Tuesday, 16 May 2017

Reflection for the Homily of 6th Sunday of Easter (21-05-17) By Lavet Fernandes 





पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार


दिनांक: २१-०५-२०१७
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ८:५-८, १४-१७
दुसरे वाचन: १ पेत्र ३:१५-१८
शुभवर्तमान: योहान १४:१५-२१





 “पिता तुम्हांला दुसरा कैवारी देईल






                                     
प्रस्तावना:

     आज आपण पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचने आपणांस प्रीती व पवित्र आत्मा ह्या दोन आंतरिक दानांविषयी सांगतात. प्रेषितांची कृत्ये ह्या आजच्या पहिल्या वाचनातून आपणांस कळते की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने फिलिप्पने देवाचा संदेश संपूर्ण शमोरोनात पसरविला. योहानाने व पेत्राने शमोरोनातील लोकांना पवित्र आत्म्याचे वरदान लाभण्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली. आजच्या दुस-या वाचनात संत पेत्र आपल्या पत्रात म्हणतो, ‘ख्रिस्तासाठी आपल्या मनात पूज्य भाव ठेवून ख्रिस्ताला आपला प्रभू माना’. कारण शारिरिकदुष्ट्या ख्रिस्ताचा वध करण्यात आला, परंतू आत्मिकदुष्ट्या ख्रिस्ताला जिंवत आहे.
आजचे पवित्र शुभवर्तमान आपणांस पवित्र आत्म्याविषयी सांगत आहे. येशू म्हणतो, ‘तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझा आज्ञा पाळाल.' मी पित्याला विनवणी करीन व तो तुम्हांला दुसरा साह्यकर्ता म्हणजे सत्याचा आत्मा देईल. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण आपल्या पापाची क्षमा मागूया व पवित्र आत्म्याचा आर्शिवाद आपल्यावर यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.   

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ८:५-८, १४-१७

     फिलिपने शोमारोनात जाऊन सुवार्तेची घोषणा केली. यहुदिया आणि गालीलीयात लोक शोमरोनी पाखंडी व यहुदी आहेत असे समजत. शोमारोन प्रांत यहुदियाच्या उत्तरेस होता. फिलिपचा परिचय येथे देताना त्याने केलेली अदभूत चिन्हे, अशुद्ध आत्मे काढणे व आजार बरे करणे इत्यादींचा उल्लेख केला आहे. त्याचे हे कार्य पाहून लोकांनी त्यांचे सांगणे काळजीपूर्वक ऐकले. शोमरोनी लोकांमध्ये सुवार्ता सेवा कार्य सुरु करण्याची योजना अगोदर केली नसल्याने ही वार्ता यरुशलेमध्ये प्रेषितांना समजली तेव्हा ते नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार. त्यांनी ही चौकशी करण्यासाठी पेत्र व योहान ह्यांना तिकडे पाठवले.

दुसरे वाचन: १ पेत्र ३:१५-१८

     पेत्र आपल्या वाचकांना भावी काळात दु:ख सोसण्यासाठी तयार करीत आहे. तसेच मानवी स्वभावाला अनुसरून दु:ख क्लेश म्हणजे केवढी मोठी हानी असे उद्गार त्यांच्या तोंडून निघतील हेही त्याने लक्षात घेतले आहे. त्याने येशूचे उदाहरण देऊन त्यांचे दु:खसहन व त्यातून त्याने काय साधले ते स्पष्ट केले आहे. निर्दोष, निरपराध ख्रिस्ताने देवाच्या योजनेनुसार केलेल्या दु:खसहनाची लक्षणे आहेत. ख्रिस्ताचे दु:खसहन हाच आमचा आदर्श कित्ता आहे हे सांगताच त्याच्या मूल्यावर पेत्राने भर दिली आहे. देवाने पापाला दिलेला न्यायदंड शिक्षा येशूने पूर्णपणे भोगल्यानंतर त्याचा आत्मा देहापासून मुक्त करण्यात आला.

शुभवर्तमान: योहान १४:१५-२१

     पवित्र आत्मा अंतकरणात वस्ती करतो. जे ख्रिस्तावर प्रीती करतात ते उस्तुक्तेने ख्रिस्ताच्या आज्ञा पाळतात. येशु ख्रिस्त लवकरच शिष्यांना सोडून जाणार होता. आतापर्यंत त्याने शिष्यांना मदत केली होती. त्यांचे समाधान करण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविण्याचे अभिवचन त्याने दिले. ही घटना पेंटेकॉस्टच्या दिवशी पडली. पवित्र आत्म्याचा स्वभाव ख्रिस्तासारखाच आहे. तो समाधान देऊन आधार व उत्तेजन देणारा आहे. तो सत्य सांगतो व सत्याचा पाठपुरावा करतो. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यात वस्ती करतो. तो कधीच तिथून जात नाही. ही खात्री आपल्या अंतकरणात असावी. ते शिष्य कधीच अनाथ राहणार नव्हते. देवपिता आपल्या मुलांना कधीच दूर करीत नाही.

बोध कथा

     एक बदलेल्या गरुड पक्षाची ही दंतकथा आहे. एक वनवासी जंगलामध्ये राहत होता. एके दिवशी त्याला गरुडाचे अंड भेटले. त्याने ते अंडे घरी आणले व कोंबडीच्या अंड्याबरोबर उबवण्यासाठी ठेवले. काही दिवसांनी अंडे उबवून झाल्यानंतर त्यातून कोंबडीचे पिल्ले व गरुडाचे पिल्लू बाहेर आले. कालांतराने गरुडाचे पिल्लू कोंबडीच्या पिल्लाबरोबर  वाढू लागले. हे गरुडाचे पिल्लू माती खाऊ लागले. जसे कोंबडीचे पिल्ले जिथे-तिथे जाऊन काही किडे खात होती तसे हे गरुडाचे पिल्लू ही खाऊ लागले. परंतु ह्या गरुडाच्या पिल्लाने उडण्याचे कधी प्रयत्न केले नाहीत.
     एके दिवशी हे गरुडाचे पिल्लू अन्न शोधत असताना, त्याने उंच आकाशात एक गरुड मोठ्याने झेप घेत होते ते पहिले आणि आकाशात उडणाऱ्या गरुडाविषयी मोठ्याने कौतुक करु लागले. तेथे कोंबडीचे पिल्ले ही आले आणि गरुडाच्या पिल्लूला म्हणाले, “पहा, ते गरुड ! सर्व पक्षाचा राजा". मी आणि तू कोंबडीचे पिल्ले. आपण कधीच उंच भरारी, त्या गरुडासारखे झेप घेऊ शकणार नाही.  

मनन चिंतन:

     कधी कधी आपणामध्ये असलेल्या शक्तीचा व सामर्थ्याची जाणीव होत नसते. आपण त्या गरुडाच्या पक्षाप्रमाणे इतरांमध्ये असलेल्या सामर्थ्याची व शक्तीची वाहवा व कौतुक करतो. परंतु आपणामध्ये असलेल्या शक्तीचा वापर करत नसतो. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये पराभव, निराश व अपयश यांच्या मार्गावर चालत राहतो. देवाने आपणांस जी शक्ती दिले आहे त्याबद्दल आपण अज्ञानी असतो. जेव्हा आपण देवाच्या सहकार्यात किंवा संबंधात येतो तेव्हा आपण फार मोठे अदभूत कार्य करु शकतो. संत पौल फिलिप्पेकरांस पत्र ४:१३ मध्ये सांगतात की “मला जो सामर्थ्य देतो त्यांच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.
     आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त असे सांगत आहे की, ‘मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.” शिष्यांना फार दु:ख झाले होते कारण येशू त्यांच्यापासून दूर जाणार होता. आता शिष्यांपुढे अडचण निर्माण झाली होते. ती म्हणजे ख्रिस्त त्यांच्यामधून निघून गेल्यानंतर ते जीवनाला कसे सामोरे जाणार होते. अशा वेळी येशू ख्रिस्त त्यांना आत्मविश्वासाने सांगतो की तुम्ही घाबरू नका; मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.
     प्रत्येक मानवी मनुष्याच्या जीवनात दोन आध्यात्मिक गोष्टींची गरज असते. पहिली म्हणजे क्षमाशीलता व दुसरी नीतिमान किंवा चांगुलपणा. आपण जाणीवपुर्वक ह्या दोन्ही गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो.
     आपण क्षमा मिळवण्यासाठी देवाकडे आरोळी किंवा आक्रोश करत असतो. कारण आपण सर्वजण पापी आहोत आणि आपल्या प्रत्येकाकडून पाप घडलेले आहे. त्यामुळे आपण देवाच्या गौरवासाठी अपुरे पडले आहोत. आपण सर्वजण देवाच्या समोर उभे राहून देवाला सांगतो की हे देवा आम्ही सर्वजण पापी आहोत. आम्हांला तुज्या क्षमेचि गरज आहे. देवाने कृपा करून आपली ही आरोळी ऐकली व त्याच्या पुत्राला ह्या जगात पाठवले जेणेकरून तो आपल्या पापांची क्षमा करेल.
     आपल्यामध्ये अशी तीव्र इच्छा असते की आपण चांगले बनावे. परंतु आपण कधी तरी अशा गोष्टी करतो की त्याचा आपण द्वेष करतो. आपल्यामध्ये नैसर्गिक क्षमता व कौशल्य आहे की आपण काही तरी चांगले करु शकतो; हीच तीव्र इच्छा आपल्यात असली पाहिजे. त्यासाठी पित्याने पवित्र आत्मा पाठविला आहे. जेणेकरून पवित्र आत्मा आपल्याला आपल्या कार्यात मदत करेल. पवित्र आत्मा सर्व वाईट शक्तीपासून बचाव करत असतो व सर्व कमजोर गोष्टीपासून रक्षण करतो.
     संत पौल रोमकरांस पत्रात सांगत आहे की, “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत राहीन; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो. (रोम ७:१९). ख्रिस्ताने आपल्याला पाप मुक्त केले आहे आणी पवित्र आत्मा पाठवला आहे. जेणेकरून पवित्र आत्मा आपल्या जीवनात आपल्याला मदत करेल.
     आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे; आणि जो कोण माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मी ही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रगट होईल. अशी जो प्रार्थना करणार त्याच्यासाठी पिता त्याच्यावर पवित्र आत्मा पाठवणार व हा पवित्र आत्मा त्याचा समर्थक बनणार. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे पूर्ण विश्वासाने येतो तेव्हा पित्याला वाटते की आपण जीवनात जिंकलो पाहिजे. जेणेकरून आपण चांगले जीवन जगले पाहिजे व ह्या चांगल्या जीवनाने आपण देवाचा महिमा व गौरव केला पाहिजे. पवित्र आत्मा हा आपला समर्थक व सहाय्यक आहे. पवित्र आत्मा शक्तीचे उगमस्थान आहे. पवित्र आत्मा कष्टी व दु:खी जीवनात आपल्याला मदत करतो व आपले दु:ख दूर करण्यासाठी मदत करतो.
     ख्रिस्ताने आपल्याला वचन दिले आहे की, “तो आपल्यावर पवित्र आत्मा पाठवणार आहे व ख्रिस्त त्याच्या वचनाशी सत्य आहे कारण येशू ख्रिस्ताने पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर पवित्र आत्मा पाठवला.” सर्व शिष्य धैर्याने, श्रद्धेने व सामर्थ्याने भरून गेले व पूर्णपणे बदलून सुद्धा गेले. शिष्यांनी पवित्र आत्म्याच्या शक्तीद्वारे सर्व जगाला बदलून टाकले आणि आता हाच पवित्र आत्मा आपल्यासाठी उपलब्ध आहे. फक्त आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. संत पेत्र म्हणतो की, “ पश्चताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा दया, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २:३८).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐक.

१. आपण आपल्या ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मगुरूभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पवित्र आत्म्याचे सहाय्य मिळावे व त्यांनी देवाचे शब्द जगाच्या काना-कोप-यात पोहोचवावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. समाजातील तरुण-तरुणी यांनी उच्च शिक्षण घेतले आहे, नोकरी शोधत आहेत. व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यश न आल्यामुळे काही तरुण-तरुणी दिशाहीन झाले आहेत. अशा अडचणीच्या प्रसंगी त्यांनी कष्ट, प्रयत्न चालू ठेवावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे, सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावा व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाचा कायापलट व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. आता आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.   

           

Tuesday, 9 May 2017

Reflection for the Homily of 5th Sunday of Easter (14-05-2017) By Br Camrello Dimekar





पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार


दिनांक: १४-०५-२०१७
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७
दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९
शुभवर्तमान: योहान १४:१-१२






‘मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.’








प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी जमलेल्या भाविकांनो, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशुचे अनुकरण करण्यास पाचारीत आहे, कारण येशु हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे.
     प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक सांगते की, ख्रिस्ती समुदायात वादविवाद आणि तणावाचे वातावरण होते. ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व ख्रिस्ती समाजात शांती आणि ऐकीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे सात पुरुषांची निवड करण्यात आली आहे. पेत्राचे पहिले पत्र सांगते की, आपल्या जीवनात येशुवर श्रद्धा असली तर आपण येशु ख्रिस्ताच्या वंशात एक याजकगण, निवडले लोक असे होणार. योहानलिखीत शुभवर्तमान आपल्याला येशु ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आह्वान करत आहे. येशु ख्रिस्त हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे. येशू ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे येशु ख्रिस्ताची मुल्ये तंतोतंत पाळणे हे होय.
      आपले जीवन जेव्हा येशु ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार चालते तेव्हा आपले आचार आणि विचार स्वर्गीय गोष्टीकडे वळतात आणि आपल्या जीवनाला नवीन वळण लाभते. आजच्या ख्रिस्तयागामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपण येशूची कृपा मागुया जेणेकरून आपण त्याच्या शिकवणुकीचे अनुकरण करून त्याच्या मार्गावर चालू आणि सत्याचे जीवन जगून सार्वकालिक जीवनाचा अनुभव स्वीकारू.
 
सम्यक विवरण

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७

     इब्री व ग्रीक भाषा बोलणारे यांच्यात काही गोष्टीवरून वाद सुरु झाला होता. सर्वांच्या गरजेप्रमाणे मालमत्तेची (वस्तूंची) वाटणी होत असे. आम्ही ग्रीक बोलतो म्हणून आंम्हाला कमी मिळते अशी ग्रीक बोलणाऱ्या विधवांची तक्रार होती. या कारणाने त्या मोठ्या जमावात फुट पडत होती. या प्रश्नाकडे प्रेषितांनी ताबडतोब लक्ष दिले. त्यांनी सर्व मंडलीळा जमविले आणि मंडळीसमोरचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. आणि हा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दल विचारपूस केली.
येशु ख्रिस्ताने प्रेषितांना प्रार्थना करावयास शिकविले होते.  दररोजचे रेशन वाटप करणारी माणसे पवित्र आत्म्यावर अवलंबून राहत असे. जे पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतात त्यांच्यात ख्रिस्ताचे गुण दिसतात. कारण हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे.

दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९

     विश्वास असणाऱ्या लोकांना देवाची योजना काय आहे याचे वर्णन या वाचनात आढळते. या योजनेचचा कोनशिला ‘जीवंत ख्रिस्त’ हा आहे. त्याच्याजवळ येत असता........ याचा अर्थ आपण त्याच्याजवळ नेहमी स्व:त होऊन येत असल्यामुळे आपण अधिक ख्रिस्तासारखे बनत जातो. ख्रिस्ताची मंडळी आध्यामिक मंदिर आहे आणि सर्व विश्वास ठेवणारे पवित्र म्हणजे देवासाठी वेगळे केलेले याजक आहेत. या याजकांना देवाला आवडणारे यज्ञ करायचे आहते. ते यज्ञ म्हणजे ख्रिस्ताद्वारे देवाची स्तुती करणे.
कोनशिला: ज्या दगडावर इमारतीचे बांधकाम टेकलेले असते त्या दगडाला कोनशिला म्हणतात. ख्रिस्त कोनशिला आहे. विश्वास ठेवणारे त्याच्यावर अवलंबून राहतात. त्यांची कधीच फजिती होणार नाही. त्यांना ख्रिस्त फारच मोलवान वाटतो.

शुभवर्तमान: योहान: १४:१-१२

     पित्याचे घर हि अंतकरणातील गौरवी आशा आहे. देवाची सर्व मुले पित्याच्या घराकडे चालली आहेत. तेथे जागेचा तुटवडा नाही. ख्रिस्त त्यांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी गेला आहे. पित्याच्या घरी गेल्यावर तेथे कायम राहायचे आहे. प्रभू येशु ख्रिस्त स्वत: येईल व देवाच्या सर्व मुलांना पित्याच्या घरी नेईल. मग ते ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय सुखात राहतील. आपण पित्याच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर आहात का याची खात्री करून घेऊन जीवन जगले पाहिजे. ख्रिस्त सत्य आणि जीवनाचा मार्ग आहे. ख्रिस्ताचा स्वीकार करणाराच पित्याकडे येतो व तोच पित्याच्या घराकडे चालला आहे. पित्याच्या घरी जाणाच्या मार्गावर पित्याची ओळख होते. ख्रिस्ताला ओळखणे म्हणजे देवपित्याला ओळखणे.

मनन चिंतन

     प्रभू येशु ख्रिस्त हा आमचा उत्तम मेंढपाळ आहे. इतकेच नव्हे तर तो मेंढवाड्याचे दार आहे आणि त्या दारातून आम्ही त्याच्याकडे पोहोचयाचे आहे आणि इतरांनाही त्याच्याद्वारे आम्ही त्याच्याकडे आणण्यासाठी आम्हांला पाचारण करण्यात आले आहे. आजच्या वाचनातून प्रभू येशु आम्हाला अधिक खोलात नेत आहे. आणि मार्ग, सत्य व जीवन मीच आहे हे आम्हाला ठासून सांगत आहे.
     आधी सत्य काय आहे ते पाहू. सत्य म्हणजे स्वत:मध्ये जीवन असणारा, खरोखरी अस्तिवात असणारा, फक्त परमेश्वरच सत्य आहे, स्वत:चे जीवन जगणारा, स्वबळावर अस्तिव असणारा असा आहे. सर्व निर्मित वस्तू, पशुपक्षी मानव त्याने निर्माण केले म्हणून जीवनासाठी त्यावर अवलंबून असतात. प्रभू येशु ख्रिस्त सत्य आहे म्हणजेच पिता आणि पुत्र एक आहेत. विभक्त नाहीत. दैवी जीवन म्हणजे पवित्र आत्मा त्याच्या ठायी आहे. यालाच आपण परमपवित्र त्रेक्य असे म्हणतो. म्हणूनच तर प्रभू येशु फिलिपला म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पहिले आहे. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे (योहान १४:९-११).
     प्रभू येशु ख्रिस्त जीवन आहे. ते कसे हे आता लगेच लक्षात आहे पाहिजे कारण परमेश्वर पिता आणि पुत्र प्रभू येशु ख्रिस्त पवित्र आत्म्यामध्ये एकच आहेत. त्यांना आपण वेगळे करु शकत नाही. याचाच अर्थ, सत्य म्हणजे जीवन आहे हे एकदा आपण मान्य केले तर प्रभू येशु ख्रिस्त मार्ग कसा याचे सहज आकलन होते. परमेश्वर पिता आत्मा आहे, तो दिसत नाही, त्याला आपण पाहू शकत नाही. त्याचे बोलणे ऐकू शकत नाही. परंतु येशु ख्रिस्ताला त्याच्या काळाच्या लोकांनी पाहिले, त्याचे बोलणे ऐकले, त्याला स्पर्श केला, त्याबद्दल साक्ष दिली.
त्यांनी लिहिलेले शुभवर्तमान आम्ही वाचतो व ऐकतो. परमेश्वर पित्याला आम्ही पाहू शकत नाही, त्याचे ऐकू शकत नाही, स्पर्श करून शकत नाही ते सर्व प्रभू येशु ख्रिस्ताद्वारे शक्य होते. मार्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावरून आम्हाला लांबचा प्रवास करावा लागत नाही, वेळ खर्च करावा लागत नाही. प्रभू म्हणतो त्याप्रमाणे जो त्याला पाहतो, त्यावर विश्वास ठेवतो, त्याला शरण जातो तो पित्याला पाहतो, पित्यावर विश्वास ठेवतो, पित्याला शरण जातो आणि त्याद्वारे त्याला पित्याच्या दैवी जीवनाचा साक्षात्कार होतो.
     असे दैवी साक्षात्कार झालेले ते तुम्ही तर देवाचा निवडलेले वंश, राजकीय याजकपण, पवित्र राष्ट्र, देवाचे लोक असे आहात, असे संत पेत्र आम्हांला आजच्या दुसऱ्या वाचनातून सांगत आहे. तर पहिल्या वाचनात देवाचे कार्य व सेवा करण्यासाठी पवित्र आत्मा व ज्ञानाने पूर्ण असे स्थान प्रतिष्टीत पुरुष शिष्यांनी शोधून काढले असे वर्णन आले आहे. त्यांस त्यांनी त्यांच्यावर हात ठेवले मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला आणि येरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुजे साक्षीदार बनव.

१. आपल्या ख्रिस्तसभेचे पोप महाशय फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. पापी, जकातदार व समाजाने बहिष्कृत केलेल्या व्यक्तीबरोबर प्रभू तुझे कार्य आम्हाला प्रेरणा देवो जेणेकरून आम्ही तुज्या सुर्वार्तेची घोषणा सर्व ठिकाणी पसरू म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे वासना, व्यसन यांच्या आधीन गेले आहेत, जे मृत जीवन जगत आहेत त्यांना आमच्या सेवेद्वारे नवजीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. पर्यावरणाची काळजी घेऊन स्वच्छ व सुंदर विश्व बनविण्यासाठी आम्ही झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
      


Thursday, 4 May 2017

 Reflection for the Homily of 4th Sunday of  Easter (07-05-17) By Brendon Noon


पुनरुत्थानकाळातील चौथा रविवार


दिनांक: ०७/०५/२०१७
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २:१४, ३६-४१
दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५
शुभवर्तमान: योहान १०:१-१०






मी मेंढराचे दार आहे.








प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो, आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास प्रभू येशु हा उत्तम मेंढपाळ आहे आणि आपण सर्वजण त्याची मेंढरे आहोत या विषयी सांगत आहे. येशु ख्रिस्त हा खरा मेंढपाळ असून तो आपली काळजी घेतो व आपल्याला त्याच्या सानिध्यात ठेवून आपले संरक्षण करतो.
     प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात पेत्र, यहुदी लोक आणि येरुशलेममधील रहिवाशांच्या समोर उभा राहून येशु ख्रिस्ताच्या मरणाविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात, पेत्र सांगतो की, ‘जरी कोणी चांगल्या कार्यासाठी दु:ख सहन करत असेल तर ते त्याने हसत-मुखाने करावे कारण ख्रिस्ताने सुद्धा आपणासाठी दु:ख सहन केलेले आहे.’ तसेच आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताची उपमा प्रेमळ व विश्वासू मेंढपाळाबरोबर करण्यात आली आहे. येशु ख्रिस्त हा मेंढवाड्यांचे दार आहे. जो कोणी त्या दारातून प्रवेश करतो त्याचे संरक्षण होते आणि त्याला तारणप्राप्ती होते याची जाणीव आजच्या शुभवर्तमानामध्ये करून दिली आहे. 
     आजच्या ह्या पवित्र मिसाबलीदानात आपण सहभागी होत असताना येशु ख्रिस्त मेंढपाळाच्या मार्गदर्शनासाठी आपण सदैव तत्पर असावे व आपण सुद्धा चांगले मेंढपाळ बनावे म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४, ३६-४१

     ह्या वाचनात आपण नव्या युगाची सुरुवात येशु ख्रिस्ताच्या मरणाने व पुनरुत्थानाने झाली आहे या विषयी ऐकतो. जेव्हा निरनिराळ्या भाषांत देवाची महाकृत्ये सांगणाऱ्या प्रेषितांची, काही लोक थट्टा करत होते, अशावेळी पेत्र त्या यहुदी व येरुशलेममधील रहिवाशांच्या समोर मोठ्या धैर्याने उभा राहतो व सुवार्ता सांगतो. पेत्राने ख्रिस्ताविषयी जे सांगितले त्याच्यावर यहुदी लोक विश्वास ठेवतात व त्यांचे अपराध व चूक त्यांना समजते म्हणून ते पेत्राला विचारतात “आम्ही काय करावे ?” ख्रिस्ताला धिक्कारणाऱ्या यहुदियांना पश्चाताप करून, आपली वृत्ती बदलून येशूला मसीहा व पापापासून तारणारा असे स्वीकार करण्याची गरज होती. म्हणून पेत्र सांगतो पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशु ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. म्हणून त्या दिवशी तीन हजार लोकांनी पश्चाताप करून ख्रिस्ताचा स्वीकार केला.  

दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५

     या पत्रात पेत्र, अन्याय व दु:ख या विषयी सांगतो. त्या काळात बरेच नोकर व गुलाम ख्रिस्तसभेचे सभासद होते. त्यांच्यावर खूप अन्याय होत असे तेव्हा त्यांना धीर देऊन पेत्र सांगतो की, तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे परत या व मेंढपाळाच्या आज्ञेत रहा. जर तुम्ही ख्रिस्ताला अनुसरत असाल तर तुम्हाला दु:ख सहन करावे लागेल असे ही पेत्र सांगतो. ख्रिस्ताने आपल्या पापांमुळे दु:ख सहन केले. कारण अन्याय होत असता शांत राहून तो सोसणे हि गोष्ट देवाच्या दृष्टीत योग्य ठरते. याचे कारण असे की, न्याय करणारा फक्त देव आहे आणि ख्रिस्त हा आपला कित्ता आहे.

शुभवर्तमान: योहान १०:१-१०

     आजच्या योहानलीखीत शुभवर्तमानात आपण मेंढपाळ व मेंढरे यांच्यामधील जे नाते आहे, त्या विषयी ऐकतो. कारण जेव्हा ख्रिस्ताने आंधळ्यांना बरे केले होते तेव्हा परुशी लोकांनी हा चमत्कार नाकारला होता. म्हणून ह्या दाखल्याद्वारे येशु त्यांना संदेश देतो व स्व:ताला दाराची उपमा देतो. मी मेंढराचे दार आहे. कारण कोणत्याही मेंढरांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी दारातून मेंढवाड्यात जावे लागे व आपण सर्वांचे तारण होण्यासाठी येशु ख्रिस्त हा एकच उपाय आहे. कारण जो ख्रिस्ताद्वारे देवाजवळ जाईल त्यालाच तारण मिळेल. येशुख्रिस्त आपल्या मेंढरांचे पालन-पोषण व संरक्षण करतो. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला सार्वकालिक जीवन विपुलपणे देण्यासाठीच येशु ख्रिस्त आला होता.

बोध कथा

     काही वर्षा पूर्वी एका छोट्याश्या कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला होता. मुलीचे आई-वडील खूप प्रेमळ होते. त्यांनी आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले. जस-जशी ती मुलगी मोठी झाली, तस-तशी तिने चांगले गुण आत्मसात केले. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, स्व:ताचे जीवन देवाच्या कार्यासाठी अर्पण केले. तिने व्रतस्थ जीवन स्वीकारले आणि धर्म-भगिनी बनली. त्यानंतर तिने सर्वावर एकाच प्रकारची माया, दया, सेवा आणि सौम्यता दाखविली. तिने सर्वांवर सारखेच प्रेम केले. जे कोणी आजारी, दु:खी व जीवनात निराश झालेले होते अशांना मदत केली. अनाथ मुला-मुलींना आई-वडिलांचे प्रेम दिले, रोग्यांची सेवा केली, गरिबांना दिलासा दिला व तिने दुसऱ्यांसाठी नेहमी प्रार्थना केली. ती स्व:साठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी जीवन जगली. जसा एक मेंढपाळ त्याच्या मेंढऱ्यांची देखरेख करतो तशाच प्रकारचे कार्य या धर्म-भगिनीने केले. स्व:ताच्या जीवनाविषयी विचार न करता तिने दुसऱ्यांसाठी आपले जीवन दिले. त्या धर्म-भगिनीला आज आपण संत मदर तेरेजा या नावाने ओळखतो.

मनन चिंतन

     येशु ख्रिस्त मेंढराचे दार आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे. जी व्यक्ती ख्रिस्ताच्या आज्ञा प्रमाणे चालते ती प्रभू येशु ख्रिस्ताच्या सानिध्यात राहते व नेहमी आनंदी जीवन जगते. येशु ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे हे आजच्या शुभवर्तमानामध्ये स्पष्ट करून दिले आहे. मजुरीसाठी मेंढरे राखणारा व प्रीतीने मेंढरे राखणारा यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मेंढरावर कुठलेही संकट आले तर मोलकरी मेंढरांचे संरक्षण न करता तो पळून जातो. मेंढरांची दाणादाण झाली तरी त्याला काही वाटत नाही. तो फक्त मजुरीसाठी काम करतो. त्याला कशाची काळजी नसते.
परंतु येशु ख्रिस्ताच्या सानिध्यात तसे होत नाही. येशु ख्रिस्त मेंढरावर प्रीती करतो. त्याचे संरक्षण करतो. याचे छोटेशे उदाहरण आपल्याला संत मदर तेरेजा हिच्या जीवनात आढळते. तिने कधीही कुणाचा तिरस्कार केला नाही. जेव्हा तिने दुसऱ्याची सेवा चालू केली ती तिने शेवटपर्यंत केली. तिने घोर-गरिबांचा कधीही धिक्कार केला नाही. तिने निस्वार्थीप्रमाणे सर्वांची सेवा केली.
     प्रभू येशु आपला मेंढपाळ असून तो आपले फक्त संरक्षण करत नाही तर आपल्यासाठी प्राण सुद्धा देतो. आपल्याला सार्वकालीक जीवन देता यावे यासाठी येशु ख्रिस्ताला आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला. हि पित्याची आज्ञा होती. इतकेच नव्हे, तर येशु ख्रिस्त मेला व तिसऱ्या दिवशी जिवंत झाला.
येशु ख्रिस्त प्रथम यहुदी लोकांना देवपित्याकडे आणण्यास आला. त्याच्या पुनरुत्थानानंतर इतर राष्ट्रातील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला हे आपण आजच्या पहिल्या दोन्ही वाचनात ऐकले आहे. आपण सर्वजण ख्रिस्ताचे मेंढरे आहोत. म्हणून त्याचे प्रभुत्व मानून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आपण चांगले जीवन जगले पाहिजे कारण येशु ख्रिस्त व देव पिता आपले संरक्षण करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमचा मार्गदर्शक हो.

१. आम्ही आपल्या परमगुरुस्वामीद्वारे परमेश्वराचे सत्य समजून घ्यावे व त्यांच्या बरोबर आम्हाला मिळालेल्या देणग्यांचा वापर करावा व एक ख्रिस्तसभा म्हणून काम करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे प्रभू येशु ख्रिस्ता तुझी कृपादृष्टी आमच्या देशाच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यावर असू दे. त्यांना सत्य आणि न्यायाने राज्य कारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गावर चालण्यास मदत कर म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
३. जे दारू व अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्यासाठी धार्मिक नेत्यांनी मार्गदर्शक व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपण सर्वांनी शुद्ध हवा, शुद्ध पाणी तसेच कचरामुक्त शहरे व गावे निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. आता आपण आपल्या सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.