Friday, 11 January 2019


Reflection for the Homily of Feast of The Baptism of the Lord (13-01-19) By Br. Godfrey Rodriques





येशूच्या स्नानसंस्काराचा सण

दिनांक: १३/०१/१९
पहिले वाचन: यशया ४०: १-५, ९-११
दुसरे वाचन: संत पौलाचे तीताला पत्र २:११-१४, ३:४-७  
शुभवर्तमान: लूक ३:१५-१६, २१-२२ 


तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.
प्रस्तावना:
आज देऊळमाता आजच्या उपसानेद्वारे आपणा प्रत्येकाला आपल्या स्नानसंस्काराच्या वेळी घेतलेल्या वचनाची पुनरावृत्ती करण्यास बोलावत आहे. कारण आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजची उपासना, ‘स्नानसंस्काराद्वारे’ आपल्या श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते, ह्या महत्वाच्या मुद्द्यावर मनन-चिंतन करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा लोकांना तारणप्राप्तीसाठी पश्चाताप आणि देवपुत्राच्या आगमनाची तयारी करावयास सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल तीताला लिहिलेल्या पत्रात सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे लाभली आहे, अशे सांगतो. तसेच लूकलिखित शुभवर्तमानात योहानाने येशू विषयी केलेली, ‘माझ्या पेक्षा समर्थ असा कोणी येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे’ ही घोषणा ऐकावयास मिळते.
‘स्नानसंस्कार’ हा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्वाचा संस्कार आहे. त्याद्वारे आपली ख्रिस्ती श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते. हीच ख्रिस्ती श्रद्धा अधिक भक्कम होण्यासाठी लागणारी कृपा शक्ती आपणास मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
योहानाने लोकांस पश्चाताप करावयास सांगितले आणि बाप्तिस्मा करण्याची प्रथा सुरु केली. बाप्तिस्मा ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे डूबणे, डूबविणे अथवा बुडवून काढणे असा होतो. नवीन करारात जणू ख्रिस्ताच्या मृत्यूत पुरले जाणे व नवीन निर्मिती म्हणून त्याच्या पुनरुत्थानात सहभागी होणे असा अर्थ होतो. म्हणून आपण ऐकतो की, संत पौल कलैसेकरांस सांगतो, तुमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्हाला उठविले जाईल. येशू ख्रिस्त म्हणतो, ‘पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. ह्याच ख्रिस्त वचनानुसार बाप्तिस्मा संस्काराला पवित्र आत्म्याठायी नवजीवन असे सुध्दा म्हटले जाते. योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालीलातून यार्देन नदीजवळ त्याच्याकडे आला. येशूने संत योहान बाप्तीस्ताच्या हस्ते बाप्तिस्मा स्वीकारून मगच आपल्या प्रेषितीय कार्यास सुरुवात केली. आपल्या पुनरुत्थानानतर येशूने आपल्या प्रेषितांनाही ह्याच प्रेषित कार्याची दीक्षा दिली. “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले आहे ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”
जेव्हा संत योहानाने लोकांस पश्चाताप करण्याचे आव्हान केले तेव्हा येरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देनच्या आसपासच्या अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला व त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला. योहान येशूविषयी म्हणतो, “मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या पायताणाचे बंध देखील सोडण्याची माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.”
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये पेत्र लोकांस सांगतो की, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. (२:३८) येशू ख्रिस्त देवाचा पुत्र व योहानापेक्षा श्रेष्ठ असूनही त्याने योहानाकडून बाप्तिस्मा का घ्यावा? ह्याचे उत्तर आपणांस मत्तय अध्याय ३ ओवी १५ वरून स्पष्ट होते. प्रभू येशू केवळ पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा स्वः इच्छेने घेतो तो फक्त धर्माचरण परिपूर्ण व्हावे म्हणूनच. जेव्हा प्रभूने बाप्तिस्मा स्वीकारला तेव्हा जो पवित्र आत्मा जगाच्या प्रारंभी जलाशयावर तळपत होता, तो आत्मा ख्रिस्तावर पाठवून देवाने नवनिर्मितीच्या कार्यास सुभारंभ करून व घोषित केले की, हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे.
नव्या करारात आपण अनेक ठिकाणी पाहतो की, अनेक लोकांनी बाप्तिस्मा स्वःइच्छेने व विश्वासाने स्वीकारलेला आहे. उदा. फिलीप देवाचे राज्य व येशूख्रिस्ताचे नाव ह्याविषयी सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बाप्तिस्मा झाला स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलीपाच्या सहवासात राहिला. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.   

मनन चिंतन:
आज पवित्र देऊळमाता ख्रिस्ताच्या बाप्तिस्माचा किंवा स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात येशूच्या स्नानसंस्काराविषयी नमूद केलेले असून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या येण्याची कशी तयारी केली हे सांगत आहे.
१. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा
येशू गालीलातील नाझरेथहून आला तेव्हा त्याने योहानाच्या हातून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. येशू जरी देवाचा पुत्र होता, तरी त्याने श्रेष्ठपणा न दाखवता नम्रपणाने योहानाकडून बाप्तिस्मा स्विकारला यावरून येशू मानव होता हे आपणास दिसून येते. तसेच तो देवपुत्र असल्यामुळे पाण्यातून वर येताना आकाश विदारले व पवित्र आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर येशूला दिसला व आकाशवाणी झाली की, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्या विषयी मी संतुष्ट आहे.” देवाचा कृपा आशीर्वाद त्याच्यावर येतो व इथूनच प्रभू येशूच्या प्रेषितीय कार्याची सुरुवात होते.
२. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची तयारी
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या अशी घोषणा केली, कारण इस्त्रायलचे संदेष्टेही हाच सुपरिचित संदेश देत असत. हाच संदेश देत योहान प्रभूच्या येण्याचा मार्ग तयार करीत होता. त्याच्या ह्या घोषणेने तेथील लोकांचे परिवर्तन झाले व त्यांनी लगेच योहानाकडून बाप्तिस्मा स्विकारला. तसेच योहानाने प्रभू येशूच्या येण्याचा संदेश जगजाहीर केला. योहान घोषणा करताना म्हणत असे की, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे. त्याच्या पायताणाचा बंध सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. येथे योहानाचा नम्रपणा जाणवतो; कारण त्यास ठाऊक होते की, त्याच्यामागून जगाचा तारणारा प्रभू येशू येत आहे. त्यामुळेच त्याने प्रभूचा मार्ग अतिशय योग्यपणे तयार केला. प्रभू येशू आत्म्याने, अंतःकरणे शुद्ध करणार होता त्यामुळे येथे आपणास येशूचे कार्य हे योहानापेक्षा वेगळे व सामर्थ्यशाली होते ह्याची प्रचीती येते.
३. स्नानसंस्काराद्वारे आपल्या श्रद्धेत व विश्वासात वाढ
आपल्या प्रत्येकाचा बाप्तिस्मा पाण्याने व पवित्र आत्म्याने झालेला आहे व त्याद्वारे देवाने आपणाला त्याची लेकरे म्हणून निवडले आहे. आपल्या श्रद्धेत व विश्वासात वाढ झाली आहे व त्याचीच साक्ष देण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला जगात पाठवले आहे. आपल्याविषयी देव संतुष्ट आहे. आपले आईबाप, तसेच धर्म आईबाप आपल्यासाठी देवाला वचने देतात. आपण ती वचने आपल्या दररोजच्या जीवनात आचरणात आणली पाहिजे व जगाला ख्रिस्ताच्या प्रेमाची व दयेची साक्ष देणे गरजेचे आहे.
स्नानसंस्काराद्वारे आपण प्रत्येकजण देऊळ मातेचे अविभाज्य घटक झालो असून ख्रिस्त आपल्याला त्याच्या कार्यासाठी बोलावत आहे. चर्च हे उत्तम प्रकारचे कार्य करण्याचे साधन आहे. चर्च-संलग्न अशा खूप संघटना आहेत. ह्या संघटनेत सहभागी होऊन देवाचे कार्य करूया म्हणजे आपण खरे ख्रिस्ती असल्याचा अभिमान वाटेल. स्नानसंस्काराच्या वेळेला घेतलेल्या वचनाची पुनरावृत्ती करूया व देऊळमातेशी एकनिष्ठ राहून विश्वास व श्रद्धेत वाढ व्हावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
१) आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व धार्मिक अधिकारी ह्यांना देव-राज्याची सुवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव दूर होऊन सर्वत्र शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या काम धंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) स्नान-संस्काराद्वारे आपल्यावर असलेल्या ख्रिस्ती जबाबदारीची आपणांस जाणीव व्हावी व स्नान-संस्काराच्या वचनांशी आपण सदैव एकनिष्ठ राहावे म्हणून प्रार्थना करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारी, निराशित आणि दुःखी-कष्टी आहेत, अशा सर्वांना दैवी-दयेचा स्पर्श होऊन त्यांचे जीवन प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.   
   


No comments:

Post a Comment