देवमातेचा सोहळा
दिनांक: ०१/०१/२०१९
पहिले वाचन – गणना ६:२२-२७
दुसरे वाचन – गलतीकरांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान – लूक २:१६-२१
प्रस्तावना:
आज आपण नवीन वर्षात पदार्पण करीत असताना वर्षाच्या पहिल्याच
दिवशी ख्रिस्तसभा आपल्याला ‘मरिया देवाची माता’ हा सोहळा साजरा करण्यासाठी बोलावत आहे. मरिया
जरी साधी व भोळी स्त्री असली तरी ख्रिस्तसभेत तिचे स्थान महत्वाचे आहे. मरीयेने
सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या, असे संत लुक आपल्याला सांगतो. परमेश्वर पुत्राची
माता हि आज अखिल मानव जातीची माता बनली आहे. तिच्या मध्यस्थीने अनेक प्रसंगी
मानवजातीवर कृपेचा वर्षाव होत आहे. तिचा आदर्श आपण आपल्या नजरेसमोर ठेवून नवीन
वर्षात चांगले जीवन जगण्यासाठी ह्या पवित्र मिस्साबलीदानात देवमातेचे सहाय्य मागू
या.
पहिले वाचन – गणना ६:२२-२७
आजच्या पहिल्या वाचनात
परमेश्वराच्या सांगण्यावरून आशिर्वादाची प्रार्थना आहारोन व त्याचे पुत्र लोकांना
देतात. कारण ते देवाने निवडलेले लोक होते; म्हणून देवाची पवित्र
कृपा त्यांच्यावर होती. हीच प्रार्थना आज ख्रिस्तसभा आपल्या सर्वांना करण्यास प्रेरित करत आहे.
दुसरे वाचन – गलतीकरांस पत्र ४:४-७
संत पौल स्पष्ट करतो कि, आपल्या सर्वांना नवजीवन मिळाले आहे. म्हणूनच आपण आतापासून गुलाम नाही, देवाचे नुसते पुत्र नाही तर देवाद्वारे वारस ही आहोत. कारण देवाला अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात
पाठविले आहे.
शुभवर्तमान – लूक २:१६-२१
आजच्या शुभवर्तमानात देवदुताने पवित्र मरीयेला कशाप्रकारे
संदेश दिला व मेंढपाळांनी येशू ख्रिस्ताला कशी भेट दिली ह्याविषयी आपण ऐकतो. ह्या
संपूर्ण अध्यायामध्ये आपण विश्वासाचे अनेक गुण पाहत आहोत, ज्यामध्ये पवित्र मरीयेच्या विश्वासाला उत्तम
स्थान प्राप्त होते; म्हणूनच आज
ख्रिस्तसभेमध्ये पवित्र मरीयेला उत्तम स्थान दिले आहे.
मरीयेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात
ठेवल्या (२:१९). गब्रियल दूताने मरीयेला दिलेल्या संदेशानुसार आपल्या उदरी जन्मला
येणारे बाळ येशू दाविदाच्या वंशात जन्मला येणारा मसीहा देवाचा पुत्र असेल हे तिला
माहिती होते. त्यानंतर अलिशिबेने पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ‘माझ्या प्रभूची माता’ म्हणून तिला संबोधले. आता मेंढपाळामार्फत
देवदुताने सांगितल्याप्रमाणे हे बाळ ‘तारणारा ख्रिस्त व प्रभू आहे’ हे तिला कळले. या सर्व गोष्टी ऐकून मरीयेच्या
मनात विचार आला असेल कि, आपल्या उदरी जन्मला आलेले हे बाळ सर्व जगाचा प्रभू असूनही
त्याने इतक्या सामान्य व गरीब परिस्थितीत जन्मला यावे यामागे ईश्वरी योजना काय
असावी? ह्या व इतर सर्व
प्रश्नांचे उत्तर मरीयेच्या ‘तुझ्या शब्दाप्रमाणे होवो’ या श्रद्धापूर्ण होकारातच सामावलेले आहे.
मेंढपाळ गरीब, बुद्धीने मंद व समाजात त्यांना कमी दर्जा दिला जात असे. ते
जरी गरीब व बुद्धीने मंद असले तरी विश्वासाने भक्कम होते. जेव्हा देवदुताने
त्यांना संदेश दिला तेव्हा आपल्याला जो देवदूत दिसला तो भास असेल किंवा आपली
कोणीतरी फसवणूक करीत असेल अशी ते चिकित्सा करीत बसले नाहीत. तर ते ताबडतोब येशू
ख्रिस्ताच्या भेटीसाठी निघाले.
योहानाची सुंता झाली तेव्हा त्याच्या भविष्याविषयीचे भाकीत
केले होते. येशूला मंदिरात नेले तेव्हा त्याच्या बाबतीतही असे भाकीत करण्यात आले
होते.
बोधकथा:
मरिया माता हि नेहमी आपल्या जवळ उपस्थित असते व आपली काळजी
घेत असते. ह्याचे जिवंत उदाहरण आपल्याला पोप जॉन पॉल दुसरे ह्यांच्या जीवनात
आढळते. आपली माता लहानपणीच वारल्याने त्यांनी मरिया मातेला आपली अध्यात्मिक माता
म्हणून स्विकारून घेतले होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांना मरिया मातेचे
सहकार्य लाभले. ह्याचा प्रखर अनुभव जेव्हा १३ मे १९८१ रोजी त्यांच्यावर संत पिटर
चौकात गोळी झाडली त्या वेळी आला. पोप म्हणाले कि, “मरीयामातेने त्या गोळीची दिशा
बदलून माझा जीव जाण्यापासून मला वाचवले. मारीयेचे आभार मानण्यासाठी पुढल्यावर्षी
पोप जॉन पॉल दुसरे फातिमा येथे तीर्थस्थळाला भेट देण्यासाठी गेले व ती गोळी आता
फातिमा येथील मरिया मातेचा मूर्तीवरील मुकुटामध्ये रोवण्यात आली आहे. अशाचप्रकारे
देवमाता हि आपल्या सर्वांची काळजी वाहून आपले रक्षण करत असते.
मनन चिंतन:
पवित्र मरिया गे इशमाते, कुमारिका ख्रिस्ताचे माते,
देवकृपेचे मंगल माते, निर्दोषी अतिविरक्त माते.
जगत्रात्याची माता कुमारी, दूरदर्शी स्तुतियोग्य कुमारी,
माननीय अतिसबल कुमारी, श्रद्धाळू अतिविमल कुमारी.
आज आपण नव्या वर्षाला सुरवात करत आहोत. पवित्र देऊळमाता वर्षाचा पहिला दिवस पवित्र मरीयेला समर्पित करते व तिच्या मध्यस्थीची याचना
करते. माणसाचे जीवन त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्माने श्रेष्ठ बनते आणि ते कर्म परमेश्वर त्याच्या योजनेने पूर्ण करत असतो. नाझरेथमधील पवित्र मरिया ही सुद्धा अतिशय नम्र, परंतु श्रद्धेत आणि
आचार-विचारात अव्वल आणि अतिशय
पावित्र्याचे जीवन जगली. कोणत्याही कठीण परिस्थितीला न डगमगता जीवनाला धाडसाने समोर गेली. तिची देवमाता म्हणून केलेली निवड अतिशय समर्पक
होती. ती येशू ख्रिस्ताचा तीच्या
उदरात झालेल्या जन्मापासून तर भूतलावरच्या त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत व तद्नंतर ख्रिस्तसभेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. ही
आई आपल्यासाठी एक महान आदर्श व आपली कैवारीन आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईला एक महत्वाचे स्थान असते. आईची माया व वात्सल्य वेगळ्या प्रकारची असते जी आपल्याला
तिच्याकडे आकर्षित करते. प्रत्येकाने आपल्या
आईचा अनुभव घेतलेला असतो. येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या आईमध्ये तिची माया व वात्सल्य अनुभवले होते. देवपित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या विश्वात
पाठविण्यासाठी एका कुमारिकेची नेमणूक
विश्वाच्या सुरुवातीपासूनच करून ठेवली होती. तिच्या गर्भसंभावापासून देव पित्याने तिचा सांभाळ केला व तिला
पवित्र ठेवले व जेव्हा तिची वेळ आली तेव्हा देवपित्याने तिच्या उदरी पुत्र वाढवला व तो तिच्याद्वारे ह्या भूतलावरती आला. म्हणूनच आज ख्रिस्त सभेमध्ये पवित्र मरीयेला
देवाच्या आईच मान मिळाला आहे. पवित्र
मारीयेने देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याच्या तारण कार्यात स्वतःला समर्पित केले. हेच ह्या मातेचे खास वैशिष्ट्य आहे.
पवित्र मारीयेने देवाच्या योजनेला प्रथम स्थान देऊन, देवाला सर्वकाही शक्य आहे हे मानून देवपुत्राची माता होण्यास तयार झाली ह्यावरून आपल्याला समझते की त्यागी जीवन जगण्यास मरिया
मातेने नकार दिला नाही. पवित्र मरिया आपल्याला स्वतःचे जीवन देवाला समर्पित करण्यास, लीन व शरणागत होण्यास, आणि प्रभूशब्द आपल्या जीवनात उतरवण्यास बोलावत आहे.
“या दासीच्या लीनत्वाला, प्रभुणे उंचावले किती.
मन माझे आनंदे भरले, गाते प्रभूरायाची स्तुती.”
देवापित्याने मरीयेला अतिशय योग्य असे ख्रिस्तसभेत स्थान दिले आहे.
आज आपण नवीन वर्ष २०१९ ला सुरवात करत आहोत. वर्षाचा पहिला महिना ‘जानेवारी’ हा शब्द ग्रीक देवता जानूस ह्या पासून येतो. ह्या देवतेला एक मागे पाहणारे व
दुसरे पुढे बघणारे असे दोन मुखवटे होते; म्हणजेच एक भूतकाळात
पाहणारे तर दुसरे भविष्यकाळा कडे दृष्टीक्षेप टाकणारे. आज ह्या दिवशी नक्कीच आपण सुद्धा आपल्या मागे
सरलेल्या २०१८ ह्या वर्षावर नजर फिरवली पाहिजे. ह्या वर्षात मि माझे जीवन कसे जगलो? मी माझ्या जीवनात काही
प्रगती केली का? मी माझे सर्व ध्येय पूर्ण
केले का? कदाचित मि काही अजून चांगले करू शकलो असतो का? मी देवावरील, शेजाऱ्यावरील, कुटुंबातील सदस्यावर प्रेम
करण्यास व शांतीचे आणि क्षमेचे जीवन जगण्यास यशस्वी झालो का? जर आपल्याला गतवर्षात हे शक्य झाले नसेल तर ह्या
नवीन वर्षात आपण आपली ध्येय पूर्ण
करण्याचा प्रयत्न करू या. काही व्यक्ती म्हणतात की निश्चय करण्यात काही अर्थ नसतो कारण ते पूर्ण होत नसतात. अश्या व्यक्तीवर
विश्वास ठेऊ नका. आपण नवीन निश्चय व ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यास प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा पवित्र मरिये सारखे चांगले जीवन जगून, तिचे सर्व गुण अंगी
जोपासून, ह्या नवीन वर्षात तिचे अनुकरण
करावे व देव कार्यासाठी आपले जीवन समर्पित करावे म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र देवामाते आम्हासाठी विनंती
कर.
१. ख्रिस्त सभेचे
पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात
कार्य करत आहेत त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. हे नवीन वर्ष २०१९ आपल्या सर्वांना
सुखा-समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व चागल्या आरोग्याचे जावो म्हणून आपण
मारिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. ह्या वर्षी
आपल्या सर्वांना चांगले हवामान मिळावे व सर्व शेतीबागा पिकांनी व फळा-फुलांनी
बहरून याव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. सर्व स्थानिक
कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता
पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.