Thursday 14 September 2017

Reflection for the Homily of 24th Sunday in Ordinary Time  (17-09-2017)  By Isidore Patil. 






सामान्य काळातील चोविसावा रविवार


दिनांक: १७-०९-२०१७
पहिले वाचन: बेनसिराक २७:३०-२८:
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:-
शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५





"प्रभू ऐकमेकांना क्षमा करण्यास बोलावीत आहे"


प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वराच्या अमर्यादित प्रेमाचा व क्षमेचा अनुभव घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात ऐकमेकांना क्षमा करण्यास बोलावीत आहे
बेनसिरा यांची बोधवचने शेजाऱ्याविषयी कुभावना, संताप व द्वेष ह्यांच्यातून होणारे दुष्परिणाम व्यक्त करतात. म्हणून देवाची कृपा व क्षमा मिळविण्यासाठी हे सर्व सोडून क्षमाशिल होण्यास सांगत आहे. संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की येशू, मरण व पुनरुत्थानाद्वारे मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू आहे.’ मत्तयलिखित शुभवर्तमानात कृतघ्न चाकराच्या दृष्टांताद्वारेप्रभू येशू आपणा सर्वाना देवाच्या अपार क्षमाशिलतेचा अनुभव घेऊन जीवनात क्षमा व दया अंगीकारण्यास बोलावीत आहे.            देव प्रेमळ आहे. देवाची दया व क्षमा अनुभवण्यासाठी आपल्याला संताप, कुभावना, द्वेष सोडून देण्याची फार गरज आहे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र ख्रिस्त यागात सहभागी होत असताना मागूया.

पहिले वाचन: बेनसिराक २७: ३३-२८:

बेनसिरा आपल्याला सांगतो की जो मनुष्य शेजाऱ्यावर क्रोध, कुभावना, राग  व्यक्त करतो तो पापांस बळी पडतो. जो मनुष्य आपल्या शेजाऱ्यावर द्या, क्षमा व प्रेम  दाखवतो त्याच्यावर देव सुध्दा नेहमी संतुष्ट असतो. परमेश्वर हा दयाळू आहे. तो नेहमी विश्वासू लोकांवर द्या दाखवतो. देवाची क्षमा व प्रेम अनुभवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तींनी आपला स्वभाव शांत ठेऊन आपल्या शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने व अंतकरणाने प्रेम केले पाहिजे.  

दुसरे वाचन: रोमकरास पत्र: १४: -

संत पौल सांगतो की आपण बाप्तिस्माद्वारे येशूच्या मरण व पुनरुत्थानात सहभागी झालेलो आहोत. आपण जिवंत किंवा मेलेले असलो तरी आपण येशूचे झालेलो आहोत. आपण सर्वांनी प्रभूसाठी जगले पाहिजे. प्रभू येशु एकदाच मेला व तो आता युगानयुगे जिवंत आहे. प्रभू येशू हा सर्व विश्वासू लोकांचा प्रभू आहे; मग ते मेलेले असोत किंवा जिंवत असोत.

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५

सात वेळा पापक्षमा करून मी फारच उदारपणा दाखवीत आहे असे पेत्राला वाटले. जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” येशूच्या ह्या उत्तराने पेत्राला मोठा धक्काच बसला. येशू पेत्राला देवाच्या अमर्यादित क्षमेचा अर्थ समजून देण्यासाठी कृतघ्न चाकराचा दृष्टांतत्याच्यापुढे ठेवतो. शुभवर्तमान सांगते की एक नोकराला आपल्या राजाला कर्ज द्यायचे होते. कर्ज परतफेड न करता आल्यामुळे राजाने त्याच्यावर दया दाखवून त्याचे सर्व कर्ज माफ केले. त्यानंतर त्या कर्जदाराला त्याचा एक सोबती भेटला ज्याने त्याचे शंभर रुपये घेतले होते. त्या व्यक्तीने विनवणी करून सुद्धा त्याला माफी मिळाली नाही. उलट त्याने त्याला तुरुंगात टाकले. राजाने दाखविलेल्या क्षमेची त्याला आठवण झाली नाही. नंतर जेव्हा राजाला माहिती पडले तेव्हा त्याने त्या क्रूर दासाला शिक्षा केली व कर्ज फेडीपर्यत त्याने तुरुंगात ठेवले. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले सर्व दाखले स्वर्गाची वाट दाखवतात. देवाचे राज्य हे क्षमेचे व प्रेमाचे आहे. म्हणून देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आपण ऐकमेकांना क्षमा केली पाहिजे जेणेकरून देव आपल्याला क्षमा करेल.

बोधकथा:

     संपत्ती आणि जमीन ह्यांच्या वाटपावरून दोन श्रीमंत ख्रिस्ती भावामध्ये वैर व सुडाची भावना वाढीस लागली. लहान भावाच्या घराशेजारी सुंदर फुलबाग होती. एक दिवस मोठ्या भावाच्या मुलीने त्या बागेमधील फुले तोडण्यास बागेत शिरली. हे पाहुन तिच्या मागे ऐकाने आपला कुत्रा सोडला. त्या कुत्र्याने तिला चावले व ती रक्तबंबाळ झाली आणि तिथेच गतप्राण झाली. मोठा भाऊ काहीच तक्रार करु शकला नाही, कारण चुकी त्याच्या मुलीची होती. परंतू, तो बदला घेण्याची संधी पाहू लागला. दोन्ही भावांनी पाऊस पडल्यावर शेकडो एकर जमिनीत बियाणं पेरलं. पावसाने मध्येच दांडी मारल्याने रुजलेले बियाण फुकट गेलं. मोठ्या भावाकडे पुन्हा पेरण्यासाठी भरपूर बियाणं होते. परंतू, छोट्या भावाकडे मात्र काहीच शिल्लक नव्हते. छोट्या भावाला बियाणं उसने घेण्याकरीता तोंड नव्हते. दोघे भाऊ एकमेकांचे मरणशत्रू झाले होते. माझ्या भावाचे बियाणं नसल्यामुळे काही लाखांचे नुकसान होणार ह्यापेक्षा मोठा सूड कोणता असू शकतो असे मोठ्या भावाला वाटले. परंतू, ह्या त्याच्या हट्टी स्वभावामुळे मोठ्या भावाला रात्रीची झोप येत नव्हती आणि जेवणही गोड लागत नव्हते. मध्यरात्रीपर्यंत झोप न आल्यामुळे त्याने लाईट लावली तर त्याची नजर भिंतीवरील क्रुसावर गेली. तेथे लिहिलेले शब्द त्याच्या हृदयात शिरले, ते शब्द असे होते, क्षमा सात वेळा नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी” व “हे पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहित नाही.” अशी वाक्ये वाचून तो सर्व राग व सूड विसरला. आपल्या दोन नोकरांना त्याने उठवले. बियाणांची वीस मोठी पोती भरलेली घेऊन तो आपल्या भावाच्या घराजवळ गेला. दार उघडताच जोराने त्याने भावाला मिठी मारली व म्हणाला, ‘क्रूसावरील ख्रिस्ताने मला तुला क्षमा करायला पाठवले आहे व तुझ्या शंभर एकर शेतजमिनीत पेरण्याकरिता मी वीस पोती बियाणं घेऊन आलो आहे’. ती समेटाची व समंजसपणाची कृती पाहून अपराधी भावाने गहिवरलेल्या शब्दांमध्ये माफी मागितली आणि भावाचे आभार मानले.

मनन चिंतन:

     दैनंदिन जीवनात ऐकमेकांना क्षमा करणेखूप कठीण आहे. पण खरोखर जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहायचे असेल तर आपण शेजाऱ्याविषयीची कुभावना, संतापद्वेष बाजूला सारून त्यांना खऱ्या अंतकरणाने क्षमा करायला पाहिजे. परंतू, किती वेळा आपण ऐकमेकांना क्षमा करावी? जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” ह्याचा अर्थ म्हणजे आपली क्षमा अमर्यादित असली पाहिजे. हे कृतीत आणणे खूप कठीण आहे. पण जर आपण देवाच्या आज्ञेनुसार वागलो तर आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडून येऊ शकतो. जीवनात कित्येकवेळा आपण पाप करतो. पापांची कबुली करून देवाकडे क्षमेची व दयेची याचना करतो, असे असूनही आपण पाप करणे बंद करत नाही. राग, द्वेष, संताप इत्यादी वाईट गुणामुळे आपले देवावर असलेले नाते तुटून जाते. म्हणून देवाची कृपा व क्षमा मिळविण्यासाठी हे सर्व सोडून क्षमाशिल होण्यास बेनसिरा सांगत आहेयेशूने लोकांवर मरेपर्यंत प्रीती केली. “हे बापा त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही (लुक २३:३४).” परंतू, येशूच्या प्रीतीचे फळ त्याला केवळ मरणच प्राप्त झाले. तसेच संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की येशू मरण व पुनरुत्थानाद्वारे मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू आहे.’ जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” प्रभू येशू आपणा सर्वाना देवाच्या अपार क्षमाशिलतेचा अनुभव घेऊन जीवनात क्षमा व दया अंगीकारण्यास बोलावीत आहे. आपण दररोज प्रार्थना करतो. परंतू, प्रार्थनेचे योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्या अंतकरणात राग, द्वेष व क्रोध असतो. आपण येशूने शिकविलेल्या प्रार्थनेत मोठ्या विश्वासाने बोलतो की, ‘जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.’ ह्याद्वारे आपण देवाला आपल्या पापांची क्षमा करण्यास विनंती करतो. जर आपण दुसऱ्यांना त्यांच्या पापांची क्षमा केली नाही तर देव सुद्धा आपल्याला आपल्या पापांची क्षमा करणार नाही. आपल्या जीवनात सुद्धा असे होऊ नये म्हणून आपण ऐकमेकांना क्षमा करून क्षमाशिलता अंगिकारली पाहिजे. कारण आजची उपासना आपल्याला क्षमा करण्याचा बोध देत आहे. ऐकमेकांना क्षमा करण्यासाठी आपल्याला देवाची कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐकून घे.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी व प्रांपचिक यांना ख्रिस्तमळ्यात काम करत असताना त्यांच्यावर देवाचा आशिर्वाद असावा तसेच त्यांनी देवाच्या दैवी क्षमेचा अनुभव लोकांपर्यत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या कुटुंबामध्ये शुल्लक गोष्टीवरून भांडणे, तंटे व वादविवाद निर्माण होतात व कुटुंबातील प्रार्थनामय जीवन व शांती नष्ट होते, अशा कुटुंबांना देवाच्या दयेचा व क्षमेचा स्पर्श व्हावा आणि त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन शांतीचे व क्षमेचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.  
३. आपल्या देशामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, स्त्रीयावर अत्याचार असे प्रकार वाढत आहेत. प्रत्येकाने इतरांच्या प्रतिष्ठेचे भान ठेवून चांगली वागणूक दाखवावी व कुणालाही कमी न लेखता त्यांचा आदर राखावा व राजकीय पुढाऱ्यांनी देशाची निस्वार्थी सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आजच्या तरूण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड दयावे लागत आहे. प्रसंगी ते निराश होत आहेत. या तरूण पिढीत असलेला उत्साह कायम टिकून राहावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.


    
    


No comments:

Post a Comment