Wednesday, 19 October 2016

Reflection for the Homily of 30th Sunday in Ordinary Time (23-10-2016) By Lavet Fernandes.

सामान्यकाळातील तिसावा रविवार

दिनांक: २३/१०/२०१६.
पहिले वाचन: बेनसिरा ३५: १२-१४; १६-१८.
दुसरे वाचन: २तिमथी ४:६-८; १६-१८.
शुभवर्तमान: लुक १८:९-१४.
   
                           
“स्वतःला जो उंचावतो त्यास नमविले जाईल व जो नम्र होतो त्यास उंचावले जाईल”



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास देवासमोर नम्र व लीन हृदयाचे असण्यास पाचारत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात देवाच्या न्यायाची गणना केली आहे. देव सर्वांना न्यायाने एकसमान वागणूक देत असतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्या शिष्यांना स्वतःचे उदाहरण देत आहे. त्याने जसे खडतर जीवन जगून ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण केले तसे शिष्यांनाही करावे अशी तो अपेक्षा बाळगतो. तर शुभवर्तमानात संत लूक आपल्याला परुशी आणि जकातदार ह्यांच्या दाखल्याद्वारे नम्रतेचा बोध करत आहे.
 “जो कोणी स्वतःला उंचावतो त्यास नमविले जाईल आणि जो कोणी नम्र होतो त्यास उंच केले जाईल.” आपणही जकातदाराप्रमाणे नम्र होऊन परमेश्वराची नितांत सेवा करावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: बेनसिरा ३५ : १२-१४;१६,१८

ह्या पुस्तकामध्ये देवाच्या न्यायाचा उल्लेख केलेला आपणास आढळतो. देव न्यायाने सर्वांना समान वागणूक देत असतो.. तो अनाथ, पिडीत व जे काहीच करु शकत नाही त्यांची काळजी वाहतो. परमेश्वर सर्व लोकांची विशेषकरून जे हृदयाने नम्र आहेत अशा लोकांची प्रार्थना ऐकतो व त्यांना उत्तर देतो.
प्रत्येक मनुष्याची पात्रता त्याच्या कार्यावरून केली जाते. त्याला त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळते. तसेच देव नेहमी गरिबांच्या बाजूने असतो. जे कोणी देवाची आज्ञा पाळतात व त्याप्रमाणे वागतात, तो त्यांच्यावर त्याचे प्रेम दाखवतो व त्यांना त्यांचे प्रतिफळ किंवा बक्षीस देतो.
     प्रार्थनेमध्ये जो कोणी देवापुढे स्वत:ला नम्र व अपात्र समजतो, त्याचीच प्रार्थना ऐकली जाते. जो न्यायाने वागतो त्याला देव कधीच अन्यायाने वागवत नाही. देवाचा नेहमी न्यायाच्या आणि सत्याच्या बाजुने कल असतो.

दुसरे वाचन: २तिमथी ४:६-८; १६-१८.

संत पौल आपल्या शिष्यांना स्वत:चे उदाहरण देत आहे. त्याचे जीवन फार खडतर होते. त्याने त्याच्या जीवनात फार दु:ख सहन केले. त्यामुळे तो त्याच्या शिष्यांना सांगत आहे कि, ‘तुम्ही तुमच्या कार्यामध्ये मजबूत व खंबीर राहा, जेणेकरून हे कार्य तुम्हांस पुढे चालू ठेवता येईल.’
     संत पौल स्वत:चे जीवन त्याग करण्यासाठी तयार होता. तसेच ख्रिस्ताच्या सुवार्तेखातीर व शिष्यांना उदाहरण देण्यासाठी पौल नेहमी तत्पर होता. संत पौल सांगतो कि ‘मी चांगली लढाई केली आहे.’ संत पौलाने येथे ‘ग्रीक अलंकार’ वापरला आहे. तो ख्रिस्ताच्या विश्वासात एकरूप झाला होता. त्याने त्यांची सर्व आश्वासने पूर्ण केली. जेव्हा त्याचे परिवर्तन झाले व तो एक ख्रिस्ताचा सच्चा अनुयायी झाला, तेव्हा ख्रिस्त त्याच्या बाजूने होता व त्याला धैर्य देत होता, जेणेकरून त्याने देवाची सुवार्ता सर्व रोमच्या लोकांस पसरवावी. ह्या संधीचे सोने करून रोमवासीयांना त्याने ख्रिस्ताची ओळख करून दिली. परमेश्वराची सुवार्ता पसरवीत असताना त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागले परंतु, तो फार विश्वासू व ठाम होता कारण देव सदैव त्याच्या पाठीशी उभा होता. 

शुभवर्तमान:  लुक १८: ९-१४

आजच्या दाखल्यामध्ये परुशी स्वतःला उंचावत आहे आणि स्वतःच्या पावित्र्याबद्दल बोलत आहे. परुशी नेहमी स्वत:च्या कामाविषयी व प्रार्थनेविषयी बढाई मारत असे आणि सांगत असे कि, ‘मी सर्व नियम कडक पद्धतीने पाळतो’. ज्यांनी नियम पाळले नाहीत त्या लोकांना त्यांनी त्रासून सोडले होते तसेच त्यांचा तिरस्कारही करत.  
कर जमा करणारा, ‘जकातदार’, ह्याचा ‘ज्यू’ लोक द्वेष करत. कारण त्याला रोमन सरकारने सांगितल्याप्रमाणे ज्यू लोकांकडून तो कर गोळा करीत असे. याचा रोम सरकारला खूप फायदा होत होता. जिल्हाधिकाऱ्याला जितका कर वसूल करता येईल तितका कर वसूल केला जाई. कधी कधी वाजवीपेक्षा अधिकही कर वसूल केला जात असे.
दाखल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ‘परुशी’ हा गर्वाने देवाच्या मंदिरामध्ये उभा आहे. वस्तुस्थिती पाहिली तर तो देवाला सांगत आहे कि, ‘तू माझे आभार मानले पाहिजेत कारण माझ्यासारखी लोक ह्या भूतलावर आहेत’. त्या परुशाचे मुलभूत दुर्गुण असे आहेत कि, तो स्वतःला शहाणा व स्वाभिमानी समजत होता. कारण त्याला वाटले कि तो चांगले काम करत आहे. तो दुसऱ्यांना दाखवून देत आहे कि तो किती दयाळू आणि नीतिमान मनुष्य आहे आणि असे गुण दुसऱ्या कोणाकडेच नाहीत. पुढे परुशी असे सांगतो, की, ‘मी त्या जकातदारासारखा नाही. तो जकातदार फार मोठा लज्जास्पद पापी आहे. परुशी जकातदाराविषयी काही दुर्गुण सांगतो.
त्याउलट जकातदार मंदिरापासून खूप लांब उभा होता. त्याला वाटत होते कि, कोणी त्याला बघू नये. तो स्वत:ला अपात्र समजत होता आणि स्वर्गाकडे मान उंच करून पाहण्याचीही त्याला लाज वाटत होती. तो देवाला सांगतो कि, ‘हे परमेश्वरा माझ्यावर तुझी द्या व करुणा दाखव.’ देवाकडे तो त्याच्या पापांची कबुली करत होता. त्यांच्याकडे एकच आशा होती; ती म्हणजे ‘देवाची अमर्यादित द्या त्याला सार्वकालीक जीवनाकडे घेऊन जाईल’.
     ज्या नम्र मनुष्याने देवाकडून खरोखर पापांची क्षमा मागितली त्याला देवाने क्षमा व द्या दाखवली. त्याला त्यांच्या पापाची क्षमा झाली. परंतु ज्या मनुष्याने स्वत:ला उंच केले, गर्विष्ठ केले त्याला वाटले कि, त्यास क्षमेची गरज नाही; तो मंदिरातून खाली गेला व त्याचे हृद्य पापाने व गर्वाने भरलेले होते. त्यामुळे जो कोणी स्वत:ला उंचावतो त्याला नम्र केले जाईल आणि जो नम्र होतो त्याला उंच केले जाईल.

मनन चिंतन:

नारद हा भारतीय ऋषी होता व तो देवाचा पवित्र भक्त होता. त्याची भक्ती फार महान होती. एके दिवशी त्याला मोह झाला; त्याला वाटले कि, भूतलावर माझ्यापेक्षा देवावर अधिक प्रेम करणारा कोणीही नाही. नारदाला स्वतःचा फार चांगुलपणा वाटू लागला व त्यामुळे तो गर्विष्ठ झाला.
एक दिवस देवाने त्याच्यामध्ये असलेला गर्व समजुन त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. देव नारदाला म्हणाला कि, ‘माझा एक भक्त गंगा नदीच्या काठावर राहत आहे तू तिथे जाऊन त्यास ही माझी भेट देऊन ये. तो माझा अत्यंत विश्वासू भक्त आहे. नारदाला त्याच्याबद्दल घृणा वाटू लागली. त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ भक्त असू शकतो हे त्याला सहन होईना. नारद तिथे जातो व त्या एक शेतकऱ्याला भेटतो. तो रोज सकाळी लवकर उठून देवाचे नाव उच्चारत असे. नंतर तो नांगर घेऊन शेतात काम करत असे. संपूर्ण दिवस काम केल्यामुळे तो रात्री देवाचे नाव घेऊन झोपण्यासाठी जात असे.
नारदाला वाटलं कि, हा शेतकरी कसा काय देवाचा भक्त असू शकतो? कारण तो शेतकरी फक्त दोन वेळा देवाचे नाव घेत होता आणि संपूर्ण दिवस कष्ट करतो. मग नारदाने त्याचे मत देवापुढे मांडले. मग देव त्याला म्हणाला, ‘ठीक आहे, एक भांड घे त्यामध्ये काठोकाठ दूध भर संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून ह्याच ठिकाणी परत ये. हो! परंतु त्या भांड्यातील दुध सांडता कामा नये.’ नारदाला सांगितल्याप्रमाणे त्याने तसं केलं व संध्याकाळी परत आला. त्यानंतर देवाने त्याला विचारले कि, ‘तू हे भांडे दुधाने घेऊन फिरत असताना किती वेळा माझे नाव उच्चारले?’ नारदाने उत्तर दिले कि, ‘तुम्ही मला दुधाच्या भांड्यावर लक्ष देण्यास सांगीतले त्यामुळे मी तुमचे नाव घेऊ शकलो नाही.’ मग देवाने उत्तर देले कि, ‘त्या दुधाच्या भांड्याने तुझे लक्ष इतके वेधून घेतले कि तू माझे नामस्मरण करण्यास विसरला. पण त्या शेतकऱ्याकडे पहा; त्याच्यावर कामाचे ओझे असतानादेखील त्याने माझे नाव दोनदा घेतले व त्याला माझी दिवसातून दोनदा आठवण झाली.
जे देवाच्या अधिक जवळ असतात तेच देवाला विसरतात कारण ते त्यांच्या कामाला अधिक महत्व देतात. परंतु जो व्यक्ती देवापासून दूर असतो त्याच्या हृदयात, देव अधिक जवळ असतो. तीच व्यक्ती देवाचे नाव सदा-सर्वदा घेत असते.
आपणही त्या शेतकऱ्याचे उदाहरण घेतलं पाहिजे. जरी तो त्याच्या कामामध्ये गुंतलेला असला तरी तो देवाचे नाव घेत असे. कधी कधी स्वत:चे गर्व व घमेंड देवापासून दूर घेऊन जात असतो.
      आजच्या शुभवर्तमानामध्ये येशु ख्रिस्ताने परुशाची व जकातदाराची बोधकथा सांगितलेली आहे. परुशी मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेला परंतु प्रार्थना करण्याऐवजी त्याने देवाला स्वत:विषयी बढाया मारायला सुरुवात केली. त्याउलट जकातदार मंदिरामध्ये नम्र होऊन देवाची क्षमा मागतो म्हणून त्यास देवाची द्या, क्षमा प्राप्त होते. देव प्रत्येकाच्या बाह्यांगावर नव्हे तर हृदयाकडे पाहतो व त्यानुसार त्यांना न्याय देत असतो. जकातदार नम्र व पापी अंत:करणाने देवासमोर उभा राहिला म्हणून तो न्यायाने घरी गेला. त्याने त्याच्या भावना नम्रतेद्वारे व अपात्रपणे व्यक्त केल्या. आपणही त्या जकातदाराच्या वृत्तीचे असावे. देव नेहमी लीन आणि नम्र हृदय असणाऱ्या प्रार्थनांची उत्तरे देतो.
     यशया संदेष्ट्यालादेखील अपात्रतेचा अनुभव आला होता, जेव्हा तो देवाच्या पुढे उभा होता. तेव्हा तो स्वत:ला म्हणाला होता कि, “माझे आता वाईट झाले कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी डोळ्यांनी पाहिले आहे (यशया ६:५). जेव्हा आपण देवापुढे उभे राहतो, तेव्हा आपण देवाकडे आदराने व पवित्र दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. आपल्या कपड्यांमध्ये सभ्यता व लीनता असावी.
 देव कोणाचा कर्जदार नाही. आपण चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये आल्याने देवावर उपकार करत नसतो. लोक मंदिरात जाऊन बाजारात गेल्यासारखे वागतात; चार आठ आणे टाकून काहीन काही मागत असतात. कधी कधी काही लोक जे उच्च पदांवर किंवा राजकारणी आहेत, त्यांना वाटते कि, त्यांना उच्च ठिकाणी बसवून सन्मानित करायला हवे. परंतु मंदिरामध्ये सर्व मनुष्य एकसमान असतात. तेथे भेदभाव चालत नाही. जेव्हा एखादा मनुष्य चर्चमध्ये येतो, तेव्हा तो नम्र हृदयाचा असायला हवा.
 आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला उदाहरण आहे ते म्हणजे जकातदाराचे त्याने स्वत:ला नमवले म्हणून परमेश्वराने त्यास उंचावले. देव हा महान व सर्वज्ञ आहे. देव आपल्यासाठी जे काही चांगले आहे तेच करत असतो. जकातदाराला त्याच्या अपात्रतेचा व देवाच्या पावित्रतेचा अनुभव होता. त्यामुळे त्याने प्रार्थना करताना डोके वर करून पाहिले नाही, तर त्याने प्रामाणिकपणा व नम्रता दाखविली. त्यामुळे त्याला देवाची कृपा व आशिर्वाद मिळाला. आपल्या आंतरिक विखुरलेल्या आणि कोमेजून गेलेल्या हृदयाच्या प्रार्थनांना देवाकडून नेहमी उत्तर मिळते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:  हे ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आपले पोप फ्रान्सीस सर्व कार्डीनल्स, बिशप धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे युवक व युवती देवापासून दूर गेले आहे व ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या अधिक जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत व ज्यांना जगाच्या एैहिक वस्तूंमध्ये आनंद मिळतो अशा लोकांना तो आनंद सर्वकाळचा नाही तर तो क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव व्हावी व त्यांनी देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जी मुले अनाथ आश्रमामध्ये आहेत व ज्या मुलांना आई वडिलांनी सोडून दिले आहेत, त्यांची परमेश्वराच्या मायेच्या पंखाखाली वाढ व्हावी व उदारमतवादी आश्रयदात्यांनी त्यांचे आश्रयस्थान बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment