Reflection for the Homily of 30th
Sunday of Ordinary Time
(28-10-18) By Br. Jameson
Munis
सामान्य काळातील
तिसावा रविवार
दिनांक – २८/१०/२०१८
पहिले वाचन – यिर्मया ३१:७-९
दुसरे वाचन – इब्री ५:१-७
शुभवर्तमान – मार्क १०:४६-५२
“तुझ्या
विश्वासाने तुला बरे केले आहे.”
प्रस्तावना :-
आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करीत
आहे. विश्वास परमेश्वराकडून मनुष्याला मिळालेली एक महान देणगी आहे. ज्या व्यक्तीचे
जीवन विश्वासाच्या पायावर उभारले आहे, ती व्यक्ती देवाच्या शक्तीने सर्व काही प्राप्त
करू शकते.
देव आपल्या सर्वाचा पिता आहे. तो आपल्या लोकांना पुन्हा एकदा सुखात
आणि आनंदात ठेवण्याचे वचन देतो हे यिर्मया संदेष्टा इस्त्राएल लोकांस आजच्या पहिल्या वाचनात सांगतो. आपण देवाला निवडत
नसतो तर देव आपल्याला निवडत असतो व सर्व काही त्यांच्याच इच्छेप्रमाणे होत असते
असे आजच्या दुसऱ्या वाचनात आपण एकतो. तर शुभवर्तमानात आंधळा असलेल्या बार्तीमयला
त्याच्या विश्वासामुळे येशू त्याला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त करतो असा उतारा आपण ऐकतो.
आपल्या जीवनात आपण देवाला
पूर्णपणे ओळखण्यास कमी पडत असतो. म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात बार्तीमय
सारखा आपला विश्वास दृढ करण्यासाठी व देवाला पूर्णपणे ओळखण्यासाठी लागणारी कृपा, शक्ती
व मार्गदर्शन आपण देवाकडे मागुया.
सम्यक विवरण
पहिले वाचन - यिर्मया ३१:७-९
आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा इस्त्रायल लोकांस
परमेश्वराचे कार्य व इच्छा प्रकट करतो. परमेश्वर लोकांस आनंदित होण्यास सांगतो; कारण मी तुम्हास
त्या उत्तरेकडच्या देशातून इस्राएलला आणीन. जगातील दूरदूरच्या ठिकाणाहून मी
इस्राएलच्या लोकांना एकत्र करीन. काही लोक आंधळे आणि पंगू असतील. काही स्त्रिया
गर्भवती असतील. ते सर्व रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन व सांत्वन
करीन. कारण मी इस्राएलचा पिता आहे.
दुसरे वाचन - इब्री ५:१-६
दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, देवाच्या
कार्यासाठी देव स्वतः माणसाला निवडतो. सर्व अधिकार देवाच्या हातात आहेत आणि तोच
आपल्या सर्वांची अनुयायी व शिष्य म्हणून निवड करत असतो. ख्रिस्ताने स्वतःला याजक
बनविले असे नाही तर तो या जगात मनुष्यरूप धारण करून आला व देवाने त्याला मलकीसदेका
प्रमाणे याजक म्हणून नेमले. माणसाने स्वताःहून देवाला अनुसरण्यास निवडले तर त्याचे
देवावरील प्रेम दिसून येते. व जेव्हा देव आपली निवड करतो तेव्हा देवाचे मानवावरील
प्रेम दिसून येते. म्हणून आपण त्याच्या हाकेला प्रतिसाद देण्यास तयार असायला हवे.
शुभवर्तमान – मार्क १०:४६-५२
आजच्या शुभवर्तमानात आपण येशू आंधळ्या बार्तीमयला दृष्टीदान देतो
या विषयी ऐकतो. ह्या उताऱ्यात बार्तीमय नावाचा एक मनुष्य दृढ विश्वासाची साक्ष
देतो. बार्तीमयचा विश्वास एखाद्या रहस्यावर किंवा शिकवणुकीवर आधारित नसून, येशू
ख्रिस्त मला बरे करेल व मला नवजीवन देईल ह्या विश्वासामध्ये सामावलेला आहे. हा
त्याचा विश्वास त्याच्या प्रत्येक कृत्यातून दिसून येतो. जेव्हा येशू जवळून जात
होता, तेव्हा तो मोठ्याने हाक मारतो व बोलतो, “हे दाविदाच्या पुत्र येशू माझ्यावर दया कर.” कित्येकांनी त्याला
दटावले व धमकी दिली तरी तो अधिकच ओरडून दयेची
याचना करू लागला. प्रभू येशूने
त्या हाका ऐकल्या. तो उभा राहिला व बार्तीमयला त्याच्या कडे येण्याची आज्ञा दिली.
तो जवळ आला. मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. तेव्हा बार्तीमय साध्या
व सोप्या भाषेत फक्त एवढेच म्हणतो कि, “मला दृष्टी हवी आहे.” तेथेच प्रभू येशूने
त्याला दृष्टी दिली आणि म्हणाला, “जा,
तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि त्या क्षणापासून तो पाहू शकला व देवाचा
महिमा वर्णीत त्याच्या मागे गेला.
बोधकथा
विजय नावाचा एक मनुष्य जन्मापासून आंधळा होता. जरी तो काही
पाहू शकत नव्हता तरीही त्याचे कान मात्र फार तीक्ष्ण होत. एक दिवस तो मित्राच्या
लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसापर्यंत सर्व लोक
सजावट, शोभा, अलंकार, पेहराव ह्या
बाबतीत बोलत होते. हे सर्व विजय न पाहिल्यामुळे कानाने ऐकत होता. परंतु त्याच्या
मनात एकाच विचार होता की, लोकं एवढे सारे कौतुक
करतात परंतु लग्नाच्यावेळी झालेल्या वैभवशाली घंटानादाविषयी कोणीही काहीच का बोलत
नाही? ह्या आंधळ्या व्यक्ती साठी वधू-वरांच्या
आगमनावेळी झालेला वैभवशाली घंटानाद सगळ्यात महत्वाचा होता कारण त्या घंटानादाने
संपूर्ण वातावरण बहरुन गेले होते. परंतु दुसऱ्या सर्वांच्या नजरेत ही गोष्ट आलीच
नव्हती. परंतु विजयाने त्याचा आनंद अनुभवला होता. व तोच आनंद दुसऱ्यांनी गमावला
होता. जे काही इतर व्यक्तीसाठी शुल्लक होते ते त्या आंधळ्या विजयसाठी आनंददायक
होते.
मनन चिंतन
हि छोटीशी गोष्ट आपल्याला आजच्या उपासना विषयीची आठवण करून देत आहे. आजच्या
शुभवर्तमानात आपण बार्तीमय नावाच्या आंधळ्या माणसाची गोष्ट ऐकली. जरी तो आंधळा
असला तरी त्याचे कान तीक्ष्ण होते. शुभवर्तमान सांगते कि, येशू तेथून जात असल्याचे
त्याने ऐकले. जरी तो पाहू शकत नव्हता, तरी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेने त्याने
येशुशी संवाद साधला. येशूवर असलेला त्याचा विश्वास त्याने दर्शविला. त्याने येशूला
आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी पहिले व ह्याच विश्वासाने येशूने त्याला बरे केले.
आपल्या जीवनात सुद्धा आपण अश्याच परिस्थितीमधून जात असतो. आपल्याला
एखादा आजार, एखादे संकट किंवा कुठलाही समस्या असेल तर ह्यातून मुक्ती
मिळविण्याकरिता आपण सर्वजण अनेक वैद्याकडे व डॉक्टरकडे जातो. तसेच आपण अनेकांचा
सल्ला सुद्धा घेतो. परंतु आपण आत्मिक, मानसिक किंवा शारीरिक आजारातून बरे होतो का?
“कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून
उपाशी.” या ओवीप्रमाणे, साऱ्या सृष्टीचा तारण व निर्माण कर्ता प्रभू येशू नेहमी
आपणा जवळ असताना सुद्धा आपण इकडे-तिकडे भटकतो. याचे कारण म्हणजे आपला ख्रिस्तावर
असलेला अविश्वास व कमीपणा. ख्रिस्ती धर्म हा विश्वासावर आधारित आहे. हे आपल्याला
आजच्या उपसानेमधून कळून येते. विश्वास देवाकडून मानवाला मिळालेली एक मोफत देणगी
आहे. आपण जितक्या प्रमाणात खरा विश्वास ठेवतो तितक्या प्रमाणात आपणाला परमेश्वराचे
धैर्य मिळते. कारण आपल्याला विश्वासामुळे कळू लागते कि, परमेश्वर आपपल्या बरोबर
आहे. तसेच प्रभू परमेश्वर स्वतः म्हणतो, ‘जे
श्रद्धावंत आहेत त्याच्यावर माझी कृपादृष्टी कायम असते.’ श्रद्धेमध्ये अधिका-अधिक
स्थिर होण्याकरिता व टिकून राहण्याकरिता आपण सर्वांनी अंत:करणातून प्रार्थनेला
आपल्या जीवनात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. म्हणून, आज बार्तीमय व त्याचा विश्वास
आपल्या सर्वांना येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास सांगत आहे. जरी तो आंधळा
होता तरी खरे काय आहे हे त्याने पहिले
होते.
जेव्हा आपण खरा विश्वास ठेवू लागतो तेव्हा परमेश्वराच्या कृपेने आपले जीवन
अधिक आनंदी व अधिक समृद्ध होऊ लागते. जेव्हा आपल्यावर संकटे, अडचणी येतात व जेव्हा
आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते तेव्हा आपण देवाच्या विरुद्ध कुरकुर करतो.
कारण आपला विश्वास कुठेतरी दुबळा व डळमळीत असतो. म्हणून आपला विश्वास जितका मजबूत
तितके आपले धैर्य वाढणार. तितके आपण चांगले कार्य करणार, तितके आपण देवाचे
विश्वासाचे दान व प्रेम न घाबरता दुसऱ्यांना देत राहणार. म्हणून ज्याप्रमाणे
बार्तीमयला दृष्टी मिळाल्यानंतर त्याने त्याचा विश्वास अधिक दृढ केला,
त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा विश्वासचे आणखी खरे सत्य समजावे व आपण ते दैनंदिन
जीवनामध्ये व मनामध्ये स्विकारावे म्हणून कृपा मागुया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद :- हे प्रभू, आमचा विश्वास दृढ कर.
१)
आपले परमगुरुस्वामी
फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी आणि प्रापंचिक ह्यांना प्रभूने
चांगले आरोग्य व आयुष्य द्यावे. तसेच त्यांचा विश्वास दृढ व्हावा आणि पूर्ण
श्रद्धेने त्यांनी देवाचे कार्य करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)
जे लोक आजारी, दुःखी व
संकटात आहेत अश्या सर्वांना देवाचा स्पर्श व्हावा; त्यांच्या इच्छा व आकांशा पूर्ण
व्हाव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३)
हे प्रेमळ पित्य ख्रिस्ती
श्रद्धेमुळे ह्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत, अश्या लोकांचा विश्वास
पक्का ठाम व्हावा व त्यांनी ख्रिस्तसभेशी एकनिष्ठ राहण्यासाठी धैर्य व सामर्थ्य
लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४)
सर्व भाविकांना बार्तीमय
सारखा दृढ विश्वास मिळावा व प्रभू येशू वर विश्वास ठेवण्यास कृपा-शक्ती लाभावी
म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५)
आपण शांतपणे आपल्या
कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक हेतूसाठी प्रार्थना करूया.