Thursday 17 May 2018


Reflection for the homily of the Feast of Pentecost (20/5/2018) By Br. Amit D'Britto 




पेन्टेकॅास्टचा सण

दिनांक: २०/०५/२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: २: १-११
दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२: ३-७, १२-१३
शुभवर्तमान: योहान: २०: १९-२३




प्रस्तावना:

            आज देऊळमाता पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत आहे. आजच्या दिनी शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला व पवित्र आत्म्याच्या वरदानांनी परिपूर्ण होऊन त्यांनी प्रभूची सुवार्ता पसरविण्याच्या कार्यास सुरुवात केली.
     येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मरणानंतर सर्व शिष्यांनी घाबरून स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवले होते. येशूप्रमाणे छळ होऊन त्यांना देखील क्रूसावरील मरण सोसावे लागेल ह्या विचाराने ते भयभीत झाले होते. पंरतु आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त त्यांना पवित्र आत्म्याच्या दानांचे अभिवचन देतो. पवित्र आत्मा सदैव त्यांच्या बरोबर राहून त्यांना त्यांच्या कार्यात सहाय्य करील असे आश्वासनही देतो. ह्याच प्रभूवचनांवर विश्वास ठेऊन त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवली.
     शिष्यांप्रमाणे आपलादेखील पवित्र आत्म्यावरील विश्वास दृढ व्हावा व आपण ख्रिस्ताची सुवार्ता इतरापर्यंत पोहचविण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपणास लाभावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: २: १-११

     बारा प्रेषित व त्यांच्यासोबत असलेल्या शिष्यगण एकचित्ताने प्रार्थना करीत पवित्र आत्म्याच्या आगमनाची वाट पाहत होते. पेंन्टेकाँस्टच्या दिवशी म्हणजे पास्कानंतरच्या पन्नासाव्या दिवशी ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात स्वर्गातून आवाज आला. तो सोसाट्याच्या वाऱ्यासारखा होता. त्या आवाजाने ज्या घरात ते सर्व बसले होते ते घर भरून गेले; आणि त्यांना अग्नीच्या जीभासारख्या जीभा दिसल्या. त्या वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर बसल्या व नंतर सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तसेच आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

 दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२: ३-७, १२-१३

     पवित्र आत्मा एकच आहे. विविध प्रकारची कृपादाने एकाच उगमापासून, देवापासून येतात. देवानेच ती सर्वांच्या समान हितासाठी दिली आहेत. हाच आत्मा प्रभू व देव ह्याच्या कडून विविध प्रकारची कृपादाने, देणग्या व सेवाकार्य होत असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी नव्हे तर सार्वजनिक हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण होते.
     कृपादाने विविध आहेत, तरी ती एकाच आत्म्यापासून मिळतात. आत्म्याने एकाच शरीरात बाप्तिस्मा होतो. त्यात वांशीक भेदाभेद, लौकिक दर्जा- प्रतिष्ठा वैगेरेमुळे काहीच फरक पडत नाही. आपण सर्वजण पवित्र आत्म्याठायी एकच आहोत. कारण आत्माच आपल्या आध्यत्मिक जीवनाचा उगमस्त्रोत आहे.

शुभवर्तमान: योहान: २०: १९-२३

     येशू शिष्यांना दर्शन देतो. येथे भयाची भावना मावळून आनदांचा भाव झपाट्याने पुढे आल्याचे आपणास दिसून येते. पुन्हा उठलेल्या प्रभुने उच्चारलेले शांतीचे वचन हेच त्यांच्या आनंदाचे कारण आहे. “तुम्हास शांती असो” – येशूच्या मुखातून आलेल्या ह्या शब्दातून त्याने आपली स्वतःची शांती शिष्यांना दिल्याचे दिसून येते. शिष्यांना आपले हात व क्रुसावरचे खिळल्याचे घाय दाखवून त्यांच्या मनातील शंका काढून टाकली.
     “शांती असो” हे वचन महत्त्वपूर्ण आहे. कारण येशूला पित्याकडून शांती पसरविण्याची जी कामगिरी मिळाली होती तीच शिष्यांमार्फत पूर्ण करण्यासाठी हे शांतीवचन सांगितले आहे.

मनन चिंतन:

     आज आपण पवित्र आत्म्याचा सण साजरा करत आहोत. ‘पेंन्टेकाँस्ट' ह्या शब्दाचा अर्थ पन्नास असा आहे आणि हा यहुदी लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे. यहुदी लोकांसाठी हा सण मिळालेल्या पिकाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. परंतु ख्रिस्ती लोक हा सण येशूच्या पुनरुत्थानानंतर पवित्र आत्म्याचा सण म्हणून साजरा करतात. कारण ह्या दिवशी पवित्र आत्मा येशूच्या शिष्यांवर उतरलेला व ते वरदानाने परिपूर्ण झाले. पेंन्टेकाँस्ट हा एक क्षण आहे जेव्हा देव स्वतःला अतिशय शांतपणे प्रगट करतो.
     पवित्र आत्मा हा त्रैक्यामधील तिसरा व्यक्ती आहे. पिता व पुत्र ह्या प्रमाणे तो सुद्धा परिपूर्ण असा देव आहे. तसेच तो पिता व पुत्र ह्यापासून वेगळा आहे. प्रभू येशू अनेक वेळा पवित्र आत्मा पाठवण्याचे वचन देतो व त्याने जाहीर केल्याप्रमाणे तो हे वचन पूर्तीस आणतो.
     दृढीकरण हा संस्कार विशेषकरून पवित्र आत्मा स्विकारण्याचा संस्कार आहे. ह्या संस्काराद्वारे आपण पवित्र आत्म्याने भरून जातो व आपण ख्रिस्ताचे साक्षीदार बनतो. तसेच आपल्याला पवित्र आत्म्याची अनेक ‘दाने’ व ‘फळे’ मिळतात.
     पवित्र आत्म्यासाठी अनेक प्रतिके वापरण्यात येतात. ‘पाणी’ हे प्रतिक पवित्र आत्म्याचे स्नानसंस्कारातील कार्य सूचित करते. तसेच ‘अग्नि’ हे प्रतिक आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणते. तसेच ‘कबुतर’, ‘वारा’ अशी सुद्धा प्रतीके बायबलमध्ये पवित्र आत्म्यासाठी वापरण्यात आलेली आहेत.
     प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पाठविण्यात आलेल्या पवित्र आत्म्याद्वारे ह्या भूतलावावर अनेक व्यक्तीमध्ये परिवर्तन घडून आले आहे व ह्या गोष्टी आपण स्वतःहून ऐकल्या आहेत. पुष्कळ व्यक्तींना पवित्र-आत्म्याचे वरदान प्राप्त झालेले आहे. तसेच आपणास  बायबलमधील संत पौलाच्या परिवर्तनाच्या गोष्टीबद्दल परीचय आहे. संत पौलाला ख्रिस्ती महासभेचा एक भक्कम असा पाया म्हणून समजले जाते. त्यांच्याद्वारे अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. आज सुद्धा समाजात पवित्र आत्म्यामुळे अनेक बद्दल घडून येत आहेत आणि ह्या अनेक लोकांपैकी आपण सुद्धा त्यांच्यामधील एक असू शकतो.
     पवित्र आत्म्याचे वरदान प्राप्त करण्यासाठी पुढील तीन गोष्टींची गरज आहे.
१.     समजूतदारपणा – पवित्र आत्मा हे काही काल्पनिक गोष्ट नाही तर तो प्रत्येक्षात व खरेपणाने हजर आहे हे आपण समझून घेतले पाहिजे व मान्य केले पाहिजे.
२.     शरण जाणे – आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी त्यास शरण गेले पाहिजे व त्यासाठीच पापमुक्त होणे गरजेचे आहे.
३.     विश्वासामध्ये चालणे – आपण आपल्या जीवनात पापामध्ये मरून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जिवंत झालो पाहिजे व आपले जीवन देवावरील विश्वासात बळकट केले पाहिजे.
तसेच आपल्या जीवनात पवित्र आत्म्याची वरदाने लाभण्यासाठी आपण प्रभूकडे नेहमी प्रार्थना करावयास फार गरजेचे आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू, आम्हांस तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर”.

१.     प्रभू येशूची सुवार्ता घोषित करणारे आपले पोप महाशय, महागुरु, धर्मगुरू, धर्मबंधू- भगिनी व सर्व व्रतस्त यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव सदैव होत रहावा व त्यांच्या कार्यावर लागणाऱ्या सर्व गरजा त्यांना मिळाव्या म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     प्रभू येशू ह्या भूतलावावर शांतीचे साम्राज्य पसरविण्यास आला होता. हीच शांती आपल्या कुंटुंबात यावी व आपले जीवन सुखमय बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     आज पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत असताना आपल्या सर्वावर पवित्र आत्म्याचा भरपूर असा वर्षाव व्हावा व आपले जीवन अधिक पवित्र होण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.     ज्या लोकांचा विश्वासामुळे छळ होत आहे अश्या लोकांना प्रभूची कृपा लाभावी व ते पवित्र आत्म्याच्या द्वारे अधिक सामर्थ्यवान व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५.     थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment