Friday, 12 October 2018


Reflection for the Homily of 28th Sunday of Ordinary Time (07-10-18) By Br. David Godinho  






सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार



दिनांक १४-१०-२०१८
पहिले वाचन :- ज्ञानग्रंथ :- ७:७-११
दुसरे वाचन :- इब्री लोकांस पत्र :- ४:१२-१३
शुभवर्तमान :- मार्क १०:१७—३०




 जगातील संपत्तीच्या मागे जाऊन स्वर्गातील संपत्ती गमावू नका 


प्रस्तावना  :
    आज आपण सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास खऱ्या संपत्तीचा शोध घ्यावयास आव्हान करीत आहे.
    ह्या जगात जीवन जगत असताना आपण ऐहिक किंवा नश्वर सुख-संपत्तीच्या मागे असतो. हि नाशवंत संपत्ती मिळविण्यासाठी प्रत्येक मनुष्य अनेक असे काबाड-कष्ट करीत असतो. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीसाठी  आपण नक्कीच कष्ट केले पाहिजेत. परंतु त्या हि पेक्षा जी खरी संपत्ती आहे. जिचा उल्लेख आजच्या वाचनात केलेला आहे. ती मिळविण्यासाठी आपण अतोनात परिश्रम केले पाहिजेत.
    आजच्या पहिल्या वाचनात ज्ञानाची तुलना जगातील संपत्तीशी करताना ती कवडी मोल किंवा वाळू समान आहे असे सांगितले आहे. तसेच इब्री लोकांस पत्र ह्यात “प्रभू शब्द” हि खरी संपत्ती आहे असे आपणास ऐकावयास मिळते. शुभवर्तमानात असे समझते कि, प्रभू येशू ख्रिस्त हिच खरी संपत्ती आहे. म्हणूनच त्या तरुणाला प्रभू ‘माझ्यामागे ये’ असे आमंत्रण देतो. 
    ह्या मिस्सा-बलिदानात सहभागी  होत असताना दैनंदिन जीवनात प्रभू-वचनाला प्राधान्य देऊन, ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास अशा प्रकारे स्वर्गातील संपत्ती न गमावता ती मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून प्रभू चरणी प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन  - ज्ञानग्रंथ :- ७:७-११
    आजचे पहिले वाचन शलमोनचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. आपणास ‘समज’ आणि ‘विवेक शक्ती’ मिळावी म्हणून शलमोनने देवाकडे प्रार्थना केली. जगातील इतर साधन–सामग्री ऐवजी (राजदंड, सिंहासन, आरोग्य, सौदर्य आणि प्रकाश) त्याने ज्ञानाची निवड केली. अशा प्रकारे बुद्धीची किंवा ज्ञानाची प्रशंसा आजच्या पहिल्या  वाचनात नमूद केलेली आहे.

दुसरे वाचन
इब्री लोकांस पत्र :- ४:१२-१३
आजचे दुसरे वाचन  इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रातून आहे. देवाच्या वचनाचे सामर्थ्य इथे स्पष्ट केले आहे. देवाच्या वचनास आपल्या जीवनात यथार्थ स्थान मिळावे, कारण देवाचे वचन म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे असे आपण योहान कृत शुभवर्तमानात एकतो (योहान:- १:१).  प्रभू येशू ख्रिस्त सर्व ज्ञानी व सर्व जाणणारा आहे.

शुभवर्तमान - मार्क १०:१७—३०
    मार्क लिखित शुभवर्तमानात आपल्याला ‘येशू ख्रिस्ताची संपत्ती’ बद्दल शिकवण वाचावयास मिळते. तसेच ‘संपत्ती’ शिष्यवृत्ती मध्ये अडथळा बनू शकते आणि शिष्यवृत्तीचे बक्षीस हे केलेल्या त्यागापेक्षा कितीतरी पटीने मोठे असल्याचे आजच्या वाचनात सांगण्यात आलेले आहे.
    देवाचे किंवा स्वर्गाचे राज्य मिळविण्यासाठी किंवा येशूचा खरा शिष्य बनण्यासाठी आपल्याला त्यागाची वृत्ती अंगी बाळगावी लागते. सर्व आज्ञा पाळल्या, सर्वधर्म आचरणात आणले, चांगले व्यवस्थित जीवन जगले, कोणाला त्रास दिला नाही म्हणून आपण देव कृपेला किंवा राज्याला विकत घेऊ शकत नाही. परंतु ख्रिस्ताच्या मागे जाऊन म्हणजे ख्रिस्ताने सांगितलेल्या वचनाप्रमाणे जीवन जागून आपण खऱ्या अर्थाने शाश्वत जीवनाला अंगिकारू शकतो, असे सांगण्यात आले आहे.

बोध कथा:
एकदा एक लहान मुलगा पैश्याच्या नाण्याबरोबर खेळत होता. खेळता, खेळता काही नाणी एका लहानश्या कुंडित पडली. मग हा मुलगा, ती नाणी काढण्यासाठी आपला हात कुंडित घालतो व ती नाणी आपल्या मुठित घट्ट पकतो व हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या कुंडीचे तोंड अरुंद असल्यामुळे तो आपला हात बाहेर काढू शकत नव्हता. हे सर्व कृत्य त्या मुलाचे वडील पाहत होते. मग ते वडील त्या मुलाला सांगतात, की तुझी मुठ तू उघडल्याशिवाय व ती पैश्याची नाणी सोडल्याशिवाय, तू तुझा हात बाहेर काढू शकणार नाहीस. परंतु, तो मुलगा आपली मुठ उघण्यासाठी तयार नव्हता. तेव्हा त्याचे वडील त्याला सांगतात की, मी तुला १०० रुपयाची नोट देईन परंतु, तरीसुद्धा तो मुलगा आपली मुठ उघण्यासाठी तयार नव्हता, कारण त्याला ती नाणी हवी होती. आणि म्हणुन तो आपला हात बाहेर काढू शकत नव्हता. आपली ही वृत्ती, कधी कधी ह्या लहानश्या मुलाप्रमाणे असते. आपणा प्रत्येकाला प्रभू परमेश्वर शाश्वत संपत्ती द्यायला तयार आहे, परंतु त्यासाठी आपण जगातील संपत्तीचा त्याग करावयास सज्ज असले पाहिजे.   

मनन चिंतन
    हिप्पोचे संत अगस्तीन म्हणतात, “हे परमेश्वरा जो पर्यंत आमची हृदये तुझ्यात विश्रांती घेत नाहीत तोपर्यंत ती अस्वस्थ राहतील!आजची उपासना आपल्याला हेच सांगत आहे. जगातील कोणतीही संपत्ती माणसाला समाधानी ठेवू शकत नाही. कारण प्रत्येक मनुष्य परमेश्वराने स्वतःसाठी निर्माण केलेला आहे. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराच्या म्हणजेच खऱ्या सार्वकालिक संपत्तीचा शोध घ्यावयास सुरवात करते व ती मिळवण्यासाठी कोणताही त्याग करावयास तयार होते तेव्हाच ती व्यक्ती खऱ्या अर्थाने समाधानी होत असते. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, राजा शलमोनने भौतिक संपत्ती ऐवजी ज्ञानाची निवड केली. लूकलिखित शुभवर्तमानात ११:३१ मध्ये आपण वाचतो की, ख्रिस्त सांगत आहे की, शलमोनापेक्षा थोर असा एकच आहे. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो ज्ञानाचा स्त्रोत आहे. किंबहूना ख्रिस्तच ज्ञान आहे. ज्या ज्ञानासाठी शलमोनाने प्रार्थना केली होती व ते ज्ञान शलमोनास बहाल करण्यात आले होते. दुसऱ्या वाचनात आपल्याला देव-शब्दा विषयी सांगण्यात आलेले आहे आणि हा देव-शब्द देखील खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणूनच जो प्रभूवचन ऐकून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो; तो मनुष्य स्वर्गातील संपत्ती मिळवण्याच्या मार्गावर असतो. प्रभू-शब्द आपणा प्रत्येकाला आपलं जीवन बदलण्यास आव्हान करत असते. त्यासाठी आपल्याला खूप अश्या आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग करावयास आपण तयार असण्याची नितांत गरज आहे.   
     हिंदीमध्ये एक म्हण आहे, “कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैशुभवर्तमानातील तरुणाला सार्वकालिक जीवन वतन म्हणून पाहिजे होते. ते मिळवण्यासाठी तो ख्रिस्ताकडे आला. परंतु ख्रिस्ताची आज्ञा ऐकताच त्याला धक्काच बसला. जगातील संपत्ती त्याला अधिक प्रिय होती. ती सोडून ख्रिस्ताच्या म्हणजेच सार्वकालिक संपत्तीच्या मागे जाणे हा विचारच त्याला धक्कादायक होता. म्हणून आपण ऐकतो की हाच एक असा व्यक्ती, जो ख्रिस्ताकडे आला, परंतु तसाच कष्टी होऊन, दुःखाने निघून गेला.
     असिसिकर संत फ्रान्सिस हा दुसरा तरुण की जो, सार्वकालिक जीवन म्हणजेच ख्रिस्त प्राप्तीसाठी संसारी संपत्तीवर लाथ मारून ख्रिस्ताला आलिंगन दिले. म्हणूनच आज संत गणात त्याची गणना केली जात आहे. मत्तयकृत शुभवर्तमानात आपण वाचतो तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर दुसऱ्या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील (मत्तय ६:३३). पेत्राने व इतर शिष्यांनी येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी सर्व काही सोडले होते. प्रभुने त्यांना धीर दिला की, प्रभू ह्या जगात त्यांच्या गरजा भागविणारा होता व त्याबरोबर त्यांना स्वर्गात संपत्ती मिळणार होती. संसारी संपत्ती बद्दल येशू ख्रिस्त आपणास का बरे सावध राहावयास सांगत आहे? कारण संपत्ती आपल्याला देवावर अवलंबून राहण्याऐवजी खोट्या सुरक्षतेची आशा देते. यहुदी लोकांची अशी समझ होती की, जो माणूस श्रीमंत आहे त्याच्यावर देवाचा आशीर्वाद असतो. परंतु स्वर्गाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे कठीण आहे असे येशू ख्रिस्त सांगत आहे. धनाने, संपत्तीने, मालमत्तेने श्रीमंत असण्यापेक्षा हृदयाने श्रीमंत असणे फार गरजेचे आहे. कारण संपत्ती श्रीमंतांना देवापासून व विश्वासू जीवनापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करीत असते. जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेतत्यामुळे त्यांनी स्वत:लाच पुष्कळ दु:ख करून घेतले आहे” (१ तिमथी ६:९-१०).
     गरीब लाजाराला मदत करण्यास नकार देणाऱ्या श्रीमंत माणसाला ख्रिस्ताने दिलेल्या धड्याकडे पहा (लूक १६:१९-३१). संसारी संपत्तीशी चिकटून राहण्यापेक्षा विलग होण्याचा म्हणजेच जगातील संपत्तीच्या मागे लागण्याऐवजी स्वर्गातील सार्वकालिक संपत्ती मिळवण्यासाठी तत्पर राहूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे देवा आमची प्रार्थना ऐक.
१. सर्व धार्मिक अधिकारी, तसेच सर्व लोकांना, प्रभू, जी ‘स्वर्गातील खरी संपत्ती’ आहे, त्या संपत्तीची ओढ लागावी आणि ती मिळविण्यासाठी त्यांनी आटोकाट परिश्रम करावे हया परिश्रमात प्रभूने त्यांना यश दयावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्मसंस्कृतीपंथ आहेत या मायभूमित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकमेकांविषयी आदराची भावना असावी व देशाच्या उन्नतीसाठी ज्या ज्या नेत्यावर जबाबदारी आहे त्या सर्वांनी आपले कार्य निस्वार्थीपणे करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

. मानव, आज आपला मानवधर्म, विसरून धन-संपत्ती व प्रसिद्धी ह्यांना आपला धर्म समजत आहे. आपणा सर्वाना प्रभूचा स्पर्श व्हावा व मानवतेवर आपले प्रेम वाढावे आणि आपली संपत्ती गरजवंतुना द्यावयास आपण संकोच न करता हसत मुखाने मदत करण्यास पुढे यावे. म्हणून लागणारी कृपा आपणास मिळण्यासाठी प्रभू कडे प्रार्थना करू या.

४. आपल्या गावातील तरुण पिढीला देवाने स्पर्श करावा, ऐहिक सुख-संपत्तीच्या मागे न जाता, त्यांनी शाश्वत संपत्तीचा शोध घ्यावा व जे देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूने पुन्हा एकदा त्यांच्या हृदयात प्रभू प्रेमाची ओढ निर्माण करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करुया.

1 comment: