Thursday 13 September 2018


Reflections for the homily of 24th  Sunday in Ordinary time (16-09-2018) by: Br Lipton Patil.





सामान्य काळातील चोविसावा रविवार

दिनांक : १६-०९-२०१८
पहिले वाचन : यशया ५०:५-९
दुसरे वाचन : याकोब २:१४-१८
शुभवर्तमान : मार्क ८:२७-३५



“आपण ख्रिस्त आहां”

प्रस्तावना :

        आज आपण सामान्य काळातील चोविसाव्या रविवारात प्रवेश केला आहे. देऊळ माता आजच्या उपसानेद्वारे आपल्याला तीन गोष्टीबद्दल सांगत आहे. व त्या म्हणजे येशू हा ख्रिस्त आहे,” “येशू ख्रिस्त दुःख भोगणारआपण प्रत्येकांनी आत्मत्याग करून आपला वधस्तंभ उचलून घ्यावा.”
        आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया सांगतो कि, येशू ख्रिस्त हा संकटांना सामोरे जाणार आहे. व सर्व काही काहीच न बोलता सहन करणार आहे. आजचे दुसरे वाचन याकोबाच्या पत्रातून घेतलेले असून, याकोब सांगतो कि, श्रद्धा व विश्वासा बरोबर चांगली कार्ये व कृत्ये केली पाहिजे. तर मार्कलिखित शुभवर्तमानात येशू हा ख्रिस्त आहे’, अशी पेत्राने कबुली दिलेली आहे. तसेच येशू स्वतःचे मरण व पुनुरुस्थानाबद्दल बोलतो आणि शेवटी आत्मत्यागाचे आपणास आमंत्रण देतो.
        जर आपणाला ख्रिस्ताला प्रथम स्थान द्यायचे असेल व आनंदित जीवन जगायचे असेल तर आपणाला दुःख, क्लेश, हेवा, मत्सर व यातना इत्यादी गोष्टीनां सामोरे जावे लागेल. ह्या गोष्टीनां सामोरे जात असताना आपणाला ख्रिस्ताची कृपा, आशिर्वाद मिळावा म्हणून आपण या मिस्साबलिदानात खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाने सहभागी होऊया व आपणासाठी व इतरांसाठी विशेष प्रार्थना करूया.


सम्यक विवरण :
पहिले वाचन : यशया : ५०:-
                       
        यशया संदेष्टाचे पुस्तक हे चार अध्यायात विभागलेले आहे. आजच्या दुसऱ्या अध्यायात आपणास पाहायला मिळते (४०-५५). यामध्ये बऱ्याचशा कविता, गीते आहेत. हि सर्व गीते आपणाला मासिहाविषयी भाकीत करतात. यशया जरी येशू येण्याच्या सातशे वर्षा अगोदर येऊन गेला तरी त्याने मासिहा विषयी केलेले दुःखसहनाचे भाकीत यथायोग्य आहे. आजचे वाचन हे तिसरे सेवक गीत म्हणून संबोधले जाते. ह्या तिसऱ्या सेवक गीतात यशया संदेष्टा सेवकाला दुष्टतेला आणि सक्रीय आकसयांना तोड द्यावे लागते आहे असे सागतो. परतून पुढे तो म्हणतो, जो विश्वासात टिकून राहतो, त्याला कितीही दुखणं किंवा संकटाना सामोरे जावे लागले तरी परमेश्वर त्याची साथ कधीही सोडत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ देत नाही.

दुसरे वाचन - याकोब २:१४-१८

    याकोबाच्या पत्रात म्हटले आहे की, आपले दररोजचे, व नित्य जीवन व त्या जीवनासाठी आवश्यक वर्तन कशाप्रकारे असले पाहिजे ह्याविषयी याकोब मार्गदर्शन करून चांगली कृत्ये करायला निमंत्रण देत आहे. आपले ख्रिस्ती जीवन हे फक्त तर्क–वितर्क ह्यावर व किंबहुना सिद्धांतवर नसून ते ख्रिस्ताने केलेल्या प्रकटीकरणावर असावे असे याकोब सांगतो.

शुभवर्तमान - मार्क ८:२७-३५

    फिल्लीपी कैसरीयाच्या प्रदेशात एका सुताऱ्याचा मुलगा येशू ह्याला पेत्र ‘देवाचा पुत्र’ किंवा मसीहा म्हणून ओळखतो. जणूकाही मोठ्या-मोठया राजा-सम्राटांनी भरलेल्या अवाढव्य इतिहास असलेल्या ह्या प्रदेशात येशुदेखील एक राजकीय नेता बनेल आणि सर्व लोकांची गुलामगिरीतून सुटका करेल, ह्या हेतूने पेत्राकडून निघालेले हे उदगार असावेत. पेत्राने जेव्हा ख्रिस्ताला सांगितले की, आपण ख्रिस्त आहात, तेव्हा येशूने हे सत्य कोणालाही सांगू नका ह्याची ताकीद दिली कारण दुसऱ्यांच्या तोंडाने सांगण्यापेक्षा, त्यांना स्वताःहून हे अनुभवायचे होते. सैतान माझ्या पुढून चालता हो, हे उद्गार व्यक्तीला वापरले जातात. जो व्यक्ती इतरांच्या दैनंदिन जीवनात अडथळे किंवा बाधा आणतो त्याला आपण सैतान म्हणतो परंतु ख्रिस्ताच्या काळी सैतान म्हणजे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी असा होता. शत्रू हा नेहमी मित्राचे वाईट करत असतो. ख्रिस्ती जीवन हे त्यागाचे आहे. कधीपण, केव्हापण आपण त्यागासाठी तयार राहिलो पाहिजे. वधस्तंभ हे आपले ध्येय आहे. कारण या वधस्तंभामुळे  आपल्याला नवीन जीवन मिळाले आहे. जो वधस्तंभाचा स्विकार करतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते.

बोधकथा:

    इटली या शहरात एक ख्रिस्ती जोडपं राहत होत. दररोज चर्चला जाणे, घरात नेहमी संध्याकाळी रोझरी करणे, वेगवेगळ्या संताचा नोव्हेना करणे, तसेच तीर्थयात्रेला भेट देणे व चर्चच्या सर्व कार्यक्रमामध्ये ते सहभागी होत असत. या जोडप्याचा ख्रिस्तावर अफाट प्रेम होते. परंतू ह्या जोडप्याच्या नशिबात मुलबाळ नव्हते. मुल-बाळ नसताना सुद्धा हे जोडपे आनंदित जीवन जगत होते. असे हे जवळ-जवळ पाच वर्षे चालू होते. परंतु ह्या जोडप्याने त्यांचे देवावरील प्रेम कधी कमी केले नाही. ते त्यांच्या प्रार्थनामय जीवनामध्ये जबाबदार होते. परंतु आजूबाजूचे लोक म्हणायला लागले की, तुम्ही प्रार्थना का करिता? तुम्ही इतकी प्रार्थना, पूजा, अर्चना करून सुद्धा देव तुम्हांला तुमच्या प्रेमाचं फळ का देत नाही? तेव्हा हे जोडपे दुःखी किंवा निराश न होता स्मित हास्याने म्हणत असे की, जो कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने स्वःताचा वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. आमच्यासाठी मुल-बाळ नाही म्हणून आमच्यासाठी तो एक वधस्तंभ आहे. अशा या कठीण परीस्थितत आम्ही आमचा वधस्तंभ उचलतो व आनंदित राहतो. एक ना एक दिवस आम्हाला आमच्या प्रार्थनेचे व आमच्या प्रेमाचे फळ मिळणार. काही वर्षा नंतर परमेश्वराने ह्याच जोडप्याला एका मुल-बाळाची देणगी न देता; दोन जुडवा मुल-बाळाची देणगी देऊन त्यांचा रिकामी पदर भरून टाकला.
    तात्पर्य : येशू ख्रिस्ताच्या मागे जात असताना आपल्याला खूप काही खाच-खळाग्यांना सामोरे जावे लागते. दुःख येतात परंतु हे दुःख सार्वकालिक नसतात.

मनन चिंतन

जर तुम्हाला कोणी या क्षणी विचारले कि, येशू ख्रिस्त कोण आहे? तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल. कारण प्रत्येक व्यक्तीचा येशू ख्रिस्ताला पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. आपण येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या रूपाने पाहतो. त्याचा अनुभव घेतो व त्यानुसार आपण उपमा किंवा नावे देतो. उदा. कोणी आई, वडील, भाऊ, बहिण, मित्र, सल्लागार, मेंढपाळ अश्या वेगवेगळ्या नावाने संबोधतात. येशूने जेव्हा शिष्यांना विचारले कि लोक मला काय म्हणून ओळखतात? तेव्हा शिष्य म्हणाले, “लोक तुम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान, एलिया व संदेष्टा अश्या नावाने ओळखतात. लोकांनी येशू ख्रिस्ताचा जवळून अनुभव घेतला नव्हता. तरी सुद्धा त्यांनी येशू मध्ये महान व्यक्तीचे गुण पाहिले होते. तर शिष्यांनी येशू ख्रिस्ताचा जवळून अनुभव घेतला होता. ते येशू सोबत राहत होते. म्हणून येशू ख्रिस्ताला शिष्यांच्या तोंडून ऐकायचे होते. म्हणून येशूने त्यांना तोच प्रश्न विचारत म्हटले कि, “तुम्ही मला कोण म्हणून ओळखता?” दुसऱ्याने दिलेल्या उत्तराची पुनरावृत्ती करणे सोपे असते परंतु वैयक्तिक उत्तर देण्यास अनुभव, हिंमत असावी लागते. त्यामुळे पेत्र येशूला उत्तरतो कि, “आपण ख्रिस्त आहां.” पेत्राने येशुमध्ये जिवंत ख्रिस्त पाहिला म्हणून पेत्राने हि कबुली दिली. ज्याप्रमाणे आपण सुद्धा ज्या व्यक्तीच्या सोबत राहतो त्याविषयी आपण जाणून त्या व्यक्तीचे गुण सांगू शकतो. तसेच जेव्हा पेत्राने हि कबुली दिली तेव्हा ख्रिस्ताला सुद्धा ते माहिती होते. त्यामुळेच येशू ख्रिस्त सांगतो कि, माझ्याबद्दल कुणाला सांगू नका. यशया संदेष्ट्याने सुद्धा भाकीत केले होते कि, मसिहा येणार आहे. आपणा सर्वांचे तारण करावयास दुःख, हाल-अपेष्टा सहन करणार आहे. शुभवर्तमानात ख्रिस्त खुद्द सांगतो कि, मी दुःख सहन करणार व मरणार परंतु तीन दिवसानंतर पुन्हा उठणार. प्रभू येशू आपल्या पापांमुळे दुःख सहन करतो व आपल्याला पापांच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतो व मृत्यूवर विजय मिळवतो.
हाच ख्रिस्त आपणास त्याचा अनुयायी होण्यास बोलावत आहे. आपण आत्मत्याग करून स्वतःचा वधस्तंभ उचलला पाहिजे. तसेच आपण दुःख व संकटात व अपयशात ख्रिस्ताला दोष न देता त्याच्यावरील विश्वास वाढवला पाहिजे. चांगली कृत्ये करून ख्रिस्ताचे अनुयायी झाले पाहिजे. आपण आपल्या दुःखाच्या क्षणी प्रभू येशूचे गेथसेमनी बागेतील दुःख डोळ्यासमोर आणले पाहिजे. आपल्या अपयशात ख्रिस्ताने वाहिलेल्या भारदस्त क्रुसाची आठवण केली पाहिजे. जेव्हा आपण खाली कोसळतो तेव्हा आपण ख्रिस्ताने सोसलेल्या क्लेशाचा अनुभव घेतला पाहिजे. कारण प्रत्येक रात्रीनंतर रम्य पहाट येत असते. बोधकथेत सांगितल्याप्रमाणे, इटलीच्या जोडप्याच्या जीवनात दुःखानंतर आनंदाची लाट वाहू लागली.
        आज आपण दुसऱ्याकडून ख्रिस्ताच्या चमत्काराची खूप महती ऐकतो पण मला ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव आहे का? येशू माझ्यासाठी कोण आहे? ख्रिस्ताची प्रतिमा आपल्यात दिसते का? मी ख्रिस्तासारखा जीवन जगतो का? जर, ख्रिस्तामध्ये एकरूप होऊन आनंदित जीवन जगायचे असेल तर येणाऱ्या संकटांना सामोरे गेले पाहिजे कारण दुख सहन करणे हे गरजेचे असते. बहुतेक वेळा आपण व्यक्तीच्या कृतीवरून सांगतो कि हा मुलगा आई किंवा वडिलांची हुबेहूब प्रतिकृती आहे. परंतु कधी आपल्या आचारणावरून कुणी आपल्याला म्हटले आहे का, कि हा/हि ख्रिस्ताप्रमाणे वागतो/ वागते. तसेच आपण जेव्हा रस्त्यावरती भेटतो तेव्हा कितीजण ख्रिस्ताबद्दल बोलतात? आपले संभाषण दुसऱ्याबद्दल असते. जर ख्रिस्ताचे खरे अनुयायी व्हायचे असेल तर ख्रिस्तामध्ये विलीन झालो पाहिजे. ख्रिस्ताची प्रतिमा आपल्यात दिसली पाहिजे, आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना.
प्रतिसाद: परमेश्वरा करुणा करा व आमची प्रार्थना स्विकारा.

१)     आपले महागुरू पोप, बिशप्स, कार्डीनल, धर्मगुरू-धर्मभागिनी तसेच ख्रिस्तामध्ये एकरूप होऊन सेवाकार्य करणाऱ्या या सर्व लोकांना प्रभूचे कार्य व्यवस्थितरित्या पुढे नेता यावे व त्यांना चांगले आरोग्य, कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)     सध्या जगामध्ये अशांतता दिसून येत आहे. घातकी संकटे कोसळत आहेत. राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक व आर्थिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)     सर्व ख्रिस्ती बांधवात एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांना समजून घ्यावं, आप-आपसातली वैर-भावना या गोष्टींचा त्यांग करून प्रेम, सदभावना निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     जे लोक आजारी आहेत, ज्याचं मरण जवळ येऊन ठेपल आहे त्यांनी जीवनात निराश न होता त्यानां प्रभूची प्रेरणा मिळावी व धैर्याने जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)     देव प्रीती आहे, तो आपली प्रार्थना ऐकतो म्हणून आता आपण आपल्या स्थानिक गरजा शांतपणे प्रभूचरणी मांडूया.






No comments:

Post a Comment