Thursday, 12 July 2018


Reflection for the Homily of 15th Sunday of Ordinary Time (15-07-18) By Br. Brandon Noon






सामान्य काळातील पंधरावा रविवार


दिनांक – १५-०७-२०१८
पहिले वाचन: आमोस ७:१२-१५
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र १:३-१४.
शुभवर्तमान: मार्क ६:७-१३




येशूने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून सुवार्ता सांगण्यास पाठविले

प्रस्तावना

आज आपण सामन्य काळातील पंधराव्या रविवार मधे पदार्पण करीत आहोत. आजची उपासना आपणास देवाची सुवार्ता पसरविण्यास आमंत्रण करीत आहे. आजच्या तिन्ही वाचनात आपणाला प्रभू परमेश्वराने केलेल्या महान अशा कार्याचे गुणगान व ख्रिस्ताची शांती संपूर्ण जगभरात कशा प्रकारे पसरावी याविषयी सांगितले आहे.
     पहिल्या वाचनात संदेष्टा आमोसला सांगण्यात आले आहे कि, “जा, माझ्या लोकानां इस्त्राईल मध्ये जाऊन सुवार्ता सांग.” शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या प्रिय शिष्यांना आशिर्वाद सह  अधिकार देऊन प्रेषित कार्य करण्यास पाठवत आहे.
आज देऊळमाता आपण सर्वांना या मिशन कार्यामध्ये सक्रीय सहभाग घेण्यास बोलावत आहे. म्हणून आजच्या या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना, प्रार्थना करूया कि, प्रभुने आपणां सर्वांना सामर्थ्य व कृपा द्यावी जेणेकरून आपण सर्वजण ख्रिस्तसभेच्या मिशन कार्यात सतत कार्यरत राहू. आमेन.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: आमोस ७:१२-१५

पहिल्या वाचनात अमासिया, आमोस ह्या संदेष्ट्याला त्याच्या देशात परत जाण्यास सांगतो; कारण शलमोन राजाच्या मरणाअगोदरच इस्रायलची दोन भागांमध्ये विभागणी झाली होती; यहुदी आणि इस्रायल.
     आमोस हा यहुदिया प्रांतातून इस्रायल प्रांतात देवाची शुभसंदेश सांगण्यासाठी आला होता. पण आमोस अमासियाला सांगतो की, मी स्वतःहून आलो नाही, तर देवाने मला त्याची सुवार्ता सांगण्याकरिता पाठविले आहे.
     आमोस इस्रायल प्रांतात धन-दौलत मिळवण्यासाठी आला नव्हता; कारण मेंढपाळ म्हणून तो त्याच्या कार्यात आनंदी होता. आमोस हा उपदेशक नव्हता, अर्थात संदेष्टा बनणे हे त्याच्या विचारापलिकडचे होते, परंतु देवाने त्याला पाचारण केले आहे असे तो ठामपणे सांगतो व देवाचा संदेश देत इस्रायलच्या काना कोपऱ्यात फिरतो, हे आमोसाचे उदाहरण लक्षणीय आहे.

दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र १:३-१४.

     संत पौल इफिसकरांस ईश्वस्तवन करण्यास सांगतो, कारण देवाने आपणा सर्वांना येशूच्या रक्ताने त्याची लेकरे (दत्तक) म्हणून स्विकारले आहे. अर्थात ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या पवित्र आत्म्याचे वतनदार झालो आहोत. आणि देवाचा कृपाशिर्वाद आपणावर सदैव हजर आहे. पुढे संत पौल म्हणतो की, ज्या ख्रिस्तावर आपण पूर्वीपासून आशा ठेवली आहे, त्या येशूचा गौरव आणि महिमा गाणे अवश्य आहे.
     आपण ऐकलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. ख्रिस्ताने आपणावर पवित्र आत्मा पाठवून शिक्का मोर्तब केला आहे. ख्रिस्तामुळेच आम्हांला मुक्ती मिळाली आहे.

शुभवर्तमान: मार्क ६:७-१३

     अविश्वास असला तरीही सुवार्ताप्रसाराचे कार्य पुढे चालू ठेवणे आवश्यक होते, म्हणून येशूने बारा जणांना या कामगिरीवर पाठवले. प्रेषितांनी बरोबर काय घ्यावे, कोणती वस्त्रे घालावी वैगेरे शुभवर्तमानाच्या तपशिलात वर्णिले आहे त्यात कदाचित फरक आहे; पण ते इतके महत्त्वाचे नाही. प्रवासात जास्त ओझे घ्यायचे नाहीहे सूत्र सर्वांनीच सांगितले आहे. सुवार्ताप्रसाराचे कार्य शिरावर घेतलेल्या व्यक्तींनी अन्नपाणी, मुक्कामाची जागा वैगेरे गोष्टींची उगाच चिंता करू नये. आपल्यावर सोपवलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यात श्रोत्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न गुंतला आहे हे त्यांनी कायम मनात ठेवले पाहिजे. यहुदी लोक परक्या ठिकाणी गेले तर तेथून परताना अनेकदा तिकडची धूळ तिकडेच झटकून टाकीत. पण या प्रसंगी त्यांनी सुवार्ता नाकारल्याचे चिन्ह, रीतसर साक्ष म्हणून ते करायचे होते.
या बारा जणांना येशूने भुते काढण्याचे सामर्थ्य दिले. तथापी सुवार्तेची घोषणा करणे हेच त्यांचे मुख्य कार्य होते हे आपणाला १२वीमध्ये दिसते. ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली.ह्या घोषनेतूनच भुते काढणे व आजाऱ्यांना बरे करणे ही कार्य होतात. तेलाभ्यंग करणे हे येथे प्रतीकात्मक आहे.

बोधकथा

एकदा एक मनुष्य रस्त्यावरून जात असताना त्याने रस्त्यावरील सिग्नल जवळ एक लहान मुलगी भिक मागत असताना पाहिली. तो व्यक्ती मनात राग व्यक्त करत घरी आला आणि देवाला दोष देत म्हणाला, “हे देवा तुला काहीच वाटत नाही का? अतिशय गरीब मुले रस्त्यावर उपाशीपोटी भिक मागत आहेत, तू त्यांना का निर्माण केलेस?” देवाने त्यास उत्तर देत म्हटले, “मी त्यांच्यासाठी तुला निर्माण केले.”

मनन चिंतन

आजची उपासना आपण सर्वांना,परमेश्वराची हाक कशी येते व परमेश्वराचा संदेश संपूर्ण जगभरात कशाप्रकारे पसरावा ह्यावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण करत आहे. आज आपण जगात जर पहिले तर आपणाला समजून येईल की, जो तो शिक्षणाच्या मागे लागला आहे. प्रत्येकाला वाटते की, मी कुणीतरी मोठा होऊन चांगल्या पदवीवर असावा. त्यासाठी चांगले शिक्षण देण्यासाठी आई-वडीलही अतोनात प्रयत्नात असतात. दुसरीकडे आपणास दुष्टीस पडते की, परमेश्वर हाक देताना निःपक्षपाती आहे. तो माणसाचे अंतकरण पाहतो. परमेश्वराला ठाऊक आहे की , सर्व निवडलेले शिष्यगण प्रामाणिक आहेत.
पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वर संदेष्टा आमोस ह्याला बोलावतो. अमोस हा मेंढपाळ होता. तरीही परमेश्वराने  त्याला बोलावले. जेणेकरून तो आपल्या लोकांचा मेंढपाळ होईल. जसा मेंढपाळ मेढऱ्यांची काळजी घेतो त्याचप्रमाणे आमोसला इस्त्राईल लोकांची काळजी घेण्यास बोलावले होते.
आजही परमेश्वर अशा लोकांना त्याच्या मळ्यामध्ये कार्य करण्यासाठी बोलावत आहे. कितीतरी धर्मगुरु, धर्मभगिनी किंवा धर्मबंधू परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत. त्यांनी कधीही त्यांच्या जीवनात मी धर्मगुरू किंवा धर्मभगिनी होईन असा विचार केला नाही. परंतु सर्वकाही परमेश्वराच्या योजनेप्रमाणे त्यांच्या जीवनात घडले.
जेव्हा आपण कुठल्याही दूर प्रवासासाठी निघतो तेव्हा जाण्या अगोदर आपणास मार्गदर्शन केले जाते. उदा. येताना गरजेच्या वस्तू घेऊन योग्य ठिकाणी येण्यास सांगितले जाते. अशाचप्रकारे शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मिशन कार्यासाठी जाण्यापूर्वी मार्गदर्शन करत आहे. प्रभू येशु त्यांना जोडी-जोडीने पाठवतो. व वाटेसाठी काठीवाचून काही न घेण्यास सांगत आहे. ज्या घरात तुम्ही जाल, तेथे जर तुमचे स्वागत नाही केले तर त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुमच्या तळपायाची धूळ तेथेच झटकून पुढे जा, असे सांगतो आहे.  
आपण आज पुढील तीन गोष्टीवर मनन चिंतन करूया.
१.                 काठीवाचून दुसरे काही घेऊ नका:
येशू ख्रिस्त काठी घेण्यास शिष्यांना सांगत आहे. कारण काठीचा उपयोग डोंगराळ भागात चालण्यासाठी होतो. पैसे व भाकर न घेता देवावर परिपूर्णपणे अवलंबून राहण्यास सांगत आहे. परमेश्वराने तुम्हाला निवडले असल्याने तोच तुम्हाला सर्वकाही पुरवील. व त्यांना देवाराज्याची घोषणा करण्यास, लोकांना पश्चाताप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगत आहे.
२. जोडी-जोडीने जा:
 जर परमेश्वराने एकेकट्याला पाठवले असते तर ते बारा जण बारा ठिकाणी गेले असते परंतु जोडी जोडी ने पाठवल्याने फक्त सहा ठिकाणी पोहचू शकले. येशू ख्रिस्ताची काही तरी योजना होती. जर ते दोघे गेले तर काम लवकर होईल व दोघे आळी-पाळीने कार्य करतील.
       उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचले आहे की, जेव्हा आदम एकटा होता तेव्हा एवाची निर्मिती केली. आणि हे उदाहण आपण फक्त लग्नाच्या वेळेला देत असतो. परंतु प्रत्येक मनुष्याला जोडीदाराची गरज असते. प्रत्येकाला मित्र असतात. अध्यात्मिक जीवनातही साथीदाराची गरज असते. जेणे करून आपण एक दुसाऱ्याला मार्गदर्शन करू शकतो. प्रार्थना करू शकतो. जर काही चुकलं असेल तर चूक समजावून देऊ शकतो. कुटुंब हे दोघा किंवा तिघांनीच पूर्ण होते असते म्हणून आपणा प्रत्येकाला आध्यात्मिक जीवनात जोडीदाराची गरज असते. म्हणूनच येशू ख्रिस्ताने दोघां-दोघांना पाठवले.
२.                 तळपायाची धूळ तेथेच झटकून टाका:
आपण जेव्हा कुठलेही काम करत असतो तेव्हा आपणाला यश येईलच असे नाही. कधी कधी आपल्याला अपयशही येऊ शकते. परंतु जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा आपण खचून न जाता आपण पुढचा मार्ग निवडणे गरजेचे आहे. आणि जर आपण अपयशाला धरून बसलो तर आपण पुढे जाणार नाही.
त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे कि, जेव्हा लोक तुमचे ऐकणार नाहीत तेव्हा तुम्ही नाराज होऊ नका, तर तो अपमान तिथेच सोडून पुढे चला व ज्यांना अध्यात्मिकतेची तहान लागलेली आहे, जे प्रभू शब्दांसाठी आतुर आहेत त्यांना जाऊन सुवार्ता सांगा. येशू ख्रिस्ताने हे मार्गदर्शन फक्त धर्मगुरु व धर्मभगिनी ह्यांना दिलेले नाही तर सर्वांना दिलेले आहे. आणि आपण सर्वांनी आपल्या परीने आपल्या घरी, शेजोळात व सर्वत्र अंगी बाळगणे गरजेचे आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1.  आपल्या ख्रिस्तसभेचे आधारस्तंभ परमगुरु, महागुरू, धर्मगुरू यांनी प्रेषित कार्य करण्यास प्रयत्न करावे, यासाठी त्यांना परमेश्वराकडून शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.
2.  आजच्या तरुण पिढीने प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी ईश्वरी पाचारणाला प्रतिसाद द्यावा म्हणून प्रार्थना करूया.
3.  आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांचे आजार व दुःखे हलकी व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
4.  आपल्या देशातील राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या समाजातील गरीब लोकांसाठी विकासाची कार्य करावेत व त्यातून खरा समाज बांधावा, म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.
5.  आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतू साठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment