Reflection for the Homily of 29th Sunday in Ordinary Time (Mission Sunday)(16-10-2016) By Fr. Wilson D’Souza.
सामान्यकाळातील एकोणतिसावा रविवार
(मिशन
रविवार)
दिनांक: १६/१०/२०१६.
पहिले वाचन: निर्गम
१७:८-१३.
दुसरे वाचन: २तिमथी ३:१४-४:२.
शुभवर्तमान: लूक १८:
१-८.
'स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्त जगात प्रकट करणे'
प्रस्तावना:
आज देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार त्याचबरोबर मिशन रविवार
साजरा करीत आहे.
सर्व साधारणपणे ‘मिशन’ ह्या शब्दाचा अर्थ ‘पाठवलेला’
आपल्या स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्तसभा आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्ता
पसरविण्यासाठी पाठवत असली तरी मिशन कार्य सर्वात प्रथम घरात सुरु करायला सांगत आहे.
‘Charity begins
at home.’
मिशन रविवार
साजरा करणे म्हणजे नेमके काय करणे? मिशन रविवार साजरा करणे म्हणजे केवळ प्रार्थना
करणे (to pray), आज्ञाधारकपणे (obey) जे काही ख्रिस्तसभा सांगेल ते ऐकणे आणि दान
पेटीत (to pay) पैसे टाकण्यापर्यंत मर्यादित नाही तर आपल्याला मिळालेल्या स्नान-संस्काराद्वारे
ख्रिस्त जगात प्रकट करणे होय. ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असता खरे मिशनरी
बनण्यास देवाची कृपा मागुया.
सम्यक
विवरण:
पहिले
वाचन: निर्गम १७:८-१३.
निर्गम
पुस्तकातून घेतलेल्या वाचनात मोशे यहोशवाला आपल्यातले काही पुरुष निवडून आमालेकाशी
युद्ध करण्यास सांगतो. जोपर्यंत मोशे टेकडीच्या माथ्यावर देवाची काठी घेऊन उभा
राहतो तोपर्यंत यहोशवा पराक्रमी होतो. पण मोशेचा जेव्हा हात खाली होत असे तेव्हा
आमलेकाची सरशी होई.
पहिल्या वाचनांत जोपर्यंत मोशे हातात देवाची
काठी पकडतो, तेव्हा इस्रायल सरशी होत असतात. ती मोशेची काठी नसून देवाची काठी
होती. यहोशवा व मोशे हे आमालेकाच्या विरुद्ध युद्ध जिंकलेले नसून देवच ते युद्ध
जिंकत असतो.
दुसरे
वाचन: २तिमथी ३:१४-४:२.
संत पौल
आपला शिष्य तीमथी ह्याला तो बालपणापासून जे काही शिकलेला आहे त्याच्यावर
विश्वास ठेवून तारणासाठी सज्ज होण्यास सांगत आहे. विशेषकरून पवित्र शास्राचा
सद्बोध घेऊन नीतिशिक्षणाकरिता देवाचे भक्त व चांगल्या कामासाठी सज्ज होण्यास त्यास
संत पौल सांगत आहे.
शुभवर्तमान:
लूक १८: १-८.
लूकच्या
शुभवर्तमानात आपल्याला ‘अत्याग्रही विधवा’ व जुलमी न्यायाधीशाचा दाखला
देण्यात आलेला आहे. अत्याग्रही विधवा सातत्याने न्याय मिळविण्यासाठी न्यायाधीशाकडे
जात असते. तेव्हा जुलमी न्यायाधीश म्हणतो, ‘मी देवाला भीत नाही किंवा माणसांना
जुमानीत नाही तरी ह्या विधवेचा त्रास मला सहन होत नाही आणि तिला न्याय मिळवून देतो’.
अत्याग्रही विधवेचा आणि जुलमी न्यायाधीशाचा संवाद ऐकून येशू आपल्याला एक विशिष्ट
बोध देत आहे, तो म्हणतो, ‘अन्यायी न्यायाधीश जर असा वागत असेल, तर आपला स्वर्गीय
पिता जे त्याच्याकडे रात्रं-दिवस धावा करतील त्यांना न्याय देणार नाही काय?’
मनुष्य मनुष्याला चांगला न्याय देऊ शकत नसला तरी
, खऱ्याचे खोटे करून आणि खोट्याचे खरे करून अनेक खटले जिंकल्याचे आपण ऐकतो परंतु
देवाचा न्याय रास्त आणि सत्याशी एकनिष्ठ आहे. खऱ्या-खोट्याचा खेळ तेथे खेळला जात
नाही.
येशूच्या
काळात स्रीला दुय्यम स्थान दिले जात असे; आणि विधवेची तर अवहेलना केली जात असे. तिला
समाजात स्थान आणि मान नसताना ती एखाद्या पुरुष्याच्या घरी परत परत गेली तर ती एक घृणास्पद
गोष्ट मानली जात असे. परंतु ती अत्याग्रही विधवा आपल्याला दाद आणि न्याय
मिळेपर्यंत त्या जुलमी न्यायाधीशाकडे जात असे. म्हणून प्रार्थना करताना खचून न
जाता सातत्याने आणि सदा सर्वदा आपण प्रार्थना करावी हाच ह्या दाखल्याचा विशेष
मुद्दा आपणास पटवून देण्यात आला आहे.
बोधकथा:
एक दिवस
एक शिष्य आपल्या गुरूकडे गेला आणि त्याला म्हटले कि, ‘गुरुजी, मला प्रार्थना करणे
अवघड जात आहे तेव्हा कृपाकरून माझ्या प्रार्थनेत सातत्य लाभावे म्हणून मला काहीतरी
सल्ला द्या’. गुरूने आपल्या शिष्याला सांगितले, ‘येथून एक किलोमीटर जा; तेथे गेल्यावर
तुला एक घर दिसेल तेथे जाऊन तू दारावरची घंटा वाजव आणि तेथे तुला योग्य तो सल्ला
मिळेल’. गुरूचा सल्ला ऐकून शिष्य त्या घराकडे गेला तेथे पोहोचताच त्याने दारावरची
घंटा वाजवली, पुष्कळ वेळ थांबून देखील आणि परत परत घंटा वाजवून त्याला प्रतिसाद
मिळाला नाही.
रागाने तो परतीची वाट पकडत असता त्याला एक मनुष्य
दिसला. त्याने त्याला सांगितले हजार वेळा घंटा वाजवली तरी तुला प्रतिसाद मिळणार
नाही कारण त्या दरवाज्यावर लिहिलेले शब्द तू वाचलेलेच नाहीत. त्या दरवाजावर “Push”
म्हणजे “ढकला” असे लिहिलेले होते. त्याने नंतर दरवाजा उघडला व आत गेला तेव्हा
दुसऱ्या एका गुरूने त्याला सांगितले प्रार्थना करणे म्हणजे “Push” आणि “PUSH” ह्या
शब्दाचा खरा खुरा अर्थ म्हणजे “Pray Until Something
Happens.” आता येथून तू परत जात असता तुझ्या करीता कोणी दरवाजा
उघडणार नाही. त्यावर लिहिलेले शब्द वाच आणि बाहेर जा. त्यावर “PULL” असे शब्द
लिहिलेले होते आणि ह्या शब्दाचा अर्थ, “Pray Untill Lord
Listens” . असा होता. हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याला त्याचा
योग्य तो सल्ला मिळाला.
मनन
चिंतन:
आज
जगामध्ये अनेक कारणावरून युद्ध चालू आहेत. विशेष करून सध्याचे सिरीयामध्ये चालू
असलेलले युद्ध. बलाढ्य देश म्हणजेच रशिया आणि अमेरिका ह्यांनी आपला स्वत:चा
स्वार्थ साधण्यासाठी सिरीयाला बळीचा बकरा बनवलेले आहे. दोन्ही देशांची शांततेकडे वाटचाल नसून अधिकाधिक
पेट्रोल गोळा करण्यामागे घौडदौड चालू आहे.
आजच्या पहिल्या वाचनात जे काही युद्धाविषयी ऐकले
इस्रायल प्रजेचे अमालेकाशी चाललेले युद्ध आणि यहोशवा आणि मोशे ह्यांच्यातील
चाललेला संवाद आपल्याला एका गोष्टीची सातत्याने आठवण करून देते, कि, देवाची काठी
हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा असलेला मोशे किंवा प्रत्यक्षात युद्धात उतरलेला
यहोशवा हे युद्ध जिंकत नसून परमेश्वर त्यांच्यासाठी युद्ध लढत होता आणि
इस्रायलच्या अंत:करणातील युद्ध थांबवत होता. आज जगात जी युद्ध चाललेली आहेत ती
सर्वात प्रथम रणांगणात लढलेली जात नसून माणसाच्या अंत:करणात त्याला सुरुवात होत
असते.
दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल तिमथीला ‘शास्राचं’
महत्व पटवून देत आहे. इब्रीकरांस लिहिलेल्या पत्रात (४:१२) आपण वाचतो, “देवाचे वचन
सजीव सक्रीय, कोणत्याही दुधारी तलवारी पेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व
मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्याचे परीक्षक असे आहे”.
‘मिशन रविवार’ साजरा करत असताना संत पौल तिमथीद्वारे आपल्याला संदेश देतो कि, ज्या
गोष्टी आपण लहानपणापासून शिकलो आहोत, त्या आपल्याला पवित्र शास्रांतून प्राप्त झाल्या
आहेत. म्हणून, पवित्र शास्राचे अनुकरण करून त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजेच मिशन रविवार
योग्यरित्या साजरा करणे होय. केवळ सुवार्ता प्रचारक न होता सुवार्तेप्रमाणे जीवन
जगून आपले मिशन कार्य पूर्तीस न्यायचे आहे.
शुभवर्तमानात येशू आपल्याला दाखल्याने एकच गोष्ट
शिकवत आहे, ती म्हणजे सातत्याने व खचून न जाता आपण प्रार्थना केली पाहिजे. जुलमी
न्यायाधीश कोणालाही भीत नसला किंवा जुमानीत नसला तरी अत्याग्रही विधवेला तो नक्कीच
घाबरलेला होता. त्या विधवेप्रमाणे सातत्याने प्रभूशब्दाचा प्रसार करायला मिशन रविवार
आपल्याला आमंत्रित करत आहे. मिशन हे केवळ मानवाचे किंवा देऊळमातेचे कार्य नसून प्रत्यक्षात
देवाचे कार्य आहे. ह्या कार्याला हातभार लावणे म्हणजेच मिशनरी होणे होय.
येशू
ख्रिस्त हा देवपित्याने पाठवलेला पहिला मिशनरी आहे. म्हणून आपले जीवन
त्याच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करूया व आपले दैनंदिन जीवनातील मिशनकार्य
नम्रतेने आणि उदारतेने करण्यासाठी लागणारा कृपाशीर्वाद आपल्याला ह्या पवित्र
मिस्साबलीत लाभावा म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना.
१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची
शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात
आणण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी
स्वत:ला मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या
कृपेचा वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता
पसरविण्यास धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले
आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य
प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर
अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूचा
कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता
नैतिकता व सत्यता ह्यांनी प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते
बनावेत म्हणून प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व
कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment