Monday, 6 May 2019


Reflections for the homily for 5th Sunday of Easter 
(19-05-2019) by Br. Godfrey Rodriques 






पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार


दिनांक: १९/०५/२०१९
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये  १४:२१-२७
दुसरे वाचन: प्रकटीकरण २१:१-५
शुभवर्तमान: योहान १३:३१-३५




“जशी मी प्रीती केली तुम्हांवर, तशी प्रीती बरसात करा”

प्रस्तावना:
          आजच्या पुनरुत्थान काळातील पाचव्या रविवारी आपली देऊळमाता आपणा सर्वंना एकमेकांवर प्रेम करण्यास व देवाशी विश्वासू राहण्यास बोलावीत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात संत पौल व बर्नबा, हे त्यांच्या मंडळीबरोबर आपणा प्रत्येकाला सुध्दा संबोधून सांगत आहेत की, देवाच्या विश्वासात टिकून राहा. तर दुसऱ्या वाचनात संत योहान म्हणतो की, परमेश्वर आपल्या प्रत्येकाला नवीन आशेचा किरण दाखवत आहे. नवीन आकाश व नवीन पृथ्वी तो निर्माण करणार आहे. त्याचबरोबर आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यासोबत आपणा प्रत्येकाला सुद्धा बजावून सांगत आहे की, “जसे मी तुम्हांवर प्रेम केले, तसे तुम्ही ही एकमेकांवर प्रेम करा.”
          स्वतःवरच किंवा स्वार्थीवृत्तीचे प्रेम नव्हे, तर दुसऱ्यावर निस्वार्थी प्रेम करण्याचे आव्हान देव आपणास देत आहे. ह्या त्याच्या आव्हानाला न नाकारता गरजवंत व गरीब ह्यांच्यावर प्रेम करून त्यांच्या मदतीला धावून जाण्यास व देवाच्या प्रेमाची ज्योत सर्वत्र पसरविण्यास आपण पात्र ठरावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये  १४:२१-२७
          संत पौल व बर्नबा ह्यांनी अंत्युखिया व इकुन्या येथील ख्रिस्ती मंडळीला ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली व बोधपर उपदेश केला. तेथे त्यांनी संपूर्ण घडलेला इतिहास त्यांना सांगितला होता व ख्रिस्ताला तारणदायी सुवार्ता घेवून पाठविले होते हे त्यांस त्यांनी पटवून दिले .
          संत पौल व बर्नबा ह्यांनी केलेल्या उपदेशावर ख्रिस्ती मंडळीनी विश्वास ठेवला. परंतु विरोधकांनी संत पौलावर दगडमार करून, तो मेला असे समजून त्यास नगराबाहेर काढतात. ह्या नगरात त्यांनी त्यांच्या उपदेशामार्फत  खूप शिष्य मिळविले होते. जेव्हा ते अंत्युखिया येथे पोहचतात, तेव्हा मंडळीस जमवून त्यांस देवाने केलेल्या सत्कृत्याची जाणीव करून देतात व परराष्टीय ह्यांना विश्वासाचे दार कसे उघडले हे कथन करतात.

दुसरे वाचन: प्रकटीकरण २१:१-५
          ख्रिस्ताने सर्व गोष्टी नवीन केल्या आहेत असे योहान म्हणत आहे. सर्वकाही बदललेले आहे, नवीन आकाश व नवीन पृथ्वी तो पाहत आहे. देवाने निर्माण केलेली पृथ्वी आणि आकाश ह्यात नुतानिकरण घडून येत आहे आणि ते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने घडले आहे असे योहान प्रकट करत आहे. योहान पुढे म्हणतो की, देव  आपली वस्ती त्याच्याबरोबर करील. लोकांच्या डोळ्यातील अश्रू तो  पुसून  टाकील, ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने सर्वकाही नव्याने निर्माण झाले आहे.

शुभवर्तमान: योहान १३:३१-३५
          परमेश्वर इस्रायल लोकांस आज्ञा करतो की, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ह्याच आज्ञेला ख्रिस्त नवीन अर्थ प्राप्त करून देतो. ख्रिस्त म्हणतो की, तू आपल्या देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर व तशीच प्रीती आपल्या शेजाऱ्यावर कर.

मनन चिंतन:
          देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगात पाठविले, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणतो की, मी तुम्हांस नवीन आज्ञा देतो, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्ही ही एकामेकावर प्रीती करा.
          प्रभू ख्रिस्ताची प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्याने मरणापर्यंत प्रीती केली. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणतीही मोठी प्रीती नाही. हे ख्रिस्ताने आपल्या मरणाद्वारे दाखवून दिले. आज ख्रिस्त आपणांस आपल्या देवावर, स्वतःवर आणि जसे स्वतःवर तसेच आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करण्यास बोलवत आहे. इतकेच नव्हे, तर प्रेमासाठी आपण आपल्या प्राणाची आहुती देण्यास तयार असलो पाहिजे ह्याची आठवण आपणास करून देत आहे.
          एका शास्त्र्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत ख्रिस्त म्हणतो, तू आपला देव परमेश्वर ह्याच्या वर पूर्ण मनाने, पूर्ण जीवानेआणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. हिच्या सारखी दुसरी प्रीती कर. ख्रिस्त अतिशय हुशारगिने ‘शेजारी’ ह्या शब्दाचा वापर करतो. कारण स्वतःच्या नात्यात प्रेम व्यक्त करणे हे कोणालाही शक्य होऊ शकते, परंतु आपल्या नात्यात नसलेल्या माणसावर प्रेम करणे म्हणजे एक आव्हानच ठरते. ह्या आव्हानाला सामोरे जाण्यास व प्रेमाची ध्वजा सर्वत्र फडकविण्यास आज देऊळमाता पुन्हा एकदा आपणास बोलावत आहे.
          प्रेमाविषयी खूप अशी व्याख्याने व प्रवचने आपण ऐकली आहेत. खूप प्रेम ह्या विषयावर आपण मनन चिंतन केलेले आहे. परंतु खरच ते प्रेम कधी वास्तव्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न मात्र आपण स्वतःने स्वतःला विचारायला हवा आणि जर उत्तर सकारात्मक असेल, तर उत्तम आणि नकारात्मक असेल, तर आजच तारणाचा दिवस आहे असे समजून एकमेकांवर प्रेम करण्यास आपण तत्पर असलो पाहिजे. लक्षात ठेवा की, ज्या देवाने केवळ प्रेमा खातर ह्या जगाची निर्मिती केली व प्रेमा खातर त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ह्या भूतलावर पाठवले. तो देव आपले तारण त्या प्रेमाच्याच मापाने करणार आहे.       

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, एकमेकांवर प्रेम करण्यास आम्हाला शिकव.

१. आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे व कार्याद्वारे प्रभूचा अनुभव प्रत्येक भाविकापर्यंत पोहचवावा व सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

२. जे निराश होऊन देवापासूनदूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून यावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखविलेल्या मार्गावर चालावे आणि जीवनाचे सार्थक करावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

३. आपणा प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. प्रेम ही काळाची गरज आहे. म्हणून आपली प्रीती सर्वांचे हित साधणारी असावी. त्यात स्वार्थ व दुजाभाव नसावा. सर्वाबरोबर समेट, शांती व सलोखा असावा म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या सर्व मिशनरी बंधू-भगिनींना त्यांचे कार्य जोमाने सुरु ठेवून प्रभूची सुवार्ता जगाच्या काना कोपऱ्यात पसरविण्यास सामर्थ्य व कृपा लाभावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी ठेवूया.

No comments:

Post a Comment