Thursday, 13 April 2017


Reflections for the homily of Easter Sunday (16-04-2017) by: Br Ashley D'monty


पास्काचा सण
दिनांक : १६-०४-२०१७
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४,३७-४३.
दुसरे वाचनः कलस्सेकरांस पत्र: ३:१-४.
शुभवर्तमान: योहान २०:१-९.




"येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते." 


प्रस्तावना:

आज आपण प्रभू येशूचे पुनरुत्थान म्हणजेच पास्काचा सण साजरा करत आहोत. येशू ख्रिस्ताने क्रूसावरील मृत्युद्वारे आपल्यासाठी पापांची क्षमा मिळवली व तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन त्याने आपल्यासाठी पवित्र आत्म्याचे नवजीवन प्राप्त करून दिले.
पहिल्या वाचनात पेत्र ज्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही व जे खऱ्या जिवंत देवाविषयी उत्सुक आहेत त्यांना प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे. कारण प्रभू येशूने मृत्यूवर व जगावर विजय मिळविला आहे. तो मरणांतून उठला आहे हे आजच्या शुभवर्तमानात ऐकतो.
ख्रिस्ती जणांना मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, तर येशूने पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवर विजय मिळवला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपले पुनरुत्थान होणार आहे, अशी श्रद्धा प्रत्येक ख्रिस्ती माणसाची असावी. आपली ही पुनरुत्थित येशुवरील श्रद्धा अधिकाधिक दृढ व्हावी म्हणून आजच्या मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४,३७-४३.
     
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात प्रामुख्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयी तसेच शुभवर्तमानाच्या प्रचाराविषयी केलेल्या आज्ञेबद्दल वृत्तांत आढळून येतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण मरणातून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताविषयी संत पेत्राने दिलेल्या ग्वाहीविषयी ऐकत आहोत.
संत पेत्र म्हणतो, ‘पवित्र आत्म्याने अभिषिक्त केलेला नाझरेथकर येशूने मरणावर विजय मिळवून; तो जीवंताचा व मेलेल्यांचा न्यायधीश बनला आहे. त्यांच्यावर श्रध्दा ठेवणा-या प्रत्येकाला त्यांच्या नावाखाली पापांची क्षमा लाभली आहे.
ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून आम्हाला स्वर्गीय नवजीवनाचे भागीदार बनविले आहे. ज्या देवाने ख्रिस्ताला मरणातून उठविले आहे. तोच देव आम्हाला सुध्दा न्याय-दिनाच्या दिवशी मरणातून उठवून व आपल्या मांगल्यमय जीवनाचे सार्थक घडवून आणील.

दुसरे वाचनः कलस्सेकरांस पत्र: ३:१-४.

आजच्या दुस-या वाचनात संत पौल कलस्सैकरांना, “ख्रिस्ताबरोबर पुनरूत्थित होण्याचे परिणाम स्पष्टपणे नमुद करून देत असताना आपल्याला उद्देशून म्हणतो की ख्रिस्ताबरोबर आपण देखील उठवले गेलो आहोत. आता आपण त्यांच्या पुनरूत्थित जीवनात सहभागी झालो आहोत.
ह्यास्तव, आपले जीवन आता वेगळे असायला हवे. स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष वेधण्यास संत पौल आपल्याला विंनती करतो. कारण तेथे ख्रिस्ताच्या प्रकाशाची, प्रेमाची व सत्याची सत्ता स्थापित आहे.

शुभवर्तमान: योहान २०:१-९.

शुभवर्तमानकार संत योहान आपल्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाविषयीच्या घडलेल्या घटनेचे विवरण करीत असताना रिकामी कबरह्या प्रसंगाचा उल्लेख प्रथमरीत्या नमुद करतो. येशूची रिकामी कबरहा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा गाभा मानला जातो व ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरूत्थानाचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो.
तथापिः या घटनेमधून संत योहान आपल्यासमोर काही आधात्मिक धड्याचे विवरण साधू इच्छितो. तसे पाहिल्यास चारही शुभवर्तमानकांरानी (मत्तय, मार्क, लूक व योहान) सांगितलेल्या पुनरुत्थानाविषयीची विविध प्रंसगाची एका वाक्यात सलगपणे चित्र उभे करणे सोपे नाही.
उदाः संत योहान अध्याय २० ओवी १ मध्ये, “मरिया माग्दालिया एकटीच कबरेजवळ”  असल्याचे नमुद करतो. तथापि संत मत्तय आपल्या २८ व्या अध्याय १ ओवीत, “मरिया माग्दालिया व दुसरी मरीयाह्या दोन व्यक्ती कबरेजवळ असल्याचे नमुद करतो. तर, संत मार्क अध्याय १६ ओवी १ ह्यामध्ये, “मरीया माग्दालिया, याकोबाची आई मरिया व सलोमेह्या तीन व्यक्तीची ओळख देतो.
ह्या विविध वृत्तांतावरून साध्य करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे व त्यांने मेलेल्यांतून पुन्हा उठावेअसा जो शास्त्रलेख लिहिला गेला होता तो आज परिपूर्ण झाला आहे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात येशूच्या बारा शिष्यांपैकी दोन शिष्यांचा उल्लेख केला गेला आहे. शिमोन पेत्र ह्यांचे नाव शुभवर्तमानात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. परंतू, दुस-या शिष्याचे नाव गुपीत असल्याचे दिसून येते. पण, त्या शिष्यांविषयी येशूठायी असलेले प्रेम दर्शविण्यात आले आहे. येशूचा अतिप्रिय शिष्य म्हणून संत योहानाला संबोधले जाते.
मरिया माग्दालिया हिने दिलेल्या वृत्तांतवरून दोन शिष्य, पेत्र व योहान, येशूच्या रिकामी कबरे जवळ येतात व ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे, ‘मी तिस-या दिवशी मरणातून पुन्हा उठेनह्या वचनावर विश्वास ठेवतात.

मनन चिंतन:

सृष्टीच्या नियमानुसार प्राणीवर्गाला जन्मानंतर मृत्यू हा शब्द अटळ आहे. मृत्यूबद्दल अनेक शास्रज्ञांनी संशोधन केले, परंतु मृत्यूला जिंकणे त्यांना शक्य झाले नाही. पृथ्वीतलावर अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. सर्व जग जिंकण्याच्या पराकोटी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक राज्येही जिंकली, परंतु त्यांनाही मृत्यूला शरण जावे लागले. साधू व संत यांनी योगसाधनेद्वारे, तपश्चर्येतून देवाजवळ पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही त्यांना मृत्युपुढे शरणागति पत्करावी लागली. अद्यापही या मर्त्य मानवाला मृत्युच्या अभिशापावर विजय मिळवता आला नाही.
प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच. निसर्गाच्या कालचक्राचा नियम मोडला गेला. मर्त्य मानवाविषयीचा मरणावरील पहिला आणि शेवटचा विजय झाला. तो मृत्युंजयीझाला. येशू ख्रिस्त! देवाचा पुत्र! सुमारे २००० वर्षापूर्वी या पृथ्वीतलावर मानवी देह धारण करून जन्माला आला. सृष्टी नियमाप्रमाणे तहान-भूकथंडी-ताप, आनंद-दुःख, कष्ट सर्व काही मानवीय शरीर रूपाने प्रभू मानवाशी एकरूप झाला, एकजीव झाला. त्यालाही एकच कारण होते – ‘मानवावरील प्रेम’! ज्या मानवाच्या प्रेमासाठी देव स्वर्गातून उतरून आपल्याशी एकरूप झाला, सुख-दुःखात सहभागी झाला, तोच मानव त्याच्यावर बंड करून उठला! केवढा हा दैव दुर्विलास!
आजाऱ्यांना बरे करणारा, आंधळ्यांना दृष्टी देणारा, बहिरे, मुके, लंगडे, भूतग्रस्त यांना त्यांच्या समस्येतून सोडवणारा येशू ख्रिस्त हा आपणावरही अधिकार गाजवणार या भीतीने राज्यकर्ते भयभीत झाले. त्यांनी ख्रिस्ताला ओळखले नाही; त्यामुळेच आपला अधिकार, राज्य वाचवण्यासाठी त्याच्याविरुद्ध त्यांनी अपप्रचार सुरु केला. तर धर्मपंडित, शास्री, पुरुषांचे महत्व कमी होऊ लागले होते, त्यांनाही आपल्या अधिकाराची, पदाची चिंता वाटू लागली होती, त्यामुळे त्यांनी जनतेत आपले वर्चस्व वाढविण्यासाठी प्रभूवर खोटे आरोप करणे सुरु केले. सैतानी खेळ सुरु झाला. देव-दानव युद्ध सुरु झाले. खोटे आरोप ठेवून क्रुसावर मरणदंडाची शिक्षा देण्यात आली.
येशूचे मरण तेथील राज्यकर्त्यांना, धर्मपंडित, शास्री पुरुषांना आनंदाची बातमी होती. मरण म्हणजे शेवट असा त्यांचा विश्वास होता. पुन्हा जुलूम, जबरदस्ती, अन्याय करण्यास ते मोकळे झाले होते. जनता मात्र दुःखी झाली. आपला तारणहार आपल्याला सोडून गेला. सर्व संपले. मरणापुढे सर्वच नतमस्तक होतात! तेही झाले.
पण त्यांचे हे स्वप्न अल्पजीवी ठरले, सर्व काही क्षणभंगुर असे होते. मरण म्हणजे शेवट, मरण म्हणजे दुःख, मरण म्हणजे अंधकार या मरणावर प्रभू येशूने विजय मिळवला. तो मृत्युंजयी झाला. मरणातून तिसऱ्या दिवशी उठला. जिवंत देवाने अंधकाराला हरवले. दुःखावर विजय मिळवला.
माणसे मरणातून पुन्हा जिवंत झालेली उदाहरणे आपल्या ऐकिवात आलेली आहेत. या विषयावर पुस्तकेसुद्धा उपलब्ध आहेत. येशूनेसुद्धा लाझरसाला व नाईमच्या विधवेच्या मुलाला जिवंत केले, पण ते कालांतराने मरण पावले. येशू क्रुसावर मरण पावला. पण तो पुन्हा मरणातून उठला किंबहुना देवापित्याने त्याला मरणातून उठवले. येशू पुन्हा मरण पावला नाही तर त्याला अमरत्व प्राप्त झाले आहे. हे ऐतिहासिक व सार्वकालीक सत्य आहे.
संत पाँलची येशूच्या पुनरुत्थानाविषयी शिकवण अतिशय स्पष्ट आहे. ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे (रोमकरांस पत्र १४:९). येशू आजही आपल्याबरोबर आहे. संत इरेनिउस म्हणतात, ‘तुम्ही देव बनावे म्हणून देव माणूस झाला’, म्हणजेच आपण अमर व्हावे ही देवाची योजना आहे. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकुनिया उठला.

१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, आध्यात्मिक मेंढपाळ बिशप, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनिंना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव त्यांच्या कार्यात यावा. ख्रिस्ती श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेत व विश्वासात त्यांनी आपल्या कार्याद्वारे प्रेरित करावे व स्वर्गीय नवजीवनाचा आनंद उपभोगण्यास मनोब द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज तरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. सतत आजारामुळे ज्या कुटुंबांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वैभवशाली शक्तीने दिलासा दयावा व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५) सर्व धर्म सहभाव, सर्व धर्म स्नेहभाव, सर्व धर्म समीपभाव व सर्व धर्मसन्मानभाव या चौकटीवर विविध धर्मांच्या लोकांनी एकत्रित येऊन ऐकमेकांचा उध्दार व सन्मान करावा, गुण्यागोविंदाने नांदत राहावे व जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

६) आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment