Thursday, 19 July 2018




Reflection for the Homily of 16th Sunday of Ordinary Time 
(22-07-18) By Br. Camrello D’Mekar





सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक : २२/७/२०१८
पहिले वाचन : यिर्मया २३: १-६
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र  २: १३-१८
शुभवर्तमान : मार्क ६: ३०-३४




ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते!

प्रस्तावना

    ख्रिस्ताठायी जमलेल्या भाविकांनो, आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या वाचने आपल्याला येशू ख्रिस्त हा खरा मेंढपाळ आहे ह्याची जाणीव करून देतात.
    आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यिर्मया सांगत आहे कि, जे कळपांचं रक्षण करीत नाहीत अशा मेंढपाळाचा देव निषेध करतो आणि चांगले मेंढपाळ पाठवण्याचे वचन तो आपल्याला देतो. इफिसकरांस पाठवलेल्या पत्रात संत पौल सांगत आहे कि, आपल्या मरणाने ख्रिस्त यहुदी आणि परकीय यांच्यातील भेदाची भिंत दूर करतो आणि सर्वांना देवाची मुले होण्याचा अधिकार देतो. शुभवर्तमानात येशूला त्याच्या शिष्याविषयी असलेली काळजी आणि लोकांविषयी असलेली चिंता ह्याचे नाट्यमय दर्शन आम्हांला घडवते.
आपणही आपल्या जीवनात मेंढपाळांसारखे आहोत. आपल्या कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मेंढराप्रमाणे आपण एकमेकांवर अवलंबून असतो आणि इतरांची मदत आपल्याला हवी असते. प्रभू येशूचा आशिर्वाद आपल्यावर यावा म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलिदानात मध्ये प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : यिर्मया २३:१-६

       संदेष्टा यिर्मया वारंवार आपले संदेश राजांना उद्देशून सांगत असे. लोकांचे धार्मिक जीवन सुव्यवस्थित ठेवण्याची विशेष जबाबदारी राजाचीच असे. या संदर्भात यिर्मयाचे कार्य विशेष लक्षणीय आहे. राजे हे एका मेंढपाळा प्रमाणे असावेत, असे त्याचे म्हणणे होते. देवांच्या लोकांसाठी अधिक चांगला भविष्यकाळ असेल. तो स्वतःच आपला मेंढपाळ असणार. तो आपले मेंढपाळाचे काम विश्वासू नेत्यावर सोपवून देईल. याशिवाय, दाविदाचे ऐतिहासिक राजघराणे संपुष्टात आले असले तरीही, दविदाच्या घरण्यात असा एक नवा राजा उदयास येईल, जो अगदी दाविदा सारखा असेल. देव आमची धार्मिकता’, हे त्याचे नाव मूळ हिब्रूमध्ये सिद्कीयनावाशी जुळणारे आहे. पण या राजाला हे नाव खरोखर सर्वार्थांनी साजेसे असेल. आणि हा राजा हे नाव खरोखर सत्याने धारण करील. यिर्मया येथे दाविदाचा मसीहाकडे (येशू ख्रिस्त) पाहतो आहे. त्याचा जन्म इस्त्राईलच्या तारणासाठी असेल.


दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र २:१३-१८

   जे यहुदी नव्हते त्यांनी सत्याचे वचन म्हणजे सुवार्ता ऐकली. सुवार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला तेव्हाच ते ख्रिस्ताचे झाले. त्यांना ख्रिस्ताने जीवन दिले व ते देवाचे झाले. हा देवाचा मालकी हक्क दाखविण्यासाठी पवित्र आत्म्याचा शिक्का त्यासमयी त्यांच्यावर मारण्यात आला. हा पवित्र आत्मा आता व पुढे मिळणाऱ्या सर्व आशिर्वादाची हमी असा आहे.
इफिस मधील सर्व बंधूजनांना देवाच्या कृपेने ख्रिस्तात मिळालेले अशिर्वाद किती महान होते. देवाने आपल्याला कशाला पाचारण केले या प्रश्नाचे उत्तर देवाच्या ओळखीनेच मिळणार होते. देवाविषयी अधिक कळण्यासाठी आणि त्याचे विचार व मार्ग ओळखण्यासाठी आत्मिक दृष्टीची गरज आहे. ख्रिस्तामध्ये देव किती अगणित आशिर्वाद देत आहे हे पाहण्यासाठी सुदृष्टी हवी आहे.

शुभवर्तमान : मार्क ६:३०-३४

   शुभवर्तमानकार मार्क शिष्यांच्या परत येण्याविषयी सांगत आहे. येशूचे शिष्य त्यांचा अनुभव येशुकडे कथित करीत होते. येशूने त्यांच्या कथा ऐकून घेतल्यावर त्यांना सांगितले कि, एका निवांत आणि शांत स्थळी जाऊन विसावा घ्या. येशू आणि शिष्य मचव्यात बसून एकांतात राहण्यासाठी निघून गेले. पण त्या ठिकाणी सुद्धा लोकांचा समुदाय जमला होता. त्यांना एक मेंढपाळाची गरज होती. म्हणूनच येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवण दिली. शिष्यांनी केलेले चमत्कार आणि सुवार्तेचा केलेला प्रचार आणि कोणकोणत्या खेडे-शहरामध्ये त्यांचे शिष्य गेले होते त्याचा सविस्तर तपशील ते येशूला देत होते. केलेल्या ह्या कामामुळे त्यांना एक मानव म्हणून थकवा आलेला असेलच, ह्याची जाणीव आपल्याला होते. परंतु येशू आपल्या सुखाची व स्वतःच्या आरामावर लक्ष केंद्रित न करता लोकांना शिकवण देण्यास सुरवात करतो. येशू ख्रिस्त निःस्वार्थी आणि निःपक्षपाती मेंढपाळ आहे असे आपल्या निदर्शनास शुभवर्तमानकार आणून देतो. 

मनन चिंतन

  जेव्हा लोकांचा समुदाय येशुजवळ आला, येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवायला सुरवात केली. येशू ख्रिस्ताने लोकांना निराश केले नाही मात्र त्यांना त्याच्याभोवती जमवले. हि वेळ रविवारच्या मिस्सेचे चिन्ह आहे आणि रविवारची मिस्सा-बलिदान देवाच्या राज्याचे चिन्ह आहे.
   प्रत्येक धर्म-ग्रामामध्ये वेगवेगळी भाषा, रीतीरिवाज आणि संस्कृती जोपासणारे गरीब, श्रीमंत, वृद्ध, तरुण, कामगार-मालक असे सर्व एकत्र मिस्साबलीदानासाठी जमत असतात. काही व्यक्ती काही कारणस्तव टिव्हीवरील मिस्सा पाहत असतात. जिथे लहान बालके मिस्सा सुरु असताना रडत नाहीत; साऊंड सिस्टम योग्य असते; त्यात काही अडथळा येत नाही प्रत्येक गोष्ट वेळेवर केली जाते. मात्र देवाचे राज्य, ज्याचे बीज ख्रिस्तसभा आहे ते मात्र ह्या टिव्हीवरच्या कार्यक्रमापेक्षा मोठे आहे. येशू ख्रिस्त प्रत्येकाला आपल्या जवळ घेतो. त्याच्या मध्ये कोणताही भेदभाव नाही. जेव्हा आपण येशूच्या सानिध्यात येतो तेव्हा आपल्या जीवनात बदल घडून येतात. कदाचित आपल्याला काळजी घेण्याची दक्षता आहे कि, आपले पवित्र बलिदान हे सर्व ख्रिस्तीवासियांचे केंद्रबिंदू बनले पाहिजे. प्रवक्ता यिर्मया ह्याने सांगितल्याप्रमाणे देवाचे राज्य दुभागले जात आहे. त्याच्या मध्ये फूट पडत आहे. जेव्हा आपण ख्रिस्त यागासाठी एकत्र जमत असतो, तेव्हा येशू ख्रिस्त आपल्याला एका मेंढपाळाप्रमाणे जवळ घेतो. पवित्र मिस्साबलिदानाचा  कधीही शेवट होणार नाही जो पर्यत आपण येशूच्या बरोबर पवित्र मेजवानीसाठी एकत्र येतो. पवित्र मिस्साबलीदानास एक विशिष्ठ जागा आहे. जेथे आपण वेगवेगळ्या आचार-विचारांची माणसे एकत्र येऊन पुन्हा एकदा आपण आपली आशा आणि श्रद्धा प्रगट करतो. देवाचे मंदिर ही एक जागा आहे. जेथे आपण एकत्र येऊन दुसऱ्यांच्या बाजूला येऊन बसतो. ज्याचे नाव सुद्धा आपल्याला माहित नसते. मात्र आपल्याला ठाऊक असते की त्या व्यक्तीला पवित्र बाप्तिस्म्याद्वारे येशुख्रिस्ताने अभिषेक केला आहे.
       मिस्सा संपण्याअगोदर आपण विचार करायला हवा की, आपण सर्वजण परिपूर्ण (perfect) नाही. समाजाला न्याय मिळावा म्हणून खटपट करू पण मात्र दुसर्यांना क्षमा का करावी ह्याविषयी विचार करत राहू! आपण ख्रिस्तसभेची शिकवण, तिचे नियम तंतोतंतपणे पाळत राहू पण स्वःताच्या जीवनात प्रभू येशूचे अस्तित्व कितपत जपत राहू !  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

1.       आपल्या ख्रिस्त सभेचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्यांना ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेण्यास चांगले आरोग्य आणि पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
2.       आपले पालक वर्ग जे आपल्या मुलाचे पालनपोषण करून त्यांना चांगले शिक्षण देऊन घडवण्याचे कार्य करतात, त्यांनी आपल्या मुलांना चांगली मुल्ये आणि शिक्षण देऊन त्यांना भविष्यात सुसंस्कृत नागरिक होण्यास प्रोस्ताहान करावे म्हणून प्रार्थना करूया.
3.       आपल्या देशाचे कार्य सांभाळणारे कार्यकर्ते ह्यांनी लोकांची सेवा करून आपले काम जबाबदारीने पार पाडावे आणि समाजात शांतीचे वातावरण निर्माण करण्यास त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थन करूया.
4.       आपल्या धर्मग्रामातील गरीब, आजारी आणि गरजवंत लोकांना मदत करण्यास त्यांना चांगले जीवन जगण्यास आणि मानवप्रिती दर्शविण्यास जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे आणि त्यासाठी लागणारे धैर्य त्यांना मिळावे म्हणून प्रार्थना करूया.
5.       यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या काम-धंद्यात कोणतेही व्यत्यय येऊ नयेत आणि पुढच्या काळासाठी पाण्याची साठवण करून पाणी योग्य प्रकारे वापरला जावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment