Friday, 28 July 2017

 Reflection for the Homily of 17th Sunday in Ordinary Time (30-07-17) By Brendon Noon


सामान्य काळातील सतरावा रविवार


दिनांक: ३०-०७-२०१७
पहिले वाचन: १ राजे ३:५,७-१२
दुसरे वाचन: रोमकरास ८:२८-३०
शुभवर्तमान: मत्तय:१३:४४-५२










 प्रस्तावना:


आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना देवाचे राज्य कशाप्रकारे आहे व आपण कशाप्रकारे देवाच्या संकल्पनेला योगदान दिले पाहिजे यावर मनन चिंतन करण्यास सांत आहे. पहिल्या वाचनात शलमोन आपणाला विवेक बुद्धी मिळावी अशी प्रार्थना देवाकडे करत आहे व देव त्याची प्रार्थना एकतो. दुसऱ्या वाचनात देवाच्या संकल्पने विषयी ऐकायला मिळते. देवाने आपल्या योजनेनुसार प्रत्येक विश्वासू व नवा जन्म घेतलेल्याला बोलाविले आहे व देव त्या योजना पुर्ण करीत आहे किंवा असतो. व शुभवर्तमनामध्ये आपल्याला स्वर्गाच्या राज्याविषयी तीन द्रुष्टात ऐकावयास मिळत आहेत. तीन्ही द्रुष्टात स्वर्गाच्याराज्याविषयी आहेत. स्वर्गाचे राज्य आपल्यासाठी कशाप्रकारे आहे व आपण कुठल्या भावनेने पाहतो त्यासाठी ह्या मिस्साबलीदानात भक्तिभावाने सहभाग घेऊया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: १ राजे ३:५,७-१२

स्वर्गीय नंदनवन प्राप्त करण्यासाठी, २०० वर्ष चैनीचे व ऐष आरामाच्या जीवनाची नव्हे तर दोन दिवस देवासाठी व इतरांसाठी जगण्याची गरज आहे. शलमोनाचा, दावीद आपल्या पित्याच्या जागी राज्याभिषेक करण्यात आला.आपल्या पित्याच्या खुर्चीवर बसून राज्यकारभार हाताळण्यास आपण लायक नाही असे शलमोनाला वाटले.म्हणून त्याने देवाकडे मध्यस्थीची प्रार्थना केली. देवाने त्याला स्वप्नात दर्शन देऊन पाहिजे तो वर मागण्यास सांगितले.शलमोन राजाने स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या प्रजेचा योग्य न्याय करता यावा म्हणून विवेकबुद्धी मागितली    

दुसरे वाचन: रोमकरास ८:२८-३०

     देवाने आपल्या योजनेनुसार प्रत्येक विश्वासणाऱ्याला, नवा जन्म पावलेल्या व्यक्तीला बोलाविले आहे. ती योजना देव पुर्ण करीत असतो. देवाच्या लेकरांना कठीण परिस्थितीतून जावे लागते. त्यांना निरनिराळे अनुभव येतात. या सर्व गोष्टीवर प्रेमळ देवाचे नियंत्रण आहे व तो कार्य करीत असतो. कित्येकदा आपणास वाटत नाही कि हे खरे आहे, तरी त्यावर विश्वास ठेऊन आपल्याला हे ठाऊक आहे असे कबुल करायला हवे. आपले तारण होण्यापूर्वी देवाला आपल्याविषयी ठाऊक आहे. आपला प्रभू जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ.

शुभवर्तमानमत्तय:१३:४४-५२

     स्वर्गाच्या राज्याचे तीन दाखले आहेत. स्वर्गाच्या राज्यात ज्यांनी ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकार केला आहे त्याचा व जे स्वार्थासाठी स्वत:ला ख्रिस्ती म्हणतात त्यांचा अशा दोन्ही गटांचा समावेश झालेला दिसून येतो.
     देव जगातील लोकांवर प्रीती करतो. ख्रिस्त स्वर्गाचे वैभव सोडून तारणाची योजना पूर्ण करण्यासाठी या जगात आला व त्याने तारणाची योजना पूर्ण केली. यासाठी त्याला आपल्या प्राणाची किंमत भरावी लागली. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते मोठी किंमत भरून विकत घेतलेले आहेत. तसेच जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांना मौल्यवान ठेवीसारखे, तसेच मौल्यवान मोत्याप्रमाणे किंमतीचे सार्वकालिक जीवन मिळते. स्वर्गाच्या राज्यातील लोकांचे चित्र जाळ्यात सापडलेल्या निरनिराळ्या मासळीप्रमाणे आहे. कोळी जाळी टाकतो व जे सर्व लहान-मोठ्या प्रकारचे प्राणी किंवा मासे येतात ते समुद्र किनाऱ्यावर वेगळे करतो व जे हवे ते घेतो व दुसरे फेकून टाकतो. ख्रिस्त या जगावर आपले राज्य स्थापण्यास येईल तेव्हा असेच होईल.

मनन चिंतन:

     आज सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत. देऊळमाता आपणा सर्वांना प्रार्थना करण्यासाठी प्रोस्ताहन करत आहे. प्रार्थना अशासाठी करावी जेणेकरून आपल्याला विवेकबुद्धी व समजूतदारपणा मिळेल व आपल्या जीवनात देवाचे राज्य येण्यासाठी त्याचे महत्व आपणा सर्वांना समजेल. कारण स्वर्गाचे राज्य हे मौल्यवान आहे आणि ते जर आपण गमावून बसलो तर आपण सर्वकाही गमावू व जर आपल्याला भेटले तर सर्वकाही आपल्याला मिळेल. म्हणून हे स्वर्गाचे राज्य आपणा सर्वांना मिळावे यासाठी आपण सर्वांनी आपल्यापरीने प्रयत्न केला पाहिजे. हे स्वर्गाचे राज्य आपणा सर्वासाठी आहे. आपण या धरतीवर येण्यापूर्वी देवाने हे स्वर्गाचे राज्य आपणासाठी बनवून ठेवले आहे म्हणून या स्वर्गाच्या राज्याचे भागीदार आपण व्हायलाच हवे. हे स्वर्गाचे राज्य आपल्याला मिळण्यासाठी आपण शलमोनासारखी प्रार्थना करायला हवी व चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
     आजचे पहिले वाचन खूप छान आहे. हे वाचन ऐकल्यानंतर मला असे वाटते की समजा एका गरीब व्यक्तीला रक्कम न लिहिलेला धनादेश दिला व सांगितले की जी रक्कम लिहायची आहे ती तू लिहून घे व ती तुला दिली जाईल. आपणा सर्वांना ठाऊक आहे की ती गरीब व्यक्ती किती रक्कम लिहिणार.
            माझ्या प्रिय बंधू-भगिनिंनो जर शलोमोनच्या जागेवर आपण असतो तर आपण काय मागितले असते? उत्तम दर्जाची कार, चांगला बंगला, चांगले कपडे, सोने-दागिने, आपल्या खात्यात मोठी रक्कम किंवा चांगल्या दर्जाचे काम जाच्याद्वारे आपल्याला एक लाख असे पगार मिळेल. आपण आपल्या परिस्थितीनुसार आपण कशाप्रकारे श्रीमंत होऊ हे बघण्याचा प्रयत्न केला असता किंवा करु. परंतु शलोमोनाने जगातील मालमत्ता न मागता देवाकडे विवेकबुद्धी व समजूतदारपणा मागितला. जेणेकरून जेव्हा शलोमोन न्याय करील तेव्हा चांगले व वाईट काय हे त्याला समजेल. लोकांना दुखावण्यापेक्षा सर्वांना आनंदी ठेवील. लोकांची सेवा करता येईल. सत्य व असत्य यातील फरक समजेल. पाप व कर्तव्य काय हे समजेल व स्वर्ग राज्यात सर्वांचा प्रवेश चांगला व्हावा यासाठी सर्वांना मार्गदर्शन करता येईल.
     आपण सुद्धा शलोमोनापासून ह्या गोष्ठी शिकायला हव्या. आपण सुद्धा आपल्या जीवनात विवेकबुद्धी व समजूतदारपणा मागायला हवा. जेणेकरून आपणही दुसऱ्यांना मदत करु शकतो व त्यांना आनंदी ठेवू शकतो. कारण जर आपण शलोमोनसारखे वागलो तर आपणा सर्वांना परमेश्वराचा आशिर्वाद मिळेल व आपण जिथे कुठे काम करत आहोत तिथे आपण प्रामाणिक राहूया. परमेश्वर जेव्हा आपल्याला सांगत असतो की माग जे तुला हव आहे आणि परमेश्वर आपणाला देईल. परंतु हे मागत असताना आपण व्यवस्थित विचार करून मागायला हव. याचा फायदा फक्त मला न होता सर्वांना व्हायला हवा याची काळजी घेणे आवश्यक आहे.
     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणा सर्वांना आठवण करून देतो की, जो परमेश्वरावर तनाने व मनाने प्रेम करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व देव तिला किंवा त्याला कधीही दूर टाकणार नाही. संत पौल म्हणत आहे, 'देवाच्या लेकरांना कठीण परिस्थितीतून जावे लागेल. त्यांना कठीण किंवा वेगवेगळे अनुभवही येतील. परंतु या सर्वावर देवाचे नियंत्रण आहे व तोच आपणा सर्वाची काळजी घेईल.' 
     कधीकधी असे प्रसंग येतात की काय कराव हे सुचत नाही. आपल्या योजनेपलीकडे होत असते. उदा: आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही. आपण खूप दुखी झालेलो असतो. आपण आजारी असतो. घरात शांती नसते किंवा कुटुंबामध्ये भांडण-तंटे असतात. आपणा सर्वांना वाटत असते की आता यामधून आपणाला मार्ग सापडणार नाही परंतु काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर आपल्याला मार्ग मिळतो. आपली संकटे दूर गेलेली असतात. असे भरपूर संत होऊन गेले की त्यांच्या जीवनात दु:ख किंवा संकटे आली, वाईट अनुभव सुद्धा आले. परंतु त्यांनी देवावरचे प्रेम कमी केले नाही. सतत देवाच्या सानिध्यात राहिले व त्यांच्या कटू अनुभव चांगला झाला व आज ते संत पदावर पोहचलेले आहोत. उदा: असिसीचे संत फ्रान्सिस आणि संत मदर तेरेजा.
     आपण कुठल्याही परिस्थितीला घाबरून जायचे नाही उलट देवावर विश्वास ठेऊन त्याच्या सानिध्यात राहायला हवं. कारण आतापर्यंत आपली काळजी घेतलेली आहे व घेणार आहे आणि त्यामुळेच आपण इथे सर्व हजर आहोत.
     आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताने आपल्यासमोर तीन दाखले ठेवलेले आहेत. परमेश्वराने हे दाखले अशासाठी दिले आहेत कारण आपणा सर्वांना विवेकबुद्धी व समजुतदारपणा आहे. पहिले दोन्ही दाखले आपणाला निवडण्यासाठी खुले ठेवलेले आहेत. त्यासाठी जगाचे ऐहिक सुख आपल्याला सोडावे लागणार आहे. तेव्हाच आपणा सर्वांना देवाची कृपा मिळणार व आपण स्वर्गाच्या राज्याचे भागीदार बनू. येशू, त्याच्या सर्व शिष्यांना विचारत आहे की तुम्हाला हे दाखले समजले आहेत का? कारण हे स्वर्गाच्या राज्याचे दाखले शिष्यांना फक्त विवेकबुद्धी व समजुतरपणाचे समजणार आहे. म्हणून आपणही शलोमोनासारखे परमेश्वराकडे विवेकबुद्धी व समजुतदारपणाचे हे दान मागू की जेणेकरून आपणालाही स्वर्गाच्या राज्याची किंमत किंवा महत्व कळेल व आपणही राज्याचे भागीदार बनू.  
         
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना एक

1.     ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू, व व्रतस्थ बंधू भगिंनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात काम करत आहेत त्यांना परमेश्वराने चागले आरोग्य द्यावे व त्याच्याद्वारे देवाचे राज्य या जगात यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.     आपल्या धर्मग्रामात मूलगामी समुहाद्वारे समाजबांधणीस वेग मिळावा, प्रत्येक गावात असलेले हेवेदावे दूर होऊन आपण सर्वानी एक कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
 3. आपल्या धर्मग्रामातील आजारी, दु:खी पिडीत लोकांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्याचे आजार व दु:खे दूर व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
4. आपल्या धर्मग्रामातील तरूण व तरुणींना परमेश्वराच्या मळ्यात काम करण्यास पाचारण मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
5.   आता आपल्या सामुहिक व वैयक्तिक गरंजासाठी प्रार्थना करूया.



Thursday, 20 July 2017

Reflection for the Homily of 16th Sunday in Ordinary Time  (23-07-17) by Br. Glen Fernandes. 






सामान्यकाळातील सोळावा रविवार

दिनांक: २३-०७-२०१७
पहिले वाचन: ज्ञानग्रंथ १२:१३, १६-१९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७
शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३





“मग नितिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील”





प्रस्तावना:
     आज आपण सामान्यकाळातील सोळावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास प्रभू येशू प्रमाणे सहनशीलता अंगीकरण्यास व नितीमत्वासाठी झटण्यास निमंत्रण देत आहे. ज्ञानग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण एकतो की परमेश्वर हा सामर्थ्यशील व सर्वाधिकारी आहे. सर्व जगाचा तो न्यायाधीश आहे. पण तरीही तो दयाळू, कनवाळू व मंद्क्रोध आहे. व तो मोठ्या सहनशक्तीने आपणावर राज्य करतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस सांगत आहे की आपले प्रश्न सोडवायला, प्रार्थना करायला आपण समर्थ नाही. परंतू पवित्र आत्मा आपल्याला सहकार्य करतो व आपल्याला आपल्या अशक्तपणात हातभार लावतो. आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू निंदन, खमिर व मोहरीच्या दाखल्याद्वारे देवाच्या राज्याविषयी शिकवण प्रकट करतो. देवाचे राज्य ह्या जगात यावे, प्रभू येशूख्रिस्ताची शिकवण आपण आचरणात आणावी, व आपणा प्रत्येकाला देवराज्याचे वारसदार बनता यावे म्हणून या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: ज्ञानग्रंथ १२:१३, १६-१९
     परमेश्वराच्या न्यायाने उगमस्थान त्याच्या अधिकारात आहे. परमेश्वर हा सर्वाधिकारी असला तरी तो दयाळू व ममताळू आहे. परमेश्वराचा चांगुलपणा हा अमर्याद आहे. तो मोठ्या सहनशक्तीने ह्या जगावर राज्य करतो. मनुष्य खरा विश्वास ठेवू लागतो तेव्हा परमेश्वरामुळे त्याचे जीवन अधिक आनंदी, अधिक समृध्द होऊ लागते. जरी परमेश्वर न्यायी आहे व लोकांच्या पापांची शिक्षा करण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे तरीसुद्धा तो मंदक्रोध आहे. त्यामुळे त्याच्या लोकांना परमेश्वर पापांबद्दल पश्चाताप करण्यास संधी देतो. व तारणाचा मार्ग त्यांच्यासाठी खुला करून ठेवतो.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७
            आपल्या ख्रिस्ती जीवनात, आध्यात्मिक जडणघडन होत असतांना श्रद्धेत बळकट होण्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य पवित्र आत्मा आपणास पुरवितो. श्रद्धेमध्ये अधिकाधिक स्थिर होण्याकरिता, टिकून राहण्याकरिता माणसाने अंतकरणापासून प्रार्थनेला जीवनात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. आपण शरीराने, मनाने व आत्म्याने दुर्बल आहोत हे पवित्र आत्म्याला ठाऊक आहे व तो आपला विश्वासू कैवारी असल्यामुळे साहाय्य पुरवितो. आपण कशासाठी प्रार्थना करावी, प्रार्थनेत काय व कसे मागावे हे आपल्याला कळत नाही अशावेळी पवित्र आत्मा देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना जुळवून ती देवाला सादर करतो व मध्यस्थी करतो.

शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३
     ‘देवाच्या राज्याविषयी दाखले’ हे मत्तयच्या शुभवर्तमानातील तेराव्या अध्यायाचे वैशिष्ट्य आहे. देवाचे राज्य हे प्रितीचे, कृपेचे, शांतीचे, क्षमेचे, प्रार्थनेचे, बंधुत्वाचे व शेजारप्रितीचे राज्य आहे; परमेश्वराच्या महान दयेचे राज्य आहे. मात्र आपण ह्या राज्यामध्ये जीवन जगतो व आपल्या जुन्या वचनाप्रमाणे जे देवाचे राज्य नाही अशा ठिकाणी वावरतो. व अनेकवेळा सैतान आपल्याला मोहात पाडून देवराज्यापासून दूर नेत असतो. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र व जगाचा तारणारा होता हे दाखवून देण्याचा उद्देश मत्तयने शुभवर्तमान लिहिताना डोळ्यासमोर ठेवला होता. म्हणूनच मत्तय “स्वर्गाचे राज्य” ह्या शब्दाचा वापर वारंवार करतो व ह्या दाखल्याद्वारे येशूने सैतान व त्याच्या परिणामकारक घातक स्वरूपी कृतीचे वर्णन केले आहे. दाखल्याद्वारे येशू आपल्या शिष्यांना व जनसमुदायाला पाप व त्याचे परिणाम ह्याबद्दल नुसते कोरे पाषाण तत्वज्ञान सांगत नाही तर त्याचे व्यवहारातील अस्तित्वं त्यास पटवून देत आहे.
     मत्तय १३:२४-२९ मध्ये सांगितल्याप्रमाणे “तण” हा निंदणाचा असा प्रकार आहे की सुरवातीला हे निंदण हुबेहूब गव्हाप्रमाणे दिसते. म्हणून मालक ते उपटण्यास मनाई करतो. आपल्या खाजगी हवेषाखातीर दुसऱ्यांच्या शेतात गुप्तपणे तणाचे बी पेरणे ही सूड घेण्याची सर्वसाधारण पद्धत त्यावेळे पेलेस्टाईन मध्ये अस्तित्वात होती. तणाचे बी जर जेवणात मिसळले तर ते विषारी असते म्हणून कायद्यानुसार हे सैतानी कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा केली जात.
     अध्याय १३:३१-३५ द्वारे येशू अल्प आरंभाविषयी देवाच्या राज्यासाठी पटवून देताना मोहरीचे बी व खमीर दोन दाखले देतो. मोहरी व खमीर ह्या प्रमाणे देवाचे कार्य अगदी शुल्लक भासते परंतु अखेरीस ते तसे नसून प्रत्येकाला त्याची दखल घेणे भाग पडते. तो पर्यंत शिष्यांनी धीर व संयमाची पराकाष्टा जोपासली पाहिजे.

मनन चिंतन
     या जगामध्ये माणसाला थोडा फार अनुभव येतो; थोडे फार ज्ञान मिळते. आपल्याला वाटते आपण मोठे झालो म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. हा  समाज, हे ज्ञान, हा अनुभव केवळ जगातला असतो. मात्र दुसरे जे जग आहे, देवाच्या राज्याचे जग त्याची त्याला माहिती पाहिजे असेल; त्याचे ज्ञान हवे असेल; त्याचे नियम ज्याला समजून घ्यायचे असतील, देवाच्या राज्याचे स्वरूप ज्याला ओळखायचे असेल तर त्याने देवाच्या शब्दाकडे, देवाच्या संदेशाकडे वळले पाहिजे. देवाच्या राज्याकडे वळल्यानंतर परमेश्वराचे सामर्थ्य किती महान आहे याची त्याला समज येते; नाहीतर याच जगाचे नियम, याच जगाचे आपले ज्ञान देवाच्या राज्यापासून आपल्याला दूर नेऊ शकते. माणसाला देवाच्या संदेशाची, देवाच्या शब्दाची समज यावी, देवाचे सामर्थ्य किती महान आहे, याची जाणीव व्हावी, ही प्रभूची इच्छा आहे. नाहीतर आपण या जगातील नियम, या जगातल्या अपेक्षा, या जगाचे मापदंड देवाच्या राज्याला लागू करायला बघतो. परंतु देवाचे राज्य हे निराळ्या प्रकारचे आहे ही समज आपल्याला येणे गरजेचे आहे. स्वर्गाच्या राज्याला दिवस-रात्र, प्रकाश-अंधकार ह्यांची भिती नसते परंतु सैतानी राज्याला नेहमीच दिवस व प्रकाश ह्यांची अमर्याद भिती असते. ह्याच कारणास्तव आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो की, कशाप्रकारे शेतकऱ्याने दिवसा गव्हाचे चांगले बी पेरले परंतु वैऱ्याने (सैतानाने) कशाप्रकारे लोक झोपत असताना रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन गव्हामध्ये निंदन पेरले. आजच्या आधुनिक काळात सर्वसामर्थ्यशाली व्यक्ती आपल्या वैऱ्याचा प्रतिकार करून त्याचा पराभव करण्यास सदैव तयार असतो. तो अश्याप्रकारच्या संधीची चाहूल लागताच कार्यरत होतो, कारण त्या व्यक्तीस माहित असते की, हा त्याचा सर्वसामर्थ्यशालीपणा हा क्षणिक आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, आपला देव सर्वाधिकारी असला तरी दयाळू न्यायाधीस आहे, त्याची इच्छा होईल तेव्हा तो कारवाई करू शकतो तरी तो मोठ्या सहनशीलतेने आम्हांवर राज्य करतो. ह्या वचनानुसार आपला देव हा सर्वसामर्थ्य व शक्तिशाली आहे; तो क्षणातच सैतानी राज्य पराभूत करू शकतो. त्याच्या तारण योजनेत सर्वांनी स्वईच्छेने सहभागी व्हावे असी त्याची इच्छा आहे. तो कधीही कुणाचा विनास करू पाहत नाही.
    आपला परमेश्वर हा सहनशील व दयाळू आहे. ह्या सहनशिलतेद्वारे व द्याळूपणाने तो आपल्या प्रत्येकाला सैतानी राज्यातून, असंत्याच्या वाटेवरून परतण्यासाठी प्रेमाणे आमंत्रण करत असतो, जेणेकरून आपण सर्वजण त्याच्या सार्वकालिक राज्याचे वारसदार ठरू. परमेश्वर जसा सहनशील व दयाळू आहे, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सहनशीलतेचे व द्याळूपणाचे वस्त्र धारण केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या राज्याची घोषणा करू शकतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, तुझ्यावरील आमच्या प्रितीत वाढ कर.

१.    जे परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत, त्या सर्वांनी प्रभूच्या मार्गाची घोषणा करून प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
     २.   आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून तसेच भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
   ३.  आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांस शेजाऱ्यावर प्रिती करण्यास व आपले प्रेम इतरांना देण्यास प्रभूची कृपा व शक्ती मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.४.  जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, अश्या सर्वाना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व देवावरील त्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
   ५.   आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया...
    




     

Thursday, 13 July 2017

Reflection for the Homily of 15th Sunday in Ordinary Time  (16-07-17) by Br. Baritan Nigrel. 






सामान्य काळातील पंधरावा रविवार

दिनांक: १६-०७-२०१७
पहिले वाचन: यशया ५५:१०-११
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१८-२३
शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३





"पेरणाऱ्याचा दाखला"






प्रस्तावना:

आजची उपासना आपल्याला खरा ख्रिस्ती कोण? ह्याविषयी सांगत आहे. जो देवाचा शब्द ऐकून त्याचे आचरण करतो आणि ख्रिस्ताचा अनुयायी होऊन त्याचे जीवन ख्रिस्ताच्या शब्दावर उभारतो तो खरा ख्रिस्ती होय. यशया या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात देवाचे वचन हे सामर्थ्यशाली आहे असे आपण ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगत आहे की, ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या वचनानुसार जीवन जगल्यास दुःखे सोसावी लागणार पण ते सर्व किरकोळ आहे. कारण परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्म्याच दान दिलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त ‘पेरणाऱ्याचा दाखल्याद्वारे देवाच्या राज्याची घोषणा करीत आहे. ज्याप्रमाणे चांगल्या जमिनीत पडणारे बी उत्पादक होते, त्याचप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात प्रभूचा शब्द उत्पादक होऊन त्यांस जीवन जगण्यास स्फूर्ती देतो. म्हणून नेहमी देवाचा शब्द आपल्या जीवनी स्वीकारून चांगल ख्रिस्ती जीवन जगावं म्हणून या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन: यशया ५५:१०-११

या वाचनात देवाच्या वचनाची तुलना पाऊस व बर्फ यांच्याबरोबर केलेली आहे. त्यांतून संथपणे, मूकपणे चाललेले कार्य सूचित होते. या कार्याने योग्य वेळी पृथ्वीचा चेहरा मोहरा बदलला जातो. त्याचप्रमाणे देवाचे वचन हे त्याचे कार्य करण्यास आपणास योग्य वेळी सामर्थ्य देत असते. या वाचनातून आपणास सांगण्यात येत आहे की, आपल्या विचारांपेक्षा देवाचे विचार अधिक दूरवर पोचणारे आणि अधिक समृध्द अर्थपूर्ण आहेत.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१८-२३

या भागात पौलने दुःख सोसणे आणि गौरव या विषयीचा उल्लेख केलेला आहे. ख्रिस्ती माणसाला या जगात दुःखे सोसावी लागणार हे वास्तव पौलने स्पष्टपणे मांडले आहे. तथापि आमच्यामध्ये जे गौरव प्रगट व्हायचे आहे त्यांच्या तुलनेत ही दुःखे, संकटे सर्व काही किरकोळ आहे असे आपणास सांगण्यात आले आहे. तसेच पौल आपणास आठवण करून देत आहे की, आपणाला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे आणि ह्या आत्म्याद्वारे आपणास ‘पुत्रपणाचा’ हक्क मिळालेला आहे.

शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३

प्रभू येशू जी सेवा करीत होता तिचे कोणते परिणाम होत होते हे दाखविण्यासाठी त्याने ‘पेरणाऱ्याचा दाखला’ सांगितला. या दाखल्याद्वारे येशूने देवाच्या राज्याची जाहीर घोषणा केली. या दाखल्यातील चार प्रसंग दृश्यामधून प्रतिसाद मिळणे न मिळणे हे संदेशावर नव्हे तर श्रोत्यांच्या तत्पर ग्रहण शक्तीवरही अवलंबून आहे, असे सांगण्यात आले आहे.
चांगल्या जमिनीत पडणारे बी उत्पादक होते. विरोध आणि अपुरा प्रतिसाद असला तरीही पिक येईल असे आश्वासन येशूने यातून आपल्या शिष्यांना दिले आहे. पण चांगल्या जमिनीत देखील उत्पादन क्षमता सर्वत्र सारखी नसते. त्यातही कमी अधिक फरक आहे. शंभरपट, साठपट आणि तीसपट पिक मिळते. म्हणजे शिष्य एकाच प्रकारचे वा आकाराचे नसतात. देवाच्या राज्यामध्ये अतिसामान्यांना तसेच असामान्यांनाही स्थान आहे.


मनन चिंतन:

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्की येते, जिथे कोणाच्या सल्ल्याची नव्हे तर, कोणाच्या तरी सोबतीची गरज असते.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण ख्रिस्ती आहोत, म्हणजेच आपण ख्रिस्ताचे ‘अनुयायी’ आहोत. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणून संत पौल म्हणतो, “जो मला सामर्थ्य पुरवितो त्याच्याद्वारे मी सर्व गोष्टी करू शकतो” (फिलीप्पै ४:१३). जो प्रभूचा शब्द ऐकतो व त्यानुसार त्याचे जीवन जगतो, त्यास प्रभू परमेश्वर सामर्थ्य देतो. आपल्या जीवनात अनेकजण येतात पण फक्त सल्ला देण्यासाठी. पण कधी कधी आपल्याला सोबतीची गरज भासते. तेव्हा परमेश्वराचा शब्द आपल्याला सामर्थ्य व जीवनात सोबत देण्यासाठी येतो.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की देवाच्या वचनाची व शब्दाची तुलना पाऊस व बर्फ यांच्याबरोबर केलेली आहे. जेव्हा पाऊस व बर्फ पडतो, तेव्हा ते संथपणे आपले कार्य करून पृथ्वीचा चेहरा बदलतात. त्याचप्रमाणे देवाचे वचन व त्याचा शब्द आपणास योग्य वेळी सामर्थ्य देऊन आपल्या जीवनाचा रंग व चेहरा बदलत असतात. त्यासाठी आपलं जीवन हे चांगल्या जमिनीसारख असलं पाहिजे. कारण प्रभू परमेश्वर त्याचे वचन कधीच आपल्यावर लादत नाही. तो पेरत राहतो. चांगल पिक टिकू देण की न देण हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपणास आठवण करून देत आहे की, आपल्या प्रत्येकाकडे १०० पट पिक देण्याची क्षमता आहे. त्यासाठी आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. प्रभूचा शब्द जेव्हा आपल्या जीवनामध्ये रुजतो, तेव्हा आपलं जीवन आनंदाने उमलते.
आपल्याला ठाऊक आहे की, एखादा माळी जेव्हा झाडाला फुल येत नाही तेव्हा तो रोपाला तोडत नाही. तर त्या झाडाची विशेष काळजी घेतो. आपणही कधी कधी आपलं जीवन परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगण्यास कमी पडतो. पण आपला प्रभू आपणास टाकत नाही तर आणखी एक संधी देतो. त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याचे वचन आपल्या जीवनी रुजवू या. कारण विश्वासाने आपण ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवन मिळवत असतो. ज्याप्रमाणे बी चांगल्या जमिनीत पेरल्यानंतर मरून जात व नवीन जन्म घेऊन १०० पटीने पिक देत, त्याचप्रमाणे आपणही विश्वासाने ख्रिस्तामध्ये मरून जातो व नवीन जन्म घेऊन त्याच्या आज्ञा पाळून आपण आपलं जीवन त्याच्या वचनाप्रमाणे जगतो.
आपल्याला वाटते आपला पैसा, सत्ता, ताकद आणि वैयक्तिक संबंधाद्वारे आपण सर्वकाही करू शकतो. परंतु जीवनातील समस्यांशी झुंजताना जेव्हा आपण देवाकडे वळतो, तेव्हा आपण देवाचे सामर्थ्य आपल्या जीवनात अनुभवतो. कारण तो आपल्यासाठी या धरतीवर आला. म्हणून जो कोणी त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्याचा विनाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन लाभेल (योहान ३:१६).
आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. आपल्या जीवनात दुःखे व संकटे येणार. एक खरी ख्रिस्ती व्यक्ती जीवन जगणे म्हणजे, ख्रिस्ताच्या पाहुलांवर पाहुल ठेऊन चालणे. ह्याचसाठी संत पौल दुसऱ्या वाचनात आपणास सांगत आहे की, ख्रिस्ती माणसाला या जगात दुःखे सोसावी लागणार आहेत. पण जो ख्रिस्ताच्या शब्दांवर विश्वास ठेऊन आपलं जीवन जगतो, त्याच्या तुलनेत ही दुःखे, संकटे सर्व काही किरकोळ आहेत कारण दुःख सोसणे म्हणजेच प्रभूचा गौरव करणे होय. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्की येते, जिथे कोणाच्या सल्ल्याची नव्हे तर, कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. दुःखामध्ये आपल्याला सल्ल्याची गरज भासत नाही, मात्र प्रभूचा शब्द आपल्याला आपली सोबत देऊन आपला प्रभूवरील विश्वास बळकट करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद:  हे प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मबंधू-भगिनी आणि सर्व प्रापंचिक लोक ह्या सर्वांना, देवाच्या प्रेमाची साक्ष जगजाहीर करण्यासाठी परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या. 
२. सर्व ख्रिस्ती लोकांनी सदैव देवाचा शब्द आपल्या जीवनी स्वीकारून चांगल ख्रिस्ती जीवन जगावे व आपल्या कृतीद्वारे इतरांना ख्रिस्त प्रकट करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अशांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ज्या कोणाची लग्न झाली आहेत परंतु ज्या जोडप्यांना अजून मुल-बाळ झाले नाही त्या सर्वांना प्रभूने आशीर्वादित करावे व त्यांच्या जीवनरूपी वेलीवर पुष्प फुलवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून, आपल्या सर्व सामाजिक आणि कौठूबिंक हेतूसाठी प्रार्थना करूया.












Wednesday, 5 July 2017

Reflection for the Homily of 14th Sunday in Ordinary Time  (09-07-17) by Br Ashley D'monty. 





सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक: ०९-०७-२०१७
पहिले वाचन:  जख-या ९:९-१०
दुसरे वाचन:  रोमकरांस पत्र ८:९-११,१३
शुभवर्तमान:  मत्तय ११:२५-३०






अहोकष्टी व भाराक्रांत जनहोतुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन







प्रस्तावना:

प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना  नम्रतेचा धडा देत आहे. महान होण्यासाठी गर्वाने फुगून जावून स्वतःला मो़डण्यापेक्षा स्वतःला वाकवून महान होण्यास शिकवत आहे. आजचे पहिले वाचन जख-याच्या पुस्तकातून घेतलेले आहे. संदेष्टा आपल्याला सियोनेच्या भावी राजाची कल्पना देतो. हा भावी राजा न्यायी व यशस्वी आहे. तो मनाचा, दिलाचा सौम्य व लीन आहे. संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात, पवित्र आत्म्याचे कार्य आणि त्या आत्माने प्रेरीत होऊन आपण जीवनात कसे वागावे हे नमुद करतो. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू आपल्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत आहे आणि आपणा सर्वांस बालकासारखे होण्याचे आमंत्रण देत आहे. मनुष्य जोपर्यत नम्र, लहान व अज्ञानी होत नाही तोपर्यत देवाच्या रहस्यांची त्याला जाणीव होत नाही. आपण सर्वांनी नम्रता अंगीकारावी व परमेश्वराचा गौरव पाहावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरणः

पहिले वाचन:  जख-या ९:९-१०

     संदेष्टा जख-या सियोनेच्या भावी राज्याविषयी कल्पना मांडत आहे. भावी राजा कसा असावा आणि तो परप्रांतातील राज्यापेक्षा वेगळा कसा असेल ह्याचे वर्णन केले आहे. संदेष्टा जख-या, सियोन कन्येला आणि यरूशलेम कन्येला भावी राज्याच्या नम्रतेची जाण करून देत आहे. भावी राजा हा न्यायी व यशस्वी असेल. तो गाढवाच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येईल व आपली सौम्यता, लीनता प्रकट करेल. गाढव हा इतर प्राण्यामधील एक प्राणी जरी असला तरी त्याला तुच्छ मानले जाते. त्याला भरपूर ओझे वाहण्यासाठी लावले जाते आणि एखादा कधी का, ह्या व्यवहारात चुकला तर त्याला आपण गाढवाची उपमा देतो असे असून सुध्दा गाढव सर्व काही नम्रतेने, लिनतेने आणि सौम्यतेने स्विकार करतो.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा आणखी एक गोष्ट आपल्या निर्दशनात आणतो ती म्हणजे, “शांतीचा राजा.हा राजा येरूशलेमातील घोडे व एफ्राईममधील सर्व रथ नष्ट करील. तो इंद्रधनुष्य तोडून टाकील व राष्ट्रांमध्ये शांती प्रस्थापित करील. तसे पाहिले तर रथ, घोडे आणि इंद्रधनुष्य हे युध्दासाठी वापरले जातात. ही सर्व गर्विष्टाची चिन्हे आहेत. युध्दाद्वारे युध्द जिंकून महान होण्यासाठी आणि मान-सन्मान मिळविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

दुसरे वाचन:  रोमकरांस पत्र ८:९-११,१३

संत पौल रोमकरांस लिहलेल्या पत्रात पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन नम्रतेचे जीवन जगण्यासाठी आमत्रंण देत आहे. नम्रता हे पवित्र आत्म्याकडून मिळालेले एक वरदान आणि दान आहे. गलतीकरांस लिहिलेल्या पत्रात अध्याय ५ ओव्या २२-२३ मध्ये संत पौल म्हणतो, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यताहे आहे व अश्यांविरुध्य नियमशास्त्र नाही.ही सर्व पवित्र आत्म्याची दाने आहेत. आत्म्याने प्रेरित होऊन, जीवन जगत असताना मनुष्य देहाच्या अधीन जात नसतो परंतु देहाच्या व आत्म्याच्या युद्धांत गर्विष्टपणा देहाच्या स्वाधीन जातो आणि देहाचे कृत्ये करतो, देहाची वासना भागवतो व मरणास प्राप्त होतो. तर! पवित्र आत्म्याने भरलेला नम्र मनुष्य आत्म्याची कार्ये करतो व स्वर्गीय सुख आपल्या जीवनात अनुभवतो.

शुभवर्तमान:  मत्तय ११:२५-३०

देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेला, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा नम्र सेवक आजच्या शुभवर्तमानामध्ये त्याच्या प्रिय पित्याला धन्यवाद देऊन त्याचे स्तवन व मनन करत आहे. तो आपणाला बालकाची भूमिका घेण्यासाठी बजावत आहे. येशू आपल्या स्वर्गीय पित्याला “पिता” ह्या नावाने संबोधितो, तसेच तो स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा निर्माणकरता प्रभू आहे असे दर्शवितो. तो आपल्या पित्याशी प्रार्थनेद्वारे, स्तवनाद्वारे संभाषण करतो. ह्या प्रार्थनेमध्ये तो देवाला धन्यवाद देतो. देवाने सर्वकाही ज्ञानी, सुशिक्षित, गर्विष्ठ आणि विचारवंत ह्यांच्यापासून गुप्त ठेवलेले आहे आणि देवाचे महान रहस्य त्यांनी बालकांना प्रकट केलेले आहे. म्हणून येशू म्हणतो, ‘जर तुम्हांला स्वर्गात जायचं असेल आणि स्वर्गराज्य मिळवायचं असेल तर बालकाप्रमाणे सौम्य, लीन, व सरळ बना.
पुढे येशू आपल्याला त्यांच्या स्वतःच्या कामगिरीविषयी सांगतो. पिता आणि पुत्र ह्यांच्यामध्ये ऐक्य आहे. पित्याने सर्व काही पुत्राच्या अधीन सोपविले आहे. पिता-पुत्राच नाते हे मजबूत आहे. आणि त्याचे ऐकमेव कारण म्हणजे येशू सौम्य, लीन अंतःकरणाचा, मनाचा, शरीराचा आहे. तो केवळ शब्दाने दुस-यांना नम्रतेने धडे देत नाही, तर स्वतः दुस-यांचे पाय धुऊन नम्रतेचा धडा देत आहे. तो स्वतःला इतका वाकवतो की शिष्यांच्या पायाचे तो चुंबन घेतो. आणि असे म्हणतो, “तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधिता आणि ते ठिक बोलता; कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. (योहान १३:१३-१५)  तो स्वतः गुरु आणि प्रभू असताना त्याने असे केले. येशू कष्टी व भाराक्रांत जणांना त्याच्याकडे येण्याचे आवाहन देत आहे. त्याने दुस-यांचे पाय धूतले ह्यास्तव आपण देखील तेच करावे असे तो आपल्याला शिकवितो. तो म्हणतो, “अहो, कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन” (मत्तय ११:२८). मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. मला अनुसरा व माझ्यापासून शिका.
ख्रिस्त हा नम्रतेचा नमुना म्हणून आपल्यासमोर प्रकट केला आहे. तो म्हणतो, “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर, तो सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडनीत म्हणून अर्पण करावयास आला आहे” (मार्क: १०:४५). आजच्या तिन्ही वाचनाद्वारे प्रभू आपल्याला त्याच्यापासून शिकण्यासाठी आमंत्रण देत आहे आणि त्याच्यासारखा सौम्य, लीन, सरळ व नम्र होण्यासाठी आव्हान देत आहे.
  
मनन-चिंतनः

     आजच्या समाजाकडे जर आपण नजर लावली तर आपल्याला सातत्याने अनेक लोक ताठ मानेन फुशारकी मानून गर्विष्टाचे जीवन जगताना दिसत आहेत. अश्या माणसांची उपमा केवळ शेतात असलेल्या सरळ उभ्या कणसाबरोबर करता येईल. जे लीन, सौम्य व लहान असतात ते कधीच दुस-यांना आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दिखाऊपणाची भूमिका घेऊन दाखवण्याचा प्रत्यन करत नाहीत. ते सतत विनम्र, सहनशील, दुस-यांपेक्षा कमी आणि इतर सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असेच समजतात. उदाहरण द्यायचे झाले तर महात्मा गांधी: ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेचा मार्ग स्विकारून गर्विष्ट आणि सरळ मानेने चालणारे ब्रिटिश राजवटीला सळो की पळो केले.
     गेल्याच वर्षी स्वर्गवासी झालेले नेल्सन मंडेला हे देखील नम्रतेचे एक उदाहरण आहेत. सत्ताविस वर्षे तुरुंगवास भोगला आणि काळा गोरा हा वर्णभेदाचा भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रर्यत्नांची पराकष्ट केली. जेव्हा त्यांची तुरूगांतून सुटका झाली तेव्हा लोकांनी त्यांना राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून निवडले. तसेच अजून एक महत्वाचे उदाहरण द्यायचे झाले तर, कोलकत्ताच्या मदर तेरेसा: ह्यांनी तर स्वत:ला नम्रते मध्ये वाकून घेतले होते: त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, आणि करणे हे त्यांच्या नम्रतेचे प्रतिक होते. ह्या सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचा आदर्श गिरवला होता. जे खरोखर नम्र लहान असतात तेच परमेश्वराच्या दृष्टीकोनातून महान बनत असतात. नम्र होणे म्हणजे स्वःताला वाकून घेणे, दुसऱ्यांना आपल्यापेक्षा महान समजणे. ते घोड्यावर स्वार होत नसतात तर गाढवाच्या शिंगरावर बसत असतात.

बोध कथा:

एक दिवस गुरु आपल्या शिष्यांना घेऊन एका गावातील शेती-वाडीतून प्रवास करत होते. तो सप्टेंबर महिना होता. शेतात लावलेले भाताचे कणसे आत्ताच कुठेतरी तयार होत होती. एका शिष्याची नजर शेतात पिकत असलेल्या भाताकडे गेली. त्याला कळून चुकले की भाताची काही कणसे ताठ मान करून सरळ उभी होती तर काही कणसे वाकलेली होती. ह्या शिष्याच्या मनात विचार आला की देवाने झुकलेल्या कणसावर अन्याय केले आहे. त्याने आपल्या गुरूला आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी प्रश्न केला. काही कणसे ताठ मानेने डौलदारपणे वाऱ्याच्या झुळकीवर सरळ उभी आहेत तर, दुसरी मात्र छोटयाश्या वाऱ्याच्या झुळकीने का वाकलेली आहेत?
गुरूने शिष्याला स्पष्टीकरण देताना म्हटले, “जे कणसे सरळ आहेत आणि जे वाकलेली आहेत ती दोन्ही कापून माझ्याकडे आण.दोन्ही कणसातील भाताचे दाणे काढून त्या शिष्याला दाखवले की; एका कणसातील दाणा भाताविना होता तर दुसरा भाताने भरलेला होता. जे भाताने भरलेले होते त्यांची कणसे वाकलेली होती. तर, जे रिकामी होती त्यांची कणसे ताठ मानेने सरळ डोलत होती. नम्रतेने वाकलेला मनुष्य सर्वठायी परिपूर्ण असतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसादः प्रभो, आमच्या प्रार्थना स्विकारून घे.

१. येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार वागण्यास आपल्याला आपल्या धार्मिक नेत्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. येशू ख्रिस्ताची सौम्यतेची व लीनतेची शिकवण आपण आचरणात आणून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्वांची पावसासाठी कळकळीची प्रार्थना आपल्या प्रभू येशूने ऐकून आपल्याला चांगल्या पाऊसाचे दान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या राजकीय नेत्यांनी सौम्यतेचा व नम्रतेचा मार्ग स्वीकारून जगात शांतता प्रस्तापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वयक्तिक गरजांसाठी प्रभूयेशुकडे प्रार्थना करूया.