Tuesday 25 December 2018


Reflection for the Homily of Feast of Holy Family
(30-12-18) By Br. Jameson Munis 





पवित्र कुटुंबाचा सण

दिनांक: ३०/१/२०१
पहिले वाचन: १शमुवेल १:२०-२२,२४-२८ / बेनसिरा ३:२-६, १२-१४
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३:१-२, २१-२४ / कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: लूक २:४१-५२


प्रस्तावना:
आज आपण येशू, मरिया आणि योसेफ ह्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. ज्या कुटुंबात देवाला व त्याच्या नियमांना अग्रस्थान असते ते कुटुंब पवित्र कुटुंब असते.
आजच्या पहिल्या वाचनात, जो परमेश्वराचा मान व सन्मान करतो तो आई-वडिलांचा आदर व सेवा करतो असे सांगितले आहे. दुसऱ्या वाचनात ख्रिस्ती कुटुंबातील आपले परस्पर संबंध कसे असावेत ह्याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे. आपण सर्वांनी ख्रिस्ताचा दिलेल्या सहनशीलता, क्षमा, नम्रता व चांगुलपणा ह्या मूल्यांचा स्विकार केला आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो, योसेफ व मरिया ह्यांनी येशूच्या आध्यात्मिक व नैतिक मुल्यांची जोपासना करून आपल्यापुढे एक पवित्र कुटुंबाचा आदर्श ठेवला आहे.
कुटुंब हे एक देवाचे स्थान आहे. आई-वडीलामध्ये, दैवीपणाची जाणीव करून देणारे हे प्रभू येशूचे पवित्र कुटुंब आहे. ह्या कुटुंबाने सदैव देवाची इच्छा पूर्ण केली आणि आज हे कुटुंब सर्व कुटुबांसमोर एक आदर्श कुटुंब बनलेले आहे. कुटुंब हे मानवी जीवनाचे उगमस्थान आहे. म्हणूनच चांगल्या कुटुंबासाठी क्षमा, विश्वास, प्रीती, प्रार्थना, कठीण परिश्रम व चांगुलपणा ह्या सर्व मुल्यांची अत्यंत गरज असते.
म्हणून ज्याप्रमाणे पवित्र मरिया आणि योसेफ ह्यांच्या जीवनाला एक चांगली व नवीन आशा, प्रेरणा मिळाली त्याचप्रमाणे आपले सर्वांचे कुटुंबसुध्दा एक पवित्र व आदर्श कुटुंब बनावे व देवाचे वसतीस्थान बनावे म्हणून आज आपण ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.     
      
सम्यक विवरण:
पहिले वाचन: १शमुवेल १:२०-२२,२४-२८
पहिल्या वाचनात आपण हन्नाने बालकासाठी केलेली प्रार्थना व शमुवेलाचा जन्म याविषयी ऐकतो. जेव्हा हन्नाला मुल-बाळ नव्हते. तेव्हा तिला माणसे चिडवत असत आणि हन्नाला रडू येत असे व ती काहीही खात नसे. एके दिवशी ती शिलो येथील मंदिरात प्रार्थना करावयास गेली असताना, तिचे मन व्यथित होऊन ती रडत म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा तू आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर आयुष्यभर तुझे कार्य करण्यास त्याला मी तुला बहाल करीन.” ही तिची प्रार्थना परमेश्वर ऐकतो व पूर्ण करतो. तिला एक पुत्र होतो व त्याचे नाव ती शमुवेल म्हणजे ‘परमेश्वराकडे मागितलेला’ असे ठेवते. काही दिवसांनतर जेव्हा हन्ना आपल्या पती बरोबर वार्षिक होमबली अर्पिण्यास व नवस फेडण्यास मंदिरात जाते, तेव्हा आपण बालकासाठी केलेल्या प्रार्थनेची ती एली याजकाला कबुली देते आणि बालक शमुवेलास परमेश्वराच्या स्वाधीन करते.

पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६, १२-१४
ह्या पुस्तकाचा लेखक देवाच्या प्रेमात भारावून गेला आहे असे दिसून येते आणि अशाप्रकारचे प्रेम सर्वांच्या कुटुंबात असावे असा आग्रह करतो. मानव जातीच्या उद्धारासाठी कुटुंब अतिशय मुलभूत अशी गोष्ट आहे ह्याची जाणीव आपल्याला ह्या वाचानाद्वारे दिसून येते. हे वाचन पित्याला महत्वाचे स्थान देते, जो कुटुंबाच्या मुलभूत गरजा भागविण्याची भूमिका बजावत असतो. त्याचबरोबर आईसुद्धा ही महत्वाची भूमिका पार पाडत असते. तसेच मुलामुलींनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा असा सल्ला देतो. चांगले कुटुंब उभारण्यासाठी नम्रता आणि प्रीती ह्या दोन पैलू आपल्या समोर ठेवत आहे.

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३:१-२, २१-२४
आजच्या दुसऱ्या वाचनात, योहान सांगतो की, आपण देवाची प्रेमळ मुले-मुली आहोत. तो आपल्यावर प्रेम करतो. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. तसेच त्याच्या मार्गावर चालून एक आदर्श असे जीवन जगले पाहिजे. जो देवाच्या आज्ञा पाळतो त्याच्याठायी देव वास करतो. एकमेकांवर प्रीती करणे हीच खरी देवाची आज्ञा आहे.

दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१
ह्या वाचनात संत पौल सर्व लोकांना सांगतो की, आपले जीवन येशूच्या शिकवणुकीवर आधारले पाहिजे. सर्वांनी इतरांवर ममता दाखवली पाहिजे, तसेच चांगले संबंध व वागणे चांगले पाहिजे. तो पुढे म्हणतो की, ख्रिस्ताचा स्विकार करून आपण जणू नवीन झालो आहोत जणू नवीन वस्त्र परिधान म्हणजेच सहनशीलता, क्षमा, नम्रता व चांगुलपणा ही मुल्ये अंगिकारली आहेत. तसेच पती-पत्नीला सल्ला देताना तो सांगतो की, स्त्रीने पतीच्या अधीन असावे व पतीने तिच्यावर प्रीती करावी हुकुमशाही करू नये तर प्रीतीने नेतृत्व करावे. मुलांनी आई-बापाची आज्ञा पाळावी. आणि बापांनी त्यांचावर प्रीती करावी व त्यांना चांगली शिकवणूक द्यावी. अशा प्रकारचा बोध संत पौल करत आहे.      
शुभवर्तमान: लूक २:४१-५२
शुभवर्तमानात लूक येशू बारा वर्षाचा असताना व्ह्लांडण सणासाठी मरिया व योसेफ बरोबर गेलेल्याचे दृश्य वर्णन करत आहे. व्ह्लांडण सण साजराकरून झाल्यानंतर परतीच्या मार्गावर असता, येशू मागे राहिलेला आहे. हे तिसऱ्या दिवशी त्याच्या आई-वडीलांच्या लक्षात येते. तेव्हा ते त्याचा शोध करत परत यरूशलेमला जातात. तेव्हा येशू मंदिरात शास्त्री, परुशी ह्यांच्याशी संवाद करताना सापडतो. तसेच येशू ज्ञानाने, शरीराने, तसेच देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला हे सांगण्यात आलेले आहे. तसेच तो त्याच्या आई-वडिलांच्या आज्ञेत राहिला याचा सुध्दा उल्लेख केलेला आहे.

बोधकथा:
सरिता नावाची एक मुलगी होती. तिला दुसरे भाऊ-बहिण नसल्याने, ती तिच्या आई-वडिलांची लाडकी होती. तिच्या आई-वडिलांचे तिच्यावर खूप प्रेम होते. सरिताच्या सर्व इच्छा ते पूर्ण करीत असत. असे असले तरी ते नेहमी त्यांच्या कामात मग्न असत व त्यांच्या मुलीबरोबर जास्त वेळ देत नसत. सरिता नेहमी घरात एकटी असायची. सरिताला तिच्या आई-वडिलांनी खूप शिक्षण दिले, तिचे छंद, कला आणि गुण जोपासण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले, व्यवहारिक ज्ञानही दिले तसेच आजूबाजूच्या लोकांशी कसे वागावे हे सुध्दा शिकवले, परंतु कुटुंब म्हणजे काय ह्याविषयी तिला काहीच माहिती नव्हते. सरिता व तिचे आई-वडील प्रार्थनेसाठी कधीच एकत्र येत नसत, म्हणजेच त्यांच्या कुटुंबात देवाला प्रथम स्थान नव्हते, तर पैश्याला होते. मिस्साबद्दल सुध्दा तिला काहीही माहित नव्हते.
काही दिवसांनतर सरिता मोठी होते व तिचे लग्न होते. माहेर सोडून ती आता सासरी आली. येथे तिला समजले की, माहेरी असताना तिला कधीच कौटुंबिक प्रार्थनेची सवय नव्हती. पण सासरी येऊन ती रोज कौटुंबिक प्रार्थना करायला शिकली. रोज रात्री कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र रोझरी व बायबल वाचन करीत व नंतर एकत्र जेवण करत. हे सर्व पाहून सरिताला खूप आनंद झाला व हे करावयास तिच्यात आवडही निर्माण झाली. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते याची जाणीव तिला झाली. तिला कुटुंबाचा खरा अर्थ समजला. कुटुंब हे भींतीने बनत नाही, तर ते माणसाने बनते. याची जाणीव तिला झाली व योसेफ, मारिया व येशू ह्या पवित्र कुटुंबाचा आदर्श तिच्या पुढे ठेवून तिचे कौटुंबिक जीवन ती अगदी आनंदाने जगली.  
  
मनन चिंतन:
योसेफ, मरिया व येशू एक आदर्श कुटुंब!
आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. कुटुंब हे मानवाच्या उपस्थितीने बनते. जर कुटुंबाला पूर्ण शरीराची उपमा दिली तर वडील हे धड, आई श्वास तर मुले हात-पाय आहेत. म्हणूनच कुटुंबाच्या योग्य कार्यक्षमतेसाठी सर्वांची गरज आहे. जसे शरीरात सर्व अवयव एकमेकांवर अवलंबून असतात त्याचप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर अवलंबून असतात. कुटुंब हा समाजाचा सर्वात लहान परंतु सर्वात महत्वाचा घटक  आहे. जर कुटुंब सुदृढ तर समाज सुदृढ; जर समाज सुदृढ तर राष्ट्र सुदृढ आणि राष्ट्रे सुदृढ बनली तर संपूर्ण जग सुदृढ बनेल. जेथे हृदय हृदयाला भेटते अशी खास हक्काची जागा म्हणजे कुटुंब आहे. कुटुंबात सर्वजण एकमेकांवर प्रेम करत असतात व त्या प्रेमाचा उगम ख्रिस्ताच्या हृदयात होत असतो.
पवित्र कुटुंबाचा सण हा प्रत्येक कुटुंबाचा सण आहे. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते. परंतु आजच्या कुटुंबाची अवस्था वेगळीच दिसून येते. येशू म्हणतो की, “जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, बहिण आणि माझी आई” मार्क (३:३२). कुटुंब ही चांगल्या संस्काराची पहिली शाळा आहे. मानवी जीवनाची घडण, ख्रिस्ती श्रद्धेची जोपासना ही कुटुंबातच होत असते. म्हणून सर्वांनी पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्यासमोर ठेऊन योग्य कौटुंबिक जीवन जगावे.
योसेफने देवाच्या आज्ञेचे पालन करून एक चांगला पती बनून तो मरीयेशी प्रामाणिक राहिला. आपल्या सुतारकीच्या व्यवसायात कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण केले. आई म्हणजे प्रेम. तिचे घरातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम असते. मरीयेने येशू बाळाला जन्म देऊन देवाच्या कार्यात सहभाग दर्शविला. येशूच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ती त्याच्या सोबत राहिली. सदैव नम्रतेचे, शांतीचे व प्रीतीचे जीवन जगून तिने देवाने सोपविलेले कार्य निष्ठेने पार पाडले. घरात लहान मुलांमुळे घर भरून जाते. येशूने मानवरुप धारण करून, चांगले जीवन जगून आजच्या मुलां-मुलीं समोर एक आदर्श ठेवला आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांनी येशूची मुल्ये आत्मसाद करून चांगले जीवन जगावे व सर्वांचा सन्मान करावा असे वाटते.
पूर्वी समाजात एकत्र कुटुंब पद्धत होती परंतु सध्या विभक्त कुटुंब पद्धत दिसून येते. देवाला प्रथम स्थान दिले जात नाही. आज आपल्या मुला-मुलीनां मोबाईल व इतर सर्व गरजा लगेच पुरविल्या जातात परंतु पवित्र आत्म्याचे व ख्रिस्तसभेचे ज्ञान मात्र लवकर दिले जात नाही. पैश्याला प्रार्थनेपेक्षा अधिक महत्व दिले जाते. आज समाजातील अनेक कुटुंबे अनेक समस्येमुळे उद्ध्वस्त होत आहेत. अशावेळी आपण पवित्र कुटुंबाकडे पहिले पाहिजे. ते अडी-अडचणीचा सामना करत अतिशय प्रामाणिक, विश्वसनीय जीवन जगले व समाजासमोर आदर्श ठेवला आहे. आपण ह्या पवित्र कुटुंबाचे अनुकरण केले पाहिजे.
पोप फ्रान्सिस कुटुंबाविषयी सांगतात की, “कुटुंब चालवणे हे सोपे नसून एक आव्हान आहे.” आज कुटुंबातील अडी-अडचणीला सामोरे जाण्यासाठी प्रार्थनामय जीवन जगायला हवे. म्हणूनच पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्या समोर ठेऊन आपले कुटुंब पवित्र करण्याचा प्रयत्न करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र कुटुंबा, आम्हासाठी प्रार्थना कर.
१) आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी-धर्मबंधू ह्यांच्यावर व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा, तसेच त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी लोकांना एक पवित्र व आदर्श कुटुंब उभारण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) जी कुटुंबे काही कारणास्तव उध्वस्त झाली आहेत, अशांना योसेफ, मरिया व येशू ख्रिस्ताचे चांगले मार्गदर्शन लाभून त्यांना शांतीचे, प्रेमाचे व समजूतदारपणाचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
३) इथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व सर्व इच्छा, हेतू व आकांक्षा पवित्र कुटुंबाच्या मध्यस्थिने पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) जी कुटुंबं देवापासून दुरावली आहेत, अशा सर्व कुटुंबांना देवाचा स्पर्श व्हावा आणि ती देवाच्या सानिध्यात परत यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 
५) आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि आध्यात्मिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment