Thursday, 4 May 2017

 Reflection for the Homily of 4th Sunday of  Easter (07-05-17) By Brendon Noon


पुनरुत्थानकाळातील चौथा रविवार


दिनांक: ०७/०५/२०१७
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २:१४, ३६-४१
दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५
शुभवर्तमान: योहान १०:१-१०






मी मेंढराचे दार आहे.








प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो, आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास प्रभू येशु हा उत्तम मेंढपाळ आहे आणि आपण सर्वजण त्याची मेंढरे आहोत या विषयी सांगत आहे. येशु ख्रिस्त हा खरा मेंढपाळ असून तो आपली काळजी घेतो व आपल्याला त्याच्या सानिध्यात ठेवून आपले संरक्षण करतो.
     प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात पेत्र, यहुदी लोक आणि येरुशलेममधील रहिवाशांच्या समोर उभा राहून येशु ख्रिस्ताच्या मरणाविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात, पेत्र सांगतो की, ‘जरी कोणी चांगल्या कार्यासाठी दु:ख सहन करत असेल तर ते त्याने हसत-मुखाने करावे कारण ख्रिस्ताने सुद्धा आपणासाठी दु:ख सहन केलेले आहे.’ तसेच आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताची उपमा प्रेमळ व विश्वासू मेंढपाळाबरोबर करण्यात आली आहे. येशु ख्रिस्त हा मेंढवाड्यांचे दार आहे. जो कोणी त्या दारातून प्रवेश करतो त्याचे संरक्षण होते आणि त्याला तारणप्राप्ती होते याची जाणीव आजच्या शुभवर्तमानामध्ये करून दिली आहे. 
     आजच्या ह्या पवित्र मिसाबलीदानात आपण सहभागी होत असताना येशु ख्रिस्त मेंढपाळाच्या मार्गदर्शनासाठी आपण सदैव तत्पर असावे व आपण सुद्धा चांगले मेंढपाळ बनावे म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४, ३६-४१

     ह्या वाचनात आपण नव्या युगाची सुरुवात येशु ख्रिस्ताच्या मरणाने व पुनरुत्थानाने झाली आहे या विषयी ऐकतो. जेव्हा निरनिराळ्या भाषांत देवाची महाकृत्ये सांगणाऱ्या प्रेषितांची, काही लोक थट्टा करत होते, अशावेळी पेत्र त्या यहुदी व येरुशलेममधील रहिवाशांच्या समोर मोठ्या धैर्याने उभा राहतो व सुवार्ता सांगतो. पेत्राने ख्रिस्ताविषयी जे सांगितले त्याच्यावर यहुदी लोक विश्वास ठेवतात व त्यांचे अपराध व चूक त्यांना समजते म्हणून ते पेत्राला विचारतात “आम्ही काय करावे ?” ख्रिस्ताला धिक्कारणाऱ्या यहुदियांना पश्चाताप करून, आपली वृत्ती बदलून येशूला मसीहा व पापापासून तारणारा असे स्वीकार करण्याची गरज होती. म्हणून पेत्र सांगतो पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशु ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. म्हणून त्या दिवशी तीन हजार लोकांनी पश्चाताप करून ख्रिस्ताचा स्वीकार केला.  

दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५

     या पत्रात पेत्र, अन्याय व दु:ख या विषयी सांगतो. त्या काळात बरेच नोकर व गुलाम ख्रिस्तसभेचे सभासद होते. त्यांच्यावर खूप अन्याय होत असे तेव्हा त्यांना धीर देऊन पेत्र सांगतो की, तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे परत या व मेंढपाळाच्या आज्ञेत रहा. जर तुम्ही ख्रिस्ताला अनुसरत असाल तर तुम्हाला दु:ख सहन करावे लागेल असे ही पेत्र सांगतो. ख्रिस्ताने आपल्या पापांमुळे दु:ख सहन केले. कारण अन्याय होत असता शांत राहून तो सोसणे हि गोष्ट देवाच्या दृष्टीत योग्य ठरते. याचे कारण असे की, न्याय करणारा फक्त देव आहे आणि ख्रिस्त हा आपला कित्ता आहे.

शुभवर्तमान: योहान १०:१-१०

     आजच्या योहानलीखीत शुभवर्तमानात आपण मेंढपाळ व मेंढरे यांच्यामधील जे नाते आहे, त्या विषयी ऐकतो. कारण जेव्हा ख्रिस्ताने आंधळ्यांना बरे केले होते तेव्हा परुशी लोकांनी हा चमत्कार नाकारला होता. म्हणून ह्या दाखल्याद्वारे येशु त्यांना संदेश देतो व स्व:ताला दाराची उपमा देतो. मी मेंढराचे दार आहे. कारण कोणत्याही मेंढरांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी दारातून मेंढवाड्यात जावे लागे व आपण सर्वांचे तारण होण्यासाठी येशु ख्रिस्त हा एकच उपाय आहे. कारण जो ख्रिस्ताद्वारे देवाजवळ जाईल त्यालाच तारण मिळेल. येशुख्रिस्त आपल्या मेंढरांचे पालन-पोषण व संरक्षण करतो. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला सार्वकालिक जीवन विपुलपणे देण्यासाठीच येशु ख्रिस्त आला होता.

बोध कथा

     काही वर्षा पूर्वी एका छोट्याश्या कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला होता. मुलीचे आई-वडील खूप प्रेमळ होते. त्यांनी आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले. जस-जशी ती मुलगी मोठी झाली, तस-तशी तिने चांगले गुण आत्मसात केले. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, स्व:ताचे जीवन देवाच्या कार्यासाठी अर्पण केले. तिने व्रतस्थ जीवन स्वीकारले आणि धर्म-भगिनी बनली. त्यानंतर तिने सर्वावर एकाच प्रकारची माया, दया, सेवा आणि सौम्यता दाखविली. तिने सर्वांवर सारखेच प्रेम केले. जे कोणी आजारी, दु:खी व जीवनात निराश झालेले होते अशांना मदत केली. अनाथ मुला-मुलींना आई-वडिलांचे प्रेम दिले, रोग्यांची सेवा केली, गरिबांना दिलासा दिला व तिने दुसऱ्यांसाठी नेहमी प्रार्थना केली. ती स्व:साठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी जीवन जगली. जसा एक मेंढपाळ त्याच्या मेंढऱ्यांची देखरेख करतो तशाच प्रकारचे कार्य या धर्म-भगिनीने केले. स्व:ताच्या जीवनाविषयी विचार न करता तिने दुसऱ्यांसाठी आपले जीवन दिले. त्या धर्म-भगिनीला आज आपण संत मदर तेरेजा या नावाने ओळखतो.

मनन चिंतन

     येशु ख्रिस्त मेंढराचे दार आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे. जी व्यक्ती ख्रिस्ताच्या आज्ञा प्रमाणे चालते ती प्रभू येशु ख्रिस्ताच्या सानिध्यात राहते व नेहमी आनंदी जीवन जगते. येशु ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे हे आजच्या शुभवर्तमानामध्ये स्पष्ट करून दिले आहे. मजुरीसाठी मेंढरे राखणारा व प्रीतीने मेंढरे राखणारा यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मेंढरावर कुठलेही संकट आले तर मोलकरी मेंढरांचे संरक्षण न करता तो पळून जातो. मेंढरांची दाणादाण झाली तरी त्याला काही वाटत नाही. तो फक्त मजुरीसाठी काम करतो. त्याला कशाची काळजी नसते.
परंतु येशु ख्रिस्ताच्या सानिध्यात तसे होत नाही. येशु ख्रिस्त मेंढरावर प्रीती करतो. त्याचे संरक्षण करतो. याचे छोटेशे उदाहरण आपल्याला संत मदर तेरेजा हिच्या जीवनात आढळते. तिने कधीही कुणाचा तिरस्कार केला नाही. जेव्हा तिने दुसऱ्याची सेवा चालू केली ती तिने शेवटपर्यंत केली. तिने घोर-गरिबांचा कधीही धिक्कार केला नाही. तिने निस्वार्थीप्रमाणे सर्वांची सेवा केली.
     प्रभू येशु आपला मेंढपाळ असून तो आपले फक्त संरक्षण करत नाही तर आपल्यासाठी प्राण सुद्धा देतो. आपल्याला सार्वकालीक जीवन देता यावे यासाठी येशु ख्रिस्ताला आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला. हि पित्याची आज्ञा होती. इतकेच नव्हे, तर येशु ख्रिस्त मेला व तिसऱ्या दिवशी जिवंत झाला.
येशु ख्रिस्त प्रथम यहुदी लोकांना देवपित्याकडे आणण्यास आला. त्याच्या पुनरुत्थानानंतर इतर राष्ट्रातील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला हे आपण आजच्या पहिल्या दोन्ही वाचनात ऐकले आहे. आपण सर्वजण ख्रिस्ताचे मेंढरे आहोत. म्हणून त्याचे प्रभुत्व मानून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आपण चांगले जीवन जगले पाहिजे कारण येशु ख्रिस्त व देव पिता आपले संरक्षण करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमचा मार्गदर्शक हो.

१. आम्ही आपल्या परमगुरुस्वामीद्वारे परमेश्वराचे सत्य समजून घ्यावे व त्यांच्या बरोबर आम्हाला मिळालेल्या देणग्यांचा वापर करावा व एक ख्रिस्तसभा म्हणून काम करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे प्रभू येशु ख्रिस्ता तुझी कृपादृष्टी आमच्या देशाच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यावर असू दे. त्यांना सत्य आणि न्यायाने राज्य कारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गावर चालण्यास मदत कर म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
३. जे दारू व अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत त्यांच्यासाठी धार्मिक नेत्यांनी मार्गदर्शक व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपण सर्वांनी शुद्ध हवा, शुद्ध पाणी तसेच कचरामुक्त शहरे व गावे निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. आता आपण आपल्या सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.  

No comments:

Post a Comment