Friday, 8 May 2020


Reflections for the Homily of Fifth Sunday of Easter (10-05-2020) By Dn. Godfrey Rodriques.



पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार




दिनांक: १०/०५/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७
दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९
शुभवर्तमान: योहान १४:१-१२



“मार्ग, सत्य, व जीवन मीच आहे.”

प्रस्तावना:
          आज आपण पुनरुत्थान काळातील पाचव्या रविवारात पदार्पण करीत आहोत. आज आपली देऊळमाता आजच्या उपासनेद्वारे आपल्या प्रत्येकाला येशू हाच ‘मार्ग, सत्य, व जीवन आहे’ याच्यावर विश्वास ठेवण्यास व त्याचे अनुकरण करण्यास बोलावत आहे. प्रेषितांची कृत्ये ह्यातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात; पवित्र आत्म्याने परिपूर्ण अश्या सात पुरुषांची निवड करण्यात आली आहे. तर आजच्या दुसऱ्या वाचनात पेत्र आपल्याला; ख्रिस्तावर श्रद्धा ठेवण्यास व येशूच्या वंशात एक याजकपण, निवडलेले लोक होण्यास पाचारण करीत आहे. त्याचबरोबर योहानकृत शुभवर्तमानात ख्रिस्त हा ‘मार्ग, सत्य, व जीवन आहे.’ ह्यावर विश्वास ठेवण्यास व ख्रिस्ताने शिकवलेली चांगली मुल्ये व ती अंगीकारण्यास बोलावत आहे. आजच्या प्रीती भोजनात सहभागी होत असताना; ख्रिस्तावर आपला विश्वास दृढ होण्यास व ख्रिस्त हा ‘मार्ग, सत्य, व जीवन आहे, हे सत्य अनुभवण्यासाठी लागणारा विशेष आशीर्वाद मागूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७
          इब्री व ग्रीक भाषा बोलणारे यांच्यात काही गोष्टीवरून वाद सुरु झाला होता. सर्वांच्या गरजेप्रमाणे मालमत्तेची (वस्तूंची) वाटणी होत असे. आम्ही ग्रीक बोलतो म्हणून आंम्हाला कमी मिळते अशी ग्रीक बोलणाऱ्या विधवांची तक्रार होती. या कारणाने त्या मोठ्या जमावात फुट पडत होती. या प्रश्नाकडे प्रेषितांनी ताबडतोब लक्ष दिले. त्यांनी सर्व मंडलीळा जमविले आणि मंडळीसमोरचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. आणि हा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दल विचारपूस केली.
येशु ख्रिस्ताने प्रेषितांना प्रार्थना करावयास शिकविले होते. दररोजचे रेशन वाटप करणारी माणसे पवित्र आत्म्यावर अवलंबून राहत असे. जे पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतात त्यांच्यात ख्रिस्ताचे गुण दिसतात. कारण हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे.

दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९
          विश्वास असणाऱ्या लोकांना देवाची योजना काय आहे याचे वर्णन या वाचनात आढळते. या योजनेचचा कोनशिला जीवंत ख्रिस्तहा आहे. त्याच्याजवळ येत असता; याचा अर्थ आपण त्याच्याजवळ नेहमी स्व:त होऊन येत असल्यामुळे आपण अधिक ख्रिस्तासारखे बनत जातो. ख्रिस्ताची मंडळी आध्यामिक मंदिर आहे आणि सर्व विश्वास ठेवणारे पवित्र म्हणजे देवासाठी वेगळे केलेले याजक आहेत. या याजकांना देवाला आवडणारे यज्ञ करायचे आहते. ते यज्ञ म्हणजे ख्रिस्ताद्वारे देवाची स्तुती करणे.
कोनशिला: ज्या दगडावर इमारतीचे बांधकाम टेकलेले असते त्या दगडाला कोनशिला म्हणतात. ख्रिस्त कोनशिला आहे. विश्वास ठेवणारे त्याच्यावर अवलंबून राहतात. त्यांची कधीच फजिती होणार नाही. त्यांना ख्रिस्त फारच मोलवान वाटतो.

शुभवर्तमान: योहान १४:१-१२
          पित्याचे घर हि अंतकरणातील गौरवी आशा आहे. देवाची सर्व मुले पित्याच्या घराकडे चालली आहेत. तेथे जागेचा तुटवडा नाही. ख्रिस्त त्यांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी गेला आहे. पित्याच्या घरी गेल्यावर तेथे कायम राहायचे आहे. प्रभू येशु ख्रिस्त स्वत: येईल व देवाच्या सर्व मुलांना पित्याच्या घरी नेईल. मग ते ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय सुखात राहतील. आपण पित्याच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर आहात का याची खात्री करून घेऊन जीवन जगले पाहिजे. ख्रिस्त सत्य आणि जीवनाचा मार्ग आहे. ख्रिस्ताचा स्वीकार करणाराच पित्याकडे येतो व तोच पित्याच्या घराकडे चालला आहे. पित्याच्या घरी जाणाच्या मार्गावर पित्याची ओळख होते. ख्रिस्ताला ओळखणे म्हणजे देवपित्याला ओळखणे.

मनन चिंतन:
          असे म्हणतात की, “जेव्हा एखादा माणूस सत्याच्या मार्गावर चालतो; तेव्हा सुरुवातीस त्याला वेदना सहन कराव्या लागतात. परंतु शेवटी त्या व्यक्तीचा विजय सार्थक बनत असतो.” म्हणजेच; मार्ग जर का सत्याचा असेल तर, शेवटी जीवन अर्थपूर्ण बनत असते.
          आज ख्रिस्त म्हणतो, “मीच मार्ग, सत्य, व जीवन आहे.” फिलिपने ख्रिस्ताला विचारले की, “प्रभु आम्हाला पिता दाखवा!” तेव्हा ख्रिस्त उद्गारला की, “मीच मार्ग, सत्य, व जीवन आहे. माझ्याकडे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” “No one come to the father accept through me.”
          आता पिता कोण आहे? हे जर का ओळखून घ्यायचे असेल तर, प्रथम ख्रिस्ताला ओळखून घ्यावे लागते. ख्रिस्त म्हणतो की, “मीच मार्ग, सत्य, व जीवन आहे.” आणि म्हणूनच आज आपण ह्या महत्त्वाच्या तीन रहस्यावर मनन-चिंतन करणार आहोत.
          १) मार्ग:
          मार्ग हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. एका आईचा मार्ग बाळाच्या पाळण्याकडे असतो. तर, एका शिक्षिकेचा विद्यार्थ्याच्या यशात. एका खेळाडूचा त्याच्या मैदानाकडे. तर, एका शेतकऱ्याचा शेताजवळ असतो. म्हणजेच प्रत्येकाचा मार्ग हा त्याच्यावर अवलंबून असतो. कधी-कधी मार्ग हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो.
          फादर घोन्सालो डिसिल्व्हा यांनी लिहिलेल्या “ही पहाट पुनरुत्थानाची” ह्या कादंबरीत ते म्हणतात की, “आपल्या आयुष्याच्या पाऊल वाटा ह्या सदैव फुलांनी सजलेल्या असतात असे नाही! तर, त्यात दुःखाचे, व नीराशेचे, काटे-कुटे व दगड-धोंडे आढळतातच व हे वास्तविक, सत्य आहे.” म्हणून ख्रिस्त सांगत आहे की, “दुःखाच्या व निराशेच्या काट्यांना व दगड-धोंड्यांना घाबरून जाऊ नका. तर, माझ्या तत्त्वाचे व मूल्यांचे पालन करा. म्हणजेच माझ्या मार्गावर चाला.
          म्हणजेच आपल्या आयुष्याच्या पाऊलवाटा ओलांडताना जर का आपण ख्रिस्ताची मुल्ये व शिकवण आपल्या अंगी बाळगली; तर, ख्रिस्ता बरोबर स्वर्गीय पित्याची सुद्धा आपल्याला ओळख होऊन जाईल.
          २) सत्य:
          सत्य हे ऐकणाऱ्याच्या व पाहणार्‍याच्या इच्छेचा काहीही विचार न करता जशाच्या तसे उगवत्या सूर्याप्रमाणे पुढे येत असते. म्हणून असे म्हणतात की, “जेथे सत्याची जाण तेथे नाही कुठलीच घान, व जेथे असत्याचा भरमाप तेथे होईल नाश आपोआप.” जे सत्यावर उभारलेले नसते; त्याची उंची कितीही असली तरी ते उंच नसते.
          आज ख्रिस्त म्हणतो, “मी सत्य आहे.” कारण ख्रिस्त सत्यात जीवन जगत होता. त्यामुळे कुठेतरी शास्त्री व पुरुषांचा ढोंगीपणा चव्हाट्यावर यायला लागला होता. त्यांना येशू ख्रिस्ताची म्हणजेच सत्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी ख्रिस्ताचा काटा काढण्याचा कट रचला होता. परंतु, अशा ह्या परिस्थितीत माणुसकीच्या जाळ्यात देहाची रस्सी खेचाखेच होत असताना सुद्धा तो शांत होता. का? कारण, तो सत्याने वागत होता आणि म्हणून आज तो आपल्याला जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत सत्याची वाट चालण्यास बोलावत आहे. त्याने शिकलेली मुल्ये व तत्त्व आत्मसात करण्यास व सत्य अंगी बाळगण्यास बोलावत आहे.
          ख्रिस्त, साधु-संत, विचारवंत सांगतात की, ‘सत्य हा स्वर्गात जाण्याचा जीना आहे.’ आणि ख्रिस्त म्हणतो की. “मीच तो जीना आहे. मीच ते सत्य आहे. जो कोणी माझे अनुकरण करतो त्यास पित्याची ओळख होते.”
          ३) जीवन:
          आपले जीवन हे रहस्यमय जीवन आहे. कधी सुखात हसणार तर कधी दु:खात रडणार ह्याची जाणीव नसते. अश्या ह्या जीवनात जीवन जगण्याची आशा आज ख्रिस्त आपल्याला देत आहे. ख्रिस्त म्हणतो की, “मीच जिवन आहे, जर का माझ्यावर विश्वास ठेवाल आणि मी शिकलेली मुल्ये व तत्त्वे आत्मसात कराल; तर, तुम्हास अनंत काळाचे जीवन प्राप्त होईल.”
          अशाप्रकारे ख्रिस्त जो ‘मार्ग, सत्य, व जीवन आहे.’ त्याची शिकवण अंगी बाळगण्यास व त्याच्या द्वारे पित्याची ओळख करून घेण्यास आजची उपासना आपणास बोलावत आहे.
          शेवटी एवढेच म्हणेन की,...
“जर का स्वतःकडे पहाल तर, कदाचित स्वकेंद्रित राहाल.
जर का परिस्थितीकडे पहाल तर कदाचित निरुस्थायी व्हाल.
 परंतु, जर का ख्रिस्त, जो ‘मार्ग, सत्य व जीवन आहे.’
त्याच्याकडे पहाल तर तुम्हाला त्याची ओळख होईल.
 तुम्ही ही नक्कीच सुखी व समाधानी व्हाल.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू, आम्हाला तुझे साक्षीदार बनव.”
१. आपल्या ख्रिस्तसभेचे पोप महाशय फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. पापी, जकातदार व समाजाने बहिष्कृत केलेल्या व्यक्तीबरोबर प्रभू तुझे कार्य आम्हाला प्रेरणा देवो जेणेकरून आम्ही तुज्या सुर्वार्तेची घोषणा सर्व ठिकाणी पसरू म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना ह्या रोगापासून मुक्तता मिळावी त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे वासना, व्यसन यांच्या आधीन गेले आहेत, जे मृत जीवन जगत आहेत त्यांना आमच्या सेवेद्वारे नवजीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. पर्यावरणाची काळजी घेऊन स्वच्छ व सुंदर विश्व बनविण्यासाठी आम्ही झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व व्ययक्तिक हेतू आपण प्रभू चरणी अर्पण करू या.

No comments:

Post a Comment