येशूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा
दिनांक: १८-०६-२०१७
पहिले वाचन: अनुवाद ८:२-३, १४-१६
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र १०:१६-१७
शुभवर्तमान: योहान ६:५१-५८
'स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे.'
प्रस्तावना :
आज ख्रिस्तसभा प्रभूच्या अतिपवित्र शरीर व
रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशु आजच्या योहानलीखीत शुभवर्तमानात आपणास
सांगतो की, “स्वर्गातून खाली उतरलेली जीवंत भाकर मीच आहे. जर कोणी ती भाकर खाईल तर
तो अनंतकाळासाठी जिवंत राहील.” प्रभू येशु आपल्याला मिस्साबलीदानात आपली आध्यामिक
भूक भागवण्यासाठी स्वताचे शरीर व रक्त देतो. जो कोणी ह्या शरीर व रक्ताचे सेवन
करतो त्यास प्रभू अनंतकाळचे जीवन म्हणजेच आपण प्रभूमध्ये वसती करणे व प्रभूच्या
आपल्यामध्ये वसती करण्यास बोलावणे होय. मिस्साबलीदानात जेव्हा आपण ख्रिस्तशरीर स्विकारतो
तेव्हा आपण त्या भाकरीत येशूची खरी उपस्थिती आहे ह्यावर विश्वास ठेवतो का?
आज प्रभूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सण
साजरा करीत असताना आपण परमेश्वर पित्याकडे आपला विश्वास वाढण्यासाठी विशेष प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण :
पहिले वाचन: अनुवाद
८: २-३, १४-१६
इस्रायली लोकांसाठी रानात घालवलेला हा समय
म्हणजे विश्वासात वाढण्याची संधी होती. यिर्मया संदेष्ठाने पुढे रानातील हा काळ
देवाला निष्ठेने अनुसरण्याचा काळ होता असे म्हटले आहे. तसेच हा काळ शिस्त
लावण्याचा होता यावर भर दिला आहे. इस्रायलवरील देवाच्या प्रीतीची ही आणखी एक बाजू
आहे. लोकांना देशाची देणगी मिळण्याअगोदर, लीन व नम्र करण्यासाठी रानातला अनुभव
खडतर असला तरी तोही एक देणगी असाच होता. अखेरीस आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करावे
हा त्यात उद्देश होता. लोकांना ह्या अनुभवाचे स्मरण कायम राहावे अशी योजना केली
होती. वचनदत्त देशात पोहचल्यावर त्यांना मागील गोष्टींचा विसर पडू नये व सर्व
गोष्टी देवापासून मिळतात हे त्यांनी लक्षात ठेवणे अगत्याचे होते.
दुसरे वाचन: करिंथकरास
पहिले पत्र १०:१६-१७
संत पौल आजच्या वाचनात सांगतो की, येशूने
आपल्या मरणापुर्वीच्या रात्री प्यालाचे
महत्व पुन्हा नव्याने स्पष्ट केले. हा प्याला वधस्तंभावर सांडल्या जाणाऱ्या
त्याच्या रक्ताचे द्योतक आहे. तसेच त्याच्या मरणामुळे होणाऱ्या लाभामध्ये सहभागी
होण्याचे साधन आहे. त्याने भाकर घेऊन मोडली आणि ती अशाच सहभागाचे द्योतक असल्याचे
स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रभूभोजनाच्या समयी ख्रिस्ती लोक एकाच भाकरीतून घेतात
यावरून ते सर्व ख्रिस्ताचे आहेत व ख्रिस्तामध्ये एक शरीर, एक देह आहेत हे स्पष्ट
होते.
शुभवर्तमान: योहान
६:५१-५८
येशूने एक महत्वाचे विधान केले आहे. त्यात
त्याने आपणच जिवंत भाकर असल्याचा दावा केला आहे. येशू म्हणाला की, “जी भाकर मी
देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” तेव्हा यहुदी म्हणाले, “हा आपला
देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो?” यहुदी लोकानी येशूचे बोलणे शब्दशः घेतले म्हणून
त्यांना येशूच्या वाचनातील अलंकारीक अर्थ समजलाच नाही. येशूच्या शब्दामधील
आध्यात्मिक अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोहचण्यासाठी यहुद्यांची मजल गेली नाही. कारण
हे समाजाने केवळ विश्वासाच्या द्वारेच शक्य होते आणि त्यांचा विश्वास नव्हता हे
अगोदरच स्पष्ट झाले आहे. येशूचे मांस व रक्त खाणे व पिणे म्हणजेच त्याने जे काही
केले त्यावर अवलंबून राहणे. व असे केल्यानेच आपण परस्परांमध्ये राहत असतो.
बोधकथा
काही वर्षापूर्वी पाणबुड्यांनी स्पेनमधील ४००
वर्षापूर्वी बुडालेली जहाज शोधली. या जहाजात खूप संपत्ती व सोने मिळाले. व या
संपत्तीत विशेष व आकर्षक म्हणजे एका पुरुषाची लग्नाची अंगठी होती. ही अंगठी आकर्षक
होती कारण त्या अंगठीवर हृदय मुठीत धरलेले एक हात होता व पुढील शब्द लिहिले होते:
‘ माझ्याकडे याशिवाय अजून काही देण्यासारखे नाही.’ ही अंगठीवरील प्रतिमा अतिशय
योग्य रीतीने आजच्या सणाचे वर्णन करते. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी व जगाच्या तारणासाठी स्वत:ला
परिपूर्ण अर्पण केले. म्हणूनच प्रभू म्हणतो, ‘ मी माझा तुमच्यासाठी परिपूर्णपणे
त्याग केला आहे.”
मनन चिंतन
येशूच्या अतिपवित्र रक्ताचा व शरीराचा सण हा
ख्रिस्तसभेला मिळालेले खूप अप्रतिम असे वरदान आहे. भाकररूप ख्रिस्त शरीर हे
ख्रिस्त धर्मातील एक महान रहस्य आहे. ख्रिस्ताचे आम्हाला दिव्य दर्शन घडावे, आमचे
आत्मिक पोषण व्हावे, त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा त्याची सोबत
आम्हांला नित्य लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला.
प्रभू येशु ख्रिस्ताने क्रूसावरील
समर्पणाद्वारे स्वत:चे रक्त सांडून मानव आणि परमेश्वर पिता ह्यामध्ये नवीन कराराची
स्थापना केली. आपण पवित्र मिस्साबलिदानात भाकरीचे म्हणजेच प्रभू येशूच्या शरीराचे सेवन
करतो व त्याद्वारे आपण प्रभूमध्ये सामील होतो. आपण प्रभूबरोबर एकजीव बनतो. जेव्हा आपण
ख्रिस्तशरीर स्विकारतो तेव्हा आपला विश्वास न डळमळता आपण त्या भाकररुपी ख्रिस्ताला
आपल्या हृदयात स्विकारले पाहिजे. व ह्या सेवनानंतर आपल्या जीवनात परिवर्तन घडून
आले पाहिजे.
ह्या जगात असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना
ख्रिस्तशरीर जरी त्यांची इच्छा असली तरी मिळत नाही. पुष्कळ लोक प्रभूचा स्विकार
करण्यासाठी तळमळत आहेत. कारण अशा सर्व लोकांना प्रभूच्या शरीरातून मिळणाऱ्या
आनंदाची, कृपेची व मायेची जाणीव झाली आहे.
आजपर्यंत आपण खूप वेळा पवित्र ख्रिस्तशरीराचे
सेवन केले असेल. जेव्हा आपण सर्वप्रथम ख्रिस्तशरीराचे सेवेन केले
तोच भक्तीभाव आजपर्यंत आहे का ? आपल्याला ख्रिस्तशरीराबद्दल योग्य असा आदर वाटतो
का ? व आपण त्यामध्ये येशू स्वत: हजर आहे हे जाणून घेतो का ?
जर ह्या प्रश्नांचे उत्तर नाही असेल तर आपले
काहीतरी चुकत आहे. आपण योग्य मार्गावर नाहीत व देवापासून दूर जात आहोत. जेव्हा आपण
चर्चमध्ये रांगेत ख्रिस्तशरीर स्विकारण्यास जातो तेव्हा आपण मनात निर्धार केला
पाहिजे की मी एखादी भाकर नाही तर ख्रिस्तशरीर स्विकारणार आहे. आपण स्विकारतो तो
त्याच येशूला जो बेथलेहेममध्ये जन्माला आला होता. तसेच आपण त्याच ख्रिस्ताला
स्विकारतो जो क्रुसावर आपल्यासाठी मरण पावला. आणि आपण त्याच प्रभूला स्विकारतो जो
मरणातून उठला.
आज ख्रिस्तशरीर ह्या सांक्रामेतामुळे अनेक
लोक ख्रिस्तसभेच्या जवळ येत आहेत. जर आपण तर्कशक्तीच्या बळावर ख्रिस्तशरीरातील
येशूच्या अस्तित्वाचे सत्य पाहण्यास गेलो तर आपल्याला उत्तर मिळणार नाही परंतु
विश्वासानेच ह्या सर्व गोष्टी साध्य होतात. व ह्याच विश्वासाने आपण प्रभुचे सेवन
करू शकतो. आपल्याला प्रभुने दिलेल्या ह्या
मिसाबलिदानाच्या व त्याच्या शरीराच्या अप्रतिम भेटीबद्दल आपण त्याचे मनपूर्वक आभार
मानूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या शरीर व रक्ताने आम्हांस सामर्थ्यवान
कर.
१. ख्रिस्तसभेची
धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी भक्तिमय
वातावरणात मिस्साबलिदान करून सर्वांपर्यंत प्रभू येशूची शुभवार्ता पसरावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
२. प्रभूच्या मळ्यात
काम करण्यासाठी अनेक युवक व युवतींनी पुढे यावे व त्यांना योग्य असा पाठींबा व
मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. आज हा पवित्र सण
साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररुपी मंदिरात प्रभूला प्रथम स्थान द्यावे व आपले
जीवन परिवर्तीत करावे म्हणून प्रार्थना करूया.
४. प्रभू येशू
आपल्या स्वत:च्या प्राणाचे क्रुसावर अर्पण करून ख्रिस्तसभेची स्थापना केली आहे.
ह्या ख्रिस्तसभेशी आपण एकनिष्ठ राहून तिच्या अधिका-धिक जवळ यावे यासाठी प्रार्थना
करूया.
५. आपण शांत राहून
आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment