Thursday 18 October 2018


Reflection for the Homily of 29th Sunday of Ordinary Time (21-10-18) 
By Br. Julius Rodrigues  


सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार


दिनांक: २१/१०/२०१८ 
पहिले वाचन : यशया ६०: १-६ 
दुसरे वाचन : रोम १०: ९-१८
शुभवर्तमान : मत्तय २८: १६-२०




"तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा."


प्रस्तावना :

आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता मिशन रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशूच्या मागे चालण्यास व त्याने दिलेल्या कार्यास पुढे नेण्यास बोलावित आहे. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया आपणास सांगतो कि, परमेश्वराचे सत्याचे तेज आपल्यावर आले आहे. व त्या तेजामुळे आपण आनंदित झालेलो आहेत. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो कि, जो परमेश्वराच्या नावाचा धावा करितो त्याचे तारण होईल. शुभवर्तमानात येशू त्यांच्या शिष्यांना त्याची सुवार्ता प्रकट करण्यास बोलावित आहे.
    आज मिशन रविवार साजरा करीत असताना परमेश्वराच्या प्रेमाचा, शांतीचा, ऐक्याचा अनुभव इतरांस देऊन प्रेम-सेवा आपल्या हातून घडून यावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानात आपण प्रार्थना करूया.

पहिले वाचन : यशया – ६०:१-६

    ह्या वाचनात आपण सियोनाचे गौरवी वैभव पाहत आहोत. ह्या वाचनात आपण अनुभवत आहोत कि, आनंदी उल्हासाचे असे आगळे-वेगळे आशिर्वादित चित्रण केले आहे जे जुन्या आणि खुद्ध ख्रिस्ती काळाच्याही पलीकडचे आहे. परंतु ह्या ठिकाणी वापरण्यास आलेली भाषा मात्र जुन्या करारातील विधीनियम आणि जगिक यरुशलेमची आहे. येथे मूळ दृष्टी अशी आहे कि, विखुरलेल्या इस्त्राईल लोकांचे यरुशलेम येथे पुनरागमन हे सर्व जगातून देवाकडे वळलेल्या लोकांचे दर्शक आहे आणि ह्या दुष्टांतातून अंतिम गौरवी अवस्थेकडे पहिले आहे.

दुसरे वाचन - रोम : ६०: ९-१८

    रोमकरांस पत्रात पौल विश्वासा विषयी बोलत आहे. विश्वास म्हणजे काय ह्याचे उत्तर आपणास ह्या वाचनात आढळते. सुवार्ता ऐकल्यावर येशूला आपला प्रभू मानणे हे  अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय सुवार्तेवरील आपला विश्वास फक्त बुद्धीने दिलेली संमती ठरवते.  पवित्र आत्म्याशिवाय कोणीही येशूचा, आपला प्रभू असा स्विकार करू शकत नाही. देव सर्वांचा देव आहे. आता यहुदी व हेलनी परराष्ट्रीय हा भेद राहिला नाही. सर्वांना एकाच मार्गाने आशीर्वाद मिळतो. तो मार्ग ख्रिस्त आहे. तो सर्वाचा प्रभू आहे. प्रत्येकाने त्याला प्रभू मानावे मग त्याच्यापासून विपुल आशीर्वाद मिळतील. तारण होण्यासाठी प्रभू येशूला मानून त्याचा धावा करावा लागतो, धावा करण्याआधी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागतो व विश्वास ठेवण्यासाठी सुवार्ता ऐकावी लागते.

शुभवर्तमान – मत्तय : २८:१६-२०

    शुभवर्तमानकार मत्तय येशूने दिलेल्या आज्ञा विषयी बोलत आहे. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना त्यांच्या सोबत राहण्याची साक्षच देत आहे. ख्रिस्त आपल्या शिष्यांना अधिकारणाने आज्ञा देत आहे. त्याचा अधिकार सर्व राष्ट्रातील लोकांवर होता. येशूच्या शिष्यांना सर्व राष्ट्रातील लोकांस ख्रिस्ताचे शिष्य करायचे होते. आणि त्यांना पाण्याने बाप्तिस्मा घ्यायचा होता. देव जो पिता, देव जो पुत्र, व देव जो आत्मा या त्रेक्य देवाशी एकनिष्ठ राहण्याची हि साक्षच होती.

मनन चिंतन

ऐक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

     आज ख्रिस्तसभा मिशन रविवार साजरा करीत आहे. मिशन हा शब्द मुळातून लॅटीन भाषेच्या मिशियो ह्या शब्दातून अवतरला आहे. त्याचा अर्थ पाठवलेलाकिंवा जाणेअसा होतो. बायबलमध्ये आपणास मिशन-विषयक अनेक उदाहरणे आढळतात.
१. जुन्या करारातील उत्पत्ती ह्या पुस्तकात परमेश्वराने अब्राहामास सांगितले की तू आपला देश, आपले नातेवाईक व आपले घर सोड व मी पाठवतो त्या ठिकाणी जा.
२. देव मोशेला आपल्या लोकांची गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी व त्यांना नवजीवन देण्यासाठी मिसर देशात पाठवतो.
३. परमेश्वर एलियसला सिदोनातील सारफश नगरात परमेश्वराचा शब्द प्रकट करण्यात पाठवतो.

     त्याचप्रमाणे नविन करारात आपण पाहत आहोत की, ख्रिस्ताने त्याच्या शिष्याची निवड केली व त्यांना त्याच्या प्रेमाची व शांतीची सुवार्ता जगभर पसरवण्यासाठी पाठवून दिले.

     आपण प्रत्येकाने मिशन कार्य केले पाहिजे. मिशन म्हणजेच देवाचा शब्द घोषित करणे, एकमेकांची सेवा करणे आणि परमेश्वराचे राज्य ह्या भूतलावर उत्पन्न करणे होय. प्रत्येक व्यक्ती हा मिशन कार्यासाठी निवडलेला असून त्याला एक विशिष्ट मिशन कार्य सोपवण्यात आले आहे. मदर तेरेजा हिने आपल्या जीवनातील मिशन ओळखून घेतले होते म्हणून तिने प्रभूची सेवा ही अनाथांना आश्रय देऊन केली. संत फ्रान्सिस असिसिकर ह्यांनी प्रभूशब्द अंगिकारला व तो सर्वत्र पसरवण्यासाठी नेहमी झटत राहिले. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकत आहोत की, परमेश्वर आपल्या शिष्यास सर्व जगात जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा व त्यांना पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने बाप्तिस्मा देण्यास सांगत आहे. शुभवार्ता घोषविणे हे प्रत्येक शिष्याचे आद्यकर्तव्य आहे. आज मिशन म्हणजे आपण आपले जीवन परमेश्वराच्या वचनावर जगणे; आपल्या घरी जेथे आपण आपले जीवन व्यतीत करतो तेथे प्रभूशब्द व त्याचे प्रेम पसरविणे होय.

मिशन कार्यासाठी आपण पुढील मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे:
१. मिशन कार्य हे आपले नसून परमेश्वराचे आहे.
२. मिशन म्हणजेच प्रभूच्या शब्दाची ग्वाही व येशूच्या जीवनाची पुनरावृत्ती होय.
३. आपण परमेश्वराच्या आदेशानुसार जगून, एकमेकांवर प्रेम करून, शेजाऱ्यांची सेवा करून  मिशन कार्य पूर्णत्वास आणत असतो.
४. मिशन म्हणजे आपले जीवन ख्रिस्तावर अवलंबून जगणे होय.

     परमेश्वराने जेव्हा शिष्यांना सर्व राष्ट्रांत पाठविले तेव्हा त्यांना दैवी जीवनाची ओळख इतरापर्यंत पोहचवण्यास सांगितले. प्रत्येक जण ज्याने ख्रिस्तात नवजन्म स्विकारला आहे तो एक मिशनरी झालेला आहे आणि म्हणूनच ख्रिस्तात जगणे आणि ख्रिस्त इतरांस देणे हे आपले कर्तव्य आहे. बाळ येशूची संत तेरेजा ही फक्त २४ वर्षे जगली. ती कधीही तिच्या कॉन्व्हेंटच्या बाहेर गेली नाही, तिने कोणती संस्था चालू केली नाही किंवा तिने चमत्कार केले नाहीत. ती फक्त १० वर्षे कॉन्व्हेंटमध्ये ख्रिस्तमय जीवन जगली. आणि तरीही तिला संत फ्रान्सिस झेवियर ह्यांच्या सोबत मिशनऱ्यांचा आदर्श मानले जाते. हे सर्व तिच्या प्रर्थानामय जीवन व मिशनकार्या वरील प्रेमामुळे शक्य झाले. कधी-कधी आपणांस वाटते की मी मिशनसाठी काही करू शकत नाही परंतु जे काही आपण परमेश्वराच्या राज्याचा विस्तार होण्यासाठी करीत असतो त्यातून आपण परमेश्वराचे मिशन कार्य साधत असतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे परमेश्वरा मला इतरांस मदत करण्यास स्फुर्ती दे.

१) आपल्या ख्रिस्त सभेत कार्य करणारे आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, व इतर सर्व ख्रिस्ती बांधव जे देवाचे कार्य पूर्ण श्रद्धेने ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाद्वारे करत आहेत त्यांना प्रभूने आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) समाज्याच्या हितासाठी झटणारे आपले राज्यकर्त्ये व इतर अधिकारी ह्यांना प्रभू सेवेची ओढ लागून त्यांच्याद्वारे लोकांची अधिका-धिक उन्नती घडावी म्हणून प्रार्थना करूया.

३) करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी, ह्या प्रभूवचनावर विश्वास ठेऊन जे लोक आर्थिक आणि श्रमिक मदत करतात व प्रभू सेवेची ग्वाही देतात अशांना प्रभूचे सहाय्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) एक ख्रिस्ताचा सेवक म्हणून स्वतःला झळ बसे पर्यंत पुढच्या  मार्गचा विचार न करता सढळ हाताने इतर गरजू लोकांना मदत करता यावी व ख्रिस्ताची शिकवण कृतीत दाखविता यावी म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

५) आपल्या सामाजिक व वैयक्तिक गरजा आपल्या प्रभू चरणी ठेवूया.     


No comments:

Post a Comment