Reflections for the homily for 6th Sunday
of Easter (26-05-2019) by Br. Lipton
Patil
पुनरुत्थान काळातील सहावा
रविवार
दिनांक: २६/०५/२०१९
पहिले वाचन: प्रेषितांची
कृत्ये १५:१-२,
२२-२९
दुसरे वाचन: प्रकटीकरण २१:१०-१४,
२२-२३
शुभवर्तमान: योहान १४:२३-२९
“पवित्र आत्मा तुम्हांस
सर्व शिकवील”
प्रस्तावना:
आज आपण पुनरुत्थित
काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेतून आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीची
महती ऐकावयास मिळत आहे. ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे, असे आपल्याला आजच्या
उपासनेतून कळून येते.
आजचे पहिले वाचन प्रेषितांची
कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले असून ह्या वाचनात आपण ऐकणार आहोत की, यहुदिया
प्रांतातून काही माणसे अंत्युखियास आली व शिक्षण देऊ लागले व शिक्षण देत असता ते
म्हणाले की, तुमची सुंता झालेली नसेल, तर तुमचे तारण होणार नाही. प्रकटीकरणातून घेतलेल्या
दुसऱ्या वाचनात आपणास – प्रेषित योहान आत्म्याने भरून जातो तेव्हा देवदूत त्याला
उंच पर्वतावर घेऊन जातो व पवित्र नगर यरुसलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना
त्याला दिसले व ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होत – ह्याविषयी ऐकावयास मिळते.
योहानलिखित शुभवर्तमानात येशू सांगतो की, जो कोणी माझ्यावर प्रीती करतो, तो माझी
शिकवण पाळील व माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि पवित्र आत्मा जो सहाय्यकर्ता आहे तो मी पाठविन असे आश्वासन प्रभू येशू आपणास
देत आहे.
आजच्या
मिस्साबालीदानात सहभाग घेत असताना आपण एकमेकांवर येशूप्रमाणे प्रीती करण्यास आपणास
पवित्र आत्म्याचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
बोधकथा:
एक कुटुंब
होत, या कुटुंबात वडील नेहमी दारू पिऊन घरातील मुलांना व बोयकोला मारीत असे, व
नेहमी घरात भाडण होत असे. घरात अशांतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरातील सर्व
माणसे खूप कंटाळून गेली होती. काय करायचे, हे घरातील माणसाना समजत नसे. मग घरातील
माणसे धर्मगुरू कडे गेली व धर्मगुरूना सर्व घरातील हकीकत सागितली. तेव्हा धर्मगुरूनी
घरातील माणसांना पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करायला सागितली. घरातील माणसानी त्या
दिवसापासून घरी येऊन पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करायला सुरवात केली. थोड्या दिवसानंतर
ह्या वडिलामध्ये बदल घडून आला. या व्यक्तीमध्ये बदल झाला. हळूहळू वडीलसुध्दा
प्रार्थनेसाठी बसू लागला आणि त्याने दारू प्यायची सोडून दिली. त्याला जाणीव झाली
की, दारूमुळे त्यांच्या घरात खूप अडचणी येत होत्या. आणि घरातील शांती हरवलेली
होती. प्रार्थनेमुळे आता ह्या माणसाच्या जीवनात परिवर्तन झाले होते. घरातील सर्व
माणसे पुन्हा एकदा आनंदात जीवन जगू लागली.
मनन चिंतन:
आजच्या उपासनेतून आपणाला कळून येते की,
ख्रिस्त आपणाला पवित्र आत्मा पाठवणार आहे. पवित्र आत्मा आपल्याला ज्ञान,
समजूतदारपणा व देवाच्या वाचनावर मनन चिंतन करायला आमंत्रण देणार आहे. जेव्हा
ख्रिस्ताचा पृथ्वीवरील सेवेचा अंत जवळ येत होता, तेव्हा ख्रिस्ताने पवित्र आत्मा
पाठवण्याचे वचन दिले. पवित्र आत्मा आम्हाला प्रबुद्ध करणारे तेजस्वी गौरव आहे. जर
आपण त्याच्याशी निष्ठावान राहिलो, तर तो या जगाद्वारे आपल्या सर्व निर्णयांमध्ये
आणि मार्गांनी मार्गदर्शन करेल आणि आपल्या जीवनात चांगल्या प्रकारचे पवित्र असे
जीवन जगण्यास आपणास मदत करील. प्रेषितांची
कृत्ये ह्या वाचनामध्ये आपणाला समजते की, प्रेषितांनी पवित्र आत्म्याचा सल्ला घेऊन
निर्णय घेतले. तसेच, पवित्र
आत्म्याशिवाय ते कोणतेही गंभीर कार्य करू शकले नाहीत. त्यांच्या वाटयाला खूप
अडचणी, दुःख व नैराश्य आले हे सर्व सहन करण्याची ताकद त्यांना पवित्र आत्माकडून
मिळाली. जर आपणाला दुःखावर मात करयाची असेल, तर पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहिलो
पाहिजे. तसेच दुसऱ्या वाचनात आपण एकले की, योहान जर काही पाहू शकला, तर ते फक्त
पवित्र आत्म्याचा योगाने. “आत्म्याने मला प्रचंड पर्वताच्या शिखरावर नेले” अर्थात,
पवित्र आत्म्याच्या मदतीने योहान हे सर्व काही पाहू शकत होता.
शुभवर्तमानामध्ये, ख्रिस्त त्याच्या पित्याकडे परत जात असताना
त्याने आपल्या शिष्याकडे पवित्र आत्मा पाठविण्याचे वचन दिले. पवित्र आत्मा ही
येशूची शक्ती आहे आणि तरी ही, त्रैक्यामधील एक व्यक्ती आहे.
तथापि, याचा अर्थ असा नाही की त्याचे युग संपत आले आहे,
कारण तो सर्वकाळ प्रभु आहे. त्याऐवजी, याचा
अर्थ असा की, आम्हाला अनाथ सोडत नाही. या रविवारी, येशू
आपल्याला आश्वासन देतो की, पवित्र आत्मा आपल्याला शिकवेल आणि त्याने आम्हाला जे
काही शिकवले होते त्याविषयी आठवण करून देईल. जर आपण आपल्या संकटांपासून वाचले
पाहिजे, तर आपण पवित्र आत्म्याचे भागीदार बनले पाहिजे. जेव्हा देवाचा पवित्र आत्मा
आपल्यावर असतो, तेव्हाच आपण दाविदाप्रमाणे गाऊ आणि नाचू शकतो. केवळ पवित्र
आत्म्याच्या मदतीने आम्ही प्रेषितांप्रमाणेच सुवार्ता सांगू शकतो. याचे कारण असे
आहे की, “पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय कोणीही येशू प्रभु आहे असे म्हणू शकत
नाही.” केवळ पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारेच आपण या
जीवनातील संघर्षांना तोंड देऊ शकतो आणि आपल्या मिशनरी कार्यामध्ये यशस्वी होऊ
शकतो. म्हणूनच, जर आपण त्याला पुढाकार घेण्याची परवानगी दिली,
तर आपण चांगले जीवन जगू शकतो. जर आपण त्याला आपल्याला जीवनात राहण्यास आमंत्रण दिले,
तर आपण चांगले जीवन जगू शकू. जर आपण त्याला आपल्याला शिकवण्याची परवानगी दिली, तर
आपल्याला चांगले समजेल; आणि जर आपण त्याला प्रेरित करण्यास
परवानगी दिली, तर आपण आपले ध्येय आपण साध्य करू.
जो
माझ्यावर प्रेम करतो, तो माझा शब्द पाळील. जर आपण येशूचे अनुकरण करू इच्छितो, तर आपण प्रभूवचन आपल्या
शब्दांद्वारे आणि कृतीद्वारे आपल्या जीवनात जगणे आवश्यक आहे.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: पुनरुत्थित
ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐक.
१. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रीतीची व शांतीची सुवार्ता अखंडितपणे पोहचविणारे
आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी ह्या सर्वांना
निरोगी स्वास्थ आरोग्य मिळून पुनरुत्थित त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सर्वांना
विशेष करून जे अज्ञात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे
प्रार्थना करूया.
२. पुनरुत्थित ख्रिस्ताची प्रीती प्रत्येकाच्या कुटुंबात येवून कुटुंबात
मंगलमय वातावरण निर्माण होवून, एक दुसऱ्यांना समजून घेवून दुरावलेले व तुटलेली
कुटुंबातील नाती पुनरुत्थित ख्रिस्ताने पुन्हा एकदा एकत्रित करावीत म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. जे लोक अतिशय आजारी आहेत अशा सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा स्पर्श होवून
त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपणा प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. कितीतरी लोक प्रेमासाठी आतुरलेले आहेत
अशा सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. यंदाच्या वर्षी चांगला व योग्य पाऊस पडावा व शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न
मिळावे व सर्व आपत्ती व रोगराई पासून मानवजातीचे संरक्षण व्हावे म्हणून आपण
पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी ठेवूया.