान आहे. आपल्या पाचारणास देवाची गरज आहे.  ‘प्रत्येक संताला भूतकाळ असतो, तर प्रत्येक पापी मनुष्याला भविष्यकाळ असतो’ असे म्हणतात. जक्कयचे जीवन पाप व भोगाने व्यापून गेलेले होते. फक्त पैसा त्याच्या नजरेस येत होता. इतर लोकांच्या नजरेसमोर तो पापी होता. त्याला बहुतेक वेळा अपमानास तोंड द्यावे लागे. अशा परिस्थितीला कंटाळून त्याला तारण प्राप्ती करून घ्यायची होती. येशू बद्दल त्याने ऐकले होते म्हणून त्याला पाहण्यासाठी तो झाडावर चढला आणि प्रत्यक्षात येशूने जक्कयच्या घरी जाऊन त्याचे तारण केले.
     आपल्या ख्रिस्ती जीवनात बहुतेकवेळा आपण सुद्धा धन-दौलत, मान-सन्मान, फसवा-फसवी ह्यांच्या आहारी गेलेलो आहोत. जक्कयप्रमाणे आपल्या जीवनाचे तारण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण येशूला स्विकारले पाहिजे. फक्त येशूच आपले तारण करू शकतो. म्हणून ह्या  मिस्साबलीत येशूने आपल्या ह्या ह्दयरुपी घरात यावे आणि आपले तारण करावे अशी प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू येशू, आमचे तारण कर.   
           
१. आपले पोप फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी सर्व लोकांना प्रभूजवळ येण्यास प्रोत्साहीत करावे व त्यांच्या दैनंदिन आचरणातून ख्रिस्ती राहणीमानाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक जीवघेण्या आजाराने ग्रासलेले आहेत, त्यांना प्रभूच्या प्रेमाचा व आरोग्याचा स्पर्श व्हावा. हे आजार त्यांना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य लाभावे व परत एकदा त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी भारत देशाची सेवा करीत असताना त्यांनी अहंकार, धन-दौलत, मान-सन्मान ह्यांच्या आहारी न जाता, प्रामाणिकपणे देशाच्या उन्नतीसाठी व भरभराटीसाठी सदैव झटावे म्हणून प्रार्थना करूया. 
४. आज ख्रिस्ती लोकांना खून, बलात्कार, छळवणूक व पिळवणूक असे बरेच अत्याचार सहन करावे लागत आहेत तसेच ख्रिस्ती समाजाविरुद्ध बॉम्बस्फोट व दंगली घडवून आणल्या जात आहेत. परमेश्वर कृपेने ते सर्व थांबावे व सर्वत्र प्रेम व शांती निर्माण व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. जे संपत्ती, धनदौलत ह्यांच्या मोहामुळे देवापासून दुरावलेले आहेत, देवाची जागा त्यांच्या ह्या द्रव्याने घेतली आहे अशांना परमेश्वराची महती कळावी व त्यांनी परमेश्वराकडे साधर्म परतावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



     

Wednesday, 19 October 2016

Reflection for the Homily of 30th Sunday in Ordinary Time (23-10-2016) By Lavet Fernandes.

सामान्यकाळातील तिसावा रविवार

दिनांक: २३/१०/२०१६.
पहिले वाचन: बेनसिरा ३५: १२-१४; १६-१८.
दुसरे वाचन: २तिमथी ४:६-८; १६-१८.
शुभवर्तमान: लुक १८:९-१४.
   
                           
“स्वतःला जो उंचावतो त्यास नमविले जाईल व जो नम्र होतो त्यास उंचावले जाईल”



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास देवासमोर नम्र व लीन हृदयाचे असण्यास पाचारत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात देवाच्या न्यायाची गणना केली आहे. देव सर्वांना न्यायाने एकसमान वागणूक देत असतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्या शिष्यांना स्वतःचे उदाहरण देत आहे. त्याने जसे खडतर जीवन जगून ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण केले तसे शिष्यांनाही करावे अशी तो अपेक्षा बाळगतो. तर शुभवर्तमानात संत लूक आपल्याला परुशी आणि जकातदार ह्यांच्या दाखल्याद्वारे नम्रतेचा बोध करत आहे.
 “जो कोणी स्वतःला उंचावतो त्यास नमविले जाईल आणि जो कोणी नम्र होतो त्यास उंच केले जाईल.” आपणही जकातदाराप्रमाणे नम्र होऊन परमेश्वराची नितांत सेवा करावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: बेनसिरा ३५ : १२-१४;१६,१८

ह्या पुस्तकामध्ये देवाच्या न्यायाचा उल्लेख केलेला आपणास आढळतो. देव न्यायाने सर्वांना समान वागणूक देत असतो.. तो अनाथ, पिडीत व जे काहीच करु शकत नाही त्यांची काळजी वाहतो. परमेश्वर सर्व लोकांची विशेषकरून जे हृदयाने नम्र आहेत अशा लोकांची प्रार्थना ऐकतो व त्यांना उत्तर देतो.
प्रत्येक मनुष्याची पात्रता त्याच्या कार्यावरून केली जाते. त्याला त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळते. तसेच देव नेहमी गरिबांच्या बाजूने असतो. जे कोणी देवाची आज्ञा पाळतात व त्याप्रमाणे वागतात, तो त्यांच्यावर त्याचे प्रेम दाखवतो व त्यांना त्यांचे प्रतिफळ किंवा बक्षीस देतो.
     प्रार्थनेमध्ये जो कोणी देवापुढे स्वत:ला नम्र व अपात्र समजतो, त्याचीच प्रार्थना ऐकली जाते. जो न्यायाने वागतो त्याला देव कधीच अन्यायाने वागवत नाही. देवाचा नेहमी न्यायाच्या आणि सत्याच्या बाजुने कल असतो.

दुसरे वाचन: २तिमथी ४:६-८; १६-१८.

संत पौल आपल्या शिष्यांना स्वत:चे उदाहरण देत आहे. त्याचे जीवन फार खडतर होते. त्याने त्याच्या जीवनात फार दु:ख सहन केले. त्यामुळे तो त्याच्या शिष्यांना सांगत आहे कि, ‘तुम्ही तुमच्या कार्यामध्ये मजबूत व खंबीर राहा, जेणेकरून हे कार्य तुम्हांस पुढे चालू ठेवता येईल.’
     संत पौल स्वत:चे जीवन त्याग करण्यासाठी तयार होता. तसेच ख्रिस्ताच्या सुवार्तेखातीर व शिष्यांना उदाहरण देण्यासाठी पौल नेहमी तत्पर होता. संत पौल सांगतो कि ‘मी चांगली लढाई केली आहे.’ संत पौलाने येथे ‘ग्रीक अलंकार’ वापरला आहे. तो ख्रिस्ताच्या विश्वासात एकरूप झाला होता. त्याने त्यांची सर्व आश्वासने पूर्ण केली. जेव्हा त्याचे परिवर्तन झाले व तो एक ख्रिस्ताचा सच्चा अनुयायी झाला, तेव्हा ख्रिस्त त्याच्या बाजूने होता व त्याला धैर्य देत होता, जेणेकरून त्याने देवाची सुवार्ता सर्व रोमच्या लोकांस पसरवावी. ह्या संधीचे सोने करून रोमवासीयांना त्याने ख्रिस्ताची ओळख करून दिली. परमेश्वराची सुवार्ता पसरवीत असताना त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागले परंतु, तो फार विश्वासू व ठाम होता कारण देव सदैव त्याच्या पाठीशी उभा होता. 

शुभवर्तमान:  लुक १८: ९-१४

आजच्या दाखल्यामध्ये परुशी स्वतःला उंचावत आहे आणि स्वतःच्या पावित्र्याबद्दल बोलत आहे. परुशी नेहमी स्वत:च्या कामाविषयी व प्रार्थनेविषयी बढाई मारत असे आणि सांगत असे कि, ‘मी सर्व नियम कडक पद्धतीने पाळतो’. ज्यांनी नियम पाळले नाहीत त्या लोकांना त्यांनी त्रासून सोडले होते तसेच त्यांचा तिरस्कारही करत.  
कर जमा करणारा, ‘जकातदार’, ह्याचा ‘ज्यू’ लोक द्वेष करत. कारण त्याला रोमन सरकारने सांगितल्याप्रमाणे ज्यू लोकांकडून तो कर गोळा करीत असे. याचा रोम सरकारला खूप फायदा होत होता. जिल्हाधिकाऱ्याला जितका कर वसूल करता येईल तितका कर वसूल केला जाई. कधी कधी वाजवीपेक्षा अधिकही कर वसूल केला जात असे.
दाखल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ‘परुशी’ हा गर्वाने देवाच्या मंदिरामध्ये उभा आहे. वस्तुस्थिती पाहिली तर तो देवाला सांगत आहे कि, ‘तू माझे आभार मानले पाहिजेत कारण माझ्यासारखी लोक ह्या भूतलावर आहेत’. त्या परुशाचे मुलभूत दुर्गुण असे आहेत कि, तो स्वतःला शहाणा व स्वाभिमानी समजत होता. कारण त्याला वाटले कि तो चांगले काम करत आहे. तो दुसऱ्यांना दाखवून देत आहे कि तो किती दयाळू आणि नीतिमान मनुष्य आहे आणि असे गुण दुसऱ्या कोणाकडेच नाहीत. पुढे परुशी असे सांगतो, की, ‘मी त्या जकातदारासारखा नाही. तो जकातदार फार मोठा लज्जास्पद पापी आहे. परुशी जकातदाराविषयी काही दुर्गुण सांगतो.
त्याउलट जकातदार मंदिरापासून खूप लांब उभा होता. त्याला वाटत होते कि, कोणी त्याला बघू नये. तो स्वत:ला अपात्र समजत होता आणि स्वर्गाकडे मान उंच करून पाहण्याचीही त्याला लाज वाटत होती. तो देवाला सांगतो कि, ‘हे परमेश्वरा माझ्यावर तुझी द्या व करुणा दाखव.’ देवाकडे तो त्याच्या पापांची कबुली करत होता. त्यांच्याकडे एकच आशा होती; ती म्हणजे ‘देवाची अमर्यादित द्या त्याला सार्वकालीक जीवनाकडे घेऊन जाईल’.
     ज्या नम्र मनुष्याने देवाकडून खरोखर पापांची क्षमा मागितली त्याला देवाने क्षमा व द्या दाखवली. त्याला त्यांच्या पापाची क्षमा झाली. परंतु ज्या मनुष्याने स्वत:ला उंच केले, गर्विष्ठ केले त्याला वाटले कि, त्यास क्षमेची गरज नाही; तो मंदिरातून खाली गेला व त्याचे हृद्य पापाने व गर्वाने भरलेले होते. त्यामुळे जो कोणी स्वत:ला उंचावतो त्याला नम्र केले जाईल आणि जो नम्र होतो त्याला उंच केले जाईल.

मनन चिंतन:

नारद हा भारतीय ऋषी होता व तो देवाचा पवित्र भक्त होता. त्याची भक्ती फार महान होती. एके दिवशी त्याला मोह झाला; त्याला वाटले कि, भूतलावर माझ्यापेक्षा देवावर अधिक प्रेम करणारा कोणीही नाही. नारदाला स्वतःचा फार चांगुलपणा वाटू लागला व त्यामुळे तो गर्विष्ठ झाला.
एक दिवस देवाने त्याच्यामध्ये असलेला गर्व समजुन त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. देव नारदाला म्हणाला कि, ‘माझा एक भक्त गंगा नदीच्या काठावर राहत आहे तू तिथे जाऊन त्यास ही माझी भेट देऊन ये. तो माझा अत्यंत विश्वासू भक्त आहे. नारदाला त्याच्याबद्दल घृणा वाटू लागली. त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ भक्त असू शकतो हे त्याला सहन होईना. नारद तिथे जातो व त्या एक शेतकऱ्याला भेटतो. तो रोज सकाळी लवकर उठून देवाचे नाव उच्चारत असे. नंतर तो नांगर घेऊन शेतात काम करत असे. संपूर्ण दिवस काम केल्यामुळे तो रात्री देवाचे नाव घेऊन झोपण्यासाठी जात असे.
नारदाला वाटलं कि, हा शेतकरी कसा काय देवाचा भक्त असू शकतो? कारण तो शेतकरी फक्त दोन वेळा देवाचे नाव घेत होता आणि संपूर्ण दिवस कष्ट करतो. मग नारदाने त्याचे मत देवापुढे मांडले. मग देव त्याला म्हणाला, ‘ठीक आहे, एक भांड घे त्यामध्ये काठोकाठ दूध भर संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून ह्याच ठिकाणी परत ये. हो! परंतु त्या भांड्यातील दुध सांडता कामा नये.’ नारदाला सांगितल्याप्रमाणे त्याने तसं केलं व संध्याकाळी परत आला. त्यानंतर देवाने त्याला विचारले कि, ‘तू हे भांडे दुधाने घेऊन फिरत असताना किती वेळा माझे नाव उच्चारले?’ नारदाने उत्तर दिले कि, ‘तुम्ही मला दुधाच्या भांड्यावर लक्ष देण्यास सांगीतले त्यामुळे मी तुमचे नाव घेऊ शकलो नाही.’ मग देवाने उत्तर देले कि, ‘त्या दुधाच्या भांड्याने तुझे लक्ष इतके वेधून घेतले कि तू माझे नामस्मरण करण्यास विसरला. पण त्या शेतकऱ्याकडे पहा; त्याच्यावर कामाचे ओझे असतानादेखील त्याने माझे नाव दोनदा घेतले व त्याला माझी दिवसातून दोनदा आठवण झाली.
जे देवाच्या अधिक जवळ असतात तेच देवाला विसरतात कारण ते त्यांच्या कामाला अधिक महत्व देतात. परंतु जो व्यक्ती देवापासून दूर असतो त्याच्या हृदयात, देव अधिक जवळ असतो. तीच व्यक्ती देवाचे नाव सदा-सर्वदा घेत असते.
आपणही त्या शेतकऱ्याचे उदाहरण घेतलं पाहिजे. जरी तो त्याच्या कामामध्ये गुंतलेला असला तरी तो देवाचे नाव घेत असे. कधी कधी स्वत:चे गर्व व घमेंड देवापासून दूर घेऊन जात असतो.
      आजच्या शुभवर्तमानामध्ये येशु ख्रिस्ताने परुशाची व जकातदाराची बोधकथा सांगितलेली आहे. परुशी मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेला परंतु प्रार्थना करण्याऐवजी त्याने देवाला स्वत:विषयी बढाया मारायला सुरुवात केली. त्याउलट जकातदार मंदिरामध्ये नम्र होऊन देवाची क्षमा मागतो म्हणून त्यास देवाची द्या, क्षमा प्राप्त होते. देव प्रत्येकाच्या बाह्यांगावर नव्हे तर हृदयाकडे पाहतो व त्यानुसार त्यांना न्याय देत असतो. जकातदार नम्र व पापी अंत:करणाने देवासमोर उभा राहिला म्हणून तो न्यायाने घरी गेला. त्याने त्याच्या भावना नम्रतेद्वारे व अपात्रपणे व्यक्त केल्या. आपणही त्या जकातदाराच्या वृत्तीचे असावे. देव नेहमी लीन आणि नम्र हृदय असणाऱ्या प्रार्थनांची उत्तरे देतो.
     यशया संदेष्ट्यालादेखील अपात्रतेचा अनुभव आला होता, जेव्हा तो देवाच्या पुढे उभा होता. तेव्हा तो स्वत:ला म्हणाला होता कि, “माझे आता वाईट झाले कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी डोळ्यांनी पाहिले आहे (यशया ६:५). जेव्हा आपण देवापुढे उभे राहतो, तेव्हा आपण देवाकडे आदराने व पवित्र दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. आपल्या कपड्यांमध्ये सभ्यता व लीनता असावी.
 देव कोणाचा कर्जदार नाही. आपण चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये आल्याने देवावर उपकार करत नसतो. लोक मंदिरात जाऊन बाजारात गेल्यासारखे वागतात; चार आठ आणे टाकून काहीन काही मागत असतात. कधी कधी काही लोक जे उच्च पदांवर किंवा राजकारणी आहेत, त्यांना वाटते कि, त्यांना उच्च ठिकाणी बसवून सन्मानित करायला हवे. परंतु मंदिरामध्ये सर्व मनुष्य एकसमान असतात. तेथे भेदभाव चालत नाही. जेव्हा एखादा मनुष्य चर्चमध्ये येतो, तेव्हा तो नम्र हृदयाचा असायला हवा.
 आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला उदाहरण आहे ते म्हणजे जकातदाराचे त्याने स्वत:ला नमवले म्हणून परमेश्वराने त्यास उंचावले. देव हा महान व सर्वज्ञ आहे. देव आपल्यासाठी जे काही चांगले आहे तेच करत असतो. जकातदाराला त्याच्या अपात्रतेचा व देवाच्या पावित्रतेचा अनुभव होता. त्यामुळे त्याने प्रार्थना करताना डोके वर करून पाहिले नाही, तर त्याने प्रामाणिकपणा व नम्रता दाखविली. त्यामुळे त्याला देवाची कृपा व आशिर्वाद मिळाला. आपल्या आंतरिक विखुरलेल्या आणि कोमेजून गेलेल्या हृदयाच्या प्रार्थनांना देवाकडून नेहमी उत्तर मिळते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:  हे ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आपले पोप फ्रान्सीस सर्व कार्डीनल्स, बिशप धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे युवक व युवती देवापासून दूर गेले आहे व ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या अधिक जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत व ज्यांना जगाच्या एैहिक वस्तूंमध्ये आनंद मिळतो अशा लोकांना तो आनंद सर्वकाळचा नाही तर तो क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव व्हावी व त्यांनी देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जी मुले अनाथ आश्रमामध्ये आहेत व ज्या मुलांना आई वडिलांनी सोडून दिले आहेत, त्यांची परमेश्वराच्या मायेच्या पंखाखाली वाढ व्हावी व उदारमतवादी आश्रयदात्यांनी त्यांचे आश्रयस्थान बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

Wednesday, 12 October 2016


Reflection for the Homily of 29th Sunday in Ordinary Time (Mission Sunday)(16-10-2016) By Fr. Wilson D’Souza.



सामान्यकाळातील एकोणतिसावा रविवार
(मिशन रविवार)

दिनांक: १६/१०/२०१६.
पहिले वाचन: निर्गम १७:८-१३.
दुसरे वाचन: २तिमथी  ३:१४-४:२.
शुभवर्तमान: लूक १८: १-८.

'स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्त जगात प्रकट करणे' 






प्रस्तावना:

     आज देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहे.
सर्व साधारणपणे ‘मिशन’ ह्या शब्दाचा अर्थ ‘पाठवलेला’ आपल्या स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्तसभा आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्ता पसरविण्यासाठी पाठवत असली तरी मिशन कार्य सर्वात प्रथम घरात सुरु करायला सांगत आहे. Charity begins at home.
मिशन रविवार साजरा करणे म्हणजे नेमके काय करणे? मिशन रविवार साजरा करणे म्हणजे केवळ प्रार्थना करणे (to pray), आज्ञाधारकपणे (obey) जे काही ख्रिस्तसभा सांगेल ते ऐकणे आणि दान पेटीत (to pay) पैसे टाकण्यापर्यंत मर्यादित नाही तर आपल्याला मिळालेल्या स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्त जगात प्रकट करणे होय. ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असता खरे मिशनरी बनण्यास देवाची कृपा मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: निर्गम १७:८-१३.

निर्गम पुस्तकातून घेतलेल्या वाचनात मोशे यहोशवाला आपल्यातले काही पुरुष निवडून आमालेकाशी युद्ध करण्यास सांगतो. जोपर्यंत मोशे टेकडीच्या माथ्यावर देवाची काठी घेऊन उभा राहतो तोपर्यंत यहोशवा पराक्रमी होतो. पण मोशेचा जेव्हा हात खाली होत असे तेव्हा आमलेकाची सरशी होई.
     पहिल्या वाचनांत जोपर्यंत मोशे हातात देवाची काठी पकडतो, तेव्हा इस्रायल सरशी होत असतात. ती मोशेची काठी नसून देवाची काठी होती. यहोशवा व मोशे हे आमालेकाच्या विरुद्ध युद्ध जिंकलेले नसून देवच ते युद्ध जिंकत असतो.

दुसरे वाचन: २तिमथी  ३:१४-४:२.

संत पौल आपला शिष्य तीमथी ह्याला तो बालपणापासून जे काही शिकलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तारणासाठी सज्ज होण्यास सांगत आहे. विशेषकरून पवित्र शास्राचा सद्बोध घेऊन नीतिशिक्षणाकरिता देवाचे भक्त व चांगल्या कामासाठी सज्ज होण्यास त्यास संत पौल सांगत आहे.

शुभवर्तमान: लूक १८: १-८.

लूकच्या शुभवर्तमानात आपल्याला ‘अत्याग्रही विधवा’ व जुलमी न्यायाधीशाचा दाखला देण्यात आलेला आहे. अत्याग्रही विधवा सातत्याने न्याय मिळविण्यासाठी न्यायाधीशाकडे जात असते. तेव्हा जुलमी न्यायाधीश म्हणतो, ‘मी देवाला भीत नाही किंवा माणसांना जुमानीत नाही तरी ह्या विधवेचा त्रास मला सहन होत नाही आणि तिला न्याय मिळवून देतो’. अत्याग्रही विधवेचा आणि जुलमी न्यायाधीशाचा संवाद ऐकून येशू आपल्याला एक विशिष्ट बोध देत आहे, तो म्हणतो, ‘अन्यायी न्यायाधीश जर असा वागत असेल, तर आपला स्वर्गीय पिता जे त्याच्याकडे रात्रं-दिवस धावा करतील त्यांना न्याय देणार नाही काय?’
मनुष्य मनुष्याला चांगला न्याय देऊ शकत नसला तरी , खऱ्याचे खोटे करून आणि खोट्याचे खरे करून अनेक खटले जिंकल्याचे आपण ऐकतो परंतु देवाचा न्याय रास्त आणि सत्याशी एकनिष्ठ आहे. खऱ्या-खोट्याचा खेळ तेथे खेळला जात नाही.
     येशूच्या काळात स्रीला दुय्यम स्थान दिले जात असे; आणि विधवेची तर अवहेलना केली जात असे. तिला समाजात स्थान आणि मान नसताना ती एखाद्या पुरुष्याच्या घरी परत परत गेली तर ती एक घृणास्पद गोष्ट मानली जात असे. परंतु ती अत्याग्रही विधवा आपल्याला दाद आणि न्याय मिळेपर्यंत त्या जुलमी न्यायाधीशाकडे जात असे. म्हणून प्रार्थना करताना खचून न जाता सातत्याने आणि सदा सर्वदा आपण प्रार्थना करावी हाच ह्या दाखल्याचा विशेष मुद्दा आपणास पटवून देण्यात आला आहे.

बोधकथा:

एक दिवस एक शिष्य आपल्या गुरूकडे गेला आणि त्याला म्हटले कि, ‘गुरुजी, मला प्रार्थना करणे अवघड जात आहे तेव्हा कृपाकरून माझ्या प्रार्थनेत सातत्य लाभावे म्हणून मला काहीतरी सल्ला द्या’. गुरूने आपल्या शिष्याला सांगितले, ‘येथून एक किलोमीटर जा; तेथे गेल्यावर तुला एक घर दिसेल तेथे जाऊन तू दारावरची घंटा वाजव आणि तेथे तुला योग्य तो सल्ला मिळेल’. गुरूचा सल्ला ऐकून शिष्य त्या घराकडे गेला तेथे पोहोचताच त्याने दारावरची घंटा वाजवली, पुष्कळ वेळ थांबून देखील आणि परत परत घंटा वाजवून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
रागाने तो परतीची वाट पकडत असता त्याला एक मनुष्य दिसला. त्याने त्याला सांगितले हजार वेळा घंटा वाजवली तरी तुला प्रतिसाद मिळणार नाही कारण त्या दरवाज्यावर लिहिलेले शब्द तू वाचलेलेच नाहीत. त्या दरवाजावर “Push” म्हणजे “ढकला” असे लिहिलेले होते. त्याने नंतर दरवाजा उघडला व आत गेला तेव्हा दुसऱ्या एका गुरूने त्याला सांगितले प्रार्थना करणे म्हणजे “Push” आणि “PUSH” ह्या शब्दाचा खरा खुरा अर्थ म्हणजे “Pray Until Something Happens.” आता येथून तू परत जात असता तुझ्या करीता कोणी दरवाजा उघडणार नाही. त्यावर लिहिलेले शब्द वाच आणि बाहेर जा. त्यावर “PULL” असे शब्द लिहिलेले होते आणि ह्या शब्दाचा अर्थ, “Pray Untill Lord Listens” . असा होता. हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याला त्याचा योग्य तो सल्ला मिळाला.

मनन चिंतन:

आज जगामध्ये अनेक कारणावरून युद्ध चालू आहेत. विशेष करून सध्याचे सिरीयामध्ये चालू असलेलले युद्ध. बलाढ्य देश म्हणजेच रशिया आणि अमेरिका ह्यांनी आपला स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सिरीयाला बळीचा बकरा बनवलेले आहे.  दोन्ही देशांची शांततेकडे वाटचाल नसून अधिकाधिक पेट्रोल गोळा करण्यामागे घौडदौड चालू आहे.
आजच्या पहिल्या वाचनात जे काही युद्धाविषयी ऐकले इस्रायल प्रजेचे अमालेकाशी चाललेले युद्ध आणि यहोशवा आणि मोशे ह्यांच्यातील चाललेला संवाद आपल्याला एका गोष्टीची सातत्याने आठवण करून देते, कि, देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा असलेला मोशे किंवा प्रत्यक्षात युद्धात उतरलेला यहोशवा हे युद्ध जिंकत नसून परमेश्वर त्यांच्यासाठी युद्ध लढत होता आणि इस्रायलच्या अंत:करणातील युद्ध थांबवत होता. आज जगात जी युद्ध चाललेली आहेत ती सर्वात प्रथम रणांगणात लढलेली जात नसून माणसाच्या अंत:करणात त्याला सुरुवात होत असते.
दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल तिमथीला ‘शास्राचं’ महत्व पटवून देत आहे. इब्रीकरांस लिहिलेल्या पत्रात (४:१२) आपण वाचतो, “देवाचे वचन सजीव सक्रीय, कोणत्याही दुधारी तलवारी पेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्याचे परीक्षक असे आहे”. ‘मिशन रविवार’ साजरा करत असताना संत पौल तिमथीद्वारे आपल्याला संदेश देतो कि, ज्या गोष्टी आपण लहानपणापासून शिकलो आहोत, त्या आपल्याला पवित्र शास्रांतून प्राप्त झाल्या आहेत. म्हणून, पवित्र शास्राचे अनुकरण करून त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजेच मिशन रविवार योग्यरित्या साजरा करणे होय. केवळ सुवार्ता प्रचारक न होता सुवार्तेप्रमाणे जीवन जगून आपले मिशन कार्य पूर्तीस न्यायचे आहे.
शुभवर्तमानात येशू आपल्याला दाखल्याने एकच गोष्ट शिकवत आहे, ती म्हणजे सातत्याने व खचून न जाता आपण प्रार्थना केली पाहिजे. जुलमी न्यायाधीश कोणालाही भीत नसला किंवा जुमानीत नसला तरी अत्याग्रही विधवेला तो नक्कीच घाबरलेला होता. त्या विधवेप्रमाणे सातत्याने प्रभूशब्दाचा प्रसार करायला मिशन रविवार आपल्याला आमंत्रित करत आहे. मिशन हे केवळ मानवाचे किंवा देऊळमातेचे कार्य नसून प्रत्यक्षात देवाचे कार्य आहे. ह्या कार्याला हातभार लावणे म्हणजेच मिशनरी होणे होय.
     येशू ख्रिस्त हा देवपित्याने पाठवलेला पहिला मिशनरी आहे. म्हणून आपले जीवन त्याच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करूया व आपले दैनंदिन जीवनातील मिशनकार्य नम्रतेने आणि उदारतेने करण्यासाठी लागणारा कृपाशीर्वाद आपल्याला ह्या पवित्र मिस्साबलीत लाभावा म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना.

१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी स्वत:ला मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता पसरविण्यास धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता नैतिकता व सत्यता ह्यांनी प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते बनावेत म्हणून प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.