Thursday 20 July 2017

Reflection for the Homily of 16th Sunday in Ordinary Time  (23-07-17) by Br. Glen Fernandes. 






सामान्यकाळातील सोळावा रविवार

दिनांक: २३-०७-२०१७
पहिले वाचन: ज्ञानग्रंथ १२:१३, १६-१९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७
शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३





“मग नितिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील”





प्रस्तावना:
     आज आपण सामान्यकाळातील सोळावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास प्रभू येशू प्रमाणे सहनशीलता अंगीकरण्यास व नितीमत्वासाठी झटण्यास निमंत्रण देत आहे. ज्ञानग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण एकतो की परमेश्वर हा सामर्थ्यशील व सर्वाधिकारी आहे. सर्व जगाचा तो न्यायाधीश आहे. पण तरीही तो दयाळू, कनवाळू व मंद्क्रोध आहे. व तो मोठ्या सहनशक्तीने आपणावर राज्य करतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस सांगत आहे की आपले प्रश्न सोडवायला, प्रार्थना करायला आपण समर्थ नाही. परंतू पवित्र आत्मा आपल्याला सहकार्य करतो व आपल्याला आपल्या अशक्तपणात हातभार लावतो. आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू निंदन, खमिर व मोहरीच्या दाखल्याद्वारे देवाच्या राज्याविषयी शिकवण प्रकट करतो. देवाचे राज्य ह्या जगात यावे, प्रभू येशूख्रिस्ताची शिकवण आपण आचरणात आणावी, व आपणा प्रत्येकाला देवराज्याचे वारसदार बनता यावे म्हणून या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: ज्ञानग्रंथ १२:१३, १६-१९
     परमेश्वराच्या न्यायाने उगमस्थान त्याच्या अधिकारात आहे. परमेश्वर हा सर्वाधिकारी असला तरी तो दयाळू व ममताळू आहे. परमेश्वराचा चांगुलपणा हा अमर्याद आहे. तो मोठ्या सहनशक्तीने ह्या जगावर राज्य करतो. मनुष्य खरा विश्वास ठेवू लागतो तेव्हा परमेश्वरामुळे त्याचे जीवन अधिक आनंदी, अधिक समृध्द होऊ लागते. जरी परमेश्वर न्यायी आहे व लोकांच्या पापांची शिक्षा करण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे तरीसुद्धा तो मंदक्रोध आहे. त्यामुळे त्याच्या लोकांना परमेश्वर पापांबद्दल पश्चाताप करण्यास संधी देतो. व तारणाचा मार्ग त्यांच्यासाठी खुला करून ठेवतो.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७
            आपल्या ख्रिस्ती जीवनात, आध्यात्मिक जडणघडन होत असतांना श्रद्धेत बळकट होण्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य पवित्र आत्मा आपणास पुरवितो. श्रद्धेमध्ये अधिकाधिक स्थिर होण्याकरिता, टिकून राहण्याकरिता माणसाने अंतकरणापासून प्रार्थनेला जीवनात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. आपण शरीराने, मनाने व आत्म्याने दुर्बल आहोत हे पवित्र आत्म्याला ठाऊक आहे व तो आपला विश्वासू कैवारी असल्यामुळे साहाय्य पुरवितो. आपण कशासाठी प्रार्थना करावी, प्रार्थनेत काय व कसे मागावे हे आपल्याला कळत नाही अशावेळी पवित्र आत्मा देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना जुळवून ती देवाला सादर करतो व मध्यस्थी करतो.

शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३
     ‘देवाच्या राज्याविषयी दाखले’ हे मत्तयच्या शुभवर्तमानातील तेराव्या अध्यायाचे वैशिष्ट्य आहे. देवाचे राज्य हे प्रितीचे, कृपेचे, शांतीचे, क्षमेचे, प्रार्थनेचे, बंधुत्वाचे व शेजारप्रितीचे राज्य आहे; परमेश्वराच्या महान दयेचे राज्य आहे. मात्र आपण ह्या राज्यामध्ये जीवन जगतो व आपल्या जुन्या वचनाप्रमाणे जे देवाचे राज्य नाही अशा ठिकाणी वावरतो. व अनेकवेळा सैतान आपल्याला मोहात पाडून देवराज्यापासून दूर नेत असतो. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र व जगाचा तारणारा होता हे दाखवून देण्याचा उद्देश मत्तयने शुभवर्तमान लिहिताना डोळ्यासमोर ठेवला होता. म्हणूनच मत्तय “स्वर्गाचे राज्य” ह्या शब्दाचा वापर वारंवार करतो व ह्या दाखल्याद्वारे येशूने सैतान व त्याच्या परिणामकारक घातक स्वरूपी कृतीचे वर्णन केले आहे. दाखल्याद्वारे येशू आपल्या शिष्यांना व जनसमुदायाला पाप व त्याचे परिणाम ह्याबद्दल नुसते कोरे पाषाण तत्वज्ञान सांगत नाही तर त्याचे व्यवहारातील अस्तित्वं त्यास पटवून देत आहे.
     मत्तय १३:२४-२९ मध्ये सांगितल्याप्रमाणे “तण” हा निंदणाचा असा प्रकार आहे की सुरवातीला हे निंदण हुबेहूब गव्हाप्रमाणे दिसते. म्हणून मालक ते उपटण्यास मनाई करतो. आपल्या खाजगी हवेषाखातीर दुसऱ्यांच्या शेतात गुप्तपणे तणाचे बी पेरणे ही सूड घेण्याची सर्वसाधारण पद्धत त्यावेळे पेलेस्टाईन मध्ये अस्तित्वात होती. तणाचे बी जर जेवणात मिसळले तर ते विषारी असते म्हणून कायद्यानुसार हे सैतानी कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा केली जात.
     अध्याय १३:३१-३५ द्वारे येशू अल्प आरंभाविषयी देवाच्या राज्यासाठी पटवून देताना मोहरीचे बी व खमीर दोन दाखले देतो. मोहरी व खमीर ह्या प्रमाणे देवाचे कार्य अगदी शुल्लक भासते परंतु अखेरीस ते तसे नसून प्रत्येकाला त्याची दखल घेणे भाग पडते. तो पर्यंत शिष्यांनी धीर व संयमाची पराकाष्टा जोपासली पाहिजे.

मनन चिंतन
     या जगामध्ये माणसाला थोडा फार अनुभव येतो; थोडे फार ज्ञान मिळते. आपल्याला वाटते आपण मोठे झालो म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. हा  समाज, हे ज्ञान, हा अनुभव केवळ जगातला असतो. मात्र दुसरे जे जग आहे, देवाच्या राज्याचे जग त्याची त्याला माहिती पाहिजे असेल; त्याचे ज्ञान हवे असेल; त्याचे नियम ज्याला समजून घ्यायचे असतील, देवाच्या राज्याचे स्वरूप ज्याला ओळखायचे असेल तर त्याने देवाच्या शब्दाकडे, देवाच्या संदेशाकडे वळले पाहिजे. देवाच्या राज्याकडे वळल्यानंतर परमेश्वराचे सामर्थ्य किती महान आहे याची त्याला समज येते; नाहीतर याच जगाचे नियम, याच जगाचे आपले ज्ञान देवाच्या राज्यापासून आपल्याला दूर नेऊ शकते. माणसाला देवाच्या संदेशाची, देवाच्या शब्दाची समज यावी, देवाचे सामर्थ्य किती महान आहे, याची जाणीव व्हावी, ही प्रभूची इच्छा आहे. नाहीतर आपण या जगातील नियम, या जगातल्या अपेक्षा, या जगाचे मापदंड देवाच्या राज्याला लागू करायला बघतो. परंतु देवाचे राज्य हे निराळ्या प्रकारचे आहे ही समज आपल्याला येणे गरजेचे आहे. स्वर्गाच्या राज्याला दिवस-रात्र, प्रकाश-अंधकार ह्यांची भिती नसते परंतु सैतानी राज्याला नेहमीच दिवस व प्रकाश ह्यांची अमर्याद भिती असते. ह्याच कारणास्तव आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो की, कशाप्रकारे शेतकऱ्याने दिवसा गव्हाचे चांगले बी पेरले परंतु वैऱ्याने (सैतानाने) कशाप्रकारे लोक झोपत असताना रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन गव्हामध्ये निंदन पेरले. आजच्या आधुनिक काळात सर्वसामर्थ्यशाली व्यक्ती आपल्या वैऱ्याचा प्रतिकार करून त्याचा पराभव करण्यास सदैव तयार असतो. तो अश्याप्रकारच्या संधीची चाहूल लागताच कार्यरत होतो, कारण त्या व्यक्तीस माहित असते की, हा त्याचा सर्वसामर्थ्यशालीपणा हा क्षणिक आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, आपला देव सर्वाधिकारी असला तरी दयाळू न्यायाधीस आहे, त्याची इच्छा होईल तेव्हा तो कारवाई करू शकतो तरी तो मोठ्या सहनशीलतेने आम्हांवर राज्य करतो. ह्या वचनानुसार आपला देव हा सर्वसामर्थ्य व शक्तिशाली आहे; तो क्षणातच सैतानी राज्य पराभूत करू शकतो. त्याच्या तारण योजनेत सर्वांनी स्वईच्छेने सहभागी व्हावे असी त्याची इच्छा आहे. तो कधीही कुणाचा विनास करू पाहत नाही.
    आपला परमेश्वर हा सहनशील व दयाळू आहे. ह्या सहनशिलतेद्वारे व द्याळूपणाने तो आपल्या प्रत्येकाला सैतानी राज्यातून, असंत्याच्या वाटेवरून परतण्यासाठी प्रेमाणे आमंत्रण करत असतो, जेणेकरून आपण सर्वजण त्याच्या सार्वकालिक राज्याचे वारसदार ठरू. परमेश्वर जसा सहनशील व दयाळू आहे, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सहनशीलतेचे व द्याळूपणाचे वस्त्र धारण केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या राज्याची घोषणा करू शकतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, तुझ्यावरील आमच्या प्रितीत वाढ कर.

१.    जे परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत, त्या सर्वांनी प्रभूच्या मार्गाची घोषणा करून प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
     २.   आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून तसेच भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
   ३.  आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांस शेजाऱ्यावर प्रिती करण्यास व आपले प्रेम इतरांना देण्यास प्रभूची कृपा व शक्ती मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.४.  जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, अश्या सर्वाना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व देवावरील त्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
   ५.   आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया...
    




     

No comments:

Post a Comment