Reflections for
the Homily of 5th Sunday Of
Lent (29-03-2020) By Br.
David Godinho.
प्रायश्चित काळातील पाचवा रविवार
दिनांक: २९/०३/ २०२०.
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११.
शुभवर्तमान: योहान ११:१-४५.
विषय: “पुनरुत्थान
आणि जीवन मीच आहे.”
प्रस्तावना:
आज आपण उपवास
काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. थोड्या दिवसानंतर आपण प्रभू येशू
ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा सोहळा साजरा करणार आहोत. आजची उपासना पुनरुत्थानावर
विचार विनिमय करण्यास, पुनरूत्थानावरील आपला विश्वास बळकट करण्यास बोलावीत आहे.
‘पुनरुत्थान व
जीवन मीच आहे.’ ही प्रभू येशूची वचने आजच्या ह्या परिस्थितीत आपणास दिलासा देतात.
आपले सांत्वन करतात. कुठलीही वाईट परिस्थिती, कुठलाही वाईट प्रसंग आपणावर विजय मिळवू
शकणार नाहीत. हीच गोष्ट आजची तिन्ही वाचने आपणा समोर मांडीत आहेत.
यहेज्केल
प्रवाद्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो की, ‘मी
तुमच्या काबरा उघडीन व तुम्हास कबरेतून बाहेर काढीन,’ असे आश्वासन देतो, म्हणजेच
मरणावर देवाचा ताबा आहे हे दाखवून देत आहे.
रोमकरांस लिहिलेल्या
पत्रात देहा प्रमाणे नव्हे, तर आत्म्या प्रमाणे चालण्यास आपणा प्रत्येकास आग्रह
करण्यात येत आहे. पुढे शुभवर्तमानात येशू हाच खरा पुनरुत्थान व जीवन आहे, असे
सांगण्यात आले आहे.
ह्या सर्व
सामर्थ्यशाली परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास आणि आपलं सर्वस्व त्यास समर्पित
करण्यास व सर्व परिस्थितीत विशेषता अतिशय कठोर किंवा कठीण परिस्थितीत त्याच्यावर
विसंबून राहण्यास परमेश्वराची कृपा ह्या पवित्र मिसाबलिदानात परमेश्वराजवळ मागूया.
सम्यक
विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४
येरूशलेमचा पाडाव
झाल्यानंतर तेथील लोक विखुरले गेले असते. त्यांचा आशाभंग झाला असता. ह्या दिव्य
वाणीचा संदेश सरळ आहे. इस्राएलचे हे मृत राष्ट्र एक दिवस पुनरजीवित होऊन आपल्या
स्वतःच्या देशात परत जाईल. शुष्क अस्थी सजीव, जिवंत लढाऊ सैनिक होतील. एक दिवस इस्राएलचे
असेच रूपांतर होईल, ते समर्थ होईल. इस्राएल लोकांकरीता चांगले दिवस येणार आहेत असे
आश्वासन परमेश्वर इस्राएली लोकांना देत आहे.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११
संत पौल ‘देह आणि
आत्मा’ ह्या दोन्ही गोष्टीवर विचार मांडत आहे. तो म्हणतो की, देहा प्रमाणे किंवा
देह स्वभावाने चालण्यासाठी खटपट करावी लागत नाही. तो आपला स्वभावच आहे. परंतु
पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यास निश्चयपूर्वक त्याचे नियंत्रण स्वीकारावे
लागतील. म्हणून देहाप्रमाणे नव्हे, तर आत्म्याप्रमाणे जीवन जगण्यास पौल आपणास
पाचारण करीत आहे. देह स्वभाव आपणास पापाच्या मोहात पाडतो, आणि मरणाकडे किंवा विनाशाच्या
मार्गावर नेतो, याउलट, आत्मा देवाकडे नेतो, जीवनाकडे आपली पावले वळवीत असतो, असे
सांगण्यात आले आहे.
शुभवर्तमान: योहान ११:१-४५
येशूच्या
पुनरुत्थानात सहभागी होण्यासाठी, त्याच्या मरणात, कष्टात, दुःखात सहभागी होणे
गरजेचे आहे. हे लाजारच्या कथेतून किंवा घटनेतून आपणास कळून येते. परमेश्वराला
कोणतीही गोष्ट अशक्य नाही ह्याचे जिवंत उदाहरण लाजारच्या दृष्टांतद्वारे आपणासमोर
ठेवण्यात आलेले आहे.
‘लाजारला मरणातून उठविणे’
हा प्रभू येशूचा शेवटचा आणि सर्वात महान असा चमत्कार किंवा चिन्ह होते ह्या
चमत्कारा मागे दोन उद्देश आहेत.
पहिला उद्देश
म्हणजे; येशू हा ख्रिस्त आहे किंवा मसीहा किंवा अभिषेक केलेला आहे. ज्या विषयी
पिता परमेश्वर लाजाराला पुन्हा जिवंत करून येशू विषयी सर्व लोकांसमोर साक्ष देत
आहे.
दुसरा उद्देश
म्हणजे; शास्त्री आणि परुशी यांनी येशूला मारण्याची केलेली योजना पुढे नेण्यासाठीची
आहे.
तसेच ह्या
उताऱ्यात आपणास प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख करून दिलेली आहे की, तोच खरा
पुनरुत्थान व जीवन आहे. हे शब्द त्याच्या तोंडून आपण ऐकत आहोत. आपल्या आजारात,
दुःखात व जेव्हा काही गोष्टी आपल्या विचारा पलीकडे असतात, तेव्हा देवावर विश्वास
ठेवण्यास आणि त्याच्याकडे धावा घेण्यास संत योहान आपणास प्रोत्साहित करीत आहे,
किंवा उत्तेजित करीत आहे.
मनन चिंतन
आजचा रविवार आपणास
पवित्र आठवड्याच्या जवळ आणतो आणि आजची उपासना पुनरुत्थान व जीवन ह्या ख्रिस्ती
जीवनातील दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर भर देत आहेत.
जुन्या करारात
आपल्या निवडलेल्या लोकांस परमेश्वराने शब्दानेच नव्हे, तर आपल्या कृतीद्वारे स्वतःस
प्रकट केले. परंतु इस्राएली लोक देवाने केलेल्या उपकाराचे ऋणी होण्यापेक्षा; ते
देवाच्या विरुद्ध गेले. त्यांच्या सुखात, आनंदात ते परमेश्वराला विसरले. फक्त
अडीअडचणीत, दुःखात, कष्टात त्यानी परमेश्वराकडे धाव घेतली. इ.स.वी.सन ५८७ मध्ये
जेरुसलेम मंदिराचा नाश झाला होता. इस्राएल लोक निराशेत होते, तेव्हा परमेश्वर
त्यांना पुन्हा एकदा नवजीवन देण्याचे आश्वासन देतो.
दुसऱ्या वाचनात
आपण ऐकतो की, संत पौल रोमकरांस आपल्या देहाचे पुनरुत्थानाबद्दल सुचित करत आहे. जो
कोणी ख्रिस्तामध्ये जगतो, तो ख्रिस्तामध्ये पुनर्जीवित होणार आहे. ख्रिस्तामध्ये
जीवन जगणे म्हणजे; ख्रिस्ताने दिलेल्या आत्म्याने परिपूर्ण होऊन आत्म्याच्या
प्रेरणेने जीवन जगणे होय.
शुभवर्तमानात आपणास
लाजारच्या घटनेविषयी सांगितलेले आहे. ‘लाजार’ या नावाचा अर्थ ‘देव मदत करतो.’
म्हणजे आपला देव हा आपणास मदत करण्यास सतत तयार असतो. अगदी कठीण परिस्थितीत, प्रसंगातही
आपण असलो आणि जर आपण त्यास हाक मारली, तर तो आपल्या मदतीस धावून येतो. हेच आपण यिर्मयाच्या
पुस्तकात वाचतो. परमेश्वर म्हणतो, “मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन.”(यिर्मया
३३:३)
ह्याच विश्वासाने मरिया
व मार्थाने येशूला लाजारच्या आजारा विषयी निरोप दिला होता. आणि त्याच्या येण्याची
त्या दोघी विश्वासाने व आतुरतेने वाट पाहत होत्या. त्यांना माहीत होते की, येशू
येऊन लाजारला आजारातून बरे करील. त्यांना येशूचा स्वभाव माहीत होता की, येशू दुसऱ्यांच्या
मदतीला सतत धावत असतो, तयार असतो. आणि म्हणूनच त्या दोघी बहिणी येशूच्या येण्याची
मोठ्या आतुरतेने, मोठ्या आशेने वाट पाहत होत्या. परंतु लाजारच्या जीवनाची पेटती
ज्योत हळूहळू आजारामुळे बंद होत चालली होती व शेवटी बंद झाली. आजारामुले तो मरण
पावला. परंतु येशू काही तिकडे पोहोचला नाही. त्याच्या दफन क्रियेला देखील येशू
पोहोचला नाही. आणि सर्व आशा आता संपल्या होत्या. सर्व काही संपलं होतं. जीवनाचा
जणूकाही सूर्यास्त झाला होता. आणि अशावेळी नवीन पहाटे प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त
तिकडे पोहोचतो. लाजारला कबरेत बंद करून चार दिवस लोटले होते.
जेव्हा मार्थाला
येशूच्या येण्याची चाहूल लागते; तेव्हा लागलीच ती धावत जाऊन येशूला भेटली. येशूच्या
उशिरा येण्याने ती थोडी नाराज होती. परंतु तिचा विश्वासही तेवढाच होता, म्हणून ती
म्हणते, “प्रभुजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.” आणि पुढे विश्वास प्रकट
करून म्हणते की, “आताही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल.” अशा शब्दात ती
आपली खात्री, विश्वास प्रकट करते. ह्यावरून आपणास मार्थाच्या दृढ किंवा अटळ अशा
विश्वासाची प्रचिती होते. ह्या तिच्या विश्वासामुळेच तेथील सर्व लोक प्रभू येशूचा
महिमा पाहू शकतात. आणखी नवीन एक चमत्कार ते पाहतात. मृत शरीराला प्रभु
येशू जिवंत करतो. मृत्यूच्या जबड्यातून तो लाजारला मुक्त करतो.
प्रभू येशू आपणास
आज जाणीव करून देत आहे की, कुठल्याही कठीण प्रसंगी परमेश्वरावरील श्रद्धा किंवा
विश्वास आपण ढळू देता कामा नये. कारण परमेश्वराचे विचार, त्याच्या कल्पना, आपले
विचार, आपल्या कल्पना नाहीत. त्याचे मार्ग आपले मार्ग नाहीत. (यशया ५५:८)
पुनरुत्थान हे
फक्त आपल्या शारीरिक मृत्युनंतर नाही किंवा देहाच्या मृत्यूनंतर नव्हे, तर ते
आपल्या आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीत अनुभवण्यास आजची उपासना आपणास बोलावीत आहे.
दैनंदिन जीवनातील दुःख, ताटातूट, बेरोजगारी, आजार, आपल्यावर होणारे अत्याचार, संशय,
शंका, ह्या सर्व परिस्थिती म्हणजे; आपणावर येणारे मरणाचे अनुभव आहेत. ह्या सर्व
परिस्थितीवर जेव्हा आपण ख्रिस्ताच्या सहाय्याने व प्रेमाने विजय मिळवितो; तेव्हाच
आपण खऱ्या रीतीने पुनरुत्थानाचा आणि अमोल जीवनाचा अनुभव घेत असतो.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे दयावंत प्रभू आमची
प्रार्थना ऐक.”
१. पवित्रे ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स,
धर्मगुरू, व व्रतस्थ जे येशूच्या मळ्यात कार्य करत असताना त्यांनी श्रद्धावंतांची
पुनरुत्थानावरील श्रद्धा बळकट करण्यासाठी सतत कार्यरत राहण्यास पवित्र आत्म्याची
कृपा त्यास लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सरकारी पुढाऱ्यांनी जनतेच्या फायद्यासाठी कार्य करण्यास व शांतीचे,
नीतीचे, एकोप्याचे राज्य बांधण्यासाठी झटण्यास लागणारी कृपा त्यांस मिळावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. आज संपूर्ण जगात कोरोना वायरस मुळे हजारों लोक या रोगास बळी
पडले आहेत, आणि बहुसंख्य लोक मरण पावले आहेत. ह्या रोगावर लवकरात लवकर औषधोपचार
मिळावा व जे लोक ह्या रोगास बळी पडले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि
सर्वत्र चांगले आरोग्य प्रस्तापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जेव्हा-जेव्हा आपल्या जीवनात कष्ट, दु:ख येते आणि आपले सर्व
प्रयत्न व्यर्थ होतात, सर्व आशा-निराशा होतात, तेव्हा प्रभूवरील विश्वास आणि श्रद्धा
भक्कम करण्यासाठी त्याच्या योजनेला प्राधान्य देण्यास लागणारी कृपा आपण परमेश्वराजवळ
मागुया.
५.आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व
व्ययक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment