Thursday, 6 September 2018


Reflection for the Homily of 23rd Sunday of Ordinary Time 
(09-09-18) By Br. Godfrey Rodriques






सामान्य काळातील तेविसावा रविवार


दिनांक – ०९-०९-२०१८
पहिले वाचन – यशया - ३५:४-७
दुसरे वाचन – याकोबाचे पत्र - २:१-५
शुभवर्तमान – मार्क – ७:३१-३७




"तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”


प्रस्तावना

     आज आपण सामान्य काळातील तेविसाव्या रविवारास प्रारंभ केला असून आजची उपासना आपणा प्रत्येकाला देवाच्या तारणयुक्त प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी बोलावत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा म्हणतो की, भिऊ नका, आपला उद्धारकर्ता देव आपले तारण करावयास तसेच तारणासाठी योग्य असलेले प्रतिफळ द्यावयास येत आहे. तर आजच्या दुसऱ्या वाचनात याकोब आपणाला जणू आशेचा नवीन किरण दाखवत आहे. तो म्हणतो की, देव कुठलाच भेदभाव करत नाही तर सर्वजण त्याच्यासाठी सारखेच आहेत. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दैवी स्पर्शाने मूक व बधिर माणसाला बरे करून जणू त्या माणसाला त्याच्या खालवलेल्या दर्जातून उंचावतो व तारणयुक्त प्रेमाचा अनुभव त्यास देतो.
     अशाप्रकारे आजची उपासना इतरांना आदराने वागवण्यासाठी आमंत्रण देत आहे. त्याचप्रमाणे आपल्या समाजात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल हळहळ व्यक्त करण्यास व अन्याया विरूद्ध आवाज उठवण्यास प्रोत्साहन करत आहे. म्हणून त्यासाठी लागणारी कृपा व शक्ती आपणाला मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
 पहिले वाचन – यशया ३५:४-७

     इस्त्रायली लोकांना उद्देशून संदेष्टा यशया म्हणतो की, भिऊ नका, तुमचा देव तुमचा उद्धार करावयास येत आहे. कारण यशया संदेष्टा इस्त्रायली लोकांच्या हाल-अपेष्टा जाणून होता. बाबेलच्या कैदित असताना इस्त्रायली लोकांना अवजड ओझे घेऊन येरुशलेमातून बाबेलास पायी प्रवास करण्यास भाग पाडला होता. त्यांच्या त्या प्रवासात त्यांना पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे अनेक वृद्ध लोक आजारी पडले व त्यांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले जात होते.
     बाबेलमध्ये तर त्यांची परिस्थिती खूप बिकट होती. पालकांना मुलांपासून, पतीला पत्नीपासून तर भावाला बहिणीपासून वेगळे करण्यास आले होते. योग्य अन्न न पुरवता त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून रात्री जनावरांच्या जागी झोपावे लागत असे. त्यांना क्रूरतेने वागवले जात असे. अश्याप्रकारे इस्त्रायली लोकांना बाबेलच्या मालकांनी पूर्णपणे ताब्यात ठेवले होते. अश्या ह्या परिस्थितीत यशया संदेष्टा लोकांना, भिऊ नका, तुमचा देव तुमचा उद्धार करावयास येत आहे, असे बोलून जणू आशेचा नवीन किरण दाखवत आहे.

दुसरे वाचन - याकोबाचे पत्र २:१-५

     याकोब संदेष्टा त्याच्या दैवी ज्ञानाने, आपल्या निदर्शनास आणतो की देव सर्वदा श्रीमंता वरच नव्हे तर गरिबांवर व दिनांवर सुध्या दया दाखवतो व धनवानाकडून दानशूरतेची अपेक्षा ठेवतो. याकोब संदेष्टा म्हणतो की, माणूस हा आर्थिक दुखाने गरीब असतो, पण देवासमोर, विश्वासाच्या संदर्भात सर्वच लोक एकसमान असतात, म्हणून देव त्यांच्या राज्यात सर्वांचेच स्वागत करत आहे.
     दिन, दुबळे, गरीब व आशाहीन लोकांसाठी देव आशेचा किरण बनत असतो, व सर्वदा तो त्यांच्या पाठीशी असतो, देवाला गरीबाविषयी विशेष आस्था असते व पाप्यांनी त्यांची पापी वृत्ती सोडून त्याच्या जवळ यावे म्हणून तो स्वतः पाप्याकडे वळतो व त्यांना तारणयुक्त प्रेमाचा अनुभव देतो.

शुभवर्तमान - मार्क : ७:३१-३७

     आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला असे निदर्शनास येते की, येशू ख्रिस्त, देवाचे राज्य प्रस्थापित करण्याचे कार्य पार पाडत आहे. येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार हे त्याच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नव्हते तर देव राज्यासंबंधीची शिकवण देण्यासाठी देवाने दिलेल्या शक्तीचा वापर तो करत होता.
     आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशू दकापालीस येथे येतो व मूक बधिर माणसाला बरे करतो व निक्षुरपणे सांगतो की, मी तुला बरे केले आहे हे कोणालाच कळवू नको, सांगू नको कारण त्याला प्रसिद्धी मिळवायची नव्हती तर देवाचे राज्य प्रस्थापित करायचे होते. येथे आपणाला देवाच्या तारणयुक्त प्रेमाची अनुभूती मिळते. देव हा सर्वाना आदराने,  समानतेने वागवतो हे आपल्या दृष्टीस पडते. देवाने मूक बधिर माणसाला बरे केल्यानंतर व इतर चमत्कार केल्यानंतर अनेक लोक म्हणाले की, प्रभूने सर्व काही चांगले केले आहे.

बोधकथा

दोन वर्षा अगोदर आम्ही ताबोर येथे तपासाठी (retreat ) गेलो होतो. तेथे आम्ही सुरवातीला एका अपंग माणसाला बघितले, तो चालूच शकत नव्हता, त्याच्या बरोबर त्याचा मुलगासुद्धा होता. संपर्ण त्या तपामध्ये त्याचा मुलगा त्याची सेवा करत होता. आम्हाला त्याची खूप द्या यायची. तो दररोज सकाळी लवकर उठायचा व वेळेवर प्रार्थनेला यायचा, त्याला पाहून आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करायचो.
एके दिवशी त्याच्या मुलाला आम्ही सांगितले कि तुझ्या वडिलांना चालायला खूप कठीण जाते म्हणून त्यांना थोडा जास्त वेळ झोपू दे कारण त्यांना जास्तच त्रास होतोय. त्याचा मुलाला सुद्धा त्याच्या वडिलांची द्या यायची म्हणून त्याने त्याच्या वडिलांना सांगितले कि तुम्ही आराम करा व सकाळी थोडावेळ जास्त झोपा. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला म्हंटले कि, “मी जो पर्यंत तुमच्या सारखा चालत नाही तो पर्यंत माझी प्रार्थना सोडणार नाही आणि जास्त वेळ आराम सुद्धा करणार नाही. हे जेव्हा आम्हांला माहिती पडले तेव्हा आम्ही सुद्धा गप्प राहिलो, त्या वेळेला आम्ही त्यांच्या बोलण्यावर जास्त लक्ष दिले नाही परंतु त्याचे शब्द आम्हांला शेवटच्या दिवशी आठवले, कारण शेवटच्या दिवशी जेव्हा आजाऱ्याना आशीर्वाद दिला तेव्हा ते अचानक चालू लागले, व उठून स्टेजवर आले. त्यांना बघून सर्वजण आश्चर्यचकीत झाले व देवाला धन्यवाद देऊ लागले. हे सर्व पाहून आम्हांला त्याने उच्चारलेले शब्द आठवले. त्यांच्या विश्वास व सातत्य पाहून आरोग्यदायी प्रभू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनात चमत्कार घडवून आणला.

मनन चिंतन

     आजची उपासना देवाचे दैवत्व हे तारणदायी प्रेमाचे दैवत्व आह्रे, हे आपल्या निर्देशनास आणून देते. देव दिन दुबळ्याचे रक्षण करतो, गरिबांना व श्रीमंतांना समानतेने वागवतो. तर शरीराने कमकुवत असलेल्या माणसांना चमत्कारासारख्या दैवी स्पर्शाने परिवर्तीत करतो व त्यांना आदराने वागवतो. ह्या सर्व वरील गोष्टी देव माणसावर बहाल करतो त्या फक्त एकाच उद्देशाने व ते म्हणजे, ‘मानवाला तारण दायी प्रेमाचा अनुभव देऊन देव राज्य प्रस्थापित करणे होय.
     देवाच्या राज्यात प्रेम, सुख, समाधान, द्या, क्षमा व समानता ह्या सर्व मुल्यांचा समावेश होतो; व हि सर्व मुल्ये देव स्वतः त्याच्या पुढाकाराने मानवाला अनुभवयास देतो. कारण त्याची इच्छा अशी आहे कि, आपण सुद्धा त्या देव राज्याच्या मूल्याचे पालन करून इतरांना प्रेमाचा, आनंदाचा, क्षमेचा व दयेचा अनुभव दिला पाहिजे. आपण देवाशी एकनिष्ठ व्हावे व देवा प्रमाणे व्हावे म्हणून देव स्वतः  ख्रिस्ताच्या रुपात आपल्याशी एकनिष्ठ झाला. आपल्या सारखा (पाप सोडून) बनला. त्यांनी अंगी बाळगलेली सर्व मुल्ये  जणू स्वर्ग राज्याच्या मूल्याची जणू प्रतिमा बनली आहेत; ह्याची जाणीव आपल्याला आजच्या शुभवर्तमानातून होत आहे.
किती सामर्थ्य धन्य प्रभू तुझे रे | मोठे नवल वाटले मला रे ||
मुका बहिरा होता उभा रस्त्यावरी | जरी त्याला वाचा नव्हती तरी ||
थुंकी लावून वाचा त्याला दिली रे | आयुष्यात परिवर्तन त्याच्या केले रे||
किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे | मोठे नवल वाटले मला रे ||
     वर नमूद केलेल्या गाण्याचे बोल अथवा ओवी आपणाला आजच्या शुभवर्तमानाचा सारांश देत आहेत, जणू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली व चमत्कारिक कृत्याचे वर्णन करून देत आहेत. येशू ख्रिस्त त्याचे प्रेम व कृपा सर्वांवर समानतेने बहाल करतो. त्याच्या दैवी शक्तीने तो आम्हाला बरे करतो. ज्यांनी कुणी येशुशी संबंध साधीला, त्या सर्वांना येशूने उत्तेजित केले. येशूने केलेल्या प्रत्येक चमत्कारानंतर  व विशेषताः आज नमूद केलेल्या बहिऱ्या व मुख-बधीर माणसांच्या जीवनातील चमत्कारानंतर त्यांनी प्रत्येकाला बजावून सांगितले कि, ह्या वरील गोष्टी कोणालाच कळवू नको,  कारण प्रभूला नाम लौकिकता मिळवायची नव्हती, परंतु तो त्यांना जसे सांगत गेला तस-तसे ते अधिकच जाहीर करीत गेले.
     २००० हजार वर्षापूर्वी केलेल्या चमत्काराची गरज आजच्या जगाला व समाजाला सुध्दा आहे. कारण आज जर का आपण समाजात नजर टाकली तर कळून चुकेल कि, आजचा माणूस हा मानसिक दुष्टीने बहिरा, ‘आध्यात्मिक दुष्टीने तो मुका, ‘स्वार्थीपणामुळे लगदा तर मी’ पणामुळे लुळा झालेला  आहे. व स्वर्ग राज्याची मुल्ये तो विसरून गेला आहे, व अशा ह्या स्वर्ग राज्याच्या मूल्याची जाणीव करावयास व ती पाळण्यास देवाच्या कृपेची व येशू ख्रिस्ताच्या दैवी चमत्काराची आज आपल्या समाजाला अतिशय  गरज आहे. देवाचे शांतीचे आणि प्रेमाचे राज्य, स्व-त्यागाच्या जमिनीवर उगवून बहरू शकते. म्हणून सर्व प्रकारच्या वाईटावर विजय मिळविण्यासाठी, आज भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, स्वार्थी वृत्तीला निःस्वार्थी करण्यासाठी देवाच्या चमत्कारिक कृपेची साथ मिळावी म्हणून ह्या मिस्सा बलिदानात विशेष प्रार्थना  करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद : हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.

१)     आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्या सर्वाना देव राज्यांची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)     आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)     ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)     केरळ प्रांतात पूरच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे गेलेल्या सर्व लोकांना देवाच्या तारणदायी प्रेमाचा व चमत्कारिक कृपेचा अनुभव यावा. तसेच त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा मिळविण्यास इतरांनी मदत करावी म्हणून आज आपण प्रार्थना करूया.
६)     आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment