Wednesday, 12 April 2017

Reflection for the Homily of  'Easter Vigil' (16/04/17)

By Dominic Brahmane.










पुनरुत्थान रविवार

दिनांक: १६/०४/२०१७
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२.
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८.
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ.
चौथे वाचन: यशया ५४:५-१४.
पाचवे वाचन: यशया ५५:१-११.
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४.
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८.
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११.

शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०.


"येशू मरणातून उठला आहे"


आजच्या ह्या विधीचे चार मुख्य भाग आहेत:   

पहिला भाग: प्रकाश विधी- पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग: प्रभुशब्दविधी- येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचनांमधून देवाने जगाच्या सुरूवातीपासून मानवावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाची आपणाला आठवण करून देतात.
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद- येथे बाप्तिस्म्यासाठी लागणा-या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्यसाधारण आशीर्वाद आहे.
चौथा भाग: ख्रिस्तप्रसादविधी- येथे आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण घेत असतो.   
       
प्रास्ताविक:

        आलेलुया आलेलुया ख्रिस्त आज विजयी झाला मरण जिंकुनिया उठला. आज आम्ही ख्रिस्ती श्रद्धेचा पाया असलेल्या येशूचे पुनरुत्थान मोठ्या वैभवाने साजरे करत आहोत. तारणकार्यातील इतिहासाची ही एक नवीन सुरुवात आहे. जसा प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतो, अंधारमय भोगद्याअंती आशेचा किरण चमकतो अगदी तशाचप्रकारे प्रत्येक वेदनामय उत्तम शुक्रवार नंतर प्रभूवैभवाचा इस्टर (पास्काचा) सण येत असतो. मरिया माग्दालीया व इतर स्रियांप्रमाणे आम्हीही येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवावी व त्याच्या पुनरूत्थानाचे निष्ठावंत साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०. (येशूचे पुनरुत्थान)

चारही शुभवर्तमानात आपल्याला येशूच्या पुनरुत्थानाविषयीचा उल्लेख आढळतो. त्यात काही प्रमाणात साम्य, तर काही प्रमाणात विविधता आढळते. ह्यावरून असे समजते कि, शुभवर्तमानाच्या लेखकांनी हि घटना एकत्रित स्वरूपात नव्हे तर वैयक्तिकरीत्या लिहिली असावी. मत्तयचा काही भाग (मार्क १६:१-८) ह्यातून घेण्यात आला आहे. परंतू भूमिकंपाची कल्पना, देवदुताने सरकवलेली धोंड, सैनिक मरणप्राय होणे आणि स्रियांचे पुनरुत्थित ख्रिस्ताशी झालेले संभाषण हे फक्त मत्तयनेच अंतर्भूत केले आहे.
मत्तयच्या काळात अशी अफवा पसरवली गेली होती कि, येशूच्या शिष्यांनी येशूचे मृत शरीर चोरून नेले व येशूचे पुनरुत्थान ही एक खोटी बाब आहे. येथे मत्तय ठामपणे दैवी मध्यस्थीची कल्पना मांडू इच्छितो आणि ऐतिहासिक सत्यता हि कि, कडक बंदोबस्त असल्याने येशूचे शिष्य त्याचे मृत शरीर चोरू शकले नाहीत.
दुसरे म्हणजे कबरेजवळ गेलेल्या स्रियांनी खरोखर येशूला स्पर्श केला आणि मुख्य याजक व वडील, त्यांचे सैन्य खोटे बोलत आहे हे त्याला स्पष्ट सांगायचे आहे (२८:११-१५). पुनरुत्थान हा बायबलचा केंद्रबिंदू होय. पुनरुत्थानाचा संदर्भ आपल्याला जुन्या करारातही आढळतो (ईयोब १९:२५-२६, स्तोत्र ४९:१५, यशया २६:१९, दानियल १२:२, यहज्केल ३७). परंतू नव्या करारात ह्यावर अधिक भर देण्यात आला आहे. शुभवर्तमानात आढळलेला पुनरुत्थानाचा संदर्भ “१करिंथ १५:३-८” ह्यातून घेण्यात आला आहे (संत पौलानेच ह्यावर प्रथम लिखाण केलेले होते). फक्त रिकाम्या कबरेवरूनच निष्कर्ष काढण्यात आला आहे कि, येशू पुनरुत्थित झाला आहे, कारण येशू पुनरुत्थित झाला आहे परंतू कोणीही त्याचे नयनसाक्षीदार नाहीत.  येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया होय. आपण  जरी त्याचे पुनरुत्थान पुराव्यानिशी सिद्ध करू शकत नसू तरीही आपल्या श्रद्धेच्या दृष्टीकोनातून त्याचा अनुभव नक्कीच घेऊ शकतो.
येशूचे पुनरुत्थान शब्बाथाच्या दिवशी नव्हे तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी झाले. सृष्टीनिर्मिती वेळी देवाने शब्बाथ (शेवटचा दिवस) हा दिवस पवित्र केला. पुनरुत्थानावेळी येशू पहिला दिवस पवित्र करतो. शब्बाथ सूर्यास्तावेळी संपुष्टात आला, परंतू स्रिया कबरेकडे प्रात:काळी गेल्या. त्या येशूच्या पुनरुत्थानाच्या साक्षीदार बनल्या. मरिया माग्दालीयाचा उल्लेख चारही शुभवर्तमानात आढळतो. गणना १९:१५ मध्ये कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेसाठी दोन साक्षीदारांची गरज होती. यहूदी लोकांच्या प्रथेत फक्त पुरुष साक्षीदारांस प्राधान्य दिले जाई. येशूने त्याच्या सार्वजनिक कार्यात बऱ्याच त्यांच्या प्रथा मोडकळीस काढल्या. आणि हा त्याला अपवाद नाही. अकरा शिष्यांपैकी येथे कोणीही आढळला नाही तर “दोन स्रिया” ह्याचे साक्षीदार बनल्या. मार्क (१६:१) शुभवर्तमानात स्रिया येशूचा तैलाभ्यंग करावयास आल्या असा उल्लेख आहे तर मत्तयमध्ये ‘एक स्री’ सुगंधी तेलाने येशूची उत्तरक्रिया करते. तैलाभ्यंग करण्यापलीकडे त्या येशूला कंबरेत पहावयास आल्या होत्या. भूमिकंप, देवदूत शुभ्र वस्र परिधान केलेला आणि धोंड बाजूला सरकवणे हे स्वर्गलोकाची (Eschatological) चिन्हे आहेत. ह्यावरून देव ‘नवयुग’ स्थापन करील असे समजते. येशूचे पुनरुत्थान हे तारणकार्याच्या इतिहासात नवीन सुरुवात आहे.

मनन चिंतन:

‘अंधार अंधाराला मिटवू शकत नाही तर फक्त प्रकाशातच ती क्षमता असते;
तिरस्कार तिरस्काराला दूर करू शकत नाही तर फक्त प्रेमानेच ते साध्य होते’. -मार्टिन ल्युथर किंग.
येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे त्याने त्याच्या प्रकाशानेच अंधाराचा सर्वनाश केला आणि अंधारावर विजय मिळवला. त्याने अंधाराला दोषी न मानता त्या अंधारात ज्योत पेटवली. त्याने काट्याने काटा काढला नाही तर प्रेमाने वैमनस्यावर वर्चस्व गाजवले. म्हणून येशूचे पुनरुत्थान हे फक्त चमत्काराचा एक भाग नसून आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया म्हणून गणला जातो. देवाने जगावर एवढी प्रीती केली कि, त्याने त्याचा पुत्र आपल्या तारणासाठी दिला. त्याच्या पुत्र-प्रेमाचा व मानवावरील निस्सीम प्रेमाचा तो शेवट नव्हता तर तारणकार्यातील इतिहासाची एक नवीन सुरुवात होती. ह्याची प्रचीती आपल्याला आजच्या जुन्या करारातील वाचनातून येते.
     ज्यू (यहूदी) लोकांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत येशूला देवाचा पुत्र मानण्यास नकार दिला. त्यांनी त्यांच्या गर्वामुळे व देवाने दिलेल्या शास्राच्या अज्ञानामुळे असे केले. येशूच्या पुनरुत्थानानंतरही ते येशुशी अनोळखी राहिले म्हणून त्यांनी येशूचे पुनरुत्थान हे निव्वळ अंधश्रद्धा वा अफवा आहे असे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहारेकऱ्यांना येशूच्या शिष्यांनी येशूला चोरून नेले असे सांगण्यास प्रवृत्त केले. त्यांनी अंधकारमय जीवन जगणे पसंत केले. त्यांनी येशूचा शेवट गुडफ्रायडे (उत्तम शुक्रवार) च्या दिवशी केला असे त्यांस वाटले. परंतु सत्य लपत नाही. जसा प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतो, अंधारमय भोगद्याअंती आशेचा किरण चमकतो अगदी तशाचप्रकारे प्रत्येक उत्तम शुक्रवार नंतर इस्टर (पास्काचा) सण येत असतो. संत पौल म्हणतो ‘आपण अंधाराचे नव्हे तर प्रकाशाचे लेकरे आहोत. हे एका बंदिस्त कोशातील अळई (Cacoon) सारखे आहे. त्या अळईला बाहेर येण्यासाठी मरणप्राय यातना सहन कराव्या लागतात परंतू एकदा बाहेर आल्यानंतर त्यास सुंदर, मोहक रूप प्राप्त होते. त्याचे एक सुंदर फुलपाखरू बनते. अगदी त्याचप्रकारे येशूने आपल्याला पापांतून मुक्त करण्यासाठी वेदना सहन केल्या व नवजीवन प्राप्त करून दिले. 
     आपल्याला आनंद करण्याचे कारण म्हणजे आमच्या विश्वासाला आज भक्कम पाया मिळाला आहे. ‘ख्रिस्ती जीवन हे शारीरिक मरणाने संपुष्टात येत नाही तर त्याचे नवजीवनात पदार्पण होत असते’ हि आशा येशूच्या पुनरुत्थानातून आपणास लाभते. येथे, आम्ही आमच्या दु:खानी हिरमसून किंवा खचून जावू नये तर त्यात परमेश्वराच्या योजना काय आहेत ह्याचा शोध करावयास पाचारण आहे. येशूच्या पुनरुत्थानाने परमेश्वर आपणा सर्वांस नवजीवनाची ग्वाही, पुनरूत्थानाचे बक्षीस देवू इच्छितो. म्हणून मरिया माग्दालीया व इतर स्रियांप्रमाणे आम्हीही येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवावी व त्याच्या पुनरूत्थानाचे निष्ठावंत साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आम्हांस नवजीवन दे.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डीनल्स, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी आपले जीवन ख्रिस्ताच्या दु:ख, मरण आणि पुनरुत्थानावर आधारलेले आहे. त्यांनी इतरांनाही ख्रिस्ताचे अनुकरण करून शांती प्रस्थापित करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ती श्रद्धेचा पाया असलेले येशूचे पुनरुत्थान ह्यावर आंम्हा प्रत्येकाने अधिकाधिक दृढ व्हावे व आमची ख्रिस्ती श्रद्धा दिवसेंदिवस वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगात देशांदेशांतील वैमनस्य अधिक शिगेला पोहचत आहे प्रत्येकाला इतर देशावर अधिपत्य गाजवायचे आहे ह्या सर्वातून निष्पाप जनता होरपळत आहे अशा ठिकाणी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आशिर्वादाने सर्वत्र शांती पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबावर व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रेमशांतीचा वर्षाव होऊन त्यांस नवजीवन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


 “लावेरना” ईशज्ञान गुरुविद्यालयातील सर्व धर्मगुरु व बंधूंतर्फे आपणा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
 











No comments:

Post a Comment