Reflection for the feast of Most Holy Trinity (11/06/2017) By: Br. Jameson Munis
पवित्र त्रैक्याचा सण
दिनांक: ११-०६-२०१७
पहिले वाचन: निर्गम ३४:४-६, ८-९
दुसरे वाचन : २ करिंथकरांस पत्र १३:११-१३
शुभवर्तमान : योहान ३:१६-१८
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. ख्रिस्ती श्रध्देचा गाभा असलेले पवित्र त्रैक्य आपल्या सर्वांच्या
जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या पहिल्या वाचनात म्हटले आहे, “परमेश्वर दयाळू व कृपाळू
देव, मंदक्रोध,
दयेचा व सत्याचा सागर आहे” असा महान परमेश्वर जगावर
एवढी प्रिती करतो की, त्याने आपल्या सर्वांच्या तारणासाठी त्याच्या
पुत्राला भूतलावर पाठविले.
संत पौल करिंथकरास लिहिलेल्या दुस-या पत्रात म्हणतो की, “प्रभू येशू ख्रिस्ताची
कृपा, देवपित्याची
प्रिती आणि पवित्र आत्म्याची सह्भागिता तुम्हा सर्वांसह असो.” तसेच आजच्या शुभवर्तमानात
आपण ऐकतो की, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आणि जो कोणी
त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त
व्हावे. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात सह्भागी होत असताना, पवित्र
त्रैक्याने आपली श्रद्धा बळकट करावी व त्याच श्रद्धेद्वारे आपल्या ख्रिस्ती जीवनात
एकता, शांती, प्रेम प्रस्थापित व्हावे
म्हणून आपण पवित्र त्रैक्याकडे विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम ३४:४-६, ८-९
आजच्या पहिल्या वाचनात आपण परमेश्वराच्या दया तसेच कृपेविषयी ऐकतो.
परमेश्वर हा दयेचा व सत्याचा सागर आहे.
देवाने मोशेला दुस-यांदा सिनाय पर्वतावर बोलावले जेणेकरून पुन्हा
एकदा पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडांवर सर्व आज्ञा लिहाव्या कारण मोशे जेव्हा
सिनाय पर्वतावरून खाली आला होता तेव्हा लोकांच्या पापी कृत्यामुळे त्यांनी
पहिल्या आज्ञा तोडल्या होत्या. देव स्वत: मोशेला प्रकट झाला व देवाच्या स्वरूपाचे
हे अनन्य प्रकटीकरण पाहून मोशेने देवाला विनवून सांगितले की, प्रभूने
लोकांच्या बरोबर रहावे, त्यांच्या पापांची क्षमा करावी आणि
आपले वतन म्हणून त्यांचा स्विकार करावा. मोशेची विनंती देवाने मान्य केली व
त्यांच्याबरोबर कराराचे नाते पुन्हा स्थापन केले. या कराराच्या अटी कराराच्या
पुस्तकातील अखेरच्या दोन भागात नमूद केलेल्या अटीप्रमाणेच आहेत. त्यांस आपण दहा
आज्ञा असे म्हणतो.
दुसरे वाचन : २ करिंथकरांस पत्र
१३:११-१३
पौलाने आपल्या वाचकांना उद्देशून अखेर उत्तेजनपर शब्द लिहिले आहेत.
त्यांचे कल्याण असो, त्यांना पुर्णता लाभो, समाधान
मिळो, ते एकचित्त होवोत अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे.
येथील संदर्भाला अनुसरून याचा अर्थ असा होतो: पौलाच्या विरोधकांनी आणलेली वेगळी
सुवार्ता त्यांनी नाकारावी (११:४) त्याचा प्रेषित असण्याचा पौलाचा यथार्थ व रास्त
हक्क मान्य करावा (१०:१३-१८, ११:२१-२३), त्यांच्यामध्ये कोणीही कसलेच अनैतिक आचरण, स्वैराचार
करीत नाही याची खात्री करून घ्यावी (१२:१९-२१) आणि परस्परांशी एक दिलाने, एकमेळाने राहावे.
शुभवर्तमान : योहान ३: १६-१८
योहान लिखित शुभवर्तमानात आपण येशू ख्रिस्त या जगात का आला, या
प्रश्नाचे उत्तर ऐकावयास येते. पहिले कारण असे की, देव जगातील सर्व लोकांवर प्रीती
करतो. देवाचे वाचन सांगते (३:१६), “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी
की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे." येशू ख्रिस्त ह्या भूतलावर आला आणि
सर्व लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्त
केले. मनुष्याच्या पापांसाठी तो क्रुसावर मेला आणि आपले तारण केले.
जुन्याकरारात देव हा फक्त इस्रायलवरच प्रीति करत होता असे त्यांना वाटायचे, पण
नव्याकरारात इतरत्र आढळणारी विश्वव्यापी प्रीति या संकल्पनेशी जुळणारीच आहे. येशू
जगाचा न्याय निवाडा करून दोषी ठरवण्यास नव्हे तर सुटका करण्यास का आला तेही येथे
स्पष्ट होते. खर तर जग हे अगोदरच दोषपात्र ठरलेल्या अवस्थेत आहे आणि देवाच्या
पुत्रावर विश्वास न ठेवल्याने ही स्थिती अधिकच ठळक झाली. देवाचा पुत्र ह्या
नात्याने येशू हीच अंतिम कसोटी आहे. ही कसोटी लावल्याने जगाचे विश्वासणारे आणि
विश्वास न ठेवणारे असे सरळ दोन भाग पडतात.
“देवाने जगावर एवढी प्रीती
केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” परुश्यांपैकी निकदेम नावाच्या एका मनुष्याला येशूने स्वतः जगामध्ये
का आला ह्याचे कारण स्पष्ट करून दिले आहे. मनुष्यरूप धारण करून येशू ख्रिस्त
देवाचे मानवांवर असलेले सार्वकालिक प्रेम दर्शविण्यास ह्या धरतीवर आला होता. “जो कोणी त्याच्यावर
विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”
येशूख्रिस्तावर परिपूर्ण विश्वास हाच सार्वकालिक जीवन प्राप्त
करण्याचा एकमेव मार्ग आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आपण कधीच मरणार नाही, तर जरी
आपण देहाने मरण पावलो तरीपण आत्म्याने सर्वकाळ जगणार. येशू दुस-यांचा नाश करण्यास
आला नाही तर जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांचा नाश स्वतःमुळेच
होईल.
बोधकथा
एके दिवशी संत अगस्तीन पवित्र त्रैक्यावर मनन-चिंतन करत होता आणि
एका देवात तीन व्यक्ती कशा असू शकतात ह्याचे त्याला आश्चर्य वाटत होते. पवित्र
त्रैक्याविषयी विचार करत समुद्र किना-यावर फेरफटका मारत असता त्याने पहिले की,
एक मुलगा वाळूत खड्डा करून समुद्रातील पाणी त्या छोटयाश्या खड्डयात
ओतत होता. तेव्हा संत अगस्तीन त्या मुलाच्या शेजारी गेला व त्या मुलास तो काय करत
आहे हे विचारू लागला. त्या मुलाने संत अगुस्तीनला उत्तर दिले, ‘मी समुद्राचे पाणी ह्या खड्डयात ओतत आहे व संपूर्ण समुद्र मी ह्या खड्डयात
रिकामा करणार आहे.’ संत अगस्तीन हसला व त्या मुलास म्हणाला, ‘हे शक्य
नाही.’ परंतु त्या मुलाने उत्तर दिले, तुम्हांला
पवित्र त्रैक्याचे रहस्य उलगडण्याअगोदर मी हे नक्कीच करू शकतो. इतक्यातच तो मुलगा
अदृश्य झाला. संत अगस्तीनला लगेच समजले की तो मुलगा देवाने पाठवलेला दूत होता व
कितीही प्रयत्न केले तरी आपण पवित्र त्रैक्याचे रहस्य समजू शकणार नाही.
मनन चिंतनः
आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहोत. ख्रिस्ती धर्मात जी
अनेक श्रध्देची रहस्य आहेत. त्यापैकी पवित्र त्रैक्य हे एक असे रहस्य आहे की ते
आमच्या बुध्दिसार्मथ्याच्या पलिकडे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे रहस्य आम्हाला
प्रकट केले आहे. परमेश्वर एक आहे परंतू त्यामध्ये पिता, पुत्र व
पवित्र आत्मा अशा तीन व्यक्तीचं अस्तित्व सामावून आहे ही ख्रिस्ताची शिकवण आहे.
ख्रिस्त, पवित्र त्रैक्यातील पहिली व्यक्ती “पिता” या विषयी बोलला आहे. तो म्हणाला, “जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मी देखील तुमच्यावर प्रेम
करतो.” देवळात बाजार भरविणा-या
लोकांना देवळातून हाकलून लावताना ख्रिस्त म्हणतो, “माझ्या पित्याचे घर तुम्ही लूटारूची गुहा बनवली आहे.”
ख्रिस्त पवित्र त्रैक्यातील दूसरी व्यक्ती “पुत्र” याविषयी म्हणाला, “कि तो पित्याचा एकमेव
पुत्र आहे आणि पित्याशी समतूल्य आहे.” ख्रिस्त म्हणतो, “परमेश्वराने जगावर ऐवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की,
जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेविल त्याला सार्वकालिक जीवन लाभावे.” तसेच “पिता माझ्यामध्ये आणि मी
पित्यामध्ये आहे”.
पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती “पवित्र आत्मा” याविषयी येशू बोलला आहे. ख्रिस्ताने शिष्यांवर पवित्र त्रैक्यातील
तिसरी व्यक्ती “पवित्र आत्मा” पाठविण्याचे अभिवचन दिले. शेवटच्या भोजणाच्या वेळी तो प्रेषितांना
म्हणाला, ‘मी
पित्याला विनंती करीन आणि तो कैवारी पवित्र आत्मा तुम्हावर पाठविल पवित्र आत्मा
सत्याचा आत्मा आहे तो पित्यापासून निघतो.’
ख्रिस्त आपल्या शिष्यांना शुभर्वाता प्रसारासाठी पाठवितो तेव्हा
म्हणतो, “सर्व जगात जा आणि
पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्माच्या नावे बाप्तिस्मा द्या.” पिता, पुत्र व
पवित्र आत्मा ह्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते समतूल्य आहेत. मात्र परमेश्वर एकच
आहे. परमेश्वर एक परंतू तीन जण हे रहस्य समजायला कठीण आहे. तरी तूलनेन या रहस्याचा
थोडा फार बोध आपल्याला होऊ शकतो.
पवित्र त्रैक्याच दर्शन आम्हांला ख्रिस्ताच्या बाप्तीस्म्यामध्ये घडते. जेव्हा
जॉन बाप्तीस्टा येशूला बाप्तिस्मा देतो तेव्हा पवित्र आत्मा कबुतराच्या रुपाने
येशूवर उतरतो आणि स्वर्गातून वाणी ऐकू येते: “तू माझा पुत्र आहेस तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” येशूच्या डोंगरावरील
रुपांतराच्या वेळी पित्याची वाणी ऐकू येते: “हा माझा प्रिय पुत्र आहे त्याचे ऐका.”
उपासना विधीमध्ये मिस्साची सुरवात आपण पवित्र त्रेक्याच्या नावाने
करतो. प्रत्येक प्रार्थना आपण पवित्र त्रेक्याच्या नावाने सुरवात करतो, त्याच
प्रमाणे आपण शेवटचा आशीर्वाद पवित्र त्रेक्याच्या नावाने देतो. आपण जेव्हा
परमेश्वराची प्रार्थना करतो तेव्हा ती त्रेक्याकडे प्रार्थना करत असतो.
पवित्र त्रेक्य हे ऐक्याच व समतेच प्रतिक आहे. तीन व्यक्तींचं एका
देवतत्वामध्ये ऐक्य, सुसंवादित्व, समतोलता, प्रीतिबंधुत्व अतुलनीय
आहे. आज आपल्याला कौटुंबिक ऐक्य, सामजिक समता व सुसंवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेची
अतिशय गरज आहे. अनेक धर्म, पंथ, जाती-जमाती,
संस्कृती, पक्ष, भाषा
आणि विचार ह्यांनी नटलेला आपला भारत देश प्रीतिच्या बंधनान, एकतेन जोडला जाणे आवश्यक आहे.
विभिन्नतेत एकता हे पवित्रत्रैक्याच मुलतत्व आहे. परमेश्वराने आम्हांला त्याच्या प्रतीरुपात बनवले
आहे.
संत अगुस्तीन सांगतात, “पवित्र आत्मा पित्यापासून आणि पुत्राला
दिलेल्या सार्वकालिक देणगीमुळे असून पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यापासून एकच देव
आहे.” स्नानसंस्काराच्या कृपेने पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपण
ह्या जगात अनिश्चित श्रद्धेत असताना व मृत्यूनंतर सर्वकाळच्या प्रकाशात असताना
आपणास त्रैक्याच्या जीवनात सहभागी होण्यास आमंत्रण देण्यात येते.
मानवा-मानवातील ऐक्य, समता, एकात्मता, बंधुत्व, सुसंवाद ह्या भावना विकसित करण्यास पवित्र त्रैक्य आम्हांला समर्थ करो
हीच ह्या पवित्र दिवशी प्रार्थना.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना
ऐक.
१. आपले पोप महाशय, कार्डीनल्स,
बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-धर्मभगिनी
ह्यांनी आपल्या शुभसंदेशाद्वारे देवाचे प्रेम इतरांपर्यंत पोहोचवावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२. जे लोक निराशेने
वैफल्यग्रस्त झालेले आहेत अशा सर्वांना ख्रिस्ताच्या आशेचा संदेश लाभावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. आजच्या उपासनेमध्ये
सहभागी झालेल्या सर्व भाविकांना परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे आणि सर्व
वाईटापासून व मोहापासून दूर राहण्यास देवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य
करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे कोणी देवापासून दूर
गेले आहेत अशांनी परत एकदा परतीच्या प्रवासावर येऊन देवाला बाप, येशूला-भाऊ
आणि पवित्र आत्म्याला सहकारी मानावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक व
सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment