सामान्यकाळातील बारावा रविवार
दिनांक: २५-०६-२०१७
पहिले वाचन: यिर्मया २०:१०-१३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५: १२-१५
शुभवर्तमान: मत्तय १०:२६-३३
"येशु म्हणतो भिऊ नका"
प्रस्तावना :
आज
पवित्र ख्रिस्तसभा सामान्यकाळातील बारावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना भय न बाळगण्याविषयी सांगत आहे.
पहिल्या
वाचनात यिर्मया संदेष्टा सांगतो की, परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्या दु:खात
व छळवणुकीत माझी संगत देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल, आदाम व येशू-ख्रिस्त यांच्यामध्ये
विरोधाभास दर्शविण्यासाठी त्याची तुलना करतो. मत्तयकृत शुभवर्तमानात ख्रिस्त आपणास सांगतो की, जे
शरीराचे घात करितात त्यांना भिऊ नका तर आत्मा व शरीर ह्या दोघांचा नरकात नाश
करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.
आपल्या
प्रत्येकाला ख्रिस्ताने त्याची साक्ष देण्यासाटी बोलाविले आहे. ती साक्ष देत
असताना आपल्या मनात कोणतेही भय न बाळगता निर्भयपणे ख्रिस्त इतरांना द्यावा म्हणून
आपण ह्या मिस्साबलीदानात परमेश्वराकडे विशेष धैर्य, कृपा व शक्ती मागुया.
पहिले वाचन: यिर्मया
२०:१०-१३
यिर्मया
संदेष्टाचा शारीरिक व मानसिक छळ होत होता, परंतु तो न डगमगता देवाशी व आपल्या
कामाशी विश्वासू राहिला. म्हणूनच तो म्हणतो, परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे
मजबरोबर आहे. म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत.
दुसरे वाचन :
रोमकरांस पत्र : ५: १२-१५
पौल
रोमकरांस सांगतो की, आदामापासून पाप म्हणजेच मृत्यू जगात आला तर ख्रिस्तापासून
जीवन आले. सर्व मानव जात पापाच्या प्रभावाखाली आहे म्हणून सर्वाना मुक्तीची गरज आहे
असे पौलाचे प्रमेय होते. यहुदी लोक स्वतःला सज्जन समजत होते म्हणूनच त्यांना समजवण्यासाठी संत पौल त्यांच्याच धर्मशास्त्रातील संदर्भाचा उल्लेख करून, ते कसे पापी आहेत, हे त्यांना
दाखवून दिले. केवळ धर्मशास्त्रातील नियमांच्या पालनामुळे माणसाची मुक्ती होत नाही
तर त्याला ख्रिस्ताच्या कृपेची आवश्यकता असते असा युक्तिवाद पौलाने केला आहे.
शुभवर्तमान: मत्तय १०:२६-३३
मत्तयकृत
शुभवर्तमान ख्रिस्त प्रेषितांना मिशनकार्याविषयी सूचना देतो.
आजच्या शुभवर्तमानात येशू शिष्यांना सांगतो, “भिऊ नका!” ह्याचा अर्थ सरळ व सोपा
आहे तो म्हणजे ख्रिस्त आपल्या सोबत आहे. तो आपला पाठीराखा आहे. म्हणून आपण घाबरता
कामा नये. परमेश्वर यिर्मया संदेष्टा बरोबर होता म्हणूनच धैर्याने यिर्मया संदेष्टा
म्हणतो, परमेश्वर पराक्रमी विराप्रमाणे मजबरोबर आहे (यिर्मया २०:११). ख्रिस्ताला
आपल्या शत्रूपासून म्हणजेच शास्त्री व परुशीपासून बचाव व्हावा म्हणून आपण मसिहा आहोत
तसेच आपण देवाकडून आलेलो आहोत ह्या गोष्टी तो उघडपणे बोलत नसे म्हणूनच ख्रिस्त
सांगतो जे मी तुम्हांस अंधारात सांगतो ते उजेडात बोला म्हणजेच जेव्हा वेळ येईल
तेव्हा माझा संदेश जगाला घोषित करा.
दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? ख्रिस्त
चिमण्याविषयी उदाहरण देतो कारण त्यावेळी सर्व पक्ष्यामध्ये चिमण्या सर्वात स्वस्त
विकल्या जात. म्हणून ख्रिस्त सांगतो पुष्कळ चिमण्यापेक्षा तुम्ही कितीतरी पट
मौल्यवान आहात.
शेवटी ख्रिस्त सांगतो की, मी पिता व
तुमच्यामध्ये मध्यस्थ आहे. जे माझ्याशी विश्वासू राहतील त्यांची मी पित्याबरोबर
ओळख करून देईल. परंतु जे कोणी मला, पृथ्वीवर नाकारतील त्यांना मी ही आपल्या
पित्यासमोर नाकारीन.
बोध कथा (सत्य प्रसंग)
महान ग्रीक तर्कशास्त्री सौक्रेटसला तुरुंगात मरणदंडाची शिक्षा
सुनावली होती. ह्या मरणदंडाच्या शिक्षेस त्याला अश्यासाठी सुनावली होती की, त्याने
आपल्याला दिलेला विषाचा प्याला प्यावा. परंतु सौक्रेटस हा आदेश ऐकून घाबरलेला
नव्हता. तर तो आपल्या मरणाची तयारी करीत होता. ठरलेल्या दिवशी त्याच्या समोर
विषाचा प्याला ठेवण्यात आला व त्याने तो प्याला आपल्या हातात घेऊन देवाकडे प्रार्थना
करून आपल्या अगदी जवळचा असलेला शिष्य क्रेटोला सांगितले, ‘प्रिय क्रेटो, धैर्यवान
रहा आणि लक्षात असून दे की, तू माझे शरीर दफन करणार आहेस. शांत रहा व धीर धर !
नंतर त्याने शांतपणे देवाचे स्मरण करत तो प्याला पिऊन घेतला.
मनन चिंतन
वरील
प्रसंगाप्रमाणे आपल्या समोर अनेक महान व्यक्तीचे उदाहरणे आहेत. जसे महात्मा गांधी
ज्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, मिशनरी ग्रहम स्टेन्स ज्याला ओरिसा
राज्यात जिवंत जाळण्यात आले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेचे अध्यक्ष
नरेंद्र दाभोलकर ह्याची हत्या करण्यात आली. तसेच अनेक संत-महत. ह्या सर्व महान
व्यक्ती आपल्या कार्याद्वारे समाजात जागृती व परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न
करीत होते. परंतु हे सर्वकाही समाजकंटकांना खटकत होते म्हणून त्यांचा काटा काढण्यात
आला. म्हणूच आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपणास सांगत आहे की, जे शरीराचा घात
करितात त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नाश करावयास जो समर्थ आहे
त्याला भ्या.
वरील महान व्यक्तीच्या मरणाने आज जरी ते ह्या
जगात नसतील तरीही त्यांचे आचार-विचार, त्यांची शिकवण पुसली गेलेली नाही. तर ते
आजही जिवंत आहेत. ख्रिस्ताला सुद्धा त्याच्या शत्रूकडून छळवणूक व मरण सोसावे लागले.
परंतु तो आजही आपल्या शिकवणुकीद्वारे व वाचनाद्वारे जिवंत आहे.
आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या तरी
भीतीने ग्रासलेले आहे. प्रत्येक मनुष्य हा आज भीतीच्या छायेत जगत आहे. आज आपल्याला
कोणता आजार आहे का ह्याचे भय वाटते? कोणाला आपल्या कामाविषयी चिंता आहे ती म्हणजे
आपले काम सुरक्षित आहे का? काहींना आपल्या संपत्तीविषयी तर काहींना नाव व क्रमांक
जे आपल्या जीवनात अशुभ आहे. आपले जीवन छोट्या न मोठ्या कारणाने भयग्रस्त झाले आहे.
म्हणूनच इंग्रजीमध्ये म्हण आहे ‘Worry kills!’ भीती मनुष्याला कधीच जीवनाचा आनंद घेऊ देत नाही.
ख्रिस्ती व्यक्तीने जीवनात कधीच भिऊ नये.
कारण साथ व संगत आपल्या बरोबर सदैव आहे. म्हणूच आजच्या शुभवर्तमानात येशु ख्रिस्त
आपल्या शिष्यांना साक्ष देण्यास पाठवत असताना सांगतो की, तुम्ही आपल्या मनात कधीच
कसलीही भीती ठेऊ नका. भीती फक्त परमेश्वराची बाळगा. म्हणूच रक्तसाक्षी, ज्यांनी
येशूसाठी आपले रक्त वाहिले त्यांनी आपल्या मनात कधीची कसलीही भीती बाळगली नाही व
सत्यासाठी व ख्रिस्तासाठी स्वत:ची आहुती दिली. आपल्या जीवनाचे मोल फक्त
परमेश्वराला ठाऊक आहे त्यामुळे भिऊन जीवन जगणे व्यर्थ आहे.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो
तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी आम्हांला धैर्य व शक्ती दे.
१. आपले परमगुरु पोप
फ्रान्सीस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक तसेच ख्रिस्ताठायी कार्य करणाऱ्या सर्व
व्यक्तींना प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी योग्य ती कृपाशक्ती व सामर्थ्य मिळावे म्हणून
आपण प्रार्थना करु या.
२. आपले दैनंदिन काम
आपण चागंल्या प्रकारे व विश्वासाने करावे व आपल्या कामाद्वारे आपण ख्रिस्ताची
साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करु या.
३. जेथे ख्रिस्ती
लोकांचा छळ करतात त्यांचा परमेश्वरावरील असलेला विश्वास न ढळता अधिक बळकट व्हावा व
परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर आहे ह्याचा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना
करु या.
४. जे दहावी व
बारावी विदयार्थी ह्या वर्षी परिक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना योग्य तो
मार्ग निवडण्यासाठी परमेश्वराचे सहाय्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करु या.
५. ह्या वर्षी
चांगला पाऊस व्हावा व परमेश्वराने आपल्याला अतिवर्षण व दुष्काळापासून मुक्त करावे
म्हणून आपण प्रार्थना करु या.
No comments:
Post a Comment