Thursday, 5 July 2018


Reflections for the homily of 14th Sunday in Ordinary time 
(08-07-2018) by: Fr Malcolm Dinis





सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक -  ८-७-२०१८
पहिले वाचन – यहेज्केल २:२-५
दुसरे वाचन – २ करिंथ १२:७-१०
शुभवर्तमान -  मार्क ६:१-६


“जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.”



प्रस्तावना

     आज संपूर्ण ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वराच्या पाचारणाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर संदेष्टा यहेज्केलला इस्रायलचा उद्धार करण्यासाठी पाचारण करीत आहे. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्या मिशन कार्यामध्ये परमेश्वराच्या कृपेचे वरदान मागत आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त ‘संदेष्ट्याचा सन्मान त्याच्या देशात होत नसतो’ असे विधान मांडून आपल्या शिष्यांना आपल्या कार्यामध्ये स्थिर राहण्यासाठी ताकीद देत आहे.
     परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याचे कार्य पुढे नेण्यासाठी पाचरण केले आहे. परमेश्वराच्या मळ्यात कार्य करीत असताना स्तुतीबरोबर निंदा, टीका आपल्या वाट्याला येणार आहेत. परंतु आपल्या ह्या कार्यामध्ये न डगमगता सतत पुढे जाण्यास आपल्याला परमेश्वराची विशेष कृपाशक्ती मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन – यहेज्केल २:२-५

     इस्त्रायलच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा काळ हा संदेष्ट्याचा काळ होता. समुद्राच्या लाटांनी किनारा धुऊन काढावा तसे हे संदेष्टे समाज धुऊन काढीत. म्हणूनच परमेश्वराने संदेष्टा यहेज्केल ह्याची निवड केली.
परमेश्वर आपल्या निवडलेल्या लोकांसाठी आपली अभिवचने निश्चित पूर्ण करील म्हणून संदेष्टा यहेज्केलची निवड झाली. आपल्या लोकांना इशारा देण्यासाठी आणि त्यांच्यावर एवढी संकटे का आली ते त्यांना समजावून सांगण्यासाठी परमेश्वराने यहेज्केलची निवड केली होती. परमेश्वराची योजना व कार्य काय आहे, हे निराश झालेल्या व कैदेत पडलेल्या लोकांना त्याने बावीस वर्ष बोध करून सांगितले.

दुसरे वाचन - २ करिंथ १२:७-१०

संत पौलाला ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आपण जरी अशक्त व दुर्बल असलो तरी ख्रिस्त माझ्या अशक्तेत प्रगट होत असतो, हे त्याला दाखवायचे आहे. तो स्वताःचे वर्णन ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्यया शब्दात करतो. हे किती स्थिर व गौरवी स्थान होते व तो किती नम्र भूमिका घेतो हे दिसून येते. खोट्या प्रेषितांनी पौलाविरुद्ध आरोप उठविले होते. कारण त्यांना खात्री होती कि, ह्या स्थितीमध्ये संत पौल दुर्बल व कमजोर होणार, परंतु जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे असे सांगून आपले मिशनकार्य त्याने बळकट व सबळ बनविले.

शुभवर्तमान - मार्क ६:१-६

प्रत्येक ख्रिस्ताच्या शिष्याने सोशिक सेवकाचे व्रत घेऊन आपले शिष्यत्व स्विकारावे आणि देवराज्याचा अनुभव घ्यावा, असा इशारा संत मार्क आपल्या शुभवर्तमानातून वाचकांना देत आहे. ख्रिस्ताचा शिष्य जगाच्या लोभात गुंतू नये. त्याने सेवाभावी जीवन जगावे, प्रतिष्ठा, मानसन्मान, पद ह्या गोष्टीसाठी झटू नये तर सतत आपल्या गुरूच्या सेवेचा मंत्र आपल्या जीवनात गिरवावा अशी तो अपेक्षा करतो.
     प्रेषित कार्यामध्ये आपला सतत सन्मानच होणार असे नाही तर निंदा, भेदभाव, टीका, छळ अश्या संकटांना सामोरे जावे लागले असे ठाम मत संत मार्क आजच्या आपल्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचा आपल्या लोकांकडून होणाऱ्या धिक्कारातून सांगत आहे.
     ख्रिस्त सभेचे जागतिक मिशन संकटामध्ये चालू ठेवण्यासाठी व मन ,प्रतिष्ठा, अधिकार ह्याची मुळीच आशा न ठेवता ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी संत मार्क आपल्या वाचकांना इशारा देत आहे.

बोधकथा

     थॅ।मस नावाचा एक गृहस्थ होता. पत्नी व दोन मुले असा सुखाने संसार करीत होते. आपली पत्नी व तो स्वतः चांगल्या पदावर कामावर असल्या कारणाने त्याला आपल्या कुटुंबाचा गर्व वाटत होता. फक्त रविवारी देवळात मिस्साला जाणे इतकेच कर्तव्य तो करीत होता. बाकी गोष्टीशी त्याला काहीच देण-घेण वाटत नसे.
     एका प्रापंचिक रविवारीधर्मगुरूच्या प्रवचनाने त्याच्या मनावर चांगलाच परिणाम झाला व त्या दिवसापासून तो चांगले कार्य करू लागला. इतरांना त्यांच्या अडी-अडचणीत मदत करू लागला. गावातील व धर्मग्रामातील कार्यात तो सक्रीय झाला. त्याचा हा स्वभाव पाहून त्याची मूलगामी ख्रिस्ती समाजाचा प्रमुख नेता म्हणून नेमणूक झाली. मात्र काही गावकऱ्यांना त्याचा हेवा वाटू लागला. त्याच्या पहिल्या वाईट स्वभावाची ते निंदा करू लागले. त्यामुळे कधी कधी त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले. परंतु प्रेषितकार्याद्वारे आलेल्या ख्रिस्ताच्या अनुभवातून त्याला सहनशक्ती मिळाली होती. त्यामुळे त्याचे कार्य तो पुढे चालवतच राहिला. त्याच्या कार्याबद्दल तो आनंदी व समाधानी होता.

मनन चिंतन
मी वेचिले फुलांना
काटे ख्रिस्ता मिळाले.
     प्रत्येक ख्रिस्ती माणूस हा प्रेषित आहे. बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाल्यामुळे अनेक अधिकार आपणांस प्राप्त झालेले आहेत, त्याचप्रमाणे काही कर्तव्य देखील आपल्याला पार पडावी लागतात. आपण नावाने केवळ ख्रिस्ती असाल व आपले कार्य शून्य असेल तर आपण ख्रिस्ती असणे केवळ ढोंगीपणाचे लक्षण ठरेल. ख्रिस्ताच्या मळ्यात प्रेषितीय कार्य करत असताना स्तुती बरोबर, निंदा, टीका, छळ आपल्या वाट्याला येणार आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये न डगमगता, येशुख्रिस्ताच्या दुःखसहनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण आपले मिशन कार्य पुढे चालू ठेवणार आहोत का?
     आजची तिन्ही वाचने आपल्याला आपल्या संकटात, अडी-अडचणीत व निदेंत ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यास व आपली श्रद्धा बळकट करण्यास प्रचारण करीत आहे. प्रिय बंधू-भगिनींनो आपली श्रद्धा हा एक रंगमंच आहे. तो मजबूत असेल तरच त्यावर जीवननृत्य यशस्वी पणे सादर करता येईल.
     आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते कि, श्रद्धा म्हणजे भक्ती करणे, तीर्थयात्रेला जाणे, नोव्हेना व प्रार्थनेत सहभागी होणे. भक्ती हा श्रद्धेचा भाग असला तरी भक्ती म्हणजे श्रद्धा नव्हे. तसेच एखादी व्यक्ती भक्तिमान असली, बायबल पंडित असली म्हणून ती श्रद्धेमध्ये किंवा विश्वासामध्ये मुळावलेली असेलच असे नाही.
     श्रद्धा म्हणजे परमेश्वर पित्याला शरण जाणे. आपले सर्वस्व, चांगले आणि वाईट त्याच्या हातात सोपविणे. आपल्या रोजच्या जीवनात जे घडते ते सर्व परमेश्वराच्या योजनेनुसार घडते असे समजून ते आनंदाने स्विकारणे. त्याशिवाय येशुख्रिस्ताप्रमाणे निंदेची व टिकेची पर्वा न करता देव राज्य उभारणीसाठी धडपड करीत राहावे. हेच नेमके आजच्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत.
     इस्त्रायल किंवा यहुदी, शास्त्री-पुरूशी लोक ज्यांना परमेश्वराने निवडलेले होते तेच लोक परमेश्वराच्या शरण जात नाहीत. जरी त्यांना भक्ती माहित असली तरी ते खऱ्या श्रद्धेपासून दूर होते ह्याचा परिणाम आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये बघत आहोत की, कशाप्रकारे त्यांनी प्रभू ख्रिस्ताला धिक्कारले. प्रभू ख्रिस्त ह्या आव्हानाला, प्रसंगाला व विवंचनेला धैर्याने सामोरे जातो व म्हणतो संदेष्ट्याचा सन्मान  मात्र त्याच्या देशात होत नसतोव आपल्या शिष्यांनासुद्धा भावी जीवनामध्ये आपल्या कार्या मध्ये स्थिर व सबळ राहण्याचा इशारा देतो.
     जी व्यक्ती अश्या प्रसंगांना, संकटांना धैर्याने सामोरे जाते व प्रसन्नतेने परीस्थितीचा स्वीकार करते तीच खरी श्रद्धावान व्यक्ती मानली जाते आणि अश्या खऱ्या श्रद्धेची उदाहरणे आपल्याला पवित्र बायबलमध्ये आढळून येतात. आब्राहम, याकोब, मोशे, येशूचे शिष्य, संत पौल तसेच अनेक साधू-संत संत फ्रान्सिस असिसीकर, संत जॉन मारी वियानी इत्यादी. नव्या करारात श्रद्धेसाठी अनेक महान रक्तसाक्षी होऊन गेले. संत स्टिफनला दगड-धोंड्यांने ठार मारले. तरीही त्याने आपला विश्वास ढळू दिला नाही. पेत्राला उलटे टांगवले. पौलाला अतोनात हालअपेष्टा झाल्या. परंतु, तो मागे हटला नाही. तसेच काही स्त्रियाही श्रद्धेचे नमुने आहेत.
     परंतु आज ख्रिस्तसभेमध्ये अश्याही व्यक्ती आहेत की केवळ आपल्या स्वःताच्या फायद्यासाठी ख्रिस्त सभेचा वापर करतात. मी ख्रिस्तसभेसाठी काय करतो ह्यापेक्षा ख्रिस्तसभा माझ्यासाठी काय करते? हा प्रश्न त्यांना महत्वाचा वाटतो. काही वेळा मिस्साला येणे, दानधर्म करणे, कायद्याचे पालन करणे एवढीच त्याची भूमिका  असते.
     आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे आपणा  सर्वानां पाचारण करत आहे, त्याचा प्रेषित होण्यास मी तयार आहे का? माझा वेळ मी त्याच्यासाठी देऊ शकेल का? केवळ, मान, प्रतिष्ठा न मिळवता, कुठलीही अपेक्षा न करता, नि:स्वार्थीपणे देवाचे  कार्य करण्यास  मी तयार आहे का? आजच्या शुभवर्तमाना द्वारे कार्य करीत असताना, येणाऱ्या अडचणींना, निंदेला व टीकेला सामोरे जाण्यास आपणा सर्वांना ख्रिस्ताकडून विशेष कृपाशक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया. आमेन.
विश्वासू लोकांची प्रार्थना
प्रतिसाद:- नम्र होऊनी प्रभू तुज करितो प्रार्थना.
1.  ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून, त्याचे कार्य जगभर पसरविणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्या सर्वाना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.  आपल्या जीवनात ख्रिस्ताला अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समेट घडवून आणावा व एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.  आपण प्रेषित कार्य करीत असताना कौतुकाबरोबरच येणाऱ्या टिकेला, अडचणींना सामोरे जाता यावे व अश्या प्रसंगाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
4.  आमच्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत त्यांना तुझा स्पर्श लाभू दे. तसेच जे लोक तुझ्या पासून दूर जात आहे त्यांना तुझ्या प्रेमाची हाक ऐकू यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.    
5.  आता आपल्या स्वतःच्या कौटुंबिक हेतूसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.





No comments:

Post a Comment