Reflection for the Homily of 6th Sunday of Easter (21-05-17) By Lavet Fernandes
पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार
दिनांक: २१-०५-२०१७
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ८:५-८, १४-१७
दुसरे वाचन: १ पेत्र ३:१५-१८
शुभवर्तमान: योहान १४:१५-२१
“पिता तुम्हांला दुसरा कैवारी देईल”
प्रस्तावना:
आज
आपण पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार साजरा
करीत आहोत. आजची वाचने आपणांस प्रीती व पवित्र
आत्मा ह्या
दोन आंतरिक दानांविषयी सांगतात. प्रेषितांची कृत्ये
ह्या आजच्या पहिल्या वाचनातून आपणांस कळते की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने
फिलिप्पने देवाचा संदेश संपूर्ण शमोरोनात पसरविला. योहानाने व पेत्राने शमोरोनातील
लोकांना पवित्र आत्म्याचे वरदान लाभण्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली. आजच्या
दुस-या वाचनात संत पेत्र आपल्या पत्रात म्हणतो, ‘ख्रिस्तासाठी
आपल्या मनात पूज्य भाव ठेवून ख्रिस्ताला आपला प्रभू माना’. कारण शारिरिकदुष्ट्या ख्रिस्ताचा वध करण्यात आला, परंतू
आत्मिकदुष्ट्या ख्रिस्ताला जिंवत आहे.
आजचे पवित्र शुभवर्तमान आपणांस पवित्र आत्म्याविषयी सांगत आहे. येशू
म्हणतो, ‘तुमचे
माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझा आज्ञा पाळाल.' मी पित्याला विनवणी करीन व तो
तुम्हांला दुसरा साह्यकर्ता म्हणजे सत्याचा आत्मा देईल. आजच्या ह्या पवित्र
मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण आपल्या पापाची क्षमा
मागूया व पवित्र आत्म्याचा आर्शिवाद आपल्यावर यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ८:५-८, १४-१७
फिलिपने शोमारोनात जाऊन सुवार्तेची घोषणा
केली. यहुदिया आणि गालीलीयात लोक शोमरोनी पाखंडी व यहुदी आहेत असे समजत. शोमारोन
प्रांत यहुदियाच्या उत्तरेस होता. फिलिपचा परिचय येथे देताना त्याने केलेली अदभूत
चिन्हे, अशुद्ध आत्मे काढणे व आजार बरे करणे इत्यादींचा उल्लेख केला आहे. त्याचे
हे कार्य पाहून लोकांनी त्यांचे सांगणे काळजीपूर्वक ऐकले. शोमरोनी लोकांमध्ये
सुवार्ता सेवा कार्य सुरु करण्याची योजना अगोदर केली नसल्याने ही वार्ता यरुशलेमध्ये
प्रेषितांना समजली तेव्हा ते नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार. त्यांनी ही चौकशी
करण्यासाठी पेत्र व योहान ह्यांना तिकडे पाठवले.
दुसरे वाचन: १ पेत्र ३:१५-१८
पेत्र आपल्या वाचकांना भावी काळात दु:ख
सोसण्यासाठी तयार करीत आहे. तसेच मानवी स्वभावाला अनुसरून दु:ख क्लेश म्हणजे केवढी
मोठी हानी असे उद्गार त्यांच्या तोंडून निघतील हेही त्याने लक्षात घेतले आहे.
त्याने येशूचे उदाहरण देऊन त्यांचे दु:खसहन व त्यातून त्याने काय साधले ते स्पष्ट
केले आहे. निर्दोष, निरपराध ख्रिस्ताने देवाच्या योजनेनुसार केलेल्या दु:खसहनाची
लक्षणे आहेत. ख्रिस्ताचे दु:खसहन हाच आमचा आदर्श कित्ता आहे हे सांगताच त्याच्या
मूल्यावर पेत्राने भर दिली आहे. देवाने पापाला दिलेला न्यायदंड शिक्षा येशूने
पूर्णपणे भोगल्यानंतर त्याचा आत्मा देहापासून मुक्त करण्यात आला.
शुभवर्तमान: योहान १४:१५-२१
पवित्र आत्मा अंतकरणात वस्ती करतो. जे
ख्रिस्तावर प्रीती करतात ते उस्तुक्तेने ख्रिस्ताच्या आज्ञा पाळतात. येशु ख्रिस्त
लवकरच शिष्यांना सोडून जाणार होता. आतापर्यंत त्याने शिष्यांना मदत केली होती. त्यांचे
समाधान करण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविण्याचे अभिवचन त्याने दिले. ही घटना
पेंटेकॉस्टच्या दिवशी पडली. पवित्र आत्म्याचा स्वभाव ख्रिस्तासारखाच आहे. तो समाधान
देऊन आधार व उत्तेजन देणारा आहे. तो सत्य सांगतो व सत्याचा पाठपुरावा करतो. पवित्र
आत्मा विश्वासणाऱ्यात वस्ती करतो. तो कधीच तिथून जात नाही. ही खात्री आपल्या
अंतकरणात असावी. ते शिष्य कधीच अनाथ राहणार नव्हते. देवपिता आपल्या मुलांना कधीच
दूर करीत नाही.
बोध कथा
एक बदलेल्या गरुड पक्षाची ही दंतकथा आहे. एक वनवासी जंगलामध्ये राहत
होता. एके दिवशी त्याला गरुडाचे अंड भेटले. त्याने ते अंडे घरी आणले व कोंबडीच्या
अंड्याबरोबर उबवण्यासाठी ठेवले. काही दिवसांनी अंडे उबवून झाल्यानंतर त्यातून
कोंबडीचे पिल्ले व गरुडाचे पिल्लू बाहेर आले. कालांतराने गरुडाचे पिल्लू
कोंबडीच्या पिल्लाबरोबर वाढू लागले. हे
गरुडाचे पिल्लू माती खाऊ लागले. जसे कोंबडीचे पिल्ले जिथे-तिथे जाऊन काही किडे खात
होती तसे हे गरुडाचे पिल्लू ही खाऊ लागले. परंतु ह्या गरुडाच्या पिल्लाने उडण्याचे
कधी प्रयत्न केले नाहीत.
एके दिवशी हे गरुडाचे पिल्लू अन्न शोधत
असताना, त्याने उंच आकाशात एक गरुड मोठ्याने झेप घेत होते ते पहिले आणि आकाशात
उडणाऱ्या गरुडाविषयी मोठ्याने कौतुक करु लागले. तेथे कोंबडीचे पिल्ले ही आले आणि
गरुडाच्या पिल्लूला म्हणाले, “पहा, ते गरुड ! सर्व पक्षाचा राजा". मी आणि तू
कोंबडीचे पिल्ले. आपण कधीच उंच भरारी, त्या गरुडासारखे झेप घेऊ शकणार नाही.
मनन चिंतन:
कधी कधी आपणामध्ये असलेल्या शक्तीचा व
सामर्थ्याची जाणीव होत नसते. आपण त्या गरुडाच्या पक्षाप्रमाणे इतरांमध्ये असलेल्या
सामर्थ्याची व शक्तीची वाहवा व कौतुक करतो. परंतु आपणामध्ये असलेल्या शक्तीचा वापर
करत नसतो. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये पराभव, निराश व अपयश यांच्या मार्गावर
चालत राहतो. देवाने आपणांस जी शक्ती दिले आहे त्याबद्दल आपण अज्ञानी असतो. जेव्हा
आपण देवाच्या सहकार्यात किंवा संबंधात येतो तेव्हा आपण फार मोठे अदभूत कार्य करु
शकतो. संत पौल फिलिप्पेकरांस पत्र ४:१३ मध्ये सांगतात की “मला जो सामर्थ्य देतो
त्यांच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.
आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त असे
सांगत आहे की, ‘मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे
सत्याचा आत्मा देईल.” शिष्यांना फार दु:ख झाले होते कारण येशू त्यांच्यापासून दूर
जाणार होता. आता शिष्यांपुढे अडचण निर्माण झाली होते. ती म्हणजे ख्रिस्त
त्यांच्यामधून निघून गेल्यानंतर ते जीवनाला कसे सामोरे जाणार होते. अशा वेळी येशू
ख्रिस्त त्यांना आत्मविश्वासाने सांगतो की तुम्ही घाबरू नका; मी पित्याला विनंती
करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने
तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.
प्रत्येक मानवी मनुष्याच्या जीवनात दोन आध्यात्मिक
गोष्टींची गरज असते. पहिली म्हणजे क्षमाशीलता व दुसरी नीतिमान किंवा चांगुलपणा.
आपण जाणीवपुर्वक ह्या दोन्ही गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो.
आपण क्षमा मिळवण्यासाठी देवाकडे आरोळी किंवा
आक्रोश करत असतो. कारण आपण सर्वजण पापी आहोत आणि आपल्या प्रत्येकाकडून पाप घडलेले
आहे. त्यामुळे आपण देवाच्या गौरवासाठी अपुरे पडले आहोत. आपण सर्वजण देवाच्या समोर
उभे राहून देवाला सांगतो की हे देवा आम्ही सर्वजण पापी आहोत. आम्हांला तुज्या
क्षमेचि गरज आहे. देवाने कृपा करून आपली ही आरोळी ऐकली व त्याच्या पुत्राला ह्या
जगात पाठवले जेणेकरून तो आपल्या पापांची क्षमा करेल.
आपल्यामध्ये अशी तीव्र इच्छा असते की आपण
चांगले बनावे. परंतु आपण कधी तरी अशा गोष्टी करतो की त्याचा आपण द्वेष करतो. आपल्यामध्ये
नैसर्गिक क्षमता व कौशल्य आहे की आपण काही तरी चांगले करु शकतो; हीच तीव्र इच्छा
आपल्यात असली पाहिजे. त्यासाठी पित्याने पवित्र आत्मा पाठविला आहे. जेणेकरून
पवित्र आत्मा आपल्याला आपल्या कार्यात मदत करेल. पवित्र आत्मा सर्व वाईट
शक्तीपासून बचाव करत असतो व सर्व कमजोर गोष्टीपासून रक्षण करतो.
संत पौल रोमकरांस पत्रात सांगत आहे की, “जे
चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत राहीन; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते
मी करितो. (रोम ७:१९). ख्रिस्ताने आपल्याला पाप मुक्त केले आहे आणी पवित्र आत्मा
पाठवला आहे. जेणेकरून पवित्र आत्मा आपल्या जीवनात आपल्याला मदत करेल.
आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त
आपल्याला सांगत आहे की “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच
माझ्यावर प्रीती करणार आहे; आणि जो कोण माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता
प्रीती करील; मी ही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रगट होईल. अशी जो
प्रार्थना करणार त्याच्यासाठी पिता त्याच्यावर पवित्र आत्मा पाठवणार व हा पवित्र
आत्मा त्याचा समर्थक बनणार. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे पूर्ण विश्वासाने येतो
तेव्हा पित्याला वाटते की आपण जीवनात जिंकलो पाहिजे. जेणेकरून आपण चांगले जीवन
जगले पाहिजे व ह्या चांगल्या जीवनाने आपण देवाचा महिमा व गौरव केला पाहिजे. पवित्र
आत्मा हा आपला समर्थक व सहाय्यक आहे. पवित्र आत्मा शक्तीचे उगमस्थान आहे. पवित्र
आत्मा कष्टी व दु:खी जीवनात आपल्याला मदत करतो व आपले दु:ख दूर करण्यासाठी मदत
करतो.
ख्रिस्ताने आपल्याला वचन दिले आहे की, “तो
आपल्यावर पवित्र आत्मा पाठवणार आहे व ख्रिस्त त्याच्या वचनाशी सत्य आहे कारण येशू
ख्रिस्ताने पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर पवित्र आत्मा पाठवला.” सर्व शिष्य
धैर्याने, श्रद्धेने व सामर्थ्याने भरून गेले व पूर्णपणे बदलून सुद्धा गेले. शिष्यांनी
पवित्र आत्म्याच्या शक्तीद्वारे सर्व जगाला बदलून टाकले आणि आता हाच पवित्र आत्मा आपल्यासाठी
उपलब्ध आहे. फक्त आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. संत पेत्र म्हणतो की, “ पश्चताप
करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू
ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा दया, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान होईल.”
(प्रेषितांची कृत्ये २:३८).
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐक.
१. आपण आपल्या ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मगुरूभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या
सर्वांना पवित्र आत्म्याचे सहाय्य मिळावे व त्यांनी देवाचे शब्द जगाच्या काना-कोप-यात पोहोचवावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. समाजातील
तरुण-तरुणी यांनी उच्च शिक्षण घेतले आहे, नोकरी शोधत आहेत. व्यवसाय सुरु करण्याचा
प्रयत्न करीत आहेत. यश न आल्यामुळे काही तरुण-तरुणी दिशाहीन झाले आहेत. अशा
अडचणीच्या प्रसंगी त्यांनी कष्ट, प्रयत्न चालू ठेवावेत म्हणून आपण प्रभूकडे
प्रार्थना करू या.
३. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी
प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना
शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू
ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे, सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावा व
पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाचा कायापलट व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू
या.
५. आता आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment