Reflection for the homily of Divine Mercy Sunday (23/04/2017) By: Baritan Nigrel
पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार
“दैवी दयेचा रविवार”
दिनांक : 23-4-2017
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २:४२-४७
शुभवर्तमान : योहान २०:१९-३१
“तेव्हा प्रभूला पाहून त्यांना आनंद
झाला.”
प्रस्तावना:
ख्रिस्तसभा आज दैवी दयेचा रविवार साजरा करीत आहे. प्रभू
येशू दयेचा व करुणेचा महासागर आहे. त्याचा हृदयातून दयावंत कृपेचा झरा वाहत असतो.
प्रभूची दैवी दया आपणास त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यास आवाहन करीत आहे.
आजच्या उपासनेतील पहिले वाचन आपल्याला आठवण करून देते कि, ज्यांनी
ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्वीकार केला, ते एका मनाचे व हृदयाचे होते. ख्रिस्तावरील
त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांनी ख्रिस्तामध्ये पुर्नजन्म स्वीकारला.
दुसऱ्या वाचनात पेत्र आपल्याला सांगतो कि, देवाच्या दयेत
आपला नवीन जन्म झाला आहे. आणि जो देवावर श्रद्धा ठेवतो त्याला स्वर्गातील वतन
प्राप्त होईल.
शुभवर्तमानात संत थोमा त्याच्या ख्रिस्तावरील श्रद्धेची कबुली करून म्हणतो, “माझ्या देवा! माझ्या प्रभो”.
आपणही आपल्या जीवनात पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेऊन
त्याच्यावर असलेली श्रद्धेची कबुली करावी व त्याची दैवी दया आपल्या जीवनात
अनुभवावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २:४२-४७.
ज्यांनी ख्रिस्ताच्या संदेशाचा स्वीकार करून बाप्तिस्मा
स्वीकारला होता ते प्रेषितांच्या सहवासात आले. या वाचनात आपल्याला दिसून येते कि, ते
मनाने एक होते. त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या समूहजीवनात पडू लागले. त्यांच्यात
परस्पर-सहकार्याची भावना वाढीस लागली. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सर्व नाव
ख्रिस्ती एकत्र जमत. त्यांचा प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे होता.
अ. प्रेषितांनी दिलेल्या धर्मशिक्षणावर चिंतन करणे.
आ. समूहभावनेची जोपासना करणे.
इ. पवित्र भाकरीचा विधी साजरा करणे.
ई. विविध उपकाराबद्दल देवाला धन्यवाद देणे.
अ. प्रेषितांनी दिलेल्या धर्मशिक्षणावर चिंतन करणे.
आ. समूहभावनेची जोपासना करणे.
इ. पवित्र भाकरीचा विधी साजरा करणे.
ई. विविध उपकाराबद्दल देवाला धन्यवाद देणे.
दुसरे वाचन :
१पेत्र १:३-९.
देवाच्या थोर दयेमुळे त्याने आम्हांला नवजीवन दिले आहे.
ख्रिस्ताच्या नावामुळे ज्यांचा छळ होतो त्यांना पेत्र त्यांचा स्वर्गातल्या वतनांची
आठवण करून देतो. हे वतन कोठल्याच विरोधी शक्तीकडून नष्ट होत नाही. ते
निरंतर व अविनाशी आहे.
ते वतन प्राप्त होण्यासाठी देवावर विश्वास ठेवणे आवश्यक
आहे कारण हे तारण देवाच्या महान कृपेने मिळते. त्यात नव्या जीवनात, नव्या
आशेमध्ये, नव्याने जन्म होतो व त्यातूनच पुनरुत्थान घडून येते.
शुभवर्तमान : योहान २०:१९-३१
आजच्या शुभवर्तमानात थोमाचा अविश्वास आणि मग विश्वास ठेवणे
या दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. येशूच्या शिष्यांनी त्याचे शरीर कबरेतून चोरून
नेले होते अशी खोटी बातमी शत्रूंनी गावात पसरविली होती. शिष्य घाबरलेले होते ते
एका खोलीत दारे बंद करून बसलेले होते. अकस्मात प्रभू त्यांच्यामध्ये आला आणि
त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो.” त्यांनी आपल्या जिवंत प्रभूला ओळखले तेव्हा
प्रभूला पाहून त्यांना आनंद झाला.
थोमाने प्रत्यक्ष ख्रिस्ताला पाहिले नव्हते म्हणून त्याने
शिष्यावर विश्वास ठेवला नाही. आठ दिवसानंतर पुन्हा येशू त्यांच्यामध्ये आला.
तुम्हास शांती असो असे म्हटल्यावर प्रभू थोमाकडे वळून त्याला आपले हात दाखविले.
त्याची शंका दूर केली. तेव्हा थोमाने, “माझ्या प्रभू माझ्या देवा” अशी कबुली केली.
तेव्हा येशूने म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस,
पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.”
मनन चिंतन
येशूचे पुनरुत्थान म्हणजे मरणावर विजय. तो सार्वकालिक
जीवनाचा प्रभू आहे ह्याची प्रचीती पटविणारे सत्य म्हणजे त्याचे पुनरुत्थान.
भूतलावर असा चमत्कार कधी झाला नाही. पण त्या चमत्काराचे
जीवनाच्या नवीकरणाचे आपण भागीदार झालो आहोत हे अभिवचन त्याने आपल्याला दिले आहे.
मी तुम्हास खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याजवर विश्वास
ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार
नाही तो मरणातून जिवनात पार गेला आहे.
येशूचे पुनरुत्थान व त्याचा मरणावर विजय आपण प्रतिवर्षी
साजरा करतो, कारण येशू ख्रिस्ताने हा विजय मिळवून त्यांत आपल्याला भागीदार केले
आहे. आपल्याला ठाऊक आहे कि, जगात अनेक थिर व्यक्तींनी आपले सर्व आयुष्य वेचले परंतु
ते परत आले नाही. पण आपला प्रभू येशू त्याच्या अनुयायांना जीवन देण्यासाठी मरणातून
जिवंत झाला. येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर येशूचे शिष्य यहूद्यांच्या भीतीमुळे दार
लावून घाबरून बसले होते. त्यांचे चेहरे दुःखी होते व हृदयात आशा नव्हती.
त्यांच्या आयुष्यात सर्वत्र अंधार पसरला होता. येशूला पुरताना त्यांनी आपल्या
आकांक्षाही पुरल्या होत्या. पण येशू मरणावर विजय मिळवतो व आपल्याला नवीन आशा व नवीन विश्वास देतो. घाबरलेल्या शिष्यांना येशू म्हणतो, “तुम्हास शांती असो.” आपला प्रभू जिवंत आहे हे पाहून त्यांना भरपूर
आनंद होतो.
येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी व पुनरुत्थान झाले त्यावेळी उच्चारलेले पहिले
वाक्य ‘भिऊ नका’ हे होते. थोमाला जिवंत येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले नव्हते म्हणून
थोमाने ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. त्याने ख्रिस्ताचे ‘भिऊ नका’ हे शब्द ऐकले
नव्हते. म्हणून जेव्हा येशू त्याचा मध्ये येतो तेव्हा आपल्या हातातील व पायातील
जखमा थोमाला दाखवितो व बोट घालून पाहण्यास सांगतो. थोमाचा विश्वास भक्कम होतो व तो
लगेच म्हणतो, “माझ्या देवा! माझ्या प्रभो!”
प्रभू येशू त्यांना शांती देतो व त्याच्या शुभवार्तेचा
प्रचार करण्यासाठी त्यांना पाठवितो. ख्रिस्ताचे कार्य आता हे त्याचे शिष्य चालू
ठेवतात. म्हणून पहिल्या वाचनात आपण ऐकले कि, अनेकांनी ख्रिस्ताच्या संदेशाचा
स्वीकार करून बाप्तिस्मा स्वीकारला.
आज आपण दैवी दयेचा सण साजरा करीत आहोत. प्रभू त्याची दया
आपल्याला देतो, म्हणून तो जिवंत झाला आहे. देवाने आपल्यावर केलेली दया त्याचे
आपल्यावरील प्रेम दर्शविते. म्हणून देवाची दया व त्याचे प्रेम सदा आपल्या हृदयात,
मनात व घरात असावे म्हणून आजच्या या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू आमची श्रध्दा दृढ कर.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, बिशप्स आणि व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर
सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत
करावी म्हणून प्रार्थना करूया.
२.
ख्रिस्ताच्या दैवी दयेचा अनुभव घेऊन आपण सर्वांनी प्रभूच्या सहवासात एका हृदयाचे
व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
जे देवापासून दूर गेले आहेत त्यांची देवावरची श्रध्दा वाढावी व त्यांचा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात नवीन जन्म
व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.
प्रभूची शांती सदैव आपल्या कुटुंबात नांदावी व आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या
शांतीचे साधन व्हावे म्हणून प्रार्थना करूया.
५.
पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढ व्हावा व संत थोमाप्रमाणे आपणही
आपल्या श्रध्देची कबुली करावी म्हणून प्रार्थना करूया.