Friday 28 July 2017

 Reflection for the Homily of 17th Sunday in Ordinary Time (30-07-17) By Brendon Noon


सामान्य काळातील सतरावा रविवार


दिनांक: ३०-०७-२०१७
पहिले वाचन: १ राजे ३:५,७-१२
दुसरे वाचन: रोमकरास ८:२८-३०
शुभवर्तमान: मत्तय:१३:४४-५२










 प्रस्तावना:


आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना देवाचे राज्य कशाप्रकारे आहे व आपण कशाप्रकारे देवाच्या संकल्पनेला योगदान दिले पाहिजे यावर मनन चिंतन करण्यास सांत आहे. पहिल्या वाचनात शलमोन आपणाला विवेक बुद्धी मिळावी अशी प्रार्थना देवाकडे करत आहे व देव त्याची प्रार्थना एकतो. दुसऱ्या वाचनात देवाच्या संकल्पने विषयी ऐकायला मिळते. देवाने आपल्या योजनेनुसार प्रत्येक विश्वासू व नवा जन्म घेतलेल्याला बोलाविले आहे व देव त्या योजना पुर्ण करीत आहे किंवा असतो. व शुभवर्तमनामध्ये आपल्याला स्वर्गाच्या राज्याविषयी तीन द्रुष्टात ऐकावयास मिळत आहेत. तीन्ही द्रुष्टात स्वर्गाच्याराज्याविषयी आहेत. स्वर्गाचे राज्य आपल्यासाठी कशाप्रकारे आहे व आपण कुठल्या भावनेने पाहतो त्यासाठी ह्या मिस्साबलीदानात भक्तिभावाने सहभाग घेऊया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: १ राजे ३:५,७-१२

स्वर्गीय नंदनवन प्राप्त करण्यासाठी, २०० वर्ष चैनीचे व ऐष आरामाच्या जीवनाची नव्हे तर दोन दिवस देवासाठी व इतरांसाठी जगण्याची गरज आहे. शलमोनाचा, दावीद आपल्या पित्याच्या जागी राज्याभिषेक करण्यात आला.आपल्या पित्याच्या खुर्चीवर बसून राज्यकारभार हाताळण्यास आपण लायक नाही असे शलमोनाला वाटले.म्हणून त्याने देवाकडे मध्यस्थीची प्रार्थना केली. देवाने त्याला स्वप्नात दर्शन देऊन पाहिजे तो वर मागण्यास सांगितले.शलमोन राजाने स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या प्रजेचा योग्य न्याय करता यावा म्हणून विवेकबुद्धी मागितली    

दुसरे वाचन: रोमकरास ८:२८-३०

     देवाने आपल्या योजनेनुसार प्रत्येक विश्वासणाऱ्याला, नवा जन्म पावलेल्या व्यक्तीला बोलाविले आहे. ती योजना देव पुर्ण करीत असतो. देवाच्या लेकरांना कठीण परिस्थितीतून जावे लागते. त्यांना निरनिराळे अनुभव येतात. या सर्व गोष्टीवर प्रेमळ देवाचे नियंत्रण आहे व तो कार्य करीत असतो. कित्येकदा आपणास वाटत नाही कि हे खरे आहे, तरी त्यावर विश्वास ठेऊन आपल्याला हे ठाऊक आहे असे कबुल करायला हवे. आपले तारण होण्यापूर्वी देवाला आपल्याविषयी ठाऊक आहे. आपला प्रभू जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ.

शुभवर्तमानमत्तय:१३:४४-५२

     स्वर्गाच्या राज्याचे तीन दाखले आहेत. स्वर्गाच्या राज्यात ज्यांनी ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकार केला आहे त्याचा व जे स्वार्थासाठी स्वत:ला ख्रिस्ती म्हणतात त्यांचा अशा दोन्ही गटांचा समावेश झालेला दिसून येतो.
     देव जगातील लोकांवर प्रीती करतो. ख्रिस्त स्वर्गाचे वैभव सोडून तारणाची योजना पूर्ण करण्यासाठी या जगात आला व त्याने तारणाची योजना पूर्ण केली. यासाठी त्याला आपल्या प्राणाची किंमत भरावी लागली. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते मोठी किंमत भरून विकत घेतलेले आहेत. तसेच जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांना मौल्यवान ठेवीसारखे, तसेच मौल्यवान मोत्याप्रमाणे किंमतीचे सार्वकालिक जीवन मिळते. स्वर्गाच्या राज्यातील लोकांचे चित्र जाळ्यात सापडलेल्या निरनिराळ्या मासळीप्रमाणे आहे. कोळी जाळी टाकतो व जे सर्व लहान-मोठ्या प्रकारचे प्राणी किंवा मासे येतात ते समुद्र किनाऱ्यावर वेगळे करतो व जे हवे ते घेतो व दुसरे फेकून टाकतो. ख्रिस्त या जगावर आपले राज्य स्थापण्यास येईल तेव्हा असेच होईल.

मनन चिंतन:

     आज सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत. देऊळमाता आपणा सर्वांना प्रार्थना करण्यासाठी प्रोस्ताहन करत आहे. प्रार्थना अशासाठी करावी जेणेकरून आपल्याला विवेकबुद्धी व समजूतदारपणा मिळेल व आपल्या जीवनात देवाचे राज्य येण्यासाठी त्याचे महत्व आपणा सर्वांना समजेल. कारण स्वर्गाचे राज्य हे मौल्यवान आहे आणि ते जर आपण गमावून बसलो तर आपण सर्वकाही गमावू व जर आपल्याला भेटले तर सर्वकाही आपल्याला मिळेल. म्हणून हे स्वर्गाचे राज्य आपणा सर्वांना मिळावे यासाठी आपण सर्वांनी आपल्यापरीने प्रयत्न केला पाहिजे. हे स्वर्गाचे राज्य आपणा सर्वासाठी आहे. आपण या धरतीवर येण्यापूर्वी देवाने हे स्वर्गाचे राज्य आपणासाठी बनवून ठेवले आहे म्हणून या स्वर्गाच्या राज्याचे भागीदार आपण व्हायलाच हवे. हे स्वर्गाचे राज्य आपल्याला मिळण्यासाठी आपण शलमोनासारखी प्रार्थना करायला हवी व चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
     आजचे पहिले वाचन खूप छान आहे. हे वाचन ऐकल्यानंतर मला असे वाटते की समजा एका गरीब व्यक्तीला रक्कम न लिहिलेला धनादेश दिला व सांगितले की जी रक्कम लिहायची आहे ती तू लिहून घे व ती तुला दिली जाईल. आपणा सर्वांना ठाऊक आहे की ती गरीब व्यक्ती किती रक्कम लिहिणार.
            माझ्या प्रिय बंधू-भगिनिंनो जर शलोमोनच्या जागेवर आपण असतो तर आपण काय मागितले असते? उत्तम दर्जाची कार, चांगला बंगला, चांगले कपडे, सोने-दागिने, आपल्या खात्यात मोठी रक्कम किंवा चांगल्या दर्जाचे काम जाच्याद्वारे आपल्याला एक लाख असे पगार मिळेल. आपण आपल्या परिस्थितीनुसार आपण कशाप्रकारे श्रीमंत होऊ हे बघण्याचा प्रयत्न केला असता किंवा करु. परंतु शलोमोनाने जगातील मालमत्ता न मागता देवाकडे विवेकबुद्धी व समजूतदारपणा मागितला. जेणेकरून जेव्हा शलोमोन न्याय करील तेव्हा चांगले व वाईट काय हे त्याला समजेल. लोकांना दुखावण्यापेक्षा सर्वांना आनंदी ठेवील. लोकांची सेवा करता येईल. सत्य व असत्य यातील फरक समजेल. पाप व कर्तव्य काय हे समजेल व स्वर्ग राज्यात सर्वांचा प्रवेश चांगला व्हावा यासाठी सर्वांना मार्गदर्शन करता येईल.
     आपण सुद्धा शलोमोनापासून ह्या गोष्ठी शिकायला हव्या. आपण सुद्धा आपल्या जीवनात विवेकबुद्धी व समजूतदारपणा मागायला हवा. जेणेकरून आपणही दुसऱ्यांना मदत करु शकतो व त्यांना आनंदी ठेवू शकतो. कारण जर आपण शलोमोनसारखे वागलो तर आपणा सर्वांना परमेश्वराचा आशिर्वाद मिळेल व आपण जिथे कुठे काम करत आहोत तिथे आपण प्रामाणिक राहूया. परमेश्वर जेव्हा आपल्याला सांगत असतो की माग जे तुला हव आहे आणि परमेश्वर आपणाला देईल. परंतु हे मागत असताना आपण व्यवस्थित विचार करून मागायला हव. याचा फायदा फक्त मला न होता सर्वांना व्हायला हवा याची काळजी घेणे आवश्यक आहे.
     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणा सर्वांना आठवण करून देतो की, जो परमेश्वरावर तनाने व मनाने प्रेम करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व देव तिला किंवा त्याला कधीही दूर टाकणार नाही. संत पौल म्हणत आहे, 'देवाच्या लेकरांना कठीण परिस्थितीतून जावे लागेल. त्यांना कठीण किंवा वेगवेगळे अनुभवही येतील. परंतु या सर्वावर देवाचे नियंत्रण आहे व तोच आपणा सर्वाची काळजी घेईल.' 
     कधीकधी असे प्रसंग येतात की काय कराव हे सुचत नाही. आपल्या योजनेपलीकडे होत असते. उदा: आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही. आपण खूप दुखी झालेलो असतो. आपण आजारी असतो. घरात शांती नसते किंवा कुटुंबामध्ये भांडण-तंटे असतात. आपणा सर्वांना वाटत असते की आता यामधून आपणाला मार्ग सापडणार नाही परंतु काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर आपल्याला मार्ग मिळतो. आपली संकटे दूर गेलेली असतात. असे भरपूर संत होऊन गेले की त्यांच्या जीवनात दु:ख किंवा संकटे आली, वाईट अनुभव सुद्धा आले. परंतु त्यांनी देवावरचे प्रेम कमी केले नाही. सतत देवाच्या सानिध्यात राहिले व त्यांच्या कटू अनुभव चांगला झाला व आज ते संत पदावर पोहचलेले आहोत. उदा: असिसीचे संत फ्रान्सिस आणि संत मदर तेरेजा.
     आपण कुठल्याही परिस्थितीला घाबरून जायचे नाही उलट देवावर विश्वास ठेऊन त्याच्या सानिध्यात राहायला हवं. कारण आतापर्यंत आपली काळजी घेतलेली आहे व घेणार आहे आणि त्यामुळेच आपण इथे सर्व हजर आहोत.
     आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताने आपल्यासमोर तीन दाखले ठेवलेले आहेत. परमेश्वराने हे दाखले अशासाठी दिले आहेत कारण आपणा सर्वांना विवेकबुद्धी व समजुतदारपणा आहे. पहिले दोन्ही दाखले आपणाला निवडण्यासाठी खुले ठेवलेले आहेत. त्यासाठी जगाचे ऐहिक सुख आपल्याला सोडावे लागणार आहे. तेव्हाच आपणा सर्वांना देवाची कृपा मिळणार व आपण स्वर्गाच्या राज्याचे भागीदार बनू. येशू, त्याच्या सर्व शिष्यांना विचारत आहे की तुम्हाला हे दाखले समजले आहेत का? कारण हे स्वर्गाच्या राज्याचे दाखले शिष्यांना फक्त विवेकबुद्धी व समजुतरपणाचे समजणार आहे. म्हणून आपणही शलोमोनासारखे परमेश्वराकडे विवेकबुद्धी व समजुतदारपणाचे हे दान मागू की जेणेकरून आपणालाही स्वर्गाच्या राज्याची किंमत किंवा महत्व कळेल व आपणही राज्याचे भागीदार बनू.  
         
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना एक

1.     ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू, व व्रतस्थ बंधू भगिंनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात काम करत आहेत त्यांना परमेश्वराने चागले आरोग्य द्यावे व त्याच्याद्वारे देवाचे राज्य या जगात यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.     आपल्या धर्मग्रामात मूलगामी समुहाद्वारे समाजबांधणीस वेग मिळावा, प्रत्येक गावात असलेले हेवेदावे दूर होऊन आपण सर्वानी एक कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
 3. आपल्या धर्मग्रामातील आजारी, दु:खी पिडीत लोकांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्याचे आजार व दु:खे दूर व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
4. आपल्या धर्मग्रामातील तरूण व तरुणींना परमेश्वराच्या मळ्यात काम करण्यास पाचारण मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
5.   आता आपल्या सामुहिक व वैयक्तिक गरंजासाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment