Reflection for the
Homily of 3rd Sunday of ordinary time
(27-01-19) By Br. Rahul Rodrigues
(27-01-19) By Br. Rahul Rodrigues
सामान्य
काळातील तिसरा रविवार
दिनांक:
२७/०१/२०१९
पहिले
वाचन: नहेम्या ८:२-४, ५-६, ८-१०
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:१२-३०
शुभवर्तमान:
लूक १:१-४, ४:१४-२१
प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे
प्रस्तावना:
आज आपण सामान्य
काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणांस देवाची वचने ऐकून, ती कशाप्रकारे
अंगीकारावीत ह्या विषयी मनन चिंतन करण्यास आमंत्रित करीत आहे.
आजच्या पहिल्या
वाचनामध्ये, एज्रा याजक युद्धात यातना व दुःख सहन करून
येरुसलेमेत परतलेल्या लोकांना नियमशास्त्राद्वारे धीर देऊन, नवीन जीवनास
सुरुवात करण्यास सांगत आहे. तर करिंथकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रात संत पौल
देवाच्या मंडळीला ख्रिस्ताच्या शरीराची उपमा देतो व तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून
वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात असे सांगतो.
लुककृत
शुभवर्तमानात येशू त्याच्या मिशन कार्याविषयी सांगताना आढळतो. तो म्हणतो, “प्रभूचा आत्मा
मजवर आहे, कारण त्याने माझा गरिबांना सुवार्ता
सांगण्यासाठी, बंदिवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची
घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळण्यासाठी व जुलूम
होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी अभिषेक केला आहे. तर ह्या पवित्र मिस्सा बलिदानात
भाग घेत असताना विशेष कृपा व शक्ती मागुया व देवाच्या वचनावर विचार विनिमय करून
तसे वागूया.
सम्यक
विवरण:
पहिले
वाचन: नहेम्या ८:२-४, ५-६, ८-१०
नियमशास्त्राचे
वाचन शिकण्यास उत्सुक असे लोक आणि शिकविण्यास तयार व सक्षम असा शिक्षक यांचा अजोड
मेळ या अध्यायातून साधला आहे. लोकांनी पुढाकार घेऊन नियमशास्त्राचा ग्रंथ आणा, अशी एज्राला
विनंती केली. तो ऐकण्यासाठी सर्व मंडळी एकत्र जमली यावर वचन २ मध्ये भर दिला आहे.
ते मोठ्या अपेक्षेने व अति आदराने ऐकण्यास तयार झाले आणि दीर्घकाळ चाललेले वाचन
लोकांनी एकचित्ताने कान देऊन ऐकले. अशी वृत्ती धरल्याने श्रोत्यांवर देवाच्या
वचनाचा जास्तीत जास्त प्रभाव पडतो, हे पुढील परिणामातून
सिद्ध झाले आहे.
एज्राने लोकांची
विनंती तात्काळ मान्य केली, पण त्याने या ग्रंथाचे
वाचन मंदिराच्या अंगणात केले नाही. त्यासाठी त्याने सर्व लोकांना सहज येता येईल
अशी जागा निवडली आणि तो सर्वांच्या दृष्टीस येईल असा उभा राहिला. तेथे कोणाला
प्रतिबंध केला नव्हता. या कार्यामध्ये सहाय्यासाठी त्याने सर्व सामान्य लोकांना
आपल्याबरोबर घेतले. नियमशास्त्र हे कोणा धर्मपंडिताचे खाजगी क्षेत्र आहे असे कोणी
समजू नये हे दाखविण्यासाठी एज्राने असे केले असावे.
नियमशास्त्राचे
निरुपण अर्थविवरण या परिच्छेदाच्या दोन भागांमध्ये एक लक्षणीय भेद दिसतो.
नियमशास्त्र समजून घेतल्याने प्रथम लोक रडू लागले आणि मग आनंदाने उत्सव करू लागले.
लोकांना नियमशास्त्राचा परिचय नव्हता या कारणाने ते आरंभी रडू लागले असे म्हणता
येत नाही. ते ऐकून हे सर्व आमच्या आजच्या परिस्थितीला समर्पकपणे लागू पडते याची
नव्याने जाणीव झाल्याने लोकांना रडू कोसळले असे म्हटले पाहिजे. परिणामी लोकांचा विवेकभाव जागृत झाला. आपली
जीवने, आपण देवाच्या मानदंडांना किती उणे पडलो आहोत हे
त्यांच्या लक्षात आले.
दुसरे वाचन -
१ करिंथ १२:१२-३०
आजच्या दुसऱ्या वाचनात संत
पौल करिंथ लोकांना सांगत आहे की, ‘तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या
त्याचे अवयव आहात.’ मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले असून, सर्व अवयव एकत्र मिळून
कार्य करतात. ख्रिस्ताचा व स्थानिक मंडळीचा संबंध असाच आहे. सर्व विश्वासू लोक
अवयवाप्रमाणे असून जशी अवयवांची कार्ये निराळी असतात तसेच विश्वासणाऱ्यां मंडळीची
कार्ये निरनिराळी असतात व ख्रिस्त मस्तकाप्रमाणे मंडळीवर नियंत्रण ठेवतो.
पुढे तो म्हणतो, प्रत्येक
अवयव हा गरजेचा आहे, शरीराचे कार्य चालविण्याकरिता प्रत्येक अवयवाने आपा-पले कार्य
केले पाहिजे. मगच शरीर आपले कार्य करू शकते. तसेच, मंडळीतील प्रत्येक व्यक्तिला
कार्य नेमून दिले आहे. ते कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याने कृपादान दिलेले आहे.
मंडळीतील आपले कार्य करणे हि प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी असते. आपणाला
दिलेले कार्य निराळे आहे म्हणून कोणी स्वतःला वेगळे करू नये.
देवाने आपल्या इच्छेप्रमाणे
प्रत्येकाची नेमणूक केली आहे. मंडळीत कोणी इतरांपेक्षा श्रेष्ठ नसतात, फक्त कार्य
भिन्न असतात. सर्वांना एकमेकाची गरज असते. कित्येक अशक्त असतात, त्यांचीही गरज
असते. समाजात कित्येकांना कोणी मान देत नाहीत. ते मंडळीच्या सहभागीतेत असतील तर
त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना उत्तेजन द्यावे. मंडळीतील सर्व जण एकमेकांची
काळजी घेतात. ते एकमेकांना उत्तेजन देतात. तेव्हा मंडळीत ऐक्य निर्माण होते.
सर्वांना प्रत्येकाचे मोल समजते व सर्वांच्या भल्यासाठी जे चांगले ते करण्यास
प्रत्येक जण उत्सुक असतो. सर्व एकमेकाची सुख-दुःखे समजतात, सर्वजण एकमेकांना आधार
देतात.
शुभवर्तमान:
लूक १:१-४, ४:१४-२१
आजचे शुभवर्तमान
प्रामुख्याने दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात आपल्याला वाचकाची ओळख करून
दिलेली आहे; तर दुसऱ्या भागात येशू ख्रिस्त मंदिरात असतानाचे दृष्य वर्णन केलेले
आहे.
प्रत्येक विश्वासणाऱ्या -
नवा जन्म झालेल्या – व्यक्तीला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगायचे आहे. येशू
ख्रिस्त हा जगात ह्याच प्रकारे जगला. त्याचे जीवन आपणाकरिता फार चांगले उदाहरण
आहे. यहुदी लोकांच्या सभास्थानात नियमशास्त्राचे वाचन व अभ्यास स्तोत्र गाणे आणि
प्रवचने होत. येशू ख्रिस्तही एखाद्या गावात गेला की तेथील सभास्थानात शिक्षण देई.
एक दिवस तो नाजारेथ गावी
आला. तो शब्बाथ दिवस होता. नेहमीप्रमाणे तो शास्त्रातील वचने वाचण्यास उभा राहिला.
यशया संदेष्ट्याचा ग्रंथ उघडून त्याने स्वतःविषयी काही वचने वाचली. दीनांना
सुवार्ता सांगण्यास, देवाने त्याला नेमले होते. देवाच्या कृपेचे कार्य करण्यास तो
आला होता. तो मुक्त करणारा व दृष्टी देणारा होता. तो देवाच्या कृपेची घोषणा करणारा
होता. असे ह्या वाचनात लिहिले होते.
लोकांनी ह्या गोष्टी कधीच
ऐकल्या नव्हत्या. त्याच्या मुखातील शब्द दयेने व प्रीतीने भरलेले होते. आज देवाला
याविषयी सर्वांना कळवायचे आहे. ख्रिस्ताद्वारे देव कृपा करतो व पापांच्या व
मरणाच्या बंधनातून मुक्त करतो. आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहाल तर आपणही हाच
संदेश कृपेने इतरांना देऊ शकतो.
मनन चिंतन
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय
बंधू-भगिनींनो, ज्याप्रमाणे एखादे पतंग हे धाग्याविना उडू शकत नाही, बाग माळीविना
फुलू शकत नाही, मेंढरे मेंढपाळाशिवाय कुरणात जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे आपले जीवन
आहे. जर का आपण ख्रिस्तामध्ये व त्याच्या वचनामध्ये एकरूप झालो नाही तर आपल्या जीवनाला काही
अर्थ नाही. आपल्या जीवनात आपले एक ध्येय असते व ते आपल्याला गाठायचे असते. परंतु
जर का आपण त्यासाठी प्रयत्न केला नाही तर आपण ते कसे गाठणार? त्यासाठी आपल्याला
जीवनात त्याग, परिश्रम व मेहनत करावी लागते. तसेच ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी
आपल्याला ख्रिस्तामध्ये राहणे फार गरजेचे आहे, त्याच्या वचनावर चालणे फार महत्वाचे
आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण
पाहतो कि नियमशास्त्राचे वाचन झाल्यानंतर लोकांना रडू कोसळले कारण त्यांनी
आत्मपरीक्षण केले कि आपण देवाच्या किती जवळ आहेत? आपण देवाचे वचन कितपर्यंत
पूर्णत्वास नेतो. परंतु जेव्हा त्यांना त्या वाचनाचा शब्दशहा अर्थविवरण करण्यात
आले तेव्हा त्यांना आनंद झाला.
तसेच संत पौल करिंथ लोकांना
म्हणतो कि, आपण सर्व वेगळे असलो तर आपण एक आहोत. जरी शरीराने आपण अलग असलो तरी आपण
आत्म्याने एक आहोत. कारण आपल्या सर्वांना एकच आत्मा दिला आहे (१ करिंथ १२:१३).
परंतु आपण ख्रिस्तामध्ये तेव्हाच एक शरीर बनू जेव्हा आपण देवाच्या वचनानुसार वागतो
व जेव्हा आपण देवाचे वचन आपल्या आचारणात आणतो. याचे सुबक उदाहरण आज शुभवर्तमानात
प्रभू येशू मध्ये आढळून येते. प्रभू येशू आपल्या पित्याशी एकनिष्ठ राहून त्याच्या
सर्व आज्ञा पाळल्या. त्याचमुळे प्रभू येशू सुवार्ता पसरवण्याचे व आजाऱ्याना बरे
करण्याचे आपले प्रेषितीय कार्य करू शकला.
आज ख्रिस्तसभा आपल्याला
सुद्धा हेच प्रेषितीय कार्य पुढे नेण्यास सांगत आहे. ज्याप्रमाणे नेहम्या आणि येशू
अभिषिक्त केलेले होते आपणही स्नानसंस्कार आणि दृढीकरण संस्काराने अभिषिक्त झालो
आहोत. आपणही ख्रिस्ताचे अनुकरण करून देवाची सुवार्ता पसरविली पाहिजे. आपल्याला
मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या दानांचा योग्य तो उपयोग करून दीनांना सुवार्ता
सांगितली पाहिजे. हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये राहून
त्याच्या वचनाप्रमाणे वागू व त्याचे वचन आपल्या दररोजच्या जीवनात उतरवू. त्यासाठी
लागणारी कृपा व प्रेरणा आपल्याला मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात विशेष
प्रार्थना करूया.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
आपला
प्रतिसाद- हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१) आमचे
परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व
प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) जे तरुण-तरुणी
देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहे, त्यांना
प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमन करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या
प्रेमाकडे वळावे म्हणून प्रार्थना करूंया.
३) जे लोक आजारी आहेत
अश्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास
सहनशीलता व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या देशाच्या आर्थिक
विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी
बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने
झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) थोडावेळ शांत राहून आपल्या
सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment