Reflections for the
homily of 2nd Sunday of ordinary Time
(20-01-2019)
by: Br. Lipton Patil.
सामान्य
काळातील दुसरा रविवार
दिनांक: २०/०१/२०१९
पहिले वाचन: यशया ६२:१-५
दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस पहिले
पत्र १२:४-११
शुभवर्तमान: योहान २:१-११
स्वर्गीय
सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता
प्रस्तावना:
आज
देऊळमाता सामान्य काळातील दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत आहे. आजची उपासना आपल्याला
ख्रिस्तावरील आपली श्रद्धा मजबूत करण्यासाठी विशेष आमंत्रण देत आहे. आजच्या
पहिल्या वाचनात यशया ६२:५ मध्ये असे सांगण्यात आले आहे की, ‘नवरा जसा नवरी पाहून
हर्षतो, तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.’ आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल
करिंथकरांस लिहीलेल्या पत्रात म्हणतो की, कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत. तसेच सेवा,
ज्ञान, विद्या व शक्ती ह्या पवित्र आत्म्याच्या दानांविषयी सांगत आहे. ही सर्व
दाने ख्रिस्त स्वतः च्या इच्छेप्रमाणे वाटून देत असतो. तसेच आजच्या योहानकृत
शुभवर्तमानात येशूने कानागावी लग्नसमयी पाण्याचा केलेला द्राक्षरस ह्याविषयी वर्णन
केले आहे. कानागावी येशूने केलेल्या पहिल्या चमत्कारावरून शिष्यांची त्याच्यावरील
श्रद्धा बळकट झाली.
आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपली
सुध्दा प्रत्येकाची येशुवरील श्रद्धा मजबूत व घट्ट व्हावी म्हणून आपण विशेष
प्रार्थना करुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया: ६२:१-५
वधूसारखी नटलेली सुंदर
सियोने पासून सुरु झालेली ही कविता आहे. या
कवितेत पतीची व मुलीची आतुरतेने वाट पाहणारी स्त्री व सियोन ह्याची तुलना केलेली
आहे. येथे एक होण्यामध्ये देवाच्या बाजूवर विशेष भर दिला आहे. त्याच्या इच्छेतील
उत्कट जोम सियोनाविषयीच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेची उंची आणि व्याप्ती तिला
परिपूर्ण करण्यात त्याला वाटणारा अभिमान, त्याचा आनंद आणि या सर्वाचे केंद्रस्थान
असलेले रहस्य हे कार्य होत नाही तर त्याच मुळाशी असलेली प्रीती आहे. सियोनाची मुले
या शब्दांनी जे सात्विक आहेत त्यांना माता नगरीने उत्पन्न केले असले तरी ते या
नगरीशी संलग्न आहेत आणि नगरीची पुनःस्थापना हा देवाप्रमाणे त्यांचाही आनंदाचा विषय
आहे.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र
१२:४-११
सर्व दानांचा उगम
देवापासून होतो व पवित्र आत्म्याच्याद्वारे ती वरदाने आपल्याला मिळतात. ही दाने
चांगल्या कार्यासाठी दिली जातात व ह्यातून आपण चांगले कार्य करत असतो. पौलाचा
दाखला समोर ठेवून मंडळीनेही या तिन्ही संज्ञा वापराव्यात हे स्पष्ट आहे. करिंथ
शहरातील नागरिक आपला मान, शक्ती, संपत्ती मिरवीत. स्वतःला श्रेष्ठ समजत. सेवाकार्य
करणे हे चुकीचे आहे असे ते समजत. आपण प्रत्येकाचे स्वतः साठी नव्हे तर इतरांच्या
हितासाठी आत्म्याने प्रकटीकरण होते. जगातील जीवनात हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण
होते. जगात दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी आपण जगलो पाहिजे. दुसऱ्यांचे चांगले केले
पाहिजे याबद्दल संत पौल सांगत आहे.
शुभवर्तमान: योहान २:१-११
पाण्याचा द्राक्षरस करणे
हा ख्रिस्ताचा पहिला चमत्कार आहे. ह्या पहिल्या चमत्कारावरून ख्रिस्ताचा गौरव
दिसून येतो. हा चमत्कार योहानाच्या शुभवर्तमानात दुसऱ्या अध्यायात नमूद केला आहे. यावरून
असे समजते की, ख्रिस्ताच्या सेवाकार्याची महती मिळते असा योहानाचा मानस असावा.
येशू व त्याची आई त्यांच्या समाजातील दोन बाबी लक्षात घ्याव्यात. द्राक्षरस
संपल्याने यजमानावर लाजीरवाणा प्रसंग येणार हे मरीयेच्या मनात होते, तर येशूच्या
मनात त्याच्या मुख्य कार्याचा विचार होता. त्याचा निर्देश येथे ‘वेळ’ ह्या शब्दाने
शब्दांकित केला गेला आहे. जेव्हा मरीयेने येशूला विनंती केली, तेव्हा येशू ज्या
प्रकारे आपल्या आईशी बोलला ते चमत्कारीत वाटले, तथापि तो पित्याखेरीज इतर कोणाचेही
ऐकतो असा गैरसमज होऊ नये हाच त्याचा स्पष्ठ उद्देश ह्यात होता.
बोधकथा
एका गावात एक विधवा आई व
तिचा मुलगा विजय राहत होते. विजय हा मनिषा नावाच्या मुलीवर अपार प्रेम करत होता. प्रेमामुळे
विजय आपल्या आईला विसरून गेला होता. मनिषासाठी तो काहीपण करायला तयार होता. हे सर्व
चालू असताना आईला वाटत होते कि, विजय
कुठेतरी चुकत आहे; पण शेवटी प्रेमामुळे विजय आंधळा झाला होता.
काही दिवसा नंतर ह्याच प्रेमाने म्हणजेच मनिषाने विजयला फसवले व ती त्याला सोडून गेली.
विजय फार दुःखी झाला. त्याला आपल्या जीवनाचा कंटाळा आला व तो आत्महत्या करण्याचा विचार
करू लागला. परंतु त्याच्या आईने त्याच्याशी बोलून व त्याची समझुत घालून त्याला जीवनाचे
महत्व पटवून दिले. त्याला प्रार्थना व बायबल वाचन करायला सांगून त्याच्या जीवनात परिवर्तन
घडवून आणले. आपल्या आईच्या हाकेला प्रतिसाद दिल्याने त्याच्या जीवनात परिवर्तन घडून
आले. तेव्हापासून विजयाच्या जीवनात अनेक चमत्कार घडू लागले.
मनन चिंतन
ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराबद्दल
आपण शुभवर्तमानात ऐकत असतो. परंतु योहानाच्या शुभवर्तमानात ख्रिस्त त्याच्या आईच्या
सांगण्यावरून काना गावी पाण्याचा द्राक्षरस करतो व आपल्या सेवाकार्यास प्रारंभ करतो.
आपल्या कार्याद्वारे तो प्रभूचे राज्य, वैभव व सत्ता प्रस्थापित करतो. या चमत्कारावरून असे समझते कि येशू हा देवाचा
पुत्र आहे. चमत्काराच्या वेळी शिष्यही उपस्थित होते त्यामुळे त्यांची श्रद्धा अधिक
मजबूत झाली व त्यांना कार्य करायला शक्ती मिळाली. ख्रिस्ताने चमत्कार करून लग्न घराण्यातील
लोकांना आनंदित केले. ख्रिस्ताने आपल्या आईच्या शब्दाला प्रतिसाद दिला.
आज कितीतरी मुले-मुली आपल्या
आई-वडिलांना सन्मान देत नाही. त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांना दुःखी करतात. आज
अनेक पालक एकाकी जीवन जगत आहेत. आपल्या स्वतःच्या मुलांनी त्यांना त्यागिले आहे. आजचे
शुभवर्तमान सांगते कि ख्रिस्त आईच्या आज्ञेत राहिला. आपण सुद्धा ख्रिस्ताचा आदर्श घेऊन
आपल्या आई-वडिलांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. खिस्ताने आपल्या मिशन कार्यास सुरवात
करून लोकांच्या जीवनात चमत्कार केले. परंतु त्यावर आपला विश्वास न ठेवता आपण अजून नवीन
चमत्काराची वाट पाहत आहोत.
सेवा, दानधर्म, चांगली कृत्ये,
समझुतदारपणा, ज्ञान, शक्ती
ह्या आपल्याला मिळालेल्या दानाचा वापर करून जे दुःखी, गरजवंत,
व आजारी आहेत त्यांच्या जीवनात चमत्कार केले पाहिजे. आपल्या लहान कृत्यांद्वारे
ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली पाहिजे. प्रभू येशूच्या शिष्यांनी आपली श्रद्धा मजबूत झाल्यावर
ख्रिस्ताच्या कार्यात सहभाग घेतला व त्याची सुवार्ता अनेक भागात पसरवली. आपणही त्याचप्रमाणे
जीवन जगले पाहिजे. शिष्य ख्रिस्तासाठी जगले व शेवटी ख्रिस्तासाठीच मरण पावले. आज कितीतरी
धर्मगुरू/भगिनी, प्रापंचिक जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ख्रिस्ताची
सुवार्ता पसरवीत आहेत. ह्या सर्वांचा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आज मिस्साबलीदानात
प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक!
१) आपल्या ख्रिस्तसभेची
आध्यात्मिक काळजी घेणारे आपले पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी
आणि सर्व प्रापंचिक ह्या सर्वावर देवाच्या कृपेचा वर्षाव व्हावा व त्यांच्या
कृतीतून देवाचे प्रेम लोकांकडे पोहचावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपल्या धर्मग्रामात
जे कोणी आजारी आहेत. अशा सर्व आजारी लोकांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श होऊन त्यांची
आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) आज आपली युवक पिढी
नोकरीच्या शोधात आहेत. अशा युवकांना नोकरी मिळून त्यांची व कुटुंबाची उन्नती
व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) पवित्र आत्म्याने
आपल्याला अनेक दानांनी भरलेले आहे. त्या दानांचा आपण योग्य वापर करावा व त्या
दानांनी आपण दुसऱ्यांना मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) येशू ख्रिस्त आपल्या
आई-वडीलांच्या आज्ञेत राहिला व त्यांना मान व सन्मान दिला. आज मुल-मुली
आई-वडिलांना अपशब्द बोलतात व दुखवितात अशा मुला-मुलींना ईश्वराचे प्रेम मिळावे,
जेणेकरून ही मुल-मुली आपल्या आई-वडिलांचा आदर राखतील म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) आता थोडा वेळ शांत
राहून आपल्या आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना
करूया.
No comments:
Post a Comment