Reflection for the feast of Most Holy Trinity (27/05/2018) By: Br. Isidore patil
पवित्र
आत्म्याचा सण
दिनांक: २७/०५/२०१८
पहिले
वाचन: अनुवाद ४:३२-३४; ३९-४०
दुसरे वाचन: रोमकरास
पत्र- ८:१४-१७
शुभवर्तमान: मतय् :
२८:१६-२०
प्रस्तावना:
“जय बापा, जय
पुत्र, जय आत्म्या देवा
आशीर्वाद कृपेचा
आम्हाला गा द्यावा; जय देव जय देव”
आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत आहोत.
अतिपवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्ती श्रद्धेचा आणि जीवनाचा मुलभूत पाया आहे.
आजच्या पहिल्या वाचनात मोशे ‘परमेश्वर
हाच खरा देव आहे व सुखी समृद्धीने राहण्यासाठी त्याच्या आज्ञेचे पालन करा’ असे
म्हणतो, तर दुसऱ्या वचनात संत पौल पवित्र आत्म्याचे
महत्व पटवून देत आहे. शुभवर्तमानात पिता, पुत्र
व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याच्या आज्ञेद्वारे आपल्या जीवनातील
पवित्र त्रैक्याचे महत्व पटवून देत आहे.
अगदी प्रारंभापासून पवित्र त्रैक्याचे रहस्य हे
ख्रिस्तसभेच्या जिवंत श्रद्धेचा मुलभूत घटक आहे. स्नानसंस्काराच्या श्रद्धेत, धर्मप्रचारात, धर्मशिक्षणात
आणि प्रार्थनेत त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत असते. उपासनेतही ह्या रहस्याचा
समावेश आहे. ह्या रहस्याद्वारेच प्रभू येशु ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर
पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणाबरोबर असतो व हाच पवित्र
त्रैक्याचा सहवास आपणाबरोबर सदा असावा म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४; ३९-४०
पहिल्या वाचनात मोशे देवाने निवडलेल्या लोकांना त्यांचे जुने दिवस
आठवण्यास सांगत आहे. जी महान कृत्य देवाने केली त्या सर्व कृत्यांची आठवण करा.
पूर्वी ज्यांनी देवाचा शब्द ऐकला, सर्व साधारणपणे असा समज होता की ते मरत होते,
परंतु देवाच्या निवडलेल्या लोकांनी देवाचा शब्द ऐकला ते जिवंत राहिले. जे देवाचे
लोक आहेत तेच देवाचे महत कृत्य आणि देवाच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत. म्हणून तो
लोकांना सांगतो, देवाला विसरू नका. देव सर्वोच्च आहे; आणि त्याच्या शिवाय दुसरा
कोणी नाही. म्हणून देवाच्या आज्ञेप्रमाणे वागण्यास सांगत आहे. आणि जर देवाच्या
आज्ञा पाळल्या तर देव तुम्हास सर्वकाही पुरवील.
दुसरे वाचन: रोमकरास
पत्र:
८:१४-१७
संत पौल सांगत आहे की पवित्र आत्म्याने
आपल्याला चालविले पाहिजे. हा अनुभव आपण देवाची मुले आहोत अशी खात्री देतो. आपण
एखाद्या गुलामगिरीत आहोत व या स्थितीत भीत-भीत वागायचे आहे असे समजू नका. देव आपला
स्वर्गिय पिता आहे. आपण आनंदाने त्याच्या सहभागीतेत येऊन लहान मुलाप्रमाणे
त्याच्याशी बोलू शकतो.
आपण ख्रिस्ताबरोबर वारीस झालो आहोत आणि जर
त्याच्याबरोबर गौरव प्राप्त करून घ्यायचे असल्यास आपण त्याच्यासाठी दु:ख सोसले
पाहिजे. कारण जे ख्रिस्ताचे आहेत त्याचा जग व्देष करीलच.
शुभवर्तमान: मतय्:
२८:१६-२०
येशू ख्रिस्ताच्या पुन:रुत्थानानंतर काही
दिवसांनी ११ शिष्य गालील प्रांतातील डोंगरावर गेले. या अगोदर येशू ख्रिस्ताची व
त्यांची येरुशलेमेत भेट झाली होती. त्या डोंगरावर त्यांनी ख्रिस्ताला नमन केले.
तरी कितेकांच्या मनांत संशय होता. प्रभू येशूला त्यांच्या मनातील संशय समजला. तो
त्यांच्या जवळ त्यांच्याशी बोलू लागला. त्यांची दुर्बळता व भय प्रभूला माहित होते,
कारण पुनरुत्थित प्रभू त्यांच्याबरोबर पूर्वीप्रमाणे राहत नसे. ख्रिस्ताने त्यांना
स्व:ताच्या अधिकाराविषयी सांगितले. तो स्वर्गाचा व
संपूर्ण पृथ्वीचा अधिकारी आहे. कैसर राजा किंवा सर्व धर्मपुढारयापेक्षा तो श्रेष्ठ
अधिकारी आहे.
या अधिकाराने, ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली
की शिष्यांनी सर्व लोकांस ख्रिस्ताचे अनुयायी करावे. हे काम, शिष्य, फक्त
ख्रिस्ताची सुवार्ता सांगून पार पाडू शकतात. आणि जे ख्रिस्ताचे अनुयायी होण्याची
इच्छा ठेवतात त्यांना पाण्याने बाप्तिस्मा देणे हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले
होते. देव जो पिता, देव जो पुत्र व देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाशी एकनिष्ठ
राहण्याची ही साक्ष आहे. ख्रिस्त त्यांच्याबरोबर आत्म्याने सदासर्वदा राहणार.
बोधकथा:
संत अगुस्तीन पवित्र त्रैक्याचे रहस्य
समजण्याचा प्रयत्न करत होते व ह्या रहस्यावर एकांतात विचार करण्यासाठी एक दिवस
समुद्रकिनारी फेरफटका मारत होते. किनाऱ्यावर चालत असताना त्याला एक मुलगा
किनाऱ्यावर खेळत असताना दिसला. तो काय करत आहे हे पाहण्यासाठी संत अगुस्तीन त्या
मुलाजवळ गेले. त्या मुलाने किनाऱ्यावर एक छोटासा खड्डा केला होता व तो पाण्यापाशी
जाऊन आपल्या ओंजळीत समुद्राचे पाणी घेत होता व ते पाणी त्याने केलेल्या खड्ड्यात
ओतत होता. हे पाहिल्यावर संत अगस्तीन त्या मुलाला म्हणाला, ‘तू
काय करत आहेस?’ तेव्हा तो मुलगा म्हणाला की, ‘मला
संपूर्ण समुद्र ह्या खड्ड्यात रिकामा करायचा आहे.’ हे
ऐकून संत अगुस्तीन स्मितहास्य देत म्हणाले, ‘ते
कस काय शक्य आहे? एवढा मोठा अथांग सागर ह्या छोट्याश्या खड्यात
रिकामा करणे अशक्य आहे.’ तेव्हा तो मुलगा म्हणाला, जर
तुम्हाला वाटत असेल की, आपल्या बुद्धीसामर्थ्यापलीकडील हे पवित्र
त्रैक्याचे रहस्य तुम्ही समजू शकता तर मी का नाही ह्या खड्ड्यात समुद्र रिकामा करू
शकणार?’ एवढे म्हणून ते बाळ तिथून
अदृश्य झालं, तेव्हा पवित्र त्रैक्याचे संपूर्ण रहस्य आपल्या
बुद्धिचातुर्यापलीकडीचे आहे हे संत अगुस्तीनला समजले.
मनन चिंतन:
संत अगुस्तीनप्रमाणे कदाचित आपल्यालासुद्धा
पवित्र आत्म्याचे रहस्य कसे आहे हे समजणार नाही परंतु आपण ते काय आहे ह्यावर विचार
विनिमय करू शकतो. मनात प्रश्न येतो कि, देवाने
हे पवित्र त्रैक्याचे रहस्य आपल्याला का दिले? कदाचित
त्याचे कारण हे असू शकते: देवाने आपल्याला त्याच्या प्रतीरुपात निर्माण केले आहे.
ह्या पवित्र त्रैक्याच्या रहस्याद्वारे जेवढे आपण देवाला समजू शकू तेवढे जास्त आपण
आपल्या स्वत:ला समजू शकू. कारण प्रत्येक सर्व-साधारण माणूस हा आपल्या देवासारखा
होण्याचा प्रयत्न करत असतो. जे भक्त रागवणाऱ्या व शिक्षा देणाऱ्या देवास भजतात ते
सुद्धा लवकर शिक्षा करतात, जे प्रेमळ देवाला भजतात ते आपल्या जीवनातून
प्रेम देतात, जे न्यायी देवाला भजतात त्यांच्यासाठी न्याय
मिळणे व मिळवून देणे महत्वाचे असते. जसा देव तसे त्याचे भक्त. असे असेल तर आपल्या
सर्वांच्या मनात एक प्रश्न यायला हवा की, ‘हे
पवित्र त्रैक्याचे रहस्य आपल्याला आपल्या देवाबद्दल तसेच आपणाबद्दल काय सांगत आहे?
पवित्र त्रैक्याच्या रहस्यातून आपल्याला समजते
की, आपला देव हा विभक्त राहत नाही तर तो एकत्र
राहतो. व आपल्याला सुद्धा एकाकी जगापासून दूर न राहता, आपल्या समाजात राहण्यास
सांगतो. पवित्र त्रैक्यातील ऐक्य, समतोल, प्रीतीबंधुत्व
अतुलनीय आहे. हे पवित्र त्रैक्य एक आदर्श कुटुंबाचे प्रतिक आहे. एक उत्तम कुटुंब
कसं असावं ह्याचा आदर्श पवित्र त्रैक्य आपणासमोर ठेवत आहे.
खऱ्या प्रेमासाठी तिघांची गरज असते व हे खरे
प्रेम कुटुंबात आढळते. कुटुंबात आई वडील व मुलं असे तिघे असतात. आपला देव आपल्याला
आपल्या जीवनातील कुटुंबाचे महत्व प्रदर्शित करत आहे. पिता, पुत्र
व पवित्र आत्मा एकमेकांत समन्वय राखून आपले कार्य व्यवस्थीत पार पाडतात. आपल्या
देवाचे उदाहरण समोर ठेऊन आपण आपल्या कुटुंबात समन्वय राखणे गरजेचे आहे. कुटुंबात
प्रत्येकाने स्वतःचे स्थान जाणून घेऊन आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे निरंतर पालन
करणे गरजेचे आहे.
आपण सर्व देवाचे प्रतिरूप आहोत. जसे देवाचे खरे
दैवीपण त्रैक्यात दिसून येते तसेच आपले खरे मानवी रूप त्रैक्यात दडलेले आहे.
जेव्हा एखादा माणूस जगातील आपल्या इतर बांधवांशी व देवाशी नाते जोडतो तेव्हा देव, माणूस
व त्याचे इतर बांधव ह्यामध्ये त्रैक्यात त्याचे खरे मानवी रूप दिसून येते.
त्रैक्याचे जीवन हे परीपुर्णतेचे जीवन आहे, हे
परीपुर्णतेचे जीवन जगण्यासाठी जीवनात आपल्या प्रत्येकाला देवाची व आपल्या इतर
बांधवांची गरज आहे. पवित्र त्रैक्याचा हा आदर्श समोर ठेवून आपणसुद्धा आपले
देवाबरोबर व आपल्या बांधवांबरोबर असलेले नाते दृढ करूया व खऱ्या जीवनाचा आस्वाद
घेऊया. म्हणून आपण शेवटी म्हणूया: “हे रूप ईश्वराचे, हे रूप ख्रीस्ताचे,
सर्वाहुनी पवित्र हा एक देवपुत्र.”
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे
पवित्र त्रैक्या
आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.
1. ख्रिस्तसभेचे
अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू
व व्रतस्त बंधू-भगिनी, जे
ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, त्यांची त्रैक्यावरील श्रद्धा बळकट व्हावी व
इतरांनाही त्याच श्रद्धेत दृढ करण्यास
त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. आज
पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्रेक्यातील समन्वयातून आपण प्रेरणा घेऊन
आपल्या कुटुंबात, धर्मग्रामात व समाजात समन्वय राखून
सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. ख्रिस्ती
ह्या नात्याने जी श्रद्धा आम्हाला मिळाली आहे ती श्रद्धा अधिक दृढ करण्यास आम्हाला
कृपा मिळावी व हीच श्रद्धा आम्हाला दुसऱ्यांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
4. लवकरच
मुले नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करणार आहेत. ह्या नवीन वर्षात अधिक जोमाने
अभ्यास करून त्यांना त्यांचा सर्वांगीन विकास करता यावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या
वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment