प्रभूचे स्वर्गरोहण
दिनांक: १३/५/२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: १: १-११
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र: ४: १-१३
शुभवर्तमान: मार्क १६: १५-२०
“विश्वास ठेवून
आज्ञा पाळा, ख्रिस्त
तुम्हांबरोबर आहे!”
प्रस्तावना:
प्रिय
बंधू-भगिनींनो, आज पवित्र देऊळमाता प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहे. प्रभू येशू ह्या जगात आपल्या
सर्वांच्या तारणासाठी आला. त्याने आपल्या कार्याद्वारे देवाचे प्रेम काय, किती व
कसे आहे हे सिद्ध केले. तसेच त्याने विश्वासाचे महत्त्व सुद्धा आपणास पटवून दिले.
चाळीस दिवस येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसमवेत राहून त्यांना सुवार्तेचा प्रसार
जगजाहीर करण्यास सज्ज केले.
आजच्या पहिल्या
वाचनात आपण येशू ख्रिस्ताच्या पवित्र स्वर्गरोहणाविषयी व पवित्र आत्म्याच्या
सामर्थ्याने कशा प्रकारे शिष्य येशूचे साक्षीदार बनले ह्या विषयी ऐकतो. दुसऱ्या
वाचनात संत पौल इफिस मंडळीतील लोकांना प्रीतीने, विश्वासाने व ऐक्याने वागण्यास
प्रोत्साहन करत आहे. तसेच आजच्या मार्कलिखित शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांस
अखेरची आज्ञा देतो व त्यांना विश्वासू राहण्यास सांगत आहे.
आज ख्रिस्तसभा
आपल्याला ह्याच महान आज्ञेचे प्रचारण करण्यास बोलावीत आहे. आपल्या विश्वासू जीवनात
आपण सुद्धा सुवार्तेच्या प्रचारासाठी नेहमी
तत्परतेने झटत राहावे म्हणून ह्या पवित्र
मिस्साबलीदानामध्ये विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची
कृत्ये: १: १-११
आजचे पहिले वाचन
आपल्याला येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी सांगत आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर
चाळीस दिवसापर्यंत येशूने प्रेषितांना दर्शन दिले व देवाच्या राज्याविषयी
सांगितले. चाळीस दिवसांनी येशू त्यांच्या डोळ्यादेखत वर घेतला गेला. ही घटना दिसणारी
होती. सर्वजन आकाशाकडे निरखून पाहत होते. जर का येशू सरळ अदृश्य झाला असता तर
शिष्य वर पाहण्याऐवजी आजूबाजूला किंवा अवतीभवती पाहत राहिले असते.
तो परत येणार आहे अशी खात्री त्यासमयी शुभ्र
वस्त्रे परिधान केलेल्या दोन पुरुषांनी (निःसंशय देवदूत) दिली. तसेच येशू ख्रिस्ताने
स्वर्गात जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना काही काळ यरुशलेमेत राहण्याची आज्ञा केली.
ख्रिस्ताविषयी साक्ष देण्यासाठी त्यांना येशू ख्रिस्ताकडून व पवित्र आत्म्याकडून
सामर्थ्य मिळाले. म्हणून स्वर्ग राज्याची पुनःस्थापना होणे जितके निश्चित होते तेवढेच
येशूचे परत येणे ही निश्चित आहे.
दुसरे वाचन: इफिसकरांस
पत्र: ४: १-१३
दुसऱ्या वाचनात
संत पौल इफिस मंडळीतील सर्व लोकांनी कसे प्रीतीने, विश्वासाने व ऐक्याने वागावे
ह्या विषयी बोध करत आहे. एकमेकांच्या उणीवा दिसत असल्या तरी एकमेकांशी अति
नम्रतेने व सौम्यतेने वागावे. पुढे संत पौल म्हणतो सहनशीलतेने एकमेकांना सहन करा.
ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकांस वागवून घ्या व पाचारण आचरणात आणा. मंडळीतील सर्व
विश्वासणाऱ्यांना एकच आशा आहे, एकच मंडळी (शरीर) झाली आहे. सर्वांना पवित्र आत्मा
मिळाला आहे व त्यामुळे सर्वांच्या आत्म्याचे ऐक्य घडविले पाहिजे. सर्व विश्वासणारे
सारखेच नाहीत. जसे शरीरातील अवयवांची कार्ये निरनिराळी असतात, त्याच प्रमाणे
ख्रिस्ताने निवडलेल्या मंडळीचे वागणे, प्रीती व विश्वास वेगवेगळा आहे.
शुभवर्तमान: मार्क १६:
१५-२०
आजच्या मार्क लिखित
शुभवर्तमानात येशूच्या पुनरुत्थानानंतर घडलेल्या काही घटना विषयी आपण ऐकतो. येशू
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर काही दिवसांनी शिष्य गालील प्रांतातील एका डोंगरावर
गेले. या अगोदर येशू ख्रिस्ताची येरुश्लेमेत भेट झाली. तद्नंतर शिष्यांना
ख्रिस्ताने नवीन जबाबदारी व काम देऊन सांगितले की, “जा आणि माझ्याविषयी सर्वाना
सांगा”. तसेच जे कोणी ख्रिस्ताचा स्वीकार करतील त्यांचे तारण होईल व जे कोणी विश्वास
ठेवणार नाहीत ते शिक्षेस पात्र ठरतील.
शिष्यांनी
ख्रिस्ताची सुवार्ता सांगून सर्व राष्ट्रांतील लोकांस ख्रिस्ताचे अनुयायी बनवण्याचे
कार्य केले. लोकांना बाप्तिस्मा दिला व देव जो पिता, जो पुत्र आणि जो पवित्र आत्मा
आहे ह्या त्रैक्या विषयी त्यांना देवाशी एकनिष्ठ राहण्यास सांगितले. नंतर प्रभू
येशू स्वर्गात घेतला गेला व देवाच्या उजवीकडे बसला.
बोधकथा:
संध्याकाळचे आठ
वाजले होते. प्रिया व सुविधा दोघी घरी जायला निघाल्या. परंतु आज त्यांना देवळात
भरपूर उशीर झाला होता. प्रिया म्हणाली, सुप्रिया आज आपण इथेच थांबूया. कारण
आपल्याला भरपूर उशिर झाला आहे, अंधार पडला आहे. कुणीतरी आपल्याला घ्यायला येईल.
त्यावर सुप्रिया म्हणाली नाही आपण जाऊया. तिचा देवावर भरपूर विश्वास होता. ती पुढे
म्हणाली माझ्या आई-बाबांनी मला सांगितले आहे की देव नेहमी आपल्या बरोबर असतो व तो
आपले संरक्षण करतो. सुप्रियाच्या या अशा बोलण्यावरून प्रियाला थोडे ध्येर्य,
सामर्थ्य मिळाले व देवावर विश्वास ठेऊन त्या दोघी सुखरूपणे घरी पोहचल्या आणि
त्यांचा देवावरील विश्वास अधिक धृढ व बळकट झाला.
मनन चिंतन:
ही छोटीशी गोष्ट
आपल्याला आजच्या उपासना विषयी आठवण करून देत आहे आणि ती म्हणजे विश्वासू जीवनाने
आपण देवाच्या स्वर्गरोहणामध्ये भागीदारी बनतो. तसेच स्वर्गरोहणामध्ये श्रध्दावंत
माणसाला नवीन प्रकारचे आध्यत्मिक व तेजस्वी स्वरूपाचे शरीर प्राप्त होते.
येशूच्या
स्वर्गरोहणाद्वारे आपणास एक प्रकारचे धाडस मिळते व ते म्हणजे विश्वासाचे व
श्रद्धेचे जीवन जगणे. कारण प्रभू येशू ह्या जगात आपल्या तारणासाठी आला होता.
त्याने आपल्या कार्याद्वारे देवाचे प्रेम काय व कसे आहे हे आपल्या सर्वांस पटवून
दिले. ख्रिस्ताने क्रुसावरचे क्रूर मरण स्वीकारले, यातना सोसल्या व शिष्यांना
दर्शन दिले. त्यांचा पुनरुत्थानावरील विश्वास मजबूत केला. पुढे शिष्यांची योग्य
जडणघडण केली व त्यांना पवित्र आत्म्याचे आश्वासन देत येशू त्यांना म्हणाला,
“पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल व पृथ्वीच्या
शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.
भूतलावरील आपले
तारणकार्य पूर्णत्वास नेल्यानंतर आजच्या दिवशी प्रभू येशूचे स्वर्गरोहण झाले आणि
स्वर्गात जाण्यापूर्वी प्रभूयेशूने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली की, “स्वर्ग जगात
जाऊन सुवार्तेची घोषणा करा”.
ख्रिस्ताने
दिलेली ही अखेरची आज्ञा पाळून, ख्रिस्तसभेत जीवन जगणारी देवाची प्रजा जगाला प्रकाश
आणि पृथ्वीचे मीठ बनली आहे व देवराज्याची सुवार्ता पसरवित आहेत. ते म्हणजे
धर्मगुरू त्यांच्या याजकपदाद्वारे आणि प्रापंचिक त्यांच्या सामान्य याजकपदाद्वारे हे
प्रेषितकार्य पुढे सुरु आहे. म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्ताचे वैभवशाली स्वर्गरोहण
हे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचे एक महत्वपूर्ण घटक बनले आहे. जो ख्रिस्त पित्याकडून
ह्या धरतीवर आला होता, तोच ख्रिस्त मरणावर विजय मिळवून आज पित्याकडे परत जात आहे.
ख्रिस्ताने मरणानंतर आपल्याला विश्वासाचे वरदान बहाल केले. जेणेकरून आपण सुद्धा
प्रभू येशू सारखे स्वर्गरोहण प्राप्त करू शकतो. ह्यास्तव, ईश्वरी कार्य करताना
आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन व ख्रिस्ती मुल्ये जोपासून आपण आपल्या कृतीने व
शब्दाने ख्रिस्ताचे शुभवर्तमान पसरवून त्यांचे अनुयायी बनूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: स्वर्गीय बापा, आमची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरुस्वामी, बिशप्स, कार्डीनल्स, धर्मगुरू-धर्मभगिनी व सर्व व्रतस्त ह्यांच्यावर व त्यांच्या कामात प्रभूचा सतत वरदहस्त असावा, त्यांना प्रभुने उदंड व
निरोगी आयुष्य बहाल करावे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्तसभेची प्रगती व्हावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ती वैवाहिक जीवनात स्त्री-पुरुषांना समान स्थान आहे याची जाण ठेऊन कुटुंबा-कुटुंबात वैवाहिक पावित्र्य अधिकाधिक जपले जावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशातील
राज्यकर्त्यांनी व अधिकार्यांनी देशाच्या
व लोकांच्या सर्वांगीण, आर्थिक विकासासाठी व प्रगतीसाठी सातत्याने झटावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४. आपच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतःकरणे उघडून देवाच्या शुभवर्तमानावर व येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणावर विश्वास ठेवावा व त्यांच्या सर्व इच्छा- आकांक्षा
परीपूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment