Thursday 21 September 2017

Reflection for the Homily of 25th Sunday in Ordinary Time  
(24-09-2017)  By Godfrey Patil. 







सामान्य काळातील पंचविसावा रविवार




दिनांक: २४/०९/२०१७
पहिले वाचन: यशया ५५:६-९
दुसरे वाचन: फिलीपीकरांस १:२०-२४,२७
शुभवर्तमान: मत्तय २०: १-१६






प्रस्तावना :

     आज देऊळमाता सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला स्वर्गराज्य मिळविण्यासाठी दैवी उदारता व दानशूरता अंगी बाळगण्यास आमंत्रण देत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला देवाची कल्पना तुमची कल्पना नव्हेत, त्याचे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत ह्या विषयी साक्ष देत आहे. तर आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणाला स्वर्गराज्यासाठी व देवासाठी संपूर्ण आयुष्य बहाल करण्यास आव्हान देत आहे. तसेच आजच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानात प्रभू येशूख्रिस्त दाखल्याद्वारे देवाच्या उदारपणाचे व दानशूरतेचे विवेचन केलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्यात स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर न करण्याचा इशारा ख्रिस्त देत आहे.
     आज मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपणाला देवाच्या उदारपणाचे, त्याच्या प्रेमाचे व क्षमेचे दान मिळावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन : यशया ५५:६-९

     आजच्या पहिल्या वाचनात प्रेरक गणला जाणारा देवाचा संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे देव सर्वांसाठी त्याच्याजवळ येण्याचा मार्ग मोकळा करत आहे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास प्रोस्ताहन देत असून, पापी लोकांस पाप सोडून नितीमत्व अंगी बाळगण्यास तसेच स्वत:च्या कल्पना सोडून देवाचे विचार व कल्पना सिद्धीस नेण्यास जणू प्रेरणादायी उपदेश करत आहे. यशया संदेष्ट्याद्वारे देव सर्वाना स्वत:कडे बोलावत असून, देव म्हणतो की, “तुम्ही मजकडे या, मी क्षमाशील आहे; माझ्या विचारांना, माझ्या कल्पनांना तुमच्या जिवनात स्थान द्या, माझ्या मार्गावर चाला, म्हणजे स्वर्गराज्यात तुमचा समावेश केला जाईल.” येथे आपणास देवाची उदारता दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी खुद्ध देव यशया संदेष्ट्याद्वारे तारणदायी संदेश आजच्या पहिल्या वाचनात देत आहे.  

दुसरे वाचन : फिलीपीकरांस १:२०-२४,२७

     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिपीकरांस ख्रिस्ताला पांघरण्याचा, ख्रिस्तामध्ये जीवन जगून खुद्ध ख्रिस्त बनण्याचा इशारा देत आहे. ख्रिस्ताची सुवार्ता अंगी धारण करून जगणे किवा मरणे हे केवळ ख्रिस्तासाठीच असले पाहिजे, व शेवटी जगताना ख्रिस्तासमवेत जगावे तर मरताना ख्रिस्त इतरांना देणे ह्या दोन बाबींचे अतिशय उत्कृष्टपणे वर्णन केलेले आपणाला दिसून येते. आपल्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा हा नक्कीच होतो. परंतू, आपल्या चांगल्या कार्याने मरणानंतर देखील त्याचा गौरव होऊ शकतो म्हणून संत पौल आवर्जून सांगतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.

शुभवर्तमान : मत्तय २०:१-१६

     मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्त एका दाखल्याद्वारे स्वर्गराज्याचे भागीदार होण्यास आमंत्रण देत आहे, तसेच नीतिमान व पापी ह्यांच्यातील भेदाची तफावत नष्ट करित आहे. देव कधीच भेदभाव करीत नाही. सर्वाना तो समानतेने वागवतो. अशाप्रकारे प्रेमाच्या व क्षमेच्या उदारतेने व दानशूरतेने देव आपणा प्रत्येकास स्वर्गराज्याचे हक्कदार होण्यास पात्र ठरवत आहे. शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना न करता, स्वतःला श्रेष्ठ न समजता, दुसऱ्याच्या कमीपणात स्वतःचे योगदान देऊन समाजात जणू समानता प्रस्थापित करण्याचा संदेश ख्रिस्त आपणास देत आहे. अशाप्रकारे उदारता, दानशूरता व समानता ह्या तत्वाच्या माध्यमातून ख्रिस्त आपणास स्वर्गराज्यासाठी झटण्यास आव्हान देत आहे.    

बोध-कथा :

     श्रीमंत घराण्यातील एक देखणी बाई धर्मगुरूकडे येते आणि म्हणते की माझ्याकडे खूप संपत्ती व पैसा आहे. सर्व काही जे मला हवं आहे त्याची काहीच कमतरता नाही, परंतू, कुठेतरी मानसिक सुखाची उणीव मला भासत आहे, कुठेतरी मला माझे हे जीवन असमाधानी वाटत आहे. तिचे हे सर्व बोलणे ऐकून धर्मगुरूंनी चर्चमध्ये काम करणाऱ्या बाईला बोलावले व तिच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचे कथन करावयास सांगितले. ती म्हणाली की दोन वर्षा अगोदर माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला व लगेच त्याच्या तीन महिन्यानंतर माझा मुलगा अपघातात मरण पावला. त्या क्षणा पासून मी हसणे विसरली होती व माझ्या जीवनात जणू दुःखाची मालिकाच सुरु झाली होती. खूप वेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. एके दिवशी मी घरात काम करत असता एक छोटस मांजरीचं पिल्लू आवाज करत घरात शिरलं, त्याच्या आवाजावरून मला जाणवल की हे पिल्लू खूप भुकेलेल आहे. मी स्वयपाक घरात गेली व थोडस दुध त्या मांजरीच्या पिल्लाला दिले. दुध पिऊन झाल्या नंतर त्या पिल्लाने हळूवारपणे माझ्या पायाला स्पर्श करायला सुरवात करून मला जणू स्मित हास्स दिले. मग मी त्या पिल्लाला माझ्या वेंगेत  घेऊन त्याच्याशी जणू खेळायला लागली त्या क्षणाला मला कळून चुकल की मी कुठेतरी माझ दुख विसरत चालली आहे. मी विचार करायला लागली की मी दिलेल्या त्या एक प्याला दुधाने मला खरंच आनंद झाला. तेव्हा पासून मी विचार केला की माझ्याकडे जे काही आहे ते मी इतरांना देईन व मी ते करायला सुरवात केली. मी गरजवंताना मदतीचा हात पुढे केला, आजाऱ्यानां भेटी द्यायला सुरवात केली. आज मला असं वाटते की माझ्या जीवनात सुरु झालेली ती दुख:ची मालिका संपलेली आहे, मला तर असं वाटते की माझ्या इतका आनंदी ह्या जगात कोणीच नसेल. हे सर्व ऐकून त्या श्रीमंत बाईचे डोळे पाण्याने भरून आले व तिने आपली संपत्ती गरिबांना दान करण्याचे ठरवले.

मनन-चिंतन :

ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत,
ज्यांचे स्वर जुळूनी आले त्यांनी दोन गाणी द्यावीत,
ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे,
शेवटी उदारपणात आपले सर्वस्व ख्रिस्ताप्रमाणे दुसऱ्यास द्यावे.

       दानशूरता व उदारता आपणा प्रत्येकाच्या अंगी धारण करण्यास ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. शुभवर्तमानातील दाखल्याद्वारे ख्रिस्त सर्वाना समानतेने वागवून जणू स्वर्गराज्यातील समानतेची व दैवी उदारपणाची प्रचिती प्रतिबिंबित करीत आहे. पहाटेस आलेल्या मजुरास एक रुपया व अकराव्या तासास आलेल्या मजुरास देखील एकच रुपया, असा त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला. मानवी दृष्ट्या हा अन्याय झालेले दिसतो, पण खरं पाहता हा अन्याय मुळीच नाही. कारण मालकाच्या व मजुराच्या ठरावानुसार योग्य तेच पहिल्यास व शेवटच्यास मिळाले. ठराव करून मालकाने मजुरी जर का कमी दिली असती तर अन्याय झाला असता पण ठरवल्याप्रमाणे योग्य तिच मजुरी मालकाने दिली. शेवटच्याला पहिल्या इतकेच देणे हे मालकाच्या दानशूरतेचे लक्षण आहे.
येशू ख्रिस्ताच्या काळात एक दिवस जर का मजुराला काम मिळाले नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब उपाशी राहत असे व ज्याला सकाळीच काम मिळत असे तो आनंदीत होत असे ख्रिस्ताला कामगाराच्या हाल अपेष्टा व उदारनिर्वाहाची पुरेपूर जाणीव होती म्हणून त्याच परिस्थितीला साजेसा असा दाखला ख्रिस्त कथन करतो. ह्या दाखल्यात ख्रिस्ताच्या नजरेत उशिरा येणारे कामगार म्हणजे पापिलोक जे देवशब्द ऐकतात व पश्चाताप करतात आणि सकाळी आलेले कामगार म्हणजे शास्त्री व परुशी जे पाप्यांना कमी लेखतात, जे स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांबरोबर आपल्या श्रेष्ठत्वाची तुलना करतात.
      देव उशिरा आलेल्या कामगारावर समानतेने प्रेम करतो व त्यांना क्षमा करुन स्वर्ग-राज्यात स्थान प्रधान करतो. दोन हजार वर्षा पूर्वी कथन केलेला हा दाखला आज सुद्धा आपल्या प्रत्येकाशी व समाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निगडीत आहे. आज समाजात नजर टाकली तर दिसून येईल की  माणूस उदारता हे ख्रिस्ती तत्व विसरून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नाती-गोती तर विसरतोच पण त्याच बरोबर कोर्टाची पायरीसुद्धा चढतो. का? कारण आज माणूस फक्त ‘मी आणि माझे’ ह्याच गोष्टीचा विचार करतो व ह्या स्वार्थी वृत्तीमुळे भाऊ भावाला, तर माणूस माणुसकी विसरत चालला आहे. माणसाने स्वार्थीपणाला आलिंगन देऊन उदारता, प्रेम, क्षमा व समानता सारख्या ख्रिस्ती मूल्यांना विसरत चालला आहे. म्हणून देऊळमाता आपणा प्रत्येकाला आजच्या उपासनेद्वारे ख्रिस्ताच्या उदारपणाची आठवण करून देत आहे व स्वर्गराज्याचे भागीदारी होण्यास पाचारण करीत आहे. मग तो आपल्या जिवनातील सुरवातीचा तास असु दे कि शेवटचा. स्वर्गाचे राज्य आपण मिळवू शकतो. गरज आहे ती फक्त देवाच्या मळ्यात निस्वार्थीपणे काम करण्याची व सर्वाना समानतेने वागवण्याची.
      शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्यात तुलनात्मक बाबीचे वर्णन केलेले आपणास दिसून येते. दाखल्यात नमुद केल्याप्रमाणे, जेव्हा मालक कामगारांस समानतेने वागवतो व समान मोबदला देतो तेव्हा पहाटेस आलेले कामगार मालका विरुद्ध कुरकुर करायला लागतात व स्वतःची दुसऱ्या बरोबर तुलना करून स्वतःला श्रेष्ठ समजतात व जणू शास्त्री व परुशाप्रमाणे स्वतःच्या पुण्यत्वाची तुलना इतर पापी लोकांबरोबर करतात. कधीकधी आपण सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कमी लेखतो, जेव्हा जेव्हा आपण इतरांना कमी लेखतो तेव्हा तेव्हा आपण शास्त्री व परुशी प्रमाणे स्वार्थात गुंततो. त्याच स्वार्थातून बाहेर पडण्यास आपली देऊळमाता आपणा प्रत्येकाला आजच्या उपासनेद्वारे बोलावत आहे.    
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आज आपण आपल्या पवित्र ख्रिस्तसभेसाठी विशेष प्रार्थना करूया. आपले पोप, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभागिनी व धर्मबंधू यांना प्रभुची सुवार्ता पसरविण्यासाठी भरपूर असा आशिर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
 ३. हे प्रभू परमेश्वरा, जी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीत, त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझ्या कृपेने त्यांचे मनपरिवर्तन व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करतो; ह्या आपत्तीतून बाहेर येऊन नवीन जीवन सुरु करण्यास तू त्यांना मदत कर तसेच नव्याने जीवन जगण्यास त्यांना भरगोस अशी मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.     

No comments:

Post a Comment