Thursday 5 March 2020


Reflections for the Homily of 2nd SUNDAY OF LENT
(08-03-2020) By Fr. Wilson Gaikwad










प्रायश्चित काळातील दुसरा रविवार
येशूचे रूपांतर




दिनांक: ०८/०३/२०२०
पहिले वाचन: उत्पती १२:१-४
दुसरे वाचन: तीमथी १:८-१०
शुभवर्तमान: मत्तय १७:१-९

प्रस्थावना:
“चिंतन करीत रहा मानवा चिंतन करित राहा, मी सत्याचा मार्ग दावितो माझे रूप पहा.”
          आज आपण प्रायश्चित काळातील दुसऱ्या रविवार मध्ये पदार्पण करत आहोत. ह्या कृपेच्या काळात आम्हां सर्वांचे एकच ध्येय. त्याग, प्रार्थना, उपवास, प्रायश्चित करून देवाला आपलं करून घ्यायचं. जीवनात परिवर्तन व बदल करून किंवा घडवून आणणे. देवाची कृपा ग्रहण करायची व स्वर्गीय वैभव अनुभवायचे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कीआब्राहामाने देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि विश्वासाने तो देवाच्या वचनाला जागला. देवाच्या कृपेमुळे आणि आशीर्वादमुळे आब्राहाम जणू रुपांतरीत जीवन जगला. दुस-या वाचनाद्वारे संत पौल आपल्याला दाखवून देतो की, देवाचे पाचारण हे आपल्या स्वत:च्या गुणवत्तेवर अवलंबून नाही तर ते सर्वस्वी देवाच्या कृपेवर अवलंबून आहे.
          शुभवर्तमानात प्रभू येशूचे रुपांतर कसे झाले आणि शिष्यांना प्रभू येशूचे सामर्थ्यशाली आणि गौरवमय प्रकाशाचे दर्शन कसे घडले हे सांगितले आहे. प्रभू येशूचे रुपांतर म्हणजे जणू आपल्याला केलेले पाचारण आहे. प्रभू येशूठायी आपण रुपांतरीत व नवीन जीवन जगावे म्हणून आज प्रभू येशू आपल्याला बोलावित आहे. आब्राहामाची देवावरील अढळ श्रद्धा व संत पौलाची सुवार्ता प्रसाराची जिद्द आपल्यात निर्माण व्हावी आणि आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनण्यास पात्र ठरावे म्हणून या मिस्साबलीत प्रभू चरणी प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पती १२:१-४
          आम्हांस अब्राहामाच्या अटळ विश्वासा बद्दल बोध करीत आहे. देव अब्राहामाशी  बोलतो, त्याची आज्ञा पाळतो. देव सुद्धा अब्राहामावर प्रसन्न होतो व त्याच्या वंशातून नवीन राष्ट्रांची निर्मिती करतो. परंतु अब्राहामाच्या विश्वासाचा एक खडतर प्रवास होता.

दुसरे वाचन: २ तीमथी १:८-१०
          यात पौल तीमथीला धैर्याने व निर्भीडपणे ख्रिस्ताच्या सेवेसाठी पाचारण करतो, विश्वासू राहण्याचे आव्हान करतो, व सांगतो देवाने मरण नष्ट करून नवजीवन प्रदान केले आहे.

शुभवर्तमान: मत्तय १७:१-९
          प्रभू येशू पेत्र, योहान, याकोब ह्यांना उंच डोंगरावर प्रार्थनेसाठी घेऊन जातो व तेथे त्यांना त्याचे दैवी दिव्य तेजाने भरलेले रूप ह्याचे दर्शन घडवतो. त्याद्वारे तो पुनरुत्थान याची महती प्रदर्शित करतो. पुनरुत्थान व दैवी रूप कसे असणार ह्यांची झलक दाखवतो. त्याच दर्शनाद्वारे शिष्यांचा येशूवरील विश्वास बळकट झाला, ते बदलले, त्यांचे परिवर्तन झाले. जुन्या करारात सुद्धा मोशे, एलिजा, ह्यांना डोंगरावरच देवाचे रूप बघण्यास मिळाले. आपण सुद्धा ह्या प्रायचित्त काळात देवाचे रूप पाहण्याचा प्रयत्न करूया, पपांच्या शृंखलातून मोकळे होऊया.

मनन चिंतन:
          एक कविता करावीशी वाटते.
‘चढत आहे मी उंच डोंगर माथ्यावर ।
मार्ग खडतर, काट्यांचा, ख्रिस्त सारथी मजबरोबर ।
खाली वळून बघतो आश्चर्याने । कसे शक्य झाले मजला ।
क्षणात वाटले, चढलो याकोबाच्या शिडीने उंचावर ।
परंतू, पहिले तेजस्वी मुख प्रभूचे त्या डोंगरावर ।
धन्य झालो देखुनी रूप येशूचे मनोहर’ ।
          बंधू-भगिणींनो खरोखर येशूचे रूपांतर म्हणजे पेत्र,योहान, याकोब यांच्या दैनंदिन जीवनाला कलाटनी देणारे. त्याच्या जीवनात एक विलक्षण, अविस्मरणीय, विलोभणीय, तेजपुंज अनुभव. शिवाय देवाचे बोल त्यांनी ऐकले, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्यावर मी संतुष्ट आहे.” ह्याच क्षणी त्यांनी येशूचे अतुलणीय प्रकाशमय रूप पाहिले. शिष्यांना कदाचित ह्या स्वर्गीय अनुभवाची पुसट कल्पना सुद्धा नव्हती. ते फक्त येशूच्या सांगण्यावरून डोंगरावर प्रार्थनेसाठी गेले होते. डोंगर चढून थकल्यावर ते झोपले पण होते. परंतू येशूचे खरे तेजमय रूप पाहून ते ‘खडकन’ जागे झाले. पेत्र तर म्हणाला आपण येथेच राहु, मी तीन तंबू बांधतो, एक मोशे, दुसरा एलिया व तिसरा येशूसाठी.
          खरेच! ख्रिस्त अनुभव घेण्यासाठी ह्या प्रायश्चित काळात आम्हांला पापांचा डोंगर पार करायचा आहे. आध्यात्मिकतेच्या डोंगरावर जायचे आहे. मार्ग खडतर, खडकाळ, घसरट, काट्यांचा, वेडावाकडा आहे. प्रभू येशूच्या दर्शनासाठी ह्या खडतर मार्गावर चालण्याची आम्हांला नितांत गरज आहे. पण जर आम्ही निर्धार केला तर नक्कीच ख्रिस्ताचे रूप पहावयास मिळेल, मग देवाचे रूप कसे आहे? एका गाण्यात म्हटले आहे, “हे रूप ईश्वराचे, हे रूप ख्रिस्त साचे, सर्वाहुनी पवित्र हा एक देवपुत्र.” खरंच देवाचे रूप गोड । देवाचे नाम गोड । जर अथक प्रयत्नाने ख्रिस्ताचे खरे रूप पाहिल्यावर; आपणामध्ये आमूलाग्र बदल व परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभू येशूचे रूप हे पुनरुत्थानाचे रुप व चिन्ह आहे. आपल्या रूपांतराच्या दर्शनाद्वारे, तो पेत्र, योहान, याकोब यांना पुनरुत्थानाचा संदेश देत आहे.
          म्हणूनच प्रायश्चित काळ आम्हांस पाचारण करत आहे की, आपण सर्वांनी, त्याग, प्रार्थना करुन ख्रिस्त रूप पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तन झाले पाहिजे, आपल्या पापी जीवनाचे पवित्र जीवनात रूपांतर झाले पाहिजे. मगच आपल्याला देवाची वाणी ऐकावयास मिळेल, ‘हा माझा परमप्रिय पुत्र, परमप्रिय कन्या आहे.’ चला तर देवाच्या डोंगरावर चढूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद परमेश्वरा ये आणि आमचे परिवर्तन कर.
१. ख्रिस्तसभेच्या सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेला ख्रिस्ताचा अनुभव सर्व लोकांपर्यंत पोहचवावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या देशातील पुढाऱ्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहावे आणि प्रामाणिकपणे देशाची सेवा करावी,  म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने चांगल्या कार्यक्रमाचे प्रसारण करावे व जनतेला योग्य मार्गदर्शन करावे,  म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे देवापासून दुरावलेले आहेत त्यांना प्रभुने स्पर्श करावे व तोच जीवनाचा मार्ग व सत्य आहे ह्याची जाणीव करून द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment