Reflection for the Homily of 13th Sunday in Ordinary Time (02-07-17) by Br Dominic Brahmne
सामान्य काळातील तेरावा रविवार
दिनांक: ०३-०७-२०१७
पहिले वाचन : २ राजे ४:८-११;१४-१६
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-४;८-११
शुभवर्तमान: मत्तय १०:३७-४२
'जो स्वत:चा जीव गमाविल तो राखला जाईल'
प्रस्तावना :
आज
आपण सामान्यकाळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला ख्रिस्ताला
समर्पित असे जीवन जगण्यास पाचारत आहे.
राजे
ह्या पुस्तकातील पहिल्या वाचनात, देवाने एलिशाद्वारे श्रीमंत स्त्रीला दिलेल्या
पुत्रप्राप्तीच्या वरदानाबद्दल ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल
रोमकरांस ‘बाप्तिस्माद्वारे आपण स्वतःसाठी मेलो असलो तरी ख्रिस्तात आपणांस नवजीवन
प्राप्त झाले आहे’ असा उपदेश करतो. तर मत्तयलिखीत शुभवर्तमानात येशू त्याचा
शिष्य होवू इच्छिणाऱ्यांकडून संपूर्णत: समर्पित जीवन जगण्याची अपेक्षा करतो.
आपणही, ‘तुझियासाठी जीवन माझे प्रभू ख्रिस्ता मी समर्पिले’ ह्या गीताप्रमाणे प्रभूला
समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. येशू सेवेसाठी निस्वार्थी जीवन जगण्यास कृपा
मिळावी म्हणून ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण :
पहिले वाचन : २ राजे ४:८-११;१४-१६.
एलिशा हा एलीया ह्या संदेष्ट्याचा उत्तराधिकारी होता (२ राजे २:१-१८).
त्याने इ.स.पुर्व ८-९ व्या शतकात इस्रायल देशात देवकृपेने भाकिते केली. एलीशाने
एलीजाप्रमाणेच असंख्य चमत्कार केले. म्हणून त्याच्या नावाखाली भरपूर अशा आख्यायिका
प्रचलित झाल्या. इ.स.पुर्व ८४२ ह्या काळात जेहू ह्याला इस्रायल देशाचा राजा म्हणून
अभिषिक्त करून त्याने अखाब ह्याचा राजकारभार संपुष्टात आणला. अखाब ह्यानेच
फिनीशियन ह्या राजकन्येशी विवाह करून, तिच्या
म्हणण्याप्रमाणे विधर्मी देव ‘बाल’ ह्याची
पूजा इस्रायल देशात चालू केली होती. अशाप्रकारे उत्तरे कडील सर्व भाग त्याने
विधर्मी केला होता व याव्हेची यहोशवा उपकारस्तुती, पूजा
बंद केली होती. परंतु एलिशा ह्या संदेष्ट्याने अखाब
ह्या राज्याविरोधात आवाज उठवला आणि यहोशवाची स्तुती आराधना चालू केली. त्याने
‘बाल’ ह्या विधर्मी दैवताची आराधना संपुष्टात आणली आणि यहुदी लोकांना त्यांच्या
देवाकडे परत आणले.
आजचे
पहिले वाचन आपणांस सांगते की, याव्हे
(देव) त्याच्या संदेष्ट्यासाठी नम्र आणि दानशूर असलेल्या व्यक्तींना (पुरस्कृत
करतो) व त्याचे प्रतिफळ देतो.
शुमेन: हे उत्तरेकडील इसड्रेलोन दरीच्या
काठावर वसलेले गाव होते. ह्या गावाचा परिसर हा कार्मेल पर्वतापासून यार्देनपर्यंत
पसरलेला होता.
एका
श्रीमंत बाईने एलिशा हा एक देवाचा माणूस आहे असे त्याच्या स्वभाव व वर्तणूकीतून
जाणले असावे. म्हणून
ती त्याला दररोज तिच्या घरासमोरून जात असता जेवणासाठी आमंत्रीत करीत असे.
त्याच्यातील दैवी गुणांची पारख करून तीने त्याच्यासाठी तिच्या पतीच्या संमतीने
एलीशाला आराम करण्यासाठी एक खोली बांधली. एलीशाही जेव्हा त्या रस्त्याने जाई
तेव्हा तो तेथे आरामासाठी थोडा वेळ थांबत असे. तिच्या ह्या दानशूरपणाबद्धल तीला
काहीतरी बक्षीस द्यावे म्हणून एलीशाने गेहाजी ह्या त्याच्या दासाला बोलावून तीला
कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ह्याची विचारणा केली. तेव्हा तीला पुत्रप्राप्तीची
उणीव भासत असल्याचे एलीशाला कळले. मग त्याने तीला आशिर्वाद देऊन येणाऱ्या वर्षात
पुत्रप्राप्तीचा तीला लाभ होईल असे सांगितले आणि त्याची भविष्यवाणी खरी ठरली. तीला
तिच्या नम्रतेचे आणि दानशूरपनाचे प्रतिफळ मिळाले.
हा
दाखला किंवा चमत्कार एलीशाला अनेक महानतम चमत्कारांपैकी
अगदी लहानसा आहे. परंतु येथे देव त्याच्या संदेष्टाशी प्रेमाने आणि
सढळ हाताने मदत करणाऱ्यांना त्याचे बक्षीस / प्रतिफळ देतो हे ठामपणे सांगण्यात आले
आहे. एलीशाही त्याच्या गुरूप्रमाणे (एलिया) देवाशी एकनिष्ठ राहिला व देवाच्या
आज्ञेत राहीला आणि विधर्मी लोकांचा भरमसाठ प्रसार होत असतानादेखील यहुदी धर्माचा
ऱ्हास होवू दिला नाही.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र
६:३-४;८-११
प्रस्तुत उताऱ्यातील पौलचा मतीतार्थ समजून घेण्यासाठी, पूर्वीच्या
काळी ख्रिस्ती लोकांना स्नानसंस्कार कसा दिला जायचा हे समजणे अगत्याचे आहे.
स्नानसंस्कार स्वीकारणाऱ्या व्यक्तीला एखाद्या तलावात डोके पाण्याखाली जाईपर्यंत डूबवले
जायचे आणि स्नानसंस्कारासाठी असलेल्या प्रार्थना म्हटल्यानंतरच त्याला बाहेर काढले
जाई. पाण्यात बुडवले जाणे हे स्वतःसाठी मरणे व ख्रिस्तात पुरले जाणे ह्याचे प्रतिक
होते. तसेच पाण्यातून वर येणे म्हणजे ख्रिस्तासह पुनरुत्थित होवून ख्रिस्ताच्या
गौरवी नवजीवनात सामील होणे होय. जसे पित्याने ख्रिस्ताला कबरेतून उठवून अनंतकाळ
जीवन प्राप्त करून दिले अगदी त्याचप्रकारे बाप्तिस्माद्वारे आपणही ख्रिस्ताच्या
नवजीवनात भागीदार बनतो. स्नानसंस्काराचा महत्वाचा उददेश/ हेतू म्हणजे स्वतःला (स्वार्थ)
आणि आपल्या पापाला मरणे व ख्रिस्तामध्ये नवजीवनाला सज्ज होणे. हे जीवन सार्वकालिक
जीवन होय. ख्रिस्त आपल्या पापांचा समूळ नाश करण्यासाठी मरण पावला व तो आता त्याचा
पिता व पवित्र आत्म्यासमवेत सर्वकाळ राहतो. तसेच आपणही त्याबरोबर, त्याच्या
समवेत सदैव रहावे व त्याच्या शरीराचे भाग म्हणजेच ख्रिस्तसभेशी सर्वकाळ एकनिष्ठ
असावे.
शुभवर्तमान: मत्तय
१०:३७-४२
मत्तयलिखीत
शुभवर्तमानातील आजच्या उताऱ्यामध्ये येशूख्रिस्त महत्वाच्या दोन मुद्द्यांवर विशेष
भर देत आहे.
१. येशूचा खरा शिष्य होऊ इच्छीणाऱ्याने
स्वत:चे जीवन ख्रिस्ताला संपूर्णत: समर्पित करावे.
२. जो कोणी येशूच्या
अनुयायांबद्दल आदर आणि दानशूरपणा दाखवेल त्यांस देवाकडून त्यांचे प्रतिफळ लाभेल.
‘जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आई-वडिलांवर प्रेम करेल’ ह्या वाक्यात येशू ४थ्या आज्ञेचा भंग करत नाही. (आई-बापांना मान दे) किंवा
आई वडिलांचे आपल्या मुलांबद्दल असलेले स्वाभाविक प्रेम ह्यात आडकाठी आणू इच्छित
नाही. तर त्यांच्याहून अधिक, सर्वश्रेष्ठ जो कोण आहे
त्याच्यावर प्रीती करण्यास त्यांनी कमी पडू नये हे तो येथे स्पष्टपणे सांगू
इच्छितो. ती सर्वश्रेष्ठ प्रीती पिता जो निर्माणकर्ता व पुत्र जो तारणकर्ता आहे
ह्यांच्यावर असावी.
‘जो कोणी स्वत:चा क्रूस उचलत
नाही........’.
कालवरीच्या
टेकडीवर येशूला त्याचा वधस्तंभ वाहवयाचा आहे ही त्याला पूर्ण कल्पना होती. म्हणून
त्याच्याप्रमाणेच अनुयायांनाही ही दु:खे सहन करण्यास तयार असावे ही त्याची अपेक्षा
होती. तसेच स्वत:च्या प्राणाला मुकून ख्रिस्तासाठी मरण पत्करण्याइतके त्यांच्यात
धैर्य असावे. ह्यातून त्यांना सार्वकालीक जीवन प्राप्त होईल ही येशूची धारणा होती.
धोक्याची पूर्वसूचना देऊन तो त्यांना त्यांच्या निर्णयात ठाम करत होता.
शुभवर्तमानाच्या
दुसऱ्या भागात येशू त्याच्या शिष्यांना तीन उपमा देत आहे.
१. संदेष्टा (प्रवक्ता) २. नीतिमान ३. कनिष्ट
संदेष्टा: देवाचा प्रवक्ता,
देवाची वाणी
नीतिमान: देवाच्या आज्ञेत राहून देवाला
समर्पित जीवन जगणारा
कनिष्ट: ज्यांना समाजात निकृष्ठ वागणूक मिळते
आणि देवा त्यांची ताकत आणि सर्वस्व आहे. सर्वांवर दाखवले ह्या उदारत्वामुळे आणि
आदरामुळे देवाकडून त्या दानशुरांना त्यांचे बक्षीस प्राप्त होईल.
बोधकथा १
एक
साधू गावागावातून भिक्षेसाठी फिरत होता. शेवटी तो एका झोपडी जवळ आला आणि
भिक्षेसाठी विनंती केली. परंतु आवाज काहीएक आला नाही. काही वेळाने एक लहान मुलगा
बाहेर आला आणि म्हटले, ‘घरात कोणीही नाही आणि द्यायलाही काही
नाही’. क्षणभर विचारानंतर साधूने त्या लहान मुलाला त्याच्या
अंगणातील माती त्याच्या लहानशा हातात जितकी येईल तितकी भरून स्वत:च्या झोळीत
टाकायला सांगितली आणि त्या मुलाने आनंदाने तसे केले. घडलेला सगळा प्रकार त्या
झोपडीभोवती राहणारे लोक समक्ष बघत होते. त्यातीलच एकाने त्या साधूला अशा ह्या
विचित्रपणाबद्दल विचारले. तेव्हा साधू उत्तरले, ‘मी हया
मुलाला आज त्याच्याकडे जे काही आहे ते त्याला द्यायला शिकवले. मी त्याच्या मनात
छोटे का होईना एक दानशूरपणाचे, उदारत्वाचे रोपटे/बीज रोवले
आहे. त्याला एक ना एक दिवस नवीन बहर येऊन त्याचे मोठे झाड बनेल आणि तो इतरांना
त्याच्याकडे जे काही आहे तो ते दानशूरपणाने नक्कीच देईन.
बोधकथा २
फ्रान्सिस एक श्रीमंत मनुष्याचा मुलगा होता. त्याच्या वडिलांचा कपड्यांचा मोठा कारभार होता. एक दिवस त्याच्या वडिलांच्या दुकानामध्ये बसलेला असतांना एक गरीब मनुष्य भिक मागण्यासाठी आला. त्या भिकाऱ्याने त्याच्याकडे त्याला काही पैसे मिळावे म्हणून म्हटले, 'आपली पवित्र मरिया आणि तिचा पुत्र येशू ह्याच्या नावाने मला काहीतरी द्या'. असे ऐकल्यावर फ्रान्सिस त्या व्यक्तीची विटंबना करून त्याला तेथून चालते केले. तो गरीब भिकारी ही तेथून निघून गेला.
काही वेळाने फ्रान्सिसच्या मनात कुजबुज सुरु झाली. त्या भिकाऱ्याची अशी विटंबना, अवहेलना केल्या बद्दल वाईट वाटले. तत्काळ त्याने गल्ल्यातील काही पैसे हातात घेतले आणि त्या भिकाऱ्याचा शोध घेत ताच्यामागे धावला. त्या गरीब मनुष्याचा शोध लागताच त्याने हातातील पैसे त्याला देऊ केले. आणि त्याला कडकडून मिठी मारली. हाच फ्रान्सिस पुढे संत फ्रान्सिस असीसिकर म्हणून ओळखला गेला. त्याच्या परिवर्तनाचा ह पहिला टप्पा होता.
मनन चिंतन
आपल्या
गावातील, परिसरातील बऱ्याच ख्रिस्ती व्यक्तींना असे वाटते की
धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू ह्यांनी
आमच्या घराला भेट द्यावी. आमच्याशी बोलावे, जेवण करावे; कारण त्यांचा असा विश्वास आहे की, अशा व्यक्तींनी
भेट दिल्यास त्यांना एक विशिष्ट आशिर्वाद लाभतो, ते सुसंपन्न
होतात, समाधानी होतात. त्यांना माहित आहे ही देवाची माणसे
आहेत. त्यांना स्विकारणे म्हणजेच देवाला स्विकारणे होय. अशाच प्रकारचा उपदेश येशू
त्याचा शिष्यांना शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात करत आहे. ‘जो
माझ्या नावाने तुम्हाला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि
त्याचे प्रतिफळ ते भरून पावतील’. आजचे पहिले वाचनही ह्याच
विषयाला अनुसरून आहे. एलीयाचा शिष्य एलिशा ह्याने त्याच्या गुरुप्रमाणे देवाचे
कार्य पुढे चालू ठेवले. तो देवाच्या आज्ञेत एकनिष्ठ राहिला. विधर्माचा प्रसार होत
असताना त्याने लोकांना देवाकडे यावे म्हणून लोकांची मने वळवली. त्याने केलेली
भाकिते परमेश्वर कृपेने प्रत्यक्ष अस्तिवात उतरली. अशाप्रकारे तो देवमाणूस म्हणून
गणला गेला. म्हणून त्याची सेवा करणे म्हणजे देवाची सेवा करणे होय असे त्या श्रीमंत
स्त्रीला वाटले, आणि तिच्या त्या दयाळूपणाचे प्रतिफळ म्हणून
एलीशाने देवाकडून तीला पुत्रप्राप्तीचे वरदान मिळवून दिले.
शुभवर्तमानातील
येशूची भाषा यहुदी लोकांच्या समजुतीची भाषा होती कारण त्यांचीही हीच धारणा होती की,
एखाद्या राज्याच्या संदेश वाहकाला स्विकारणे म्हणजे खुद्द राजाला स्विकारणे.
मित्राचा निरोप घेऊन आलेल्या व्यक्तीला स्विकारणे म्हणजे समक्ष मित्रालाच
स्विकारण्याजोगे होते. असा सन्मान जरी येशूच्या शिष्यांना मिळणार होता तरी येशूने
शुभवर्तमानाच्या पहिल्या भागात येशूचा खरा शिष्य होण्याच्या अटी त्यांच्या पुढ्यात
मांडल्या.
१.ख्रिस्तावर स्वत:च्या माता-पित्यापेक्षा
अधिक प्रीती करणे: स्वत:च्या मातापित्यापेक्षा ख्रिस्तावर अधिक प्रीती करणे म्हणजे
चौथी आज्ञा मोडणे नव्हे (आई बापाला मान दे) तर ख्रिस्तावर सर्वोच्च,
सर्वश्रेष्ठ प्रीती करणे होय. येशूला अग्रस्थानी ठेवणे, त्याला इतरांपेक्षा पहिले प्राधान्य देणे असे होय. तरच तो येशू ख्रिस्ताचा
खरा शिष्य होऊ शकतो. ह्यात स्वत:चा स्वार्थ गमवून ख्रिस्ताला सर्वस्वी जीवन अर्पित
करणे उचित ठरते.
२. स्वत:चा क्रूस घेऊन माझ्यामागे यावे:
ख्रिस्ती धर्माचा उगमच क्रुसामध्ये दडलेला आहे. आर्चबिशप फुल्टन शीन म्हणतात,
“ख्रिस्ताविना क्रूस आणि क्रुसाविना ख्रिस्त समजणे अशक्य आहे’.
म्हणून ख्रिस्ताला स्विकारणे म्हणजे त्याच्या क्रुसाचा स्वीकार करणे
आणि स्वत:चा धिक्कार (स्वार्थत्याग) करणे म्हणजे काय तर स्वत:साठी मरणे व
ख्रिस्तासाठी नवीन जीवन जगणे; जसे आपल्याला दुसऱ्या वाचनात संत पौल सांगत आहे. असं
म्हणतात की, ‘रक्तसाक्षाचे रक्त हेच ख्रिस्ती धर्म रुजण्याचे
बीजांकुर आहे’. म्हणून स्वत:चे ध्येय, अपेक्षा,
इच्छा ह्या प्रभूला सोपवून त्याच्या इच्छेप्रमाणे जगणे, स्वत:चा जीव मुठीत धरून दररोज समोर येत असलेल्या मरणाला निर्धास्तपणे
सामोरे जाणे म्हणजेच ख्रिस्ताचा व स्वत:चा क्रूस वाहणे होय. मरणाला भिऊन पळून जाणे
नव्हे. सॉक्रेटसविषयी(जगविख्यात तत्वज्ञानी) असे सांगितले जाते की, ‘त्याच्या मरणातच तो वाचवला गेला’. कारण मरणाचे
भ्याड त्याच्यात नव्हते. त्याला त्याच्या समोर आलेल्या मरणापासून पलायन करता आले
असते, पण जर त्याने असे केले असते, तर ‘सॉक्रेटस’ हे त्याचे नाव अजरामर झाले नसते.
संत फ्रान्सिस असिसिकर देखील म्हणतात ‘मरणातच आपल्याला
नवजीवन लाभत असते’.
आजची
उपासना आपल्याला स्वत:ला विसरून ख्रिस्त सेवेत रुजू होण्यास आवाहन करत आहे.
बाप्तीस्माद्वारे आम्हा प्रत्येकाचा ख्रिस्तात नवीन जन्म झाला आहे. त्याद्वारेच
आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य बनण्यास पुढे येऊया व आपल्या तरुण तरुणींना ह्या
प्रेमाच्या हाकेला प्रतिसाद देण्यास प्रोस्ताहीत करूया. कारण ‘चांगल्या कार्यासाठी
हुतात्मा होणे म्हणजे अजरामर होणे होय’. म्हणून गंजण्यापेक्षा देवकार्यासाठी झिजून
आपले जीवन सत्कारणी लाभावे अशी प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला दानशूर बनव.
१. अखिल विश्वाची धुरा वाहणारे आपले पोपमहाशय
आणि प्रभूच्या सुवार्ता कार्यात त्यांना साथ देणारे त्याचे विविध पदावरील, धर्माधिकारी,
पदाधिकारी ह्यांना प्रभूचे राज्य ह्या भूतलावर स्थापन करण्यासाठी लागणारी कृपा
परमेश्वराकडून सतत लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ‘देण्यातच आम्हांला प्राप्त
होत असते’ ह्या
उक्तीनुसार प्रापंचिकांनी धर्मप्रांतातील व धर्मग्रामातील धार्मिक कार्यासाठी
सढळहस्ते आर्थिक सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगाचा पोशिंदा, आपला बळीराजा ह्याला
कर्जबाजारीपणा, तुरळक पाऊस, अशा
अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परमेश्वराने त्यांच्या हाकेला प्रतिसाद
द्यावा व त्यांना सरकारकडून योग्य तो न्याय मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. दहावी, बारावीतील
उत्तीर्ण मुलामुलींना चांगले व्यवसायिक तसेच शैक्षणीक मार्गदर्शन जाणकार व्यक्तींकडून
लाभावे; स्वतःच्या
कुटुंबासाठी, देशासाठी त्यांच्यात आपुलकी निर्माण व्हावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. नेक तरुण-तरुणींनी प्रभूच्या हाकेला
प्रतिसाद द्यावा व त्याचे सुवार्ता-कार्य पसरविण्यासाठी पुढे यावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.