Reflection for the
Homily of 28th Sunday in Ordinary Time (09-10-2016) By CAMRELLO DIMEKAR
सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार
दिनांक: ०९/१०/२०१६.
पहिले वाचन – २राजे ५ : १४-१७.
दुसरे वाचन – २तिमथी २ : ८-१३.
शुभवर्तमान – लुक १७ : ११-१९.
“त्याने मोठ्या
स्वरात देवाची स्तुती केली”
प्रस्तावना
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो आज ख्रिस्तसभा
सामान्य काळातील अठठाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला देवाने
केलेल्या कृपादानाबद्दल देवाचे आभार मानण्यास आमंत्रित करत आहे.
एलिशा ह्या परमेश्वराच्या संदेष्ट्याने नामान या
कुष्ठरोग्याला कसे बरे केले याचे वर्णन आजच्या पहिल्या वाचनात केले आहे. आजच्या
दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो परमेश्वराला शरण गेलो, तर त्याचे वाचन आम्हाला
प्राप्त होते आणि त्या वचनाद्वारे आम्ही सर्व प्रकारचे दुःख सहन करण्यास समर्थ होतो.
तर शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताने कुष्ठरोग झालेल्या दहा लोकांची कुष्ठारोगापासून
मुक्तता केली, त्यांच्यापैकी फक्त एकाने येऊन प्रभूचे आभार मानले हे ऐकावयास
मिळते.
कुष्ठरोग हा आपल्या दुर्बळतेचे, आजारीपणाचे व पापांच्या
गुलामगिरीचे प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पापांच्या गुलामगिरीतून
मुक्त करण्यासाठी, बरे करण्यासाठी व सशक्त करण्यासाठी आला. प्रभूच्या चमत्काराचा
अनुभव घेण्यासाठी ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: २ राजे ५: १४-१७
रोग मुक्त
झाल्यामुळे नामान अतिशय नम्र होऊन कृतज्ञतेने अलीशाकडे आला. इस्रायलच्या देवाबद्दल
त्याचे पूर्वीचे मत काही असो, आता तोच एक देव आहे असे त्याने स्पष्टपणे सांगितले;
येथून तो पुढे फक्त देवाचीच उपासना करणार होता. त्याने अलीशाला, त्याने आणलेल्या
भेटीचा स्वीकार करण्यास सांगत होता. देवाची पावित्र्यता प्रवक्ता अलिशा ह्याच्यामध्ये
दिसत होती. त्याने दोन खेचरांच्या ओझ्याएवढी इस्रायलमधील माती मिळावी अशी विनंती
केली. त्याचा अर्थ असा नाही कि, तो पुन्हा एकदा दुसऱ्या देवाची आराधना
(मूर्तीपूजा) करणार. त्याला समजले कि देवाची त्याच्या लोकांवर आणि इस्रायलच्या
भूमीवर प्रेमाचे संबंध होते. त्यावरून देव कोणत्याही प्रकारे इस्रायल प्रदेशापुरताच
होता हेच त्याला मनातून वाटले असे म्हणणे बरोबर नाही. देवाची भूमी पवित्र आहे.
तेव्हा अराममध्ये देवाच्या उपासनेसाठी पवित्र स्थान तयार करण्यास तिकडची, देवाच्या
भूमीतील मातीच आवश्यक आहे हाच विचार यातून स्पष्ट होतो.
दुसरे वाचन: २ तीमथी २:८-१३
संत पौलाच्या ह्या संदेशात तीन मुळसूत्रे आहेत. प्रथम येशु हाच
ख्रिस्त, देवाचा अभिषिक्त मसीहा आहे. दुसरे सूत्र म्हणजे कि त्याला मेलेल्यातून
उठवण्यात आले आणि तिसऱ्या सूत्रात संत पौल म्हणतो कि, तो येशू ख्रिस्त दाविदच्या
वंशातील, संतानातील आहे. या आणखी एकाच ठिकाणी पौलाने ही वस्तूस्थिती सांगितली आहे.
देवाने दिलेल्या अभिवचनांची परिपूर्ती झाल्याचे आपणास दिसून येते. आपणा स्वत:ला
बंधन पडले असले तरी देवाचे वचन बंधनात नाही, असे पौल सांगतो. स्वत: पौल बंधनात,
कैदेत पडला असला तरीही सुवार्ता-संदेश सांगण्याचे कार्य दुसऱ्याकडून निश्चित होतच
राहील हे त्याला येथे सांगायचे आहे. आपण निवडलेल्या लोकांसाठी सर्वकाही धीटाने
सोसतो असे पौलने सांगितले आहे. ख्रिस्त येशुमध्ये या शब्दांनी हे तारण ख्रिस्ती
आहे एवढेच नव्हे तर ते ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताचे असलेल्या सर्वांना लाभले आहे हेही
दाखवले आहे.
शुभवर्तमान: लूक १७:११-१९
काही कृष्टरोगी बरे होण्यासाठी येशूकडे आले तेव्हा ‘जा आणि
याजकापुढे उभे राहा’ एवढेच तो त्यांना म्हणाला. आज्ञपालनातून त्यांच्या विश्वासाचे
प्रमाण मिळेल आणि परिणामी ते बरे होतील हेच येथे अभिप्रेत होते. सर्वांनीच विश्वास
दाखवला, सर्वच बरे झाले, पण आपण बरे झालो म्हणून त्यांच्यापैकी एकानेच थांबून
देवाची स्तुती केली, येशूच आभार मानले. उपकार न स्मरण्याच्या इतरांच्या वृत्तीवर
येशूने भाष्य केले आणि विश्वासामुळे हा ‘शमरोनी’‘देह व आत्मा’ असा रोगमुक्त झाला
आहे असे म्हटले. या उदाहरणातून विश्वासाचे अद्॒भूत कार्य दिसते तसेच यातून
कृतज्ञता हाही विश्वासाचा आवश्यक भाग असल्याचे शिकवले आहे.
बोधकथा:
एक मनुष्य मरणानंतर स्वर्गात जातो. स्वर्गातील दुत त्याला
स्वर्ग कसा आहे, स्वर्गामध्ये लोक काय करतात हे दाखवत होते. दूताने त्या माणसाला
स्वर्गामध्ये असलेली कार्यालये (offices) सुद्धा दाखवली. एका कार्यालयात लोक
कामामध्ये धुंद होते. तेथे तर धुमाकूळच चालू होता. मात्र दुसऱ्या कार्यालयातील
माणसे काम नसल्यामुळे नुसती बेकार बसली होती. त्यांना काहीच काम नव्हते. तेव्हा
त्या माणसाने त्या दोन कार्यालयाचा अर्थ काय आहे आणि त्या कार्यालयात कोणते काम
केले जाते ह्याविषयी विचारले. दुत त्याला म्हणाला ज्या कार्यालयात भरपूर काम होते,
आणि लोक कामामध्ये धुंदहोते त्या कार्यालयात लोक आपल्या प्रार्थना किंवा विनंत्या
पूर्ण व्हाव्यात म्हणून पत्रे पाठवतात. तर दुसऱ्या कार्यालयातील लोक ज्यांच्या
मागण्या पूर्ण झाल्या आहेत त्यांच्याकडून आभार मागण्यासाठी पाठवलेल्या पत्राचे
स्वीकार करतात.
लोक अनेकदा त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी स्वर्गात
मोठी खळबळच करतात. मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार
मानण्याचे विसरून जातात.
मनन चिंतन:
देवाविषयी आणि प्रवक्ता
अलीशाविषयी नामानाचा असलेला आदर आणि कुतज्ञता हीच महान देणगी देवाला भव्य आहे. जी
देणगी देवाला भव्य आहे, जी देणगी त्याने आणली होती ती त्याचा कुष्ठरोग बरे
होण्यापेक्षा जात आहे. त्याला देवाचा अनुभव आला, म्हणून तो विश्वसनीय बनला आणि
त्याने देवाचे आभार मानण्याचा निर्धार केला. प्रवक्ता अलीशाच्या आज्ञेवर विश्वास
ठेवल्यामुळे त्याला शारिरीक रोगमुक्तता प्राप्त झाली आणि त्याचा देवावर असलेल्या
दृढ विश्वासामुळे त्याला त्याच्या पापांची क्षमा झाल्याचे अनुभवयास मिळाले; त्याने
दाखवलेल्या कुतज्ञतेमुळे त्याला देवाकडून महान आशीर्वाद प्राप्त झाला, तो म्हणजे
त्याचा देवावरील “विश्वास.’
येशूने बरे केलेल्यांपैकी परत
आलेल्या एका शमरोनीला पाहून आनंद झाला होता. कारण तो प्रभूचे आभार मानण्यासाठी
मागे फिरुन आला होता. येशूला दुसऱ्या नऊ जणांची वृत्ती पाहून दुःख झाले कारण त्यांनासुद्धा
रोगमुक्त करण्यात आले होते मात्र ते येशूचे आभार मानण्यासाठी आले नाहीत. येशूला
वाटत होते की, त्यांनीसुद्धा परत येऊन येशूचे आभार मानावे. ह्याचा अर्थ असा होत
नाही की येशूने केलेल्या चमत्काराचा त्याला गर्व होता. जरी त्यांना शारिरीक रोगापासून
मुक्तता प्राप्त झाली होती मात्र त्यांना आध्यात्मिक बरेपणाची नितांत गरज होती.
कारण ते दूर काही अंतरावर असताना बरे झाले होते. आता त्यांना येशूचा जवळून अनुभव
घेण्याची गरज होती. त्यामुळे त्यांना येशुवरील असलेला विश्वास बळकट होण्यास मदत
होईल.
जरी ते परत आले नाही तरी
त्यांना येशूने पुन्हा रोगी बनवले नाही. त्यांना मिळालेल्या रोगमुक्तीचे वरदान त्यांच्यापासून
हिरावून घेतले नाही. ते आनंदी होऊन त्यांच्या गावात गेले असतील आणि याजकांकडून ते
बरे आहेत ह्याचे प्रमाणपत्र/दाखला घेतला
असेल. मात्र त्यांना एका कृपादानाचा अनुभव येऊ शकला नाही कारण गर्वामुळे त्यांना
कृतज्ञता पाळावी लागली.
ग्रीक भाषेत ‘मिस्सा’ ह्या शब्दाचा अर्थ ‘आभार’, ‘धन्यवाद’
असा आहे. जेंव्हा आपण पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होतो, तेव्हा आपण जसे ‘नामान’
आणि ‘शमरोनी’ कृष्ठरोग्याने केले तसेच करत असतो. आपण देवाला धन्यवाद आणि त्याची
स्तुती करत असतो. आपल्याला असे वाटत असते की, आपले आभार एखाद्या बाटलीत बंद
असलेल्या गोष्टीप्रमाणे असायला नको. जोपर्यंत त्या बाटलीतून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत
त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. हि तर आपली जबाबदारी आहे कि, त्या गोष्टी आपण
बाटलीतून बाहेर काढाव्यात. त्या गोष्टी बाहेर येऊ शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना
बाहेर काढत नाहीत. देवाच्या वचनाला आपण बेडी घालू शकत नाही. पण आपला प्रतिसाद
देवाच्या वचनाला बेडी घालू शकतो जेव्हा आपण सावधान, खबरदार नसतो.
आपल्या सर्वांमध्ये एखाद्या
घडयाळासारखा आत्मनिष्ठपणा आहे. तोच आत्मनिष्ठपणा सेकंदाच्या काट्याप्रमाणे वारंवार
आवाज करत असतो.. मला पाहिजे मला गरज आहे, मला पाहिजे. आपला आत्मनिष्ठपणा
आपल्याकडून अनेक मागण्या करू शकतो, ज्या मागण्या कधीही पूर्ण होऊ शकत नाही.
म्हणूनच आपल्याला आत्मसंयमाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्या महत्वाच्या
गोष्टींची गरज आहे हे कळून येईल. ह्या गोष्टीपासून आपल्याला कोणता लाभ मिळाला आहे
आणि त्याचा आपण कशाप्रकारे उपयोग केला आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्याचे
आभार उपकार मानले पाहिजे. आभार मानल्यामुळे आपण दुसऱ्यांमध्ये बदल घडवून आणू शकतो.
कृतज्ञता हि एक संवेदनशील आत्म्याचा दृष्टीकोन आहे आणि कृतज्ञता हे चांगल्या
हृदयाचे चिन्ह आहे. कृतज्ञ हृद्य हे नम्र हृद्य असते. नम्र हृद्य हे धार्मिक हृद्य
असते. धार्मिक हृद्य हे आदरयुक्त हृद्य असते. म्हणून असे हृद्य प्रत्येक वेळी
आनंदी आणि निरोगी असते. कृतज्ञता हे प्रेम आहे आणि हेच सत्य आहे. जो कोणी उपकार
व्यक्त करणारा असतो तो कसलाही विचार न करता आपल्याला ज्याने मदत केली आहे
त्याच्याकडे वळतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नवीन संबंध जुळतात. देव आपल्याला
सांगत आहे कि, आपण देवाचे प्रेम ओळखले पाहिजे आणि आपले संपूर्ण जीवन देवाच्या हाती
सोपवावे. त्यामुळे आपले देवाबरोबर असलेले नाते शेवट पर्यंत टिकून राहील.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद : हे परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो.
१. ज्या प्रेमाने परमेश्वराने आपल्याला निर्माण केले त्याच उत्कंठ प्रेमाची
अनुभूती आपल्याला यावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. ज्या प्रेमाने परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगाला दिला जो सर्व
जगाचा तारणहार ठरला त्या परमेश्वराच्या महान प्रेमाची अनुभूती आपल्याला यावी
म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. समाजातील दुर्बळ घटकाबद्दल आपण संवेदनशील असावे व त्यांच्यावर आपण मनापासून
प्रेम करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपण प्रतिफळाची अपेक्षा न करता इतरांना मदत करावी व दुसऱ्याबद्दल कृतज्ञ
असावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक गरजांसाठी प्रभूकडे
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment