Friday, 29 May 2020


Reflections for the Homily of Pentecost Sunday (31-05-2020) By Dn. Jackson Nato.







पवित्र आत्म्याचा सण
(पेन्टेकॅास्टचा सण)




दिनांक: ३१/०५/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११
दुसरे वाचन: १ करिंथ १२:३ब-७, १२-१३
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३




प्रस्तावना:
          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण पेंटेकॉस्टचा सण साजरा करीत आहोत. पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्म्याने प्रेषितांवर अग्नीच्या जिभांच्या रूपाने अवतरण केले व त्यांना सुवार्ता प्रचारासाठी सुसज्ज केले.
          आजच्या प्रभू शब्द वेदीवर नजर टाकली तर, आपल्या लक्षात येते की, आजची तिन्ही वाचणे पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांना मिळालेल्या सामर्थ्यांचे वर्णन करतात. पहिल्या वाचनात आपण पाहतो की पवित्र आत्मा शिष्यांना विभिंन्न भाषा बोलण्याचे दान देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की पवित्र आत्म्याद्वारे मिळालेली ही दाने स्वतःच्या गौरवासाठी नव्हे; तर, ख्रिस्तसभेच्या बांधिलकीसाठी आहेत. तर, शुभवर्तमानात ख्रिस्त शिष्यांना पवित्र आत्मा देऊन सुवार्तेच्या प्रचाराचे आदर्श देतो व त्यासाठी सक्षम बनवतो. पवित्र आत्मा हा आपना प्रत्येकामध्ये बाप्तिस्माद्वारे संचारीत आहे. हाच आत्मा आपल्याला ख्रिस्ताची सुवार्ता आपल्या शब्दांद्वारे व कृतीद्वारे पसरविण्यास प्रेरित करत असतो. आपल्या शब्दाने दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यास व कृतीने त्यांना मदत करण्यास उत्तेजन देत असतो. पण पवित्र आत्म्याने रुजू घातलेल्या या प्रेरणेचे रोप फक्त आपल्या सहकार्याने वाढू शकते. म्हणून त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेला आपण होकार द्यावा व सुवार्ता प्रचाराच्या कार्यात सहभागी होण्यास लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण ह्या मिसाबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११
          पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा. दिवस. यहुदी लोकांच्या तीन महत्वाच्या सणांपैकी एक महत्वाचा सण होता. वल्हांडणाच्या सात आठवडय़ानंतर हा सण साजरा केला जातो. ह्या सणाचे उद्दिष्ट प्राथमिकदृष्ट्या वार्षिक शेतीच्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्याचं असतं. जिथे गव्हाचे पहिले पीक देवाला अर्पण केले जात असे. पण काही कालावधीनंतर देवाने सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या दहा आज्ञाच देखील या दिवशी स्मरण केले जात असे. ज्या लोकांना या दिवसापासून सूट हवी होती त्यांना वगळून सर्वांसाठी या सणानिमित्त यरुशलेमेला येणे सक्तीचे होते. म्हणून यहुदा व त्याबाहेरील प्रांतात असलेले हजारो यहुदी या सणाला हजर होते त्यामुळे संपूर्ण शहर लोकांनी गजबजलेल होत. म्हणून या सणाची निमित्त साधून परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या वर्षावांसाठी हा दिवस निवडला होता यात काही शंका नाही. ख्रिस्ताची शिकवण ही जागतिक होती. एवढेच नव्हे तर सर्वधर्म समावेशक होती. हेच सर्वसमावेशक वैशिष्ट शिष्यांच्या वेगवेगळ्या भाषा उच्चारणातून उघडकीस येते आणि म्हणूनच पेत्राने जो संदेश दिला तो सर्व लोकांसाठी होता व तो संदेश त्यांना पोहचावा व ख्रिस्ताची ओळख सर्वांना व्हावी हा यामागचा हेतू होता.

दुसरे वाचन: १ करिंथ १२:३ब-७, १२-१३
          या वाचनात आपण पाहतो की पवित्र आत्म्याची दाने ख्रिस्ती लोकांच्या जीवनात उघडपणे दिसत होता. हे सर्व होणे गरजेचे होते. जेणेकरून जी लोक परधर्मीय होती, मूर्तिपूजक होती त्यांना समजून चुकावे कि; ज्या देव-देवीसमोर ते माथा टेकत आहेत हे सर्व खोटे देव आहेत. पण, ख्रिस्त मात्र खरा देव आहे. ज्याचा सृष्टीवर ताबा आहे. जी दाने ख्रिस्ती लोकांना पवित्र आत्म्याने दिली होती, ती ख्रिस्ताकडून होती. त्याचा वापर ते परिस्थितीला अनुकूल असा करत. पुढे ह्या दानाचे स्पष्टीकरण देताना संत पौल सांगतो की, ही दाने स्वतःच्या गौरवासाठी नव्हे तर समाजाच्या व ख्रिस्तसभेच्या बांधिलकीसाठी दिली गेली होती.

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३
          ख्रिस्ताने, खोळीचे दरवाजे बंद असताना सुद्धा मधे जाणे हे पुनरूत्थित ख्रिस्ताच्या दैवी शरीराचे वैशिष्टय़ दर्शविते की, जो मेला होता तो आता त्यांच्यासमोर जिवंत आहे. हा जिवंत येशू त्यांना शांतीने वंदन करतो जेणेकरून ते शांती अनुभवतील. त्यानंतर येशू शिष्याना त्यांचे मिशनकार्य स्पष्ट करतो. ज्या कार्याची सुरुवात ख्रिस्ताने केली ते पुढे नेण्यास त्यास आज्ञा करतो. एवढेच नव्हे तर या कार्यासाठी त्यांना पवित्र आत्मा देऊन सक्षम करतो.

मनन चिंतन:
          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण पुनरुत्थान काळातील शेवटचा रविवार म्हणजेच पेंटेकॉस्ट सण साजरा करत आहोत. पेंटेकॉस्ट म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा पन्नासावा दिवस. ज्या दिवशी प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला. पेंटेकॉस्ट म्हटलं तर पहिल्या प्रथम आपल्याला ज्याची आठवण येते ती गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा. पेंटेकॉस्ट आणि पवित्र आत्मा यांची आपण लगेच सांगड घालतो. कधी-कधी आपण पेंटेकॉस्ट म्हणजेच पवित्र आत्मा हा निष्कर्ष लावतो. पण जर या शब्दाचा आपण खोलवर अभ्यास केला तर, त्याचा अर्थ व त्याचे महत्त्व खऱ्या अर्थाने आपल्या समजूकीस येते. मुळात पेंटेकॉस्ट आणि पवित्र आत्मा ह्यांच्यात जवळजवळ काहीही नाते संबंध नाही.
          पेंटेकॉस्ट हा ग्रीक भाषेतील शब्द ज्याचा अर्थ म्हणजे पन्नासावा दिवस. वल्हांडण सणानंतर पन्नासाव्या दिवशी पिकाच्या कापणीचा सण यहुदी साजरा करत असत. ह्या सणाचा उद्देश म्हणजे धांन्याच्या पिकाची समाप्ती झाली आहे याची आठवण करणे व त्याबद्दल देवाला धन्यवाद देणे असा होता. पण या शब्दाचा आपण शाब्दिक अर्थ पाहिला तर, फक्त पन्नासावा दिवस असा होतो. व त्यापलीकडे कापणीचा सण किंवा पवित्र आत्मा यांच्याशी काहीही संबंध नाही. पण आजच्या पहिल्या वाचनावर जर आपण नजर टाकली तर, आपल्या लक्षात येते की, कशाप्रकारे पेंटेकॉस्टची ओळख पिकाच्या कापणीच्या सणांबरोबर झाली व तो दिवस पवित्र आत्म्याशी जोडला गेला.
          आजच्या तिन्ही वाचनांमधील सर्वव्यापी घटक जो आपल्याला पवित्र आत्म्याची उपस्थिती दर्शवितो तो म्हणजे "शब्द" पहिल्या वाचनात आपल्याला पाहण्यास मिळते की शिष्य पवित्र आत्म्याद्वारे वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, “कुणीही पवित्र आत्म्याशिवाय ख्रिस्त हा देव आहे हे ओळखू शकत नाही व तसे बोलूही शकत नाही.” तर, शुभवर्तमानात ख्रिस्त शिष्याना म्हणतो,“तुम्हांस शांती असो.” या तिन्ही वाचनातून आपल्याला शब्दाचे किंवा वाचेचे महत्त्व लक्षात येते.
          शब्दावर जर आपण मनन चिंतन केले तर आपल्या लक्षात येते की, शब्द हे आपल्याला सामान्य वाटतात की, जे सहज उच्चारले जातात. पण, तेच शब्द कधी-कधी एवढे सामर्थशाली होतात की, त्याद्वारे चांगल्या किंवा वाईट गोष्टीचे आपल्याला दर्शन होतं. म्हणून या शब्दांचे महत्त्व जाणून त्याला वाचा फोडण्या अगोदर आपण त्यावर विचार केला पाहिजे. कारण शब्दांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जर एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहाचवायचे असतील तर त्यासाठी शब्दांची गरज असते. पण या शब्दांचा वापर जर, जपून केला नाही तर, त्या पासून अपायकारक परिणाम उद्भवतात. म्हणून म्हणतात की, “धनुष्यातून निघालेले बाण व तोंडातून निघालेला शब्द यांना आवर नसतो” म्हणून तेच सोडण्याअगोदर त्यावर खोल विचार करावा. कारण, तोंडातून बाहेर येण्याअगोदर त्या शब्दांची किंमत शून्य असते. पण, एकदा का ते बाहेर आले त्याची खरी किंमत कळते. ते कुणाच्या मनात किती खोलवर बसतात याचा अंदाज आपण लावू शकत नाही.
          आपल्या तोंडातून निघणारे शब्द हे दोन प्रकारचे असतात. सकारात्मक व नकारात्मक. सकारात्मक शब्द हे जग घडवतात, माणसे जुळतात, मने जिंकतात. पण नकारात्मक शब्द जग उद्ध्वस्त करू शकतात, आपापसात कधीही न भरणारी दरी निर्माण करू शकतात, आपापसामध्ये दुरावा निर्माण करू शकतात. सकारात्मक शब्द हे निस्वार्थी असतात. त्यात दुसऱ्यांना प्रोत्साहित करण्याची शक्ती असते. उलट नकारात्मक शब्दामागे स्वार्थ असतो. दुसऱ्यांच्या भावना दु:खावल्या तरी चालेल पण आपला हेतू किंवा उद्देश मात्र पूर्ण व्हायला हवा अशा प्रकारची भावना नकारात्मक शब्दामध्ये असते. जुन्या करारात आपण नजर टाकली तर, आपल्याला बाबेल स्तंभाचे उदाहरण लक्षात येईल. मनुष्याने स्वार्थापोटी स्तंभ उभारण्यास सुरुवात केली जेणेकरून त्या बुरुजाचे टोक स्वर्गाला लागेल. यात त्यांचा मीपणा होता. स्वार्थ होता. त्यांना त्यांचे नाव उंच करायचे होते. पण, ह्याच स्वार्थामुळे त्यांची पांगापांग झाली. ते परस्परांना न समजणाऱ्या भाषा बोलू लागले. कारण त्यांच्या भाषेत मीपणा होता व ते जे एकत्र होते ते विभागले. या उलट पवित्र आत्म्याद्वारे शिष्य वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. आणि त्याद्वारे जातीने, धर्माने, भाषेने व संस्कृतीने विभागलेल्या लोकांना एकत्र आणले. जे लोक वेगवेगळ्या भाषा बोलत होते, वेगवेगळ्या पंथाचे होते, त्यांना शिष्यांनी पवित्र आत्म्याद्वारे एकत्र केले. कारण, शिष्यांचे शब्द हे सकारात्मक होते. त्यांच्यात कोणताही स्वार्थ नव्हता. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की, “पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले भाषेचे दान हे आपल्या स्वतःच्या गौरवासाठी नव्हे, दुसऱ्यांना दाखविण्यासाठी नव्हे तर, समाजाच्या व चर्चच्या बांधिलकीसाठी आहेत.” आणि जेंव्हा हि दाने आपण अशा प्रकारे योग्यतेने वापरतो तेव्हा आपण त्यांच्यातील सकारात्मक व प्रेरणादायी गुणाला वाव देत असतो.
          शब्द हे मृत असतात पण तोंडातून बाहेर पडताच ते जगायला सुरुवात करतात. म्हणून या शब्दांचे जगणं दुसऱ्यांच्या जगण्याचं कारण बनतात किंवा ते दुसऱ्यांच्या जीवनावर वार करतात हे आपण ठरवतो.
          शब्द कडू असतात आणि गोडहि असतात. पण, त्याची चव दुसऱ्यांना देण्याअगोदर प्रथम आपणच चाखावी. आपल्या शब्दात किती गोडवा आहे किंवा किती कडूपणा आहे हे आपण चाखल्याशिवाय कळणार नाही. किती गोडवा किंवा किती कडूपणा आपण दुसऱ्यांना देतो हे आपण अनुभवल्याशिवाय कळणार नाही. म्हणून तोंड उघडण्याअगोदर आपण नेहमी तीन प्रश्न विचारायला हवे: १) मी जे सांगतो ते सत्य आहे का? २) हे सांगणे गरजेचे आहे का? ३) माझ्या शब्दात दया आहे का? हे प्रश्न जर आपण काही बोलण्याअगोदरच स्वतःला विचारले तर ते आपल्याला योग्य शब्द उच्चरण्यास, चांगले बोलण्यास मदत करतील. आपण आपल्या जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कि, आपल्या शब्दात शक्ती आहे. ते कुणाचे जीवन उभारू शकतात तर, कुणाचे जग उद्ध्वस्त करू शकतात. म्हणून आपण शब्द जपून वापरायला हवे, त्यास काचेच्या तुकड्यांप्रमाणे हाताळायला हवे.



विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो तुझ्या आत्म्याचे दान आम्हाला दे.”
१. ख्रिस्त प्रेमाचा दिवा तेवत ठेवण्यास हातभार लावणारे आपले परमगुरूस्वामी फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ व प्रापंचिक ह्यांना चांगले आरोग्य मिळावे व हे कार्य अखंड चालू ठेवण्यास पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
२. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भयभीत झाले आहे. सामाजिक व आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. हे भय पवित्र आत्म्याच्या धैर्याने दूर व्हावे व संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आज अनेक स्थलांतरित व निर्वासित आपल्या गावाकडे जाण्यास प्रवास करत आहेत त्यांच्या या प्रवासात येणारे अडथळे दूर व्हावे व सुखरूप आपल्या कुटुंबियाकडे पोहोचावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत असलेला आपला देश अनेक नैसर्गिक आपत्तीशी सामना करत आहे, हे आपत्ती दूर व्हाव्या व उद्ध्वस्त झालेले त्यांची घरे व जीवन पुनर्स्थापित व्हावीत यासाठी आपण विशेष प्रार्थना करू या.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वयक्तिक गरजा प्रभूकडे मांडू या.


Thursday, 21 May 2020


Reflections for the Homily of Ascension of Our Lord (24-05-2020) By Fr. Wilson D’Souza.





प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा


दिनांक: २४/०५/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३
शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०.



“पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”
प्रस्तावना:
          आज देऊळमाता प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहे. पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक मानवाची अपेक्षा असते की, आपण स्वर्गात जावे व अनंत काळचे जीवन जगावे. हे स्वर्गीय सुख प्राप्त करण्यासाठी आपण सदोदित प्रयत्नशील असतो. परंतु, स्वर्गीय जीवन चांगल्या कृती द्वारे मिळत नसून; ती एक देवाची देणगी आहे. ती देणगी प्राप्त करण्यासाठी ह्या प्रभू भोजनात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
          पहिले वाचन येशूच्या पुनरुत्थाना नंतर त्याने चाळीस दिवस आपल्या प्रेषितांना दर्शन दिले. त्यांने जे जे करायला व शिकवायला हवे ह्याची जाणीव करून दिली आहे. कारण तो त्यांना सोडून स्वर्गात जाणार होता. ते येरुशलेममध्ये एकत्र प्रार्थना करीत असताना त्यांच्या डोळ्यादेखत प्रभू येशू स्वर्गात घेतला गेला. कारण, आता तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो मेलेल्यांचा व जीवतांचा न्याय करील असे आपल्याला वाचायला मिळते.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३
          आजच्या दुसऱ्या वाचनात आपणाला येशूचे स्वर्गारोहण, त्याचे सामर्थ्य, सत्ता, अधिकार व धनीपणा हे दर्शवते. हा अधिकार येशू गाजवतो. कारण, तो देवाच्या उजवीकडे स्वर्गात बसला आहे. तो आपल्याला पवित्र जणांमध्ये वतनाचे वैभवी समृद्धी बहाल करत आहे.

शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०.
          शुभवर्तमानकार मत्तय आपल्या शुभवर्तमानाचा शेवट येशूला असलेल्या अधिकाराची माहिती देतो. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला दिला आहे. विशेष म्हणजे तो अधिकार येशूने आपल्याला दिले आहेत, ते म्हणजे; शिष्य करणे, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देणे. आणि येशूने जे शिकवले आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यात, युगाच्या समाप्ती पर्यंत पोहचवणे. हे सगळे करीत असताना येशू आपल्या बरोबर असणार आहे ह्याची जाणीव ठेवणे.

बोधकथा:
          एक पारधी (शिकारी) होता. तो सातत्याने जंगलात जाऊन प्राण्याची शिकार करत असे. हे करत असताना तो क्रुर बनला होता. समाजात लोक त्याला तुच्छ मानत असत, ते केवळ त्याच्या स्वभावामुळे. जंगलात तर, प्राणी मात्र त्याला फार घाबरत असत. एक दिवस असाच शिकारीच्या शोधात असताना अचानकपणे काही प्राणी घोळक्यात येऊन त्याच्यावर स्वारी केली. आपला जीव वाचवण्यासाठी तो एका फुलाच्या झाडावर बसला. प्राण्याला घालवून देण्यासाठी आपल्या हातातील बंदूक वापरून आवाज करण्याच्या प्रयत्नात; त्याच्या हातातील बंदुक खाली पडली.
          आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी फुलाच्या झाडावर चढलेला पारधी काही काम नाही म्हणून, फुल वेचून खाली टाकू लागला. फुलाचा ढिगाऱ्यातून वन देवी त्याला प्रसन्न झाली. ती म्हणायला लागली की, आपण वाहिलेल्या फुलांनी मी प्रसन्न झाले. आपणास काय वर हवा आहे तो मागा. वन देवीला पाहून पारधी घाबरला. आपण क्रूर, पापी आहोत, आपल्या जीवनात आपण कोणतीच सत्कर्मे केली नाहीत. तर, वन देवी मला प्रसन्न कशी झाली? तो स्वतःला दोष देऊ लागला. पण वन देवी त्या पारध्याला म्हणाली, “आपल्या संपूर्ण जीवनात आपण काहीही केले असले; तरीही, आपल्या शेवटच्या कृत्याने मी आपल्यावर प्रसन्न झाली आहे. जे पाहिजे ते मागा व आपल्याला दिले जाईल. आपण सदोदित वन देवीबरोबर आनंदात रहावे हा वर त्याने मागितला व तो वन देवीने त्याला बहाल केला.

मनन चिंतन:
“स्वर्ग देवाची मानवाला देणगी.”
          आज आपण प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहोत. स्वर्गारोहण म्हणजे काय? ह्याचे वर्णन आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकले आहे. संत लुक आपल्याला सांगत आहे की, येशू त्यांच्या प्रेषितांच्या डोळ्यादेखत वर घेतला गेला. ते आकाशाकडे निरखून पाहत होते. आणि त्याच्या स्वर्गारोहणाचे देवदूत हे साक्षीदार आहेत. ‘अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहीलात? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला तोच परत येईल. आपण प्रेषितांचा विश्वाससंगीतकार ह्या प्रार्थनेत म्हणतो; ‘येशू मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला, व पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत व मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल.
          स्वर्ग ही एक जागा नसून आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. ती एक मानवाच्या जीवनातील स्तिथी आहे. स्वर्ग वर नसून पृथ्वीवर निर्माण करायचा आहे. स्वर्ग मानवाला त्याच्या कृत्यामुळे प्राप्त होत नसतो; तर, ही देवाची येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला बहाल केलेली देणगी आहे. देवा बरोबर राहणे म्हणजे; स्वर्गाचा अनुभव घेणे. आणि आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येशू प्रथम स्वर्गारोहण करतो. आपल्याला स्वर्गात नेण्याचा अधिकार, सामर्थ्य, सत्ता ही येशूकडे आहे.
          कधी-कधी मानवजात प्रयत्न करत असते की, मला मेल्यानंतर स्वर्गात जाऊन अनंत जीवन मिळवायचे आहे. त्यासाठी काही लोक अनेक सत्कृत्ये करतात. रोज प्रार्थना करतात, मिस्साबलीदानात सहभागी होतात, रोजरी म्हणतात, गोर-गरीबांची सेवा करतात. होय ह्या कृत्यांद्वारे आणि प्रार्थनेद्वारे आपण स्वर्ग कमावू शकतो. परंतु, ख्रिस्त स्वतः आपल्याला स्वर्गाची देणगी बहाल करत आहे. “जेथे मी असेल, तेथे त्यांनी असावे.” (योहान १४:३) अशी प्रार्थना सातत्याने त्याने बापाकडे केली आहे. त्यामुळे स्वर्ग मानवाच्या कृतीतून प्राप्त होत नसतो, उलट ती एक दैवी देणगी आपल्या सर्वांना मोफत बहाल केली आहे.
          स्वर्गा विषयी दुसरी चुकीची कल्पना आपल्या मनात आहे. ती म्हणजे देव स्वर्गात आहे. येशू ख्रिस्ताद्वारे देव आपल्या बरोबर आहे. आणि तो आपल्याला पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायला सांगत आहे. हाच आजच्या शुभवर्तमानाचा गाभारा आहे.
“जेथे प्रेम, दया, शांती तेथे देवाची वस्ती.”
“करशील जे  गरिबांसाठी, होईल ते माझ्यासाठी.
दिले खावया भुकेल्यांना अन प्यायाला तान्हेल्यांना
उघड्याला पांघरावयाला केले सी हे मज साठी
स्वर्गीचे सुख तुझ साठी.”
          स्वर्गाच्या लायकीचे शिष्य करा, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देऊन त्यांना केवळ ख्रिस्ती करू नका. तर, ख्रिस्तामध्ये त्यांना स्वर्गाचा अनुभव घेऊ द्या. जेथे येशू आहे; तेथे स्वर्ग आहे. हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवा; कारण स्वर्ग व येशू युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्याबरोबर राहणार आहेत.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू, स्वर्गीय सुख प्राप्त करण्यास आम्हांस साहाय्य कर.”
१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य बहाल करावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद असावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा दृष्टी आमच्या देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लागून त्यांचे ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.


Wednesday, 13 May 2020


Reflections for the Homily of Sixth Sunday of Easter (17-05-2020) By Dn. Lipton Patil.



पुनरुत्थान काळातील सहावा रविवार



दिनांक:१७/०५/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ८:५-८,१४-१७
दुसरे वाचन: १ पेत्र ३:१५-१८
शुभवर्तमान: योहान १४:१५-२१




विषय: “दुसरा कैवारी म्हणजे ‘सत्याचा आत्मा’ देईल.”


प्रस्तावना:
          आज आपण पुनरुत्थान काळातील सहाव्या रविवारात प्रवेश केलेला आहे. आजची उपासना ‘सत्याचा आत्मा’ याच्यांमध्ये सदैव दृढ राहण्यासाठी निमंत्रण देत आहे.
          प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपणांस असा संदेश मिळतो की; पवित्र आत्म्याच्या सहाय्याने फिलीपने देवाची सुवार्तिक बातमी संपूर्ण शोमोरोनात घोषित केली. इतकेच नव्हे तर पेत्र व योहान शोमोरोनात जाऊन लोकांना पवित्र आत्म्याची सात कायम लाभावी म्हणून देवाकडे याचना करतात.
          दुसऱ्या वाचनात संत पेत्र आपल्या पहिल्या पत्रात असा बोध करतो की, ‘ख्रिस्ताविषयी आपल्या मनात सन्मान, प्रतिष्ठा व आदर ठेवा. ख्रिस्तालाच आपला प्रभू माना.’
          योहानलिखित शुभवर्तमानात येशू ठामपणे आपल्या शिष्यांस सांगतो की, ‘तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल; म्हणजे तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजेच; ‘सत्याचा आत्मा’ पित्याकडून दिला जाईल.
          आज आपण ह्या पवित्र वेदीभोवती एक प्रीतीचे व सत्याचे कुटुंब म्हणून जमलेलो असताना; आपण आपल्या अपराधांची व वाईट कृत्यांची क्षमा मागूया व प्रीतीने व सत्याने जीवन जगण्यास पवित्र आत्म्याचे सहकार्य आपल्यावर नेहमी संचार करावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात भक्तिभावाने सहभागी होऊन प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ८:५-८, १४-१७.
          फिलिपने शोमारोनात जाऊन सुवार्तेची घोषणा केली. यहुदिया आणि गालीलीयात लोक शोमरोनी पाखंडी व यहुदी आहेत असे समजत. शोमारोन प्रांत यहुदियाच्या उत्तरेस होता. फिलिपचा परिचय येथे देताना त्याने केलेली अदभूत चिन्हे, अशुद्ध आत्मे काढणे व आजार बरे करणे इत्यादींचा उल्लेख केला आहे. त्याचे हे कार्य पाहून लोकांनी त्यांचे सांगणे काळजीपूर्वक ऐकले. शोमरोनी लोकांमध्ये सुवार्ता, सेवा कार्य सुरु करण्याची योजना अगोदर केली नसल्याने ही वार्ता यरुशलेमध्ये प्रेषितांना समजली; तेव्हा ते नक्कीच आश्चर्यचकित झाले असणार. त्यांनी ही चौकशी करण्यासाठी पेत्र व योहान ह्यांना तिकडे पाठवले.

दुसरे वाचन: १ पेत्र ३:१५-१८.
          पेत्र आपल्या वाचकांना भावी काळात दु:ख सोसण्यासाठी तयार करीत आहे. तसेच मानवी स्वभावाला अनुसरून दु:ख, क्लेश म्हणजे केवढी मोठी हानी; असे उद्गार त्यांच्या तोंडून निघतील हेही त्याने लक्षात घेतले आहे. त्याने येशूचे उदाहरण देऊन त्यांचे दु:खसहन व त्यातून त्याने काय साधले ते स्पष्ट केले आहे. निर्दोष, निरपराध ख्रिस्ताने देवाच्या योजनेनुसार केलेल्या दु:खसहनाची लक्षणे आहेत. ख्रिस्ताचे दु:खसहन हाच आमचा आदर्श कित्ता आहे हे सांगताच त्याच्या मुल्यांवर पेत्राने भर दिली आहे. देवाने पापाला दिलेला न्यायदंड शिक्षा येशूने पूर्णपणे भोगल्यानंतर त्याचा आत्मा देहापासून मुक्त करण्यात आला.

शुभवर्तमान: योहान १४:१५-२१.
          पवित्र आत्मा अंत:करणात वस्ती करतो. जे ख्रिस्तावर प्रीती करतात ते उस्तुक्तेने ख्रिस्ताच्या आज्ञा पाळतात. येशु ख्रिस्त लवकरच शिष्यांना सोडून जाणार होता. आतापर्यंत त्याने शिष्यांना मदत केली होती. त्यांचे समाधान करण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविण्याचे अभिवचन त्याने दिले. ही घटना पेंटेकॉस्टच्या दिवशी पडली. पवित्र आत्म्याचा स्वभाव ख्रिस्तासारखाच आहे. तो समाधान देऊन आधार व उत्तेजन देणारा आहे. तो सत्य सांगतो व सत्याचा पाठपुरावा करतो. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यात वस्ती करतो. तो कधीच तिथून जात नाही. ही खात्री आपल्या अंत:करणात असावी. ते शिष्य कधीच अनाथ राहणार नव्हते. देवपिता आपल्या मुलांना कधीच दूर करीत नाही.

मनन चिंतन:
          पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून पवित्र आत्म्याला स्वीकारण्यास जमलेल्या माझ्या भाविकांनो, मुंबईतील एका चाळीत एक कुटुंब राहत होते. या कुटुंबात विधवा बाई व तिची दोन मुलं होती. या बाईने दुसऱ्यांचे कामकाज करून तिच्या मुलांसाठी पैशांची बचत केली होती. दुसऱ्यांचे काम करून ही बाई थकून गेली होती. आता शेवटची घटका मोजत असताना, तिने आपल्या दोन्ही मुलांना जवळ वेंगेत धरून म्हटले की, “मी आता जास्त वेळ राहणार नाही. त्यामुळे तुमच्यावर वाईट परिस्थिती येऊ नये, किंबहुना तुम्ही दुसऱ्यांकडे भीक मागू नये. म्हणून, मी तुमच्यासाठी थोडे फार पैशांची बचत करून घेतली आहे. तुम्ही सत्याने जीवन जगा. शरीराने मी तुमच्या बरोबर नसेल तरी आत्म्याने तुमच्याबरोबर मी असेल. मी स्वर्गात गेल्यावर तुमच्यासाठी देव पित्याकडे प्रार्थना करीन. जेणेकरून, तो तुम्हांला मदत करील. जीवनात योग्य दिशा दाखविली व ध्येर्य देईल.” ह्या बाईने सत्याचे व प्रीतीचे पालन करून जीवन जगली व तशाच प्रकारचे जीवन जगण्यास ती तिच्या मुलांना आज उत्तेजीत करीत आहे. त्यांना सकारात्मक विचाराने भरून टाकते व कधीही अनाथ न सोडण्याचा दावा करून देते.
          भाविकांनो ख्रिस्त सुद्धा आजच्या शुभवर्तमानात शिष्यांना अट घालतो, “माझ्यावर तुमची प्रीती असेल तर, तुम्ही माझ्या आज्ञा पाळा.” बाईचे तिच्या मुलांवर प्रेम होते; तसेच ख्रिस्ताचे सुद्धा त्याच्या शिष्यांवर प्रेम होते. आईला आपल्या मुलांना अनाथ सोडायचे नव्हते; तसेच ख्रिस्ताला सुद्धा त्याच्या शिष्यांना अनाथ सोडून जावेसे वाटत नव्हते. आईने आपल्या मुलांसाठी सर्व सोय करून घेतली होती. जेणेकरून, त्यांच्या जीवनात अडथळा येणार नाही; आज ख्रिस्त शिष्यांना सोडून जात असताना, त्यांना वचन देतो की, “मी तुम्हांबरोबर कैवारी म्हणजेच ‘सत्याचा आत्मा’ पाठवीन. तो तुमच्याबरोबर राहील व तुम्हांला कधीही सोडणार नाही. प्रेमाचा आभास कमी पडू देणार नाही.”
          भाविकांनो, ख्रिस्ताला आपल्या शिष्यांबद्दल खूप आस्था, कळकळ होती. आपल्या शिष्यांना अनाथ सोडून देण्याची ख्रिस्ताला अजिबात ईच्छा नव्हती. शिष्यांची कुणीतरी काळजी घ्यावी, त्यांना सहकार्य करावे, असे ख्रिस्ताला वाटत असे. ख्रिस्ताने नाराज व भयभीत शिष्यांकडे पाहिले व त्यांना पाठिंबा देऊन म्हटले की, “मी पित्याला विनंती करीन व तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजेच ‘सत्याचा आत्मा’ देईल.” अर्थात तुमचा रक्षणकर्ता, सहाय्यक म्हणून ‘सत्याचा आत्मा’ पाठवीन. हा आत्मा शिष्यांच्या कायमस्वरूपी बरोबर राहील. शिष्यांच्या अध्यात्मिक घरात वस्ती करील. शिष्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होऊन त्यांच्या कार्यात हातभार लावील. ‘सत्याचा आत्मा’ शिष्यांवर संचार करील. ख्रिस्ताचे प्रेषितीय कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या आत्म्याने त्यांना परावृत्त केले. ख्रिस्तासारखे धाडस चलकारी कार्य व सुवार्तिक शिष्य बनले.
          आजच्या प्रेषितांच्या कृत्यात आपण ऐकले व त्याचे साक्षीदार आहोत की, फिलिपने पवित्र आत्म्याच्या सहाय्याने प्रेषितीय कार्य केले. त्यांने अद्भुत चिन्हे, अशुद्ध आत्म्ये काढून टाकले व आजार बरे केले. त्यामुळे तेथील लोक आनंदित झाले. शोमोरोनी लोकांमध्ये सुवार्ता कार्य सुरू केले. योहान व पेत्र ह्या गोष्टीबद्दल यांनी स्वतः साक्ष दिली व तेथील लोकांना पवित्र आत्म्याची सात लाभावी म्हणून प्रार्थना केली. शोमोरोनी लोकांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. हे सर्व काही केले फक्त आत्म्याच्या सहाय्याने. ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानाने पवित्र आत्म्याच्या स्वरूपाने शिष्यांबरोबर हजर राहिला; ह्यावरून समजते की, ख्रिस्ताने शिष्यांना अनाथ सोडले नाही. पेत्र सांगतो की, “आपल्या अंत:करणात ख्रिस्ताला स्थान दिले पाहिजे. ख्रिस्ताने आपल्यासाठी दुःख व क्लेश सहन केले. ख्रिस्ताचे दुःखसहन, यातना व मरण हाच आपला आदर्श कित्ता आहे. ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला. ख्रिस्त नीतिमान असून अनीतिमान माणसांसाठी मरण पावला, अशासाठी की, आपल्याला देवाकडे जाता येईल व आपणास पुन्हा नवजीवन व नवचैतन्य लाभेल.”
          प्रिय भाविकांनो, आपण जेव्हा दुसऱ्यांवर प्रीति करतो व इतरांचा मान-सन्मान करतो; तेव्हा, आपण देवाच्या आज्ञा पाळतो. देवाच्या महत्कार्यात आपण हातभार लावतो. आपण सुद्धा अद्भुत कृत्ये करून देवावर आपली प्रीती दर्शवतो. पण कधी-कधी आपल्या अहंकाराने, गर्विष्ठाने व स्वार्थीवृत्तीमुळे ह्या पवित्र आत्म्याला आपल्यात कार्य करण्यास बंदी घालतो. आपण सर्वजण पापी आहोत व प्रत्येकाकडून चूका होत असतात; ह्यामुळे आपण देवाकडून व पवित्र आत्म्यापासून दूर जातो व प्रेषितीय कार्यात व्यवस्थित होत नाही. आज ख्रिस्ताला सांगूया की, ‘आम्ही पापी आहोत. आम्ही तुझ्याविरुद्ध व इतरांविरुद्ध पाप करून प्रीतीची आज्ञा भंग केली आहे. आम्हाला तुझ्या दयेची व करुणेची नितांत गरज आहे.’ जेव्हा आपण आपली चूक कबूल करतो तेव्हा, आपल्यावर ‘सत्याचा आत्मा’ येतो. पवित्र आत्मा सर्व अरिष्ठांपासून आपले संरक्षण करतो. पवित्र आत्मा शक्तीचे उगमस्थान आहे. योग्य निर्णय घेण्यास व चांगले कार्य करण्यास नेहमी मार्गदर्शन करीत असतो. आज पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकावर येवो व आपल्या अंत:करणात वस्ती करो म्हणून आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे ख्रिस्ता, आम्हांला सत्याचा आत्मा प्रदान कर.”

१. ख्रिस्त सभेची अखंड सेवा करणारे परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मगुरूभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पवित्र आत्म्याचे सहाय्य मिळावे व देवाच्या लोकांची सेवा करण्यासाठी प्रभूने नेहमी त्यांना निरोगी ठेवावे व त्यांनी देवाचे शब्द जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आपल्या देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे सर्व राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात कार्य करणारे पुढारी ह्यांच्या प्रयत्नांतून देशाची उन्नती व्हावी व देशाच्या भविष्यासाठी त्यांनी चांगल्या योजना निर्माण करून अमलात आणाव्यात, तसेच समाजातील तरुण-तरुणी जे नोकरीच्या शोधत आहेत. व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यश न आल्यामुळे काही तरुण-तरुणी दिशाहीन झाले आहेत. अशा अडचणीच्या प्रसंगी त्यांनी कष्ट, प्रयत्न चालू ठेवावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे, सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, तसेच कोरोना ग्रस्थ लोकांना धीर मिळावा व त्यांच्या आजारातून त्यांची सुटका व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. "जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते." मे महिना हा सर्वत्र जपमाळेचा महिना पाळला जातो, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात पवित्र मारीयेची जपमाळेची प्रार्थना दररोज व्हावी व ह्या जपामाळेच्या प्रार्थनेद्वारे पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संचार करावा व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाचा कायापलट व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व व्ययक्तिक गरजेसाठी प्रार्थना करू या.