Monday 6 May 2019


Reflections for the homily for 4th Sunday of Easter
(12-05-2019) by Br. Isidore Patil







पुनरुत्थान काळातील चौथा रविवार

दिनांक: १२/०५/२०१९
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १३: १४, ४३-५२
दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ – १७
शुभवर्तमान: योहान १०:२७-३०





“परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.”

प्रस्तावना:
         आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला ‘परमेश्वर आपला मेंढपाळ आहे आणि आपण त्याची मेंढरे आहोत’ ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण देत आहेत.
       आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल आणि बर्नबा ह्यांनी यहुदी आणि यहुदी मतानुसार चालणारे इतर धार्मिक लोक ह्यांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली आणि त्यासाठी देवाचे वचन ऐकण्यास त्यांस प्रोत्साहन केले. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात आपण सिंहासनाच्या मध्यभागी असलेल्या कोकराविषयी ऐकतो जो त्यांचा मेंढपाळ आहे. आणि शुभवर्तमानात ह्याच कोकराविषयी सांगितलेले आहे, हा मेंढपाळ दुसरा कोणी नसून आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आपणा सर्वांचा उत्तम मेंढपाळ आहे व आपण त्याची मेंढरे आहोत ह्याची जाणीव आपणास आजची वाचने करून देत आहे.
         आजच्या प्रभू भोजनात सहभाग घेत असताना प्रभू येशूला आपला उत्तम मेंढपाळ म्हणून स्वीकारायला आणि त्याच्या कळपात राहायला लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिस्साबलिदानात मागूया. 

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १३: १४, ४३-५२
          पौल व बर्नबा हे पिर्गापासून अंत्युखियास गेले व तेथे त्यांनी लोकांना परमेश्वराचे वाचन सांगितले. जेव्हा पौल व बर्नाबा तेथून जाऊ लागले, तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना आणखी परमेश्वराचे वचन सांगण्याचा त्यांना आग्रह केला. तेव्हा ते थांबून त्यांना परमेश्वरा विषयीच्या गोष्टी सांगू लागले. हे सर्व बघून तिथले काही यहुदी कुरकुर करू लागले. त्या यहुद्यांना त्याचा मत्सर वाटू लागला. त्यावर पौल व बर्नबा यांनी निर्भयपणे त्यांना म्हटले की, देवाचा संदेश तुम्हा यहुद्यांना प्रथम सांगितलाच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देता. त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेता. पुढे पौल व बर्नबा सांगतात की, प्रभुने आम्हाला हे करण्यास सांगितले कारण प्रभू म्हणाला दुसऱ्या देशासाठी मी तुम्हांस प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवून शकाल. हे ऐकून त्या लोकांपैकी पुष्कळ लोकांनी संदेशावर विश्वास ठेवला.

दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ – १७
          ह्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो की सर्व राष्ट्रांचे, वंशाचे व सर्व प्रकारचे लोक सिंहासनावर बसलेल्या कोकरा सभोवती जमलेले आहेत. त्यांनी सर्वांनी त्यांची वस्त्रे कोकराच्या रक्ताने धुवून घेतलेली आहेत. त्यांना कुठलीही तहान किंवा भूक लागणार नाही. त्यांना त्रास होणार नाही सिंहासनाच्या मध्यभागी असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ आहे. तो त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून काढील. काळाच्या शेवटी सर्व प्रकारच्या दुखःचा पूर्णपणे नाश होऊन सुखाचा मार्ग तयार होईल हे सुचवले आहे.

शुभवर्तमान: योहान १०:२७-३०
          आपण परमेश्वराची मेंढरे आहोत. जे मेंढरू परमेश्वराची म्हणजेच प्रभू येशू जो उत्तम मेंढपाळ आहे त्याची वाणी ऐकून त्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, त्यास सार्वकालिक जीवनाची देणगी परमेश्वर बहाल करील आणि तेच खरे विश्वासू मेंढरू आहे. आजच्या शुभवर्तमानात परमेश्वर सांगतो की, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला परमेश्वराकडून कोणीच दूर करू शकत नाही. येशू आणि पिता एक आहे, म्हणून जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो पित्यावर विश्वास ठेवतो आणि जो येशूला ऐकतो तो देव पित्याला ऐकतो.

मनन चिंतन:
“मेंढपाळ तू माझा, प्रभूवर मेंढपाळ तू माझा”
          जुन्या करारातील स्त्रोत्रसंहितातील स्त्रोत्र २३ हे दाविदाचे स्तोत्र आहे की जेथे दावीद म्हणतो, “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.” येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, हे आपण आजच्या शुभवर्तमानात ऐकले आहे ह्यावरून आपल्याला असे दिसून येते की, सर्व मानव जातीची काळजी घेण्यासाठी, योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी खुद्द देवाने मेंढपाळाची भूमिका केली आहे. ज्या देवाने संपूर्ण सृष्टीची, चराचराची निर्मिती केली, तो देव त्याच्या लेकरांच्या मदतीला धावतो त्यांचा बचाव करतो व गरज पडल्यास आपल्या लोकांसाठी किंवा लेकरांसाठी प्राण देण्यास तयार होतो.
          परंतु आजच्या युगात आपण पाहतो दूरदर्शन (T.V.) व मोबाईलच आपले मेंढपाळ झालेले आहेत. जे शब्द पवित्र शुभवर्तमानात येशू हा मेंढपाळ याच्याविषयी आहेत तसेच शब्द आपण मोबाईलला किंवा T.V. ला दिले तर... T.V. किंवा मोबाईल माझा मेंढपाळ आहे, याच्या व्यतिरिक्त मला काही नको. परंतु आपले शब्द मोबाईल किंवा T.V. विरुद्ध असले पाहिजेत. मोबाईल किंवा T.V. माझा मेंढपाळ नाही. कारण ते मला परमेश्वरापासून दूर नेतात. आज कित्येक कुटुंब मोबाईल आणि T.V. ह्यात गुंतलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना प्रार्थनेसाठी वेळ नाही.
          परमेश्वर देवाने जरी सर्व मानव जात चांगल्या प्रकारे उत्त्पन्न केली, तरी मानव देवाच्या आज्ञेत व देवाच्या वचनाशी प्रामाणिक राहिला नाही. उलट तो देवाच्या विरुद्ध गेला अविश्वासूपणाचे, आज्ञाभंगाचे जीवन जगला तरीसुद्धा देवाने अनेक अशा संध्या दिल्या. परमेश्वर मेंढपाळ म्हणून आपल्या बरोबर राहिला किंवा राहतो तरीपण आपल्याला जाणीव होत नाही. देवाने स्वतःचा पुत्र येशू उत्तम मेंढपाळ म्हणून आपणा साठी पाठवला जेणेकरून त्याच्याद्वारे आपले तारण व्हावे. येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ म्हणून उत्तम अशी जबाबदारी त्याने पार पडली व आजही तो कार्य करतो. जे कोणी दुरावलेले आहेत त्यांना शोधून काढून आपल्या कळपात योग्य जागा देतो व आजच्याशुभवार्तमानात सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. त्याच्या मेंढरांना कोणीच त्याच्याकडून हिस्कावून घेणार नाहीत. कारण पित्याने ही मेंढरे त्याला दिलेली आहेत आणि तो त्यांचा सांभाळ करील.
          जर आपल्याला येशू हा आपला मेंढपाळ म्हणून स्वीकारायचे असेल, तर त्याच्या वर लक्ष देऊन चांगल्या मेंढऱ्याप्रमाणे चांगले जीवन जगूया. कारण तो आपले तारण करतो व आपल्याला सांभाळतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे उत्तम मेंढपाळा आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आपल्या ख्रिस्तसभेने येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे त्याच्या प्रेमाचा, दयेचा व क्षमेचा संदेश जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे निर्मुलन व्हावे व आपल्या देशात शांती-प्रेमाचे वातावरण पसरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या कुटुंबातील गैरसमज दूर सारून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या जीवनात स्व-मार्गाने बहकून न जाता नेहमी उत्तम मेंढपाळाच्या सानिध्यात रहावे व त्याची प्रेमळ वाणी सतत ऐकावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 

No comments:

Post a Comment