सामान्य काळातील पंधरावा
रविवार
पहिले वाचन: यशया ५५:१०-११
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र
८:१८-२३
शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३
"पेरणाऱ्याचा दाखला"
प्रस्तावना:
आजची उपासना आपल्याला खरा ख्रिस्ती कोण? ह्याविषयी सांगत आहे. जो देवाचा शब्द
ऐकून त्याचे आचरण करतो आणि ख्रिस्ताचा अनुयायी होऊन त्याचे जीवन ख्रिस्ताच्या
शब्दावर उभारतो तो खरा ख्रिस्ती होय. यशया या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात
देवाचे वचन हे सामर्थ्यशाली आहे असे आपण ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला
सांगत आहे की, ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या वचनानुसार जीवन जगल्यास दुःखे सोसावी
लागणार पण ते सर्व किरकोळ आहे. कारण परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्म्याच दान
दिलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त ‘पेरणाऱ्याचा दाखल्याद्वारे देवाच्या
राज्याची घोषणा करीत आहे. ज्याप्रमाणे चांगल्या जमिनीत पडणारे बी उत्पादक होते,
त्याचप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात प्रभूचा शब्द उत्पादक होऊन त्यांस जीवन
जगण्यास स्फूर्ती देतो. म्हणून नेहमी देवाचा शब्द आपल्या जीवनी स्वीकारून चांगल
ख्रिस्ती जीवन जगावं म्हणून या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.
पहिले वाचन: यशया ५५:१०-११
या वाचनात देवाच्या वचनाची तुलना पाऊस व बर्फ यांच्याबरोबर केलेली आहे.
त्यांतून संथपणे, मूकपणे चाललेले कार्य सूचित होते. या कार्याने योग्य वेळी
पृथ्वीचा चेहरा मोहरा बदलला जातो. त्याचप्रमाणे देवाचे वचन हे त्याचे कार्य
करण्यास आपणास योग्य वेळी सामर्थ्य देत असते. या वाचनातून आपणास सांगण्यात येत आहे
की, आपल्या विचारांपेक्षा देवाचे विचार अधिक दूरवर पोचणारे आणि अधिक समृध्द
अर्थपूर्ण आहेत.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र
८:१८-२३
या भागात पौलने दुःख सोसणे आणि गौरव या विषयीचा उल्लेख केलेला आहे. ख्रिस्ती
माणसाला या जगात दुःखे सोसावी लागणार हे वास्तव पौलने स्पष्टपणे मांडले आहे. तथापि
आमच्यामध्ये जे गौरव प्रगट व्हायचे आहे त्यांच्या तुलनेत ही दुःखे, संकटे सर्व
काही किरकोळ आहे असे आपणास सांगण्यात आले आहे. तसेच पौल आपणास आठवण करून देत आहे
की, आपणाला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे आणि ह्या आत्म्याद्वारे आपणास
‘पुत्रपणाचा’ हक्क मिळालेला आहे.
शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३
प्रभू येशू जी सेवा करीत होता तिचे कोणते परिणाम होत होते हे दाखविण्यासाठी
त्याने ‘पेरणाऱ्याचा दाखला’ सांगितला. या दाखल्याद्वारे येशूने देवाच्या राज्याची
जाहीर घोषणा केली. या दाखल्यातील चार प्रसंग दृश्यामधून प्रतिसाद मिळणे न मिळणे हे
संदेशावर नव्हे तर श्रोत्यांच्या तत्पर ग्रहण शक्तीवरही अवलंबून आहे, असे
सांगण्यात आले आहे.
चांगल्या जमिनीत
पडणारे बी उत्पादक होते. विरोध आणि अपुरा प्रतिसाद असला तरीही पिक येईल असे आश्वासन
येशूने यातून आपल्या शिष्यांना दिले आहे. पण चांगल्या जमिनीत देखील उत्पादन क्षमता
सर्वत्र सारखी नसते. त्यातही कमी अधिक फरक आहे. शंभरपट, साठपट आणि तीसपट पिक
मिळते. म्हणजे शिष्य एकाच प्रकारचे वा आकाराचे नसतात. देवाच्या राज्यामध्ये
अतिसामान्यांना तसेच असामान्यांनाही स्थान आहे.
मनन चिंतन:
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्की येते, जिथे कोणाच्या
सल्ल्याची नव्हे तर, कोणाच्या तरी सोबतीची गरज असते.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण ख्रिस्ती आहोत, म्हणजेच
आपण ख्रिस्ताचे ‘अनुयायी’ आहोत. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणून संत
पौल म्हणतो, “जो मला सामर्थ्य पुरवितो त्याच्याद्वारे मी सर्व गोष्टी करू शकतो”
(फिलीप्पै ४:१३). जो प्रभूचा शब्द ऐकतो व त्यानुसार त्याचे जीवन जगतो, त्यास प्रभू
परमेश्वर सामर्थ्य देतो. आपल्या जीवनात अनेकजण येतात पण फक्त सल्ला देण्यासाठी. पण
कधी कधी आपल्याला सोबतीची गरज भासते. तेव्हा परमेश्वराचा शब्द आपल्याला सामर्थ्य व
जीवनात सोबत देण्यासाठी येतो.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की देवाच्या वचनाची व शब्दाची तुलना पाऊस व बर्फ यांच्याबरोबर केलेली आहे. जेव्हा
पाऊस व बर्फ पडतो, तेव्हा ते संथपणे आपले कार्य करून पृथ्वीचा चेहरा बदलतात.
त्याचप्रमाणे देवाचे वचन व त्याचा शब्द आपणास योग्य वेळी सामर्थ्य देऊन आपल्या
जीवनाचा रंग व चेहरा बदलत असतात. त्यासाठी आपलं जीवन हे चांगल्या जमिनीसारख असलं पाहिजे.
कारण प्रभू परमेश्वर त्याचे वचन कधीच आपल्यावर लादत नाही. तो पेरत राहतो. चांगल पिक टिकू देण की न
देण हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपणास
आठवण करून देत आहे की, आपल्या प्रत्येकाकडे १०० पट पिक देण्याची क्षमता आहे.
त्यासाठी आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. प्रभूचा शब्द जेव्हा आपल्या
जीवनामध्ये रुजतो, तेव्हा आपलं जीवन आनंदाने उमलते.
आपल्याला ठाऊक आहे की, एखादा माळी जेव्हा झाडाला फुल येत नाही तेव्हा तो
रोपाला तोडत नाही. तर त्या झाडाची विशेष काळजी घेतो. आपणही कधी कधी आपलं जीवन
परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगण्यास कमी पडतो. पण आपला प्रभू आपणास टाकत नाही तर आणखी
एक संधी देतो. त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याचे वचन आपल्या जीवनी रुजवू या. कारण विश्वासाने
आपण ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवन मिळवत असतो. ज्याप्रमाणे बी चांगल्या जमिनीत
पेरल्यानंतर मरून जात व नवीन जन्म घेऊन १०० पटीने पिक देत, त्याचप्रमाणे आपणही
विश्वासाने ख्रिस्तामध्ये मरून जातो व नवीन जन्म घेऊन त्याच्या आज्ञा पाळून आपण
आपलं जीवन त्याच्या वचनाप्रमाणे जगतो.
आपल्याला वाटते आपला पैसा, सत्ता, ताकद आणि वैयक्तिक
संबंधाद्वारे आपण सर्वकाही करू शकतो. परंतु जीवनातील समस्यांशी झुंजताना जेव्हा
आपण देवाकडे वळतो, तेव्हा आपण देवाचे सामर्थ्य आपल्या जीवनात अनुभवतो. कारण तो
आपल्यासाठी या धरतीवर आला. म्हणून जो कोणी त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्याचा
विनाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन लाभेल (योहान ३:१६).
आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. आपल्या जीवनात दुःखे व संकटे येणार. एक खरी
ख्रिस्ती व्यक्ती जीवन जगणे म्हणजे, ख्रिस्ताच्या पाहुलांवर पाहुल ठेऊन चालणे.
ह्याचसाठी संत पौल दुसऱ्या वाचनात आपणास सांगत आहे की, ख्रिस्ती माणसाला या जगात दुःखे सोसावी लागणार
आहेत. पण जो ख्रिस्ताच्या शब्दांवर विश्वास ठेऊन आपलं जीवन जगतो, त्याच्या तुलनेत ही
दुःखे, संकटे सर्व काही किरकोळ आहेत कारण दुःख सोसणे म्हणजेच प्रभूचा गौरव करणे
होय. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात
अशी वेळ नक्की येते, जिथे कोणाच्या सल्ल्याची नव्हे तर, कोणाच्या तरी सोबतीची गरज
असते. दुःखामध्ये आपल्याला
सल्ल्याची गरज भासत नाही, मात्र प्रभूचा शब्द आपल्याला आपली सोबत देऊन आपला
प्रभूवरील विश्वास बळकट करतो.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे
प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मबंधू-भगिनी आणि सर्व प्रापंचिक लोक ह्या सर्वांना, देवाच्या प्रेमाची साक्ष
जगजाहीर करण्यासाठी
परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. सर्व ख्रिस्ती लोकांनी सदैव देवाचा शब्द
आपल्या जीवनी स्वीकारून चांगल ख्रिस्ती जीवन जगावे व आपल्या कृतीद्वारे इतरांना
ख्रिस्त प्रकट करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना
जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अशांना परमेश्वराने
चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ज्या कोणाची लग्न झाली आहेत परंतु ज्या जोडप्यांना अजून
मुल-बाळ झाले नाही त्या सर्वांना प्रभूने आशीर्वादित करावे व त्यांच्या जीवनरूपी
वेलीवर पुष्प फुलवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून, आपल्या सर्व सामाजिक आणि कौठूबिंक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment