Thursday 7 September 2017

Reflection for the Homily of 23rd Sunday in Ordinary Time  (10-09-2017)  By Amit D'Britto. 




सामान्य काळातील तेविसावा रविवार


दिनांक: १०-०९-२०१७
पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०
शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०








प्रस्तावना:

आज देऊळमाता सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करत आहे. आज ख्रिस्तसभा आपल्याला प्रभूशब्दाद्वारे इतरांबरोबर चांगले जीवन जगण्यास, त्यांना मदत करण्यासाठी आवाहन करीत आहे. आपण स्वतः आदर्शमय जीवन जगून आपल्या समाजातील बंधू भगिनींना योग्य मूल्यवान जीवन जगण्यास मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
आजच्या पहिल्या वाचनात प्रभू परमेश्वर संदेष्टा यहेज्केलद्वारे इस्त्रायल लोकांना आदर्शमय जीवन जगण्यास सांगत आहे.  आजच्या दुसऱ्या वाचनात एकमेकांवर प्रेम करणे हीच सर्वश्रेष्ठ आज्ञा आहे असे संत पौल आपणास सांगत आहे. तसेच आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपणास म्हणतो की, जर एखाद्या व्यक्तीने पाप केले, तर अपराध करणाऱ्याबरोबर कसे वागावे व त्याला समाजातून बहिष्कृत न करता त्याला त्यांच्या पापांची क्षमा कशी करावी याविषयी सांगत आहे.
आज ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण समाजात आदर्शमय जीवन जगावे ह्यासाठी प्रभू परमेश्वराकडे कृपा मागुया.

पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९

देवाची वाणी लोकांपर्यत पोचवण्यासाठी देवाला एका व्यक्तीची गरज होती. यासाठी देवाने यहेज्केलची निवड केली होती. यहेज्केलने निराश झालेल्या लोकांना बावीस वर्ष बोध केला. यहेज्केलचा संदेश हा आजच्या ख्रिस्ती व यहुदी माणसांसाठी आहे. आजच्या वाचनात आपल्याला असे दिसून येते की, इस्त्रायल लोकांना सावध करण्याचे काम संदेष्टा यहेज्केलवर सोपवले आहे. देवाने पाठवलेले इशारे, सूचना त्यानेच लोकांना कळवायच्या आहेत. त्याने हे इशारे एखाद्याला कळवले नाहीत तर त्या व्यक्तिच्या भवितव्य विकासासाठी यहेज्केलच जबाबदार राहील. पण त्याने इशारा दिला असला तर त्याचा स्वतःचा बचाव होईल.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०

एकमेकांवर प्रिती करणे हा एक कधीही न फेडला जाणारा श्रण आहे असे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगत आहे. ही आज्ञा पाळल्याने इतर सर्व आज्ञा परीपूर्ण होतात. तसेच संत पौल आवर्जून सांगतो की, प्रिती करणे या आज्ञेतच सर्व आज्ञा सामावल्या आहेत. तसेच संत पौल म्हणतो की, दुसऱ्यावर प्रिती करणे हीच पवित्र शास्त्रातील सर्वात महत्वाची येशूने दिलेली आज्ञा आहे. जर आपण एकमेकांवर प्रिती केली तर आपण नियमशास्त्रातील सर्व आवश्यक्ता पूर्ण करतो. हा येशूने दिलेला नवीन नियम मोशेच्या नियमशास्त्राची परिपूर्ती करतो. व या नियमानुसार जीवन जगण्यास आपणास आवाहन करतो.

शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

   मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला, एखाद्या व्यक्तीने पाप केले तर त्याला परत मार्गावर कसे आणावे ह्याबद्दल माहिती देत आहे. आपला भाऊ परत मिळवणे व त्याला पूर्वपदावर आणणे हेच उद्दिष्ट येथे आहे. त्याला शिक्षा करणे हा तर या वाचनाचा मुळीच हेतू नाही. चुकलेल्या भावाला सर्वप्रथम एकट्याने एकांतात व नंतर ऐकाला किंवा दुसऱ्याला सोबत घेऊन भेटावे. यातून काहीच साध्य झाले नाही तर मग स्थानिक मंडळीला कळवावे. व याद्वारे अपराधी हा वळणावर येईल ही अपेक्षा ठेवावी. जर तसे झाले नाही तर त्या व्यक्तिला वाळीत टाकावे. यामुळे त्या व्यक्तिला धक्का बसून तो पश्चाताप करील आणि अशाप्रकारे त्याला पूर्वपदावर आणता येईल अशी आशा ठेवावी. अशाप्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा समाजातील सर्व लोकांना क्षमा करून त्यांना तारणाचे दार व मार्ग प्राप्त करण्यास पाचारण करीत आहे.

बोधकथा:

सायली व तिची आई ह्या दोघी मॉलमधून परत येत होत्या. तेव्हा तिच्या आईच्या असे लक्षात आले की, सायलीने मॉलमधून एक चॉकलेट चोरले आहे. तेव्हा तिला शिक्षा देण्यासाठी तिच्या आईने तिला परत मॉलमध्ये जाऊन ते चॉकलेट परत देण्यास सांगितले. जेव्हा सायली मॉलमध्ये जाऊन मॅनेजरला भेटून घडलेली कथा सांगितली तेव्हा मॅनेजर म्हणाले, ‘काही काळजी करू नकोस, चॉकलेट ही छोठी वस्तू आहे; परंतु माझे कामगार तर खूप मोठ्या वस्तू चोरी करतात.’ मॅनेजरने सायलीच्या असे लक्षात आणून दिले की, छोट्या वस्तूची चोरी करणे हे योग्य आहे. परंतू सायलीच्या आईच्या मताप्रमाणे कोणतीही चोरी छोटी किंवा मोठी ही फार चुकीची गोष्ट आहे. समाजात ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सर्वांनी असा आदर्श ठेवला पाहिजे व ख्रिस्ताने दिलेल्या सर्व आज्ञेचे व मूल्यांचे पालन केले पाहिजे.

मनन चिंतन:

आजचे शुभवर्तमान हे तीन भागात विभागता येईल. 

१. चुकांची सुधारणा
आपण दुसऱ्यांच्या चुकांची सुधारणा का करावी? दुसऱ्यांच्या चुकांची दुरुस्ती करून आपण असे सिद्ध करू इच्छित नाही की, आपण चांगले व ते वाईट आहेत. तर आपण त्यांना एकत्र येण्यास व चांगल्या मार्गावर चालण्यास मदत करतो. यासाठीच चुकांची दुरुस्ती ही प्रेमाने करावी.
     चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत.
अ) ज्या व्यक्तीने पाप केले आहे त्या व्यक्तीशी समोरासमोर बोलून त्याला त्याच्या वाईट कृत्यांची जाणीव करून देणे व हे सर्व अगदी प्रेमाने व त्या व्यक्तीला अगदी आत्मविश्वास घेऊन करावे.
ब) दुसरी पायरी म्हणजेच जर त्या व्यक्तीने पहिल्या मार्गाचा स्वीकार नाही केला तर त्याला दोन-तीन व्यक्तीच्या प्रत्यक्ष हजेरीत घेऊन त्याला त्याच्या अपमार्गाची जाणीव करून द्यावी व त्याला ख्रिस्ती समूहात सामावून घ्यावे.
क) जर त्या व्यक्तीने दोन-तीन साक्षीदारांचे सुद्धा ऐकले नाही तर मग त्या व्यक्तीला ख्रिस्ती समूहासमोर हजर करावे आणि मग त्या व्यक्तीला त्याच्या पापांची जाणीव करून त्याला ख्रिस्ताने दिलेल्या मार्गावर चालण्यास मदत करावी. या मार्गाचा हेतू हाच असावा की, आपण त्या व्यक्तीला समाजापासून व देवापासून दूर जाऊ देऊ नये.
२. क्षमा
एखाद्या व्यक्तीच्या चुकांची दुरुस्ती करत असताना आपण त्या व्यक्तीला क्षमा  केली पाहिजे. ‘क्षमा करणे’ ही फक्त भावना नसून कृती आहे. कदाचित काही वेळा क्षमा करणे खूप कठीण असते परंतू क्षमा केल्याने आपल्याला खूप फायदे होतात. क्षमा न केल्याने आपण आपल्याच शरीरात विष पसरवत असतो. तसेच क्षमा न केलेल्या व्यक्तीला नकळतच अनेक आजार जडतात व व्यक्ती आपल्या स्वत:च्या जीवनातील आनंद, शांती व सामाजिक समतोल ह्या सर्व गोष्टींना गमावून बसतो.
     जेव्हा आपण क्षमा करण्यास नकार देतो तेव्हा आपण आपल्या स्वत:लाच शिक्षा करत असतो. म्हणून प्रभू येशूप्रमाणे आपल्या जीवनात अतिशय क्षमाशील व दयाळू होणे गरजेचे आहे.
३. प्रार्थना
     जर समाजात काही वाईट कृत्य घडत असताना दिसले किंवा एखादी व्यक्ती पापांच्या मार्गावर चालताना दिसली तर आपण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करावी. एखाद्या व्यक्तीला अतिशय प्रभावीपने सुधारायेचे असेल तर आपण त्यासाठी प्रार्थना करावी. कारण दुसऱ्यांमध्ये बदल हा आपल्या चांगल्या शब्दामुळे होत असतो. ज्याप्रमाणे प्रभू पौलाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो, त्याचप्रमाणे तो इतरांसाठी सरळ मार्गावर येण्यास प्रवृत्त करतो. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू द्या करून आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी प्रभू येशूची प्रेमाची व क्षमेची शिकवणुक साऱ्या जगात पसरावी म्हणून प्रार्थना करूया.
२. प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक युवक व युक्तींनी पुढे यावे व त्यांना योग्य असा पाठिंबा व मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. सर्व आजारी व पिडीत लोकांनी प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून सुटका होऊन त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपण सर्व ख्रिस्ती भाविकांनी प्रभू येशूने दिलेल्या प्रेमाच्या व क्षमेच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावे व समाजात योग्य असा आदर्श निर्माण करावा यासाठी प्रार्थना करूया.
५. आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment