Reflections for the homily for 3rd Sunday
of Easter
(05-05-2019) by Br. Amit
D’Britto
पुनरुत्थान काळातील तिसरा
रविवार
पहिले वाचन: प्रेषितांची
कृत्ये ५:२७-३२,
४०-४१
दुसरे वाचन: प्रकटीकरण
५:११-१४
शुभवर्तमान: योहान २१:१-१९
“तू माझ्यावर प्रीती करतोस
काय?”
प्रस्तावना:
आज
देऊळमाता पुनरुत्थान काळातील तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहे. प्रेषितांची
कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपल्या लक्षात येते की, प्रेषितांना
येशूची सुवार्ता पसरविण्यासाठी बंदी घालण्यात येते, परंतु म्हणतो की, आम्हाला
मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा प्रिय आहे. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेल्या
दुसऱ्या वाचनात योहानाने असे पहिले की, स्वर्गात आणि पृथ्वीवरील सर्व प्राणी
राजासनावर असलेल्या व कोकराला युगानयुग धन्यवाद, गौरव व सन्मान करतात.
आजच्या
योहानलिखित शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना दर्शन देतो व पेत्राची मुख्य
मेंढपाळ म्हणून नेमणूक करतो. शिष्यांना येशूच्या अनुपस्थितीत मासे मिळत नाहीत,
परंतु जेव्हा येशूचे आगमन होते, तेव्हा ते एकशे त्रेपन्न मासे पकडतात.
आपल्या
जीवनात प्रभू येशू उपस्थित आहे का? आपल्या जीवनात बदल घडविण्यासाठी व प्रभूचे
आपल्या जीवनात महत्त्व जाणण्यासाठी आनंदाने ह्या मिस्साबलीदानात सहभाग घेऊया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची
कृत्ये ५:२७-३२, ४०-४१
प्रेषितांना
मारहाण करण्यात आली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून
दिले. ही वस्तूस्थिती पाहता, न्यायसभेने या प्रश्नातून एक पळवाट काढली.
जमाव्यात खळबळ माजवल्याचा धोका व भय टाळले असेच दिसते. अटक झालेल्या प्रेषितांची
तुरुंगातून अदभूत प्रकारे सुटका होते. हे पाहून प्रेषित गोंधळून जाणे साहजिकच होते,
पण तसे झाले नाही. ते डगमगले नाहीत; उलट येशूच्या नावासाठी आपण अपमानास पात्र
ठरलो म्हणून त्यांनी आनंद केला. वधस्तंभावर येशूला ठार मारण्यात ज्याचा हात होता, अशांना
दोषी ठरवण्यावर येथे भर दिलेला आहे. येशूच्या बाबबीत माणसांनी केलेला न्यायनिवाडा
देवाने फिरवला हे पुन्हा ठामपणे येथे सांगितले आहे.
दुसरे वाचन: प्रकटीकरण
५:११-१४.
येथे
देवदूतांच्या प्रचंड मोठया समुदायाने उच्चस्वराने कोकऱ्याच्या स्तुतीचे वर्णन गीत
गाण्यास आरंभ केला. या ईशस्तुतीवर गीतामध्ये ख्रिस्ताच्या राजवटीच्या प्रारंभी
असलेले आशीर्वाद आणि सामर्थ्य याचा उल्लेख आहे. हे गीत देवाला उद्देशून गायिलेल्या
गीतासारखे आहे. स्वर्ग, पुर्थ्वी,
पृथ्वीच्याखाली आणि समुद्रावर असलेला प्रत्येक जीव व वस्तुजात अखेर
देवदूतांच्या व आद्य देवदूताच्या सुरात आपलाही सूर मिसळून हे गीत गाऊ लागले.
स्वर्गात चाललेल्या स्तुतीमधून कोकऱ्याने तारणाच्या राज्याचा आरंभ केल्याचा उत्सव
साजरा होत आहे. तथापि संपूर्ण विश्वाकडून देवाची आणि कोकऱ्याची उपासना होते.
शुभवर्तमान: योहान
२१:१-१९
येशु समुद्राकाठी आपल्या शिष्यांना दर्शन
देतो. येथे फक्त ७ शिष्यांचा उल्लेख केलेला आहे. परंतू यात काही प्रतीकात्मक अर्थ
आहे असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. जब्दीच्या पुत्राचा नावाने उल्लेख नाही,
त्यामुळे त्यांच्यापैकी एकजण योहान या शुभवर्तमानाचा लेखक असल्याच्या मताला
पुष्टीच मिळते हे लक्षात घ्यावे. मासे धरण्याचा हा प्रसंग व लूक ५:१-११ मधील,
असाच प्रसंग या दोघांमध्ये काही मार्मिक साम्य समारात आहे. त्यांनी रात्रभर
कष्ट केले पण पदरी जाळ्यात काहीच पडले नाही असे योहान सांगतो यात काही प्रतीकात्मक
अर्थ असावा. तथापी, हा तपशील प्रत्यक्ष पाहणाऱ्याने
स्मरणातून दिला असल्याची शक्यता अधिक आहे. परंतू तेथे एक आध्यात्मिक तत्व दिसून
येते. येशूच्या उपस्थितीमुळे ही परिस्थिती समर्थ पालटली.
या
वृत्तामध्ये प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगावे, तसे अनेक स्पष्ट चित्रदर्शी तपशील
आहेत. विशेषतः जाळ्यात सापडलेल्या माशांचा मोठा घोळका, किनाऱ्यापासून मचवा होता
तेथपर्यतचे अंतर, कोळशाचा विस्तव, त्यावर
भाजत असलेली मासळी आणि आणखी काही मासे आणा, हे येशूचे सांगणे इत्यादी. तसेच
मिळालेले मासे मोजले, तेव्हा ते पाहून लक्षात ठेवणारे कोणी तेथे होते म्हणूनच हा
तपशील दिला आहे.
पेत्रावर
सोपवलेल्या तीन जबाबदाऱ्या मध्येही वेगळेपण आहेच. यामध्ये मेंढरे पाळणे, राखणे या संबंधातील सर्वच कर्तव्याचा, जबाबदाऱ्याचा
समावेश केला आहे.
मनन चिंतन:
आजच्या
शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना दर्शन देतो. शिष्यांनी येशूने सांगितलेल्या जागी
जाले टाकल्यावर त्यांना पुष्कळ मासे मिळतात. तदनंतर ते येशू सोबत भाकरी व मासे
घेऊन न्याहारी करतात.
न्याहारी
झाल्यावर येशू शिमोन पेत्राला, “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” असा तीन वेळा प्रश्न
विचारतो. पेत्र तिन्ही वेळा होकारार्थी उत्तर देतो. तेव्हा प्रभू येशू, “माझी कोकरे
चार”, “माझी मेंढरे पाळ” व माझी मेंढरे चार” अशी जबाबदारी देतो.
प्रभू
येशूने ज्याप्रमाणे आपला प्राण देईपर्यंत आपल्यावर प्रेम केले, तसे प्रेम करण्यास
येशू आपल्याला बोलावीत आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू एकमेकांवर प्रेम करून ‘प्रभूमध्ये
राहण्यास’ सांगत आहे. योहानाच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो, “जशी पित्याने माजावर
प्रीती केली आहे, तशी मी ही तुमच्यावर प्रीती केली आहे. माझ्या प्रीतीत राहा.
(योहान १५:९) तसेच प्रभू येशू म्हणतो, “मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की, तुम्ही
एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हावर प्रीती केली.” (योहान १३:३४) आजच्या
शुभवर्तमानातील येशूने पेत्राला प्रेमाविषयी केलेल्या प्रश्नांची पडताळणी करून
आपल्याला परस्पर-प्रेमी, समूह-प्रेमी आणि सार्वत्रिक प्रेमी जीवन जगण्यास प्रेरणा
घेऊया.
सर्वप्रथम
येशू पेत्राला म्हणतो, “माझी कोकरे चार.” कोकरू हे नाजूक व दुसऱ्यावर अवलंबून
असते. त्याची काळजी घ्यावी लागते व त्याला दूध, अन्न, चारा द्यावा लागतो. म्हणजेच
येशू आपल्याला आपल्या मुलांची, पालकांची, शेजाऱ्यांची काळजी घेण्यास व त्यांच्यावर
प्रेम व क्षमा करण्यास सांगत आहे. हे झाले परस्परातील प्रेम. आपण परस्परावर दया
दाखवून हिंसा न करता जीवन जगले पाहिजे.
दुसऱ्या
वेळी येशू म्हणतो, “माझी मेंढरे पाळ.” जेव्हा कोकरू मोठे होते, तेव्हा ते मेंढरू
बनते आणि मग ते स्वतः अन्न, पाला चारू शकते. मेंढपाळाला फक्त मेंढरांची राखण करावी
लागते. तसेच मेंढरू कळपापासून दूर न जाण्यासाठी त्याला एकत्र ठेवावे लागते. यावरून
आपल्या लक्षात येते की, येशू आपल्याला समूह-प्रेम दृढ होण्यास मार्गदर्शन करत आहे.
परस्पर-प्रेम आपल्याला समूह प्रेमाकडे वाटचाल करण्यास मदत करते. आपल्या
धर्मग्रामामधील, गावातील, कंपनीतील समुहावर आपण प्रेम केले पाहिजे. त्यांच्या
मदतीला हातभार लावून विकासाकडे वाटचाल केली पाहिजे. भांडण-तंटे दूर करून पवित्र
समाज बनविले पाहिजे. संत इग्नेशियास लोयोला ह्यांनी लिहिले आहे की, “प्रेम हे
शब्दापेक्षा कृतीमधून दाखविले पाहिजे.” म्हणजेच आपले प्रेम हे खरे खुरे असले
पाहिजे.
शेवटी
येशू म्हणतो, “माझी मेंढरे चार.” मेंढरू हे नेहमी तरुण राहत नाही, तर ते वृद्ध आणि
अशक्त होत असते. शेवटी त्याला निरोगी ठेवणे गरजेचे असते. म्हणजेच प्रभू येशू
आपल्याला समूह-प्रेमापासून सार्वजनिक प्रेमाकडे वाटचाल करण्यास सुचवित आहे.
ज्याप्रमाणे येशूने सर्वावर समानतेने प्रेम केले तसेच आपणही करावे. कोणताही भेदभाव
न करता सर्व जातीतील मानवावर प्रेम केले पाहिजे. आपले प्रेम निसर्गावर व
निसर्गातील सर्व प्राणीमात्रावर सुध्दा असले पाहिजे.
पेत्राप्रामाणे
आपणही प्रभूवरील प्रेम प्रकट करून सार्वत्रिक प्रेमाकडे वाटचाल करण्यासाठी ह्या
मिसाबलीत विशेष प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: दयावंत
देवा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स
व सर्व प्रापंचिक लोकांना देव राज्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व मिशनरी बंधुभगीनींवर व
त्यांच्या कार्यावर देवाचा आशीर्वाद असावा तसेच ज्यांना छळाला सामोरे जावे लागत
आहे त्यांना देवाच्या मदतीचा हात मिळून मिशन कार्य चांगल्या प्रकारे पार पडावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपला
स्वार्थ, भ्रष्टाचार
व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थपणे सेवा करावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर गेले आहेत, जे अन्य धर्माकडे
वळले आहेत व ज्यांचा देवावर विश्वास नाही, अशा लोकांवर पुनरुत्थित प्रभू येशूची
कृपा यावी व त्यांनी पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. जे लोक आजारी, दु:खी, कष्टी व निराश आहेत. तसेच जे बेकार तरुण-तरुणी आहेत अश्या सर्वांना
पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या अडचणीत सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि
वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment